सॅबी परेरा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आत्याने किंवा मावशीने परस्परांच्या स्वभावाची, चारित्र्याची, उत्पन्नाची, खानदानाची हमी घेतलेली असताना, कुंडली जुळवून, दहा ठिकाणी चौकश्या करून, चार-सहा महिने आपल्या पैशाने हॉटिलिंग, शॉपिंग आणि नाटक-सिनेमे पाहिल्यानंतर, देवाच्या साक्षीने लग्न करून, एखाद-दुसरं अपत्य झाल्यावरही आपली बायको आपल्यावर विश्वास ठेवत नाही. आणि तिथे आजकालच्या पोरी केवळ ‘फेसबुक’ किंवा ‘पब्जी’ या आभासी माध्यमातून ओळखी झालेल्या प्रियकरावर विश्वास ठेवून खुशाल आपल्या कुटुंबाला सोडून अनोळखी देशात निघून जातात याचं आपल्याला आश्चर्य, कौतुक आणि क्वचित भीती वाटायला हवी.. माध्यमे आणि समाजमाध्यमे सीमापार प्रेमाच्या कहाण्यांनी उतू चालली असताना त्यावर तिरकस दृष्टिक्षेप..
‘रिफ्युजी’ या इंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमातील एका गाण्यात, जावेद अख्तरच्या शब्दांत एक प्रेमी युगुल म्हणते की, देशाच्या-प्रांताच्या सीमा या केवळ माणसांसाठी असतात. पक्षी, नदी, हवा यांना या सीमा लागू होत नाहीत. आपण जर पक्षी असतो तर ही सारी धरती आपली असती, या निळ्या आसमंतात आपण कुठेही मुक्त विहार करू शकलो असतो. देशा-प्रांताच्या सीमांची तमा न बाळगता एकमेकांवर प्रेम करू शकलो असतो. मी जर नदी असते अन् तू वाऱ्याची झुळूक असतास तर तुझ्या स्पर्शाने माझ्यात तरंग उमटले असते आणि त्या उमटलेल्या तरंगांनी, त्या लाटेने कुठल्या देशात, प्रांतात जायचे यायचे यावर कुणी तिसरी शक्ती अंकुश ठेवू शकली नसती.
हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेल्या दोन बातम्या. पहिली बातमी : सीमा हैदर नावाच्या एका पाकिस्तानी स्त्रीची एका ऑनलाइन पोर्टलवर सचिन मीना नावाच्या भारतीय तरुणाशी ओळख झाली, मैत्री झाली आणि पुढे ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडून सचिनशी लग्न करण्यासाठी ही स्त्री अनधिकृत मार्गाने भारतात दाखल झालीय. दुसरी बातमी : अंजू ही भारतीय महिला, नसरुल्लाह नावाच्या आपल्या पाकिस्तानी फेसबुक मित्राला भेटण्यासाठी अधिकृतपणे पाकिस्तानला गेली आणि तिथे तिने त्याच्याशी लग्न केलंय. या बातम्यांतून दिसणाऱ्या आभासी जगतातील प्रेमाच्या या विस्तारणाऱ्या सीमा आणि विशेषत: मीडियातील त्याच्या बटबटीत वार्ताकनाने भारतीय समाजमन अक्षरश: ‘हैदरून’ गेलं आहे.
या बातम्यांच्या ताज्या उपबातम्या दिसतात त्या जोधपूरच्या तरुणाचे पाकिस्तानच्या तरुणीशी ‘ऑनलाइन’ विवाह, उत्तर प्रदेशाच्या तरुणाचं बांगलादेशला लग्नबंधनात अडकणं, श्रीलंकेच्या तरुणीचा हैदराबादेत येऊन फेसबुक मित्राला पती-परमेश्वर बनवणं. तिकडे पाकिस्तानमध्ये भारतासह चिनी, अमेरिकी आणि दक्षिण अमेरिकी ‘बहुं’चा बहुआकडा वाढत जाणं यांच्या.
वीसेक वर्षांंपूर्वी जेव्हा नव्यानेच सोशल मीडियाचा उगम झाला होता तेव्हा चाटरूममध्ये परक्या व्यक्तीशी संभाषणाला सुरुवात करताना ‘अरछ?’ म्हणजे तुमचं वय, लिंग आणि राहण्याचं ठिकाण काय आहे? असं विचारण्याचा प्रघात होता. आता सोशल मीडियावरून ज्या प्रकारे जोडय़ा जुळत आहेत ते पाहता, आताच्या घडीला सोशल मीडियावर आणि विशेषत: डेटिंग साइट्सवर वावरणारी पिढी एकमेकांच्या खोल-खोल प्रेमात पडून लग्नाचा निर्णय
घेईपर्यंत ही चौकशी करीत असतील असं वाटत नाहीये. या आभासी दुनियेच्या सुरुवातीच्या काळात, माझ्या एका उच्चशिक्षित, श्रीमंत आणि कर्तबगार मैत्रिणीला याहू चॅटरूममध्ये आपला जन्माचा जोडीदार गवसला होता. ‘तुझ्या-माझ्यात येणारी प्रत्येक भिंत मी पाडणार, तुझ्या-माझ्यातला प्रत्येक डोंगर मी फोडणार’ या त्याच्या वचनावर भाळून ती त्याच्यासाठी अक्षरश: पागल झाली होती. एके दिवशी ती त्याला प्रत्यक्ष भेटायला गेली. तेव्हा तिला कळलं की, तो ‘जेसीबी’ चालवायचा!
तुम्हाला सांगतो, इथे आत्याने किंवा मावशीने परस्परांच्या स्वभावाची, चारित्र्याची, उत्पन्नाची, खानदानाची हमी घेतलेली असताना, कुंडली जुळवून, दहा ठिकाणी चौकशा करून, चार-सहा महिने आपल्या पैशाने हॉटेलिंग, शॉपिंग आणि नाटक-सिनेमे पाहिल्यानंतर, देवाच्या साक्षीने लग्न करून, एखाद-दुसरं अपत्य झाल्यावरही आपली बायको आपल्यावर विश्वास ठेवत नाही. आणि तिथे या पोरी केवळ ‘फेसबुक’ किंवा ‘पब्जी’ या आभासी माध्यमातून ओळखी झालेल्या प्रियकरावर विश्वास ठेवून खुशाल आपल्या कुटुंबाला सोडून अनोळखी देशात निघून जातात याचं आपल्याला आश्चर्य, कौतुक आणि क्वचित भीती वाटणेही साहजिकच आहे.
खरं तर प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. कुणी कुणावर प्रेम करीत असेल तर त्यात तिसऱ्या कुणाला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. पण हल्ली द्वेष करणे हेच राष्ट्रकार्य ठरल्यामुळे प्रेम करणे हा गुन्हा झालाय. फाळणीच्या जखमा भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही बाजूचे लोक आजही कुरवाळत आहेत. बाबरी मशीद प्रकरण, काश्मीरचा वाद, भारतातील अतिरेक्यांना पाकिस्तानात आश्रय दिल्याच्या घटना, त्यांनी घडवलेलं पुलवामा, आपण केलेला सर्जिकल स्ट्राइक, सीमेवर त्यांच्याकडून वारंवार केली जाणारी आगळीक, भारतात मुसलमानांवर आणि पाकिस्तानात हिंदूंवर अन्याय होत असल्याची उभयपक्षी भावना.. अशा अनंत जखमा आणि त्यातून वाहत असलेला द्वेषाचा पू आपल्या शरीरावर वागवत असलेल्या या दोन्ही देशांतील बऱ्याच लोकांना सीमा-सचिन आणि अंजू-नसरुल्लाह यांच्या प्रेम प्रकरणाचं ‘अँटिसेप्टिक’ खूपच झोंबल्याचं दिसून येत आहे.
कुणी ऑनलाइन प्रेमात पडतं आणि लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहोचतं हेच अजून आपल्या पचनी पडत नाहीये. आपल्या देशात लग्न जुळविण्यासाठी मॅट्रिमोनी साइट्सचा उगम झाल्याला आज दोन दशकं झाली असली तरी त्यांनी फारसं बाळसं धरलेलं नाहीये. सुयोग्य वधू किंवा वर शोधण्यासाठी काका-मामा-आत्या-मावशा या पारंपरिक माध्यमांनाच आपलं प्रथम प्राधान्य असतं. ऑनलाइन शॉपिंग हे आज आपल्याकडे बऱ्यापैकी रुळलेलं असलं तरी लग्नाचा जोडीदार शोधण्यासाठी ऑनलाइन पोर्टल हा अगदीच नाइलाजाने आणि अखेरचा पर्याय समजला जातो. वर-वधू संशोधनासाठी आपण साधने जरी आधुनिक वापरली तरी तिथे आपण आपल्या अपेक्षा मात्र पारंपरिकच घेऊन जातो. कॉम्पुटरवर कुंडली बनविणे, छत्तीस गुण जुळविणे, आपल्याच धर्माचा, जातीचा, पोट-जातीचा जोडीदार हवा असणे, लग्नाच्या जाहिरातीत वरमुलाचा पगार वाढवून लिहिणे. मुलगी काळी असली तर सावळी, सावळी असली तर गव्हाळ, गव्हाळ असली तर निमगोरी आणि निमगोरी असली तर गोरी अशी एकेक पायरी वाढवून लिहिणे. आडून-आडून हुंडय़ाच्या अपेक्षा मांडणे. थोडक्यात, पारंपरिक लग्न जुळविण्याच्या बाबतीत मध्यस्थ लोक ज्या ज्या क्लृप्त्या करायचे त्याच आपण आताच्या डिजिटल युगातही करीत आहोत. त्यामुळे लग्न जुळविण्याची साधनं जरी आपण डिजिटल वापरू लागलो असलो तरी आपली मानसिकता अजून ‘अॅनालॉग’च राहिलेली आहे. असो, खरंतर नसो!
या घटनेबद्दल सोशल मीडिया आणि टीव्हीवर प्रतिक्रिया देणारे लोक म्हणतात की, आमचा प्रेमाला विरोध नाहीये पण त्या स्त्रियांनी आपल्या समाजाचा, देशाचा विचार करायला हवा होता. माझ्या मते, शेवटी देश आणि समाज म्हणजे काय हो? एकत्र असण्याची भावना! ही भावना वाढीस लागणे महत्त्वाचे. तसेही, आज ना उद्या भारत-पाकिस्तान एकत्र येऊन अखंड हिंदुस्थान होणारच, अशी कोटय़वधी भारतीयांना खात्री आहेच. त्यामुळे अंजू आणि सीमा या मुलींनी केलेलं धाडस हे अखंड हिंदुस्थानच्या निर्मितीच्या दिशेने उचललेलं पाऊल मानायला हरकत नाही.
हे असं फेसबुकवर टाइमपास करता-करता किंवा पब्जीसारखे ऑनलाइन खेळ खेळता-खेळता प्रेम जुळणं, प्रेमाची कबुली देणं आणि त्या प्रेमाला लग्नाच्या बोहल्यापर्यंत घेऊन येणं, हे या हल्लीच्या पोरांना कसं काय साधतं याचं मला खूप आश्चर्यमिश्रित कौतुक वाटून राहिलंय. आपल्या लहानपणी आपण शाळेच्या भिंतीवर ‘आय लव्ह अमकी-तमकी’ असं कोळशाने लिहिलं असतं तर कदाचित मास्तरांकडून छडय़ांचा प्रसाद मिळाला असता, कदाचित आज देशात कोळशाची कमतरता अधिक तीव्रतेने भासली असती. पण आज आपल्यासोबत, आपल्या कुशीत आपली लाडकी चंद्रकोर असू शकली असती. इतकीशीही हिंमत दाखवता न आल्याने खूप मोठी संधी गमावल्याची खंत आजही माझ्या मनाला वाटतेच.
आज समाजातील स्वत:ला देशप्रेमी मानणारा एक घटक, सीमा-सचिन आणि अंजू-नसरुल्लाह यांच्या प्रेम प्रकरणांवर टीका करीत आहे. पण आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे असे मला वाटते. आज मीडियावाल्यांनी कौतुकाने नोंद घ्यावी असं काही विधायक काम सत्ताधारी लोक करीत नाहीत. ईडीच्या लाथा आणि सीबीआयच्या बुक्क्याच्या धास्तीने विरोधकही काही बोलत नाहीत. सर्वसामान्य जनता तर रेशनवरील दोन रुपये किलोवाले मूग गिळून बसली आहे. अशा वेळी सीमा हैदर आणि अंजू थॉमससारख्या निधडय़ा छातीच्या शूर बाया देशप्रांताच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रेम प्रकरणं करतात. त्यांच्या रसभरीत बातम्यांना मीठ-मसाला लावून पुन्हा पुन्हा ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवता येतात. यामुळेच न्यूज चॅनेल्स आणि ऑनलाइन न्यूज पोर्टलवाल्यांच्या घरच्या चुली पेटतात, त्यांच्या गरीब बिचाऱ्या पोराबाळांच्या पोटात चार पिझ्झाचे तुकडे जातात. हे आपण लक्षात घ्यायला हवे.
या दोन्ही प्रकरणातील स्त्रिया या विवाहित असूनदेखील त्या आपल्या नवऱ्यांना सोडून गेल्याबद्दल काही लोकांना आश्चर्य वाटल्याचे दिसले. खरं तर स्त्रीने नवऱ्याच्या बाबतीत असमाधानी आणि प्रियकराच्या बाबतीत आशावादी असणे हा मानसशास्त्राचा भाग आहे. प्रियकर हा नेहमीच परिपूर्ण असतो. मात्र नवऱ्याला मर्यादा असतात. कारण संसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं, असू शकतं. प्रेमात ‘मी’ उरत नाही म्हणून संघर्ष नसतो. संसारात पडताना आपण ‘मी’ सोबत घेऊन जातो. त्यामुळे संघर्ष अटळ असतो. सीमा, अंजू सारख्या हल्लीच्या पोरी एक्स्ट्रा स्मार्ट आहेत. त्यांना ठाऊक आहे की, नवरा अरसिक असणे हा आपल्या नशिबाचा भाग असला तरी प्रियकरदेखील अरसिक गटवणे हा आपला नाकर्तेपणा ठरेल!
आपण बॉलीवूडचे हिंदी सिनेमे पाहत पाहत मोठे झालोत. हिंदी सिनेमात दोन कुटुंबात खानदानी वैर असते. त्यापैकी एका कुटुंबातील तरुण मुलगी दुसऱ्या कुटुंबातील तरुणाच्या प्रेमात पडते. त्यावरून दोन्ही कुटुंबात भांडणे होतात. परस्परांच्या खानदानाचा अपमान करण्याचे, परस्परांना त्रास देण्याचे प्रकार घडतात. प्रचंड खूनखराबा होतो. सिनेमाच्या शेवटी जेव्हा या सगळ्या संकटांवर मात करून दोन्ही प्रेमी एकत्र येतात तेव्हा आपण खूश होतो. क्वचित प्रसंगी ते प्रेमी जीव एकत्र येऊ शकले नाहीत, त्यांना आत्महत्या वैगेरे करावी लागली तर आपण हळहळतो. आपले डोळे भरून येतात. कारण कुटुंबांच्या द्वेषावर प्रेमाचा विजय व्हावा अशी आपली भूमिका असते. पण हीच घटना जेव्हा खानदानी वैर असलेल्या भारत नावाच्या श्रीमंत, पुढारलेल्या आणि पाकिस्तान नावाच्या गरीब, मागासलेल्या देशाच्या बाबतीत घडते तेव्हा या दोन देशातील वैरामुळे त्या प्रेमी युगुलांच्या प्रेमाचा बळी जाऊ नये ही आपली भूमिका कुठे जात असेल?
आपल्या भारतीयांचा अहं सुखावणारं एक निरीक्षण असं आहे की, आपल्या मुलांना (आणि त्यांच्या पुढच्या पिढीला) भारतात जितकं उज्ज्वल भवितव्य आहे तितकं ते पाकिस्तानात नाही, हे या दोन्ही स्त्रियांना पुरतं ठाऊक आहे. त्यामुळेच पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा आपल्या पोरांना घेऊन आलेली आहे आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू आपल्या मुलांना भारतातच ठेवून गेलेली आहे. ही त्या सीमा आणि अंजू नावाच्या प्रेयसींवर त्यांच्यातल्या आईपणाने केलेली मात आहे.
आणखी एक निरीक्षण असं की, या दोन्ही घटनांमध्ये आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आपलं घरदार, कुटुंब, समाज, देश या सगळ्यांचा त्याग करून आपल्याला आपल्या संपूर्ण देशवासीयांच्या द्वेषाचा अन् टीकेचा मारा सोसावा लागेल याची, आपल्या चारित्र्यावर आणि देशप्रेमावर घेतल्या जाणाऱ्या संशयाची पर्वा न करता धाडस करून आपल्या घरातून बाहेर पडून नवख्या प्रदेशात जाणाऱ्या, प्रसंगी त्यासाठी अनधिकृत मार्ग चोखाळणाऱ्या या महिला आहेत. दोन्ही घटनांतील पुरुष ही हिंमत दाखवू शकले नाहीयेत. हे बाईपण देखील भारीच आहे देवा!
शेवटी प्रेम करणं महत्त्वाचं. नफरत के शहर में मोहब्बत कि दुकान उघडणं महत्त्वाचं! प्रेमाचं वातावरण निर्माण होणे महत्त्वाचं! इतरांवर प्रेम करणे जितकं महत्त्वाचं तितकंच स्वत:वर प्रेम करणेही गरजेचं. आपलं आपल्या कुटुंबीयांवर प्रेम असतं, आपल्या समाजावर प्रेम असतं. देशावर, देवावर, धर्मावर, जातीवर, राजकीय पक्षाच्या नेत्यावर, इतिहासातल्या महापुरुषांवर असं सगळ्यांवर प्रेम असतं, पण स्वत:वर मात्र प्रेम नसतं. आपल्याला कुणाबद्दल प्रेम वाटत असेल तर त्या आतल्या भावनेबद्दल आपल्याला प्रेम नसतं. आपल्याकडे जगण्याचे जे काही बहाणे असतात, त्यातही स्वत: सोडून सगळं जग असतं. स्वत:चा विचार करणं, हा जणू अपराध आहे, असं जणू आपण ठरवूनच टाकलं आहे. त्यामुळे शंभरातले नव्व्याण्णव लोक जेव्हा दोन पर्यायातून एकाची निवड करायची असते तेव्हा इतर कुणाची मर्जी राखण्यासाठी आपल्या स्वत:च्या इच्छेचा, भावनेचा, प्रेमाचा बळी देतात. अशा अनाठायी ‘पीयर प्रेशर’ला बळी न पडता आपल्या हृदयाच्या हाकेला ओ देणाऱ्या सीमा, अंजू आणि त्यांच्यासारख्याच अनेकांना हार्दिक शुभेच्छा देऊन, पब्जी खेळण्यासाठी मला उशीर होतोय म्हणून मी तुमची रजा घेतो.
sabypereira@gmail. Com