क धी उंच लाटेवर स्वार, तर कधी काठाशी निमूट कचराकाडीप्रमाणे.. केव्हातरी एकदम प्रकाशझोतात, तर काही काळ अंधारा कोपरा नशिबी येतो.. एकेकाळी सर्वाच्या ओठी असणारे नाव काळाच्या पोटात गडप होते. माणसाच्या, एखाद्या भाषेच्या, कुणा समूहाच्या वाटय़ाला येणारे हे भोग काही लेखकांच्या, काही साहित्यकृतींच्या, काही साहित्यप्रकारांच्या वाटय़ालाही येतात. अशा गोष्टी ठरवून होतात असे नाही. काहीजणांनी अथवा एखाद्या गटाने काही लेखक वा त्यांच्या कृती बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला तरी कलाकृती अस्सल असेल तर ती कालांतराने पुन्हा उसळी घेऊन प्रवाहाच्या मध्यभागी मिरवते. शेवटी काळ हाच फार मोठा समीक्षक ठरतो. अनेक हेलकावे, तडाखे, चढउतार सहन करूनही पन्नास-शंभर वर्षांनंतरही (हा कालखंड तसा छोटाच.. ‘काल अनंत आणि पृथ्वी विपुल’च्या तुलनेत!) जर एखाद्या लेखकाची वा कृतीची आवर्जून दखल घेतली जात असेल, तिच्या संदर्भाशिवाय पुढे जाता येत नसेल; अनेक आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरांनंतरही तो लेखक वा कृती ‘समकालीन’च ठरत असेल तर तिचे महत्त्व अबाधित ठरते किंवा ती कालातीत आहे असे आपण म्हणू शकतो.
‘आज’ म्हणजे प्रत्येकाचा एकेक वर्तमानकाळ असतो. त्या काळात लिहिणारे अनेक लेखक नावीन्याचा ध्यास असलेले असतात. नावीन्य आणि प्रयोगशीलता हा टप्पा थोडय़ा थोडय़ा काळानंतर प्रत्येक कलाक्षेत्राच्या बाबतीत अगदी ठरवूनदेखील आला वा आणला नाही तर तो प्रवाह पुढे जाणारच नाही. त्या प्रवाहात साचलेपण निर्माण होईल. त्याची गती कुंठित होईल. बऱ्याचदा असेही होते, की नवे लेखक वैचित्र्यालाच नावीन्य समजू लागतात. काही काळ या चटपटीत, भडक, आक्रस्ताळ्या, सामूहिक प्रयोगाचे आकर्षण वाटू लागते. पूर्वसुरींना आणि त्यांच्या लेखनाला नाकारण्याच्या नादात अनेकजण अधांतरी तरंगू लागतात आणि निर्थकतेच्या अवकाशात विरून जातात.
केशवसुतांचे उदाहरण याबाबतीत पाहण्यासारखे आहे. ‘कविकुलगुरू’, ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ अशी सार्थ बिरुदे मिरविणाऱ्या केशवसुतांना मधे वाईट दिवस आले होते. कलात्मकतेचा अभाव आहे, शैली ओबडधोबड आहे, शब्दकळा ‘सुंदर’ नाही, अकरा कविता फक्त बऱ्या आहेत, असेही आरोप त्यांच्यावर केले गेले. पण लिहिणारी प्रत्येक नवी पिढी केशवसुतांमध्ये आपल्यासाठी काहीतरी शोधत गेली आणि तिला ते सापडतही गेले. मार्क्सवादी नारायण सुर्वे आणि आंबेडकरवादी यशवंत मनोहर या देव न मानणाऱ्या कवींनाही देव मानणारे केशवसुत आपले वाटले, ही गोष्ट लक्षणीय वाटते. दामले या नामबंधाच्या पलीकडे पाहणारे केशवसुत, सामाजिक मागासलेपणाला धिटाईने (तो काळ पाहता) उजागर करणारे केशवसुत, कविता या साहित्यप्रकाराचाच अनेक अंगांनी शोध घेणारे केशवसुत सर्वच पिढय़ांना आपले वाटू लागले. (कधी कधी असे वाटते की, केशवसुतांच्या काळातील लोक खूपच समंजस आणि उदार मनाचे असावेत. केशवसुतांनी आज- म्हणजे २०१३ साली ‘ब्राह्मणही नाही आणि मी हिंदूही नाही’ असे लिहिले असते तर आपण त्यांना सहजपणे स्वीकारले असते? आता पुन्हा एकदा केशवसुतांच्या स्थानाला धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे. महात्मा फुले हेच आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत, असे सिद्ध करण्याची जबाबदारी काही जबाबदार लोकांनी आपल्या शिरावर घेतली आहे असे ऐकतो. असो!)
निसर्गकविता आणि प्रेमकविता यांनाही सध्या वाईट दिवस आलेले दिसतात. बालकवी, बोरकर, पाडगांवकर, महानोर यांच्या कवितेतला निसर्ग प्रत्यक्षात हरवलाय का? याचे उत्तर ‘होय’ असे आहे. पण हरवलाय तो हिरवा निसर्ग. पण तो काही निसर्गाचा एकमेव रंग नाही. बालकवींच्याच ‘खेडय़ातील रात्र’, ‘पारवा’ या कवितेतला करडा, कोरडा, भीषण निसर्ग पुढे कुठे गेला? हिरवाई पूर्णपणे तर संपून गेली नाही ना! ‘अजून येतो वास फुलांना.. अजून माती लाल चमकते..’! पण खरी गोष्ट अशी आहे की, निसर्ग आधी कवीच्या मनात पाहिजे! गेल्या वीस-पंचवीस वर्षांत सामाजिकतेचा बोलबाला आणि दडपण इतके वाढले, की चंद्र, फुले, चांदण्या, नदी, झरा यांचा उल्लेखही कवितेत येणे म्हणजे दंडनीय अपराध आहे की काय असेच कवींना वाटत असावे. दुसरीकडे प्रेमाची गोष्ट (!) मी तर एकेकाळी खूपच घाबरलेलो होतो. एकीकडे ‘साहिर’ लुधियानवीची तंबी..
जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है
जुल्फ ओ रुख्सार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है..
दुसरीकडे कुसुमाग्रजांनी आधी करावयाचे महत्त्वाचे कर्तव्य कोणते, हेही सूचित केले होते-
काढ सखे गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलीकडे
उभे दिवसाचे दूत..
बाप रे! म्हणजे केवढी पंचाईत! (वान्द्रे येथे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ‘साहित्य सहवास’मध्ये कवितेविषयी बोलताना शांताबाई शेळके डोईवरला पदर सारखा करीत त्यांच्या शांत स्वरात सौम्य वैताग प्रकट करीत म्हणाल्या होत्या, ‘काय बाई, हा स्वभाव! इथेही दोष त्या स्त्रीलाच. तू जा ना बाबा, काय कुठे देशकार्य करायला जायचे ते..’ तेव्हा मी आणि प्रभुणे खोखो करून हसलो होतो.) असो!
अलीकडे आणखी एका लेखनप्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. तो म्हणजे एकांकिका. त्याचे कारण एकांकिका स्पर्धाची संख्या कमी झाली, हेही असावे. आजचे माहीत नाही; पण काही वर्षांपूर्वी मराठवाडय़ातील हिंगोलीसारख्या आडगावी (आताचे जिल्हय़ाचे गाव) राज्यपातळीवरील एकांकिका स्पर्धा होत असे; जी तीन-तीन दिवस चालत असे. एकांकिका छापणारी, नाटय़कलेशी संबंधित नियतकालिके कमी झाली (वा बंद झाली), हेही एक कारण असावे. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, वृंदावन दंडवते, माधव आचवल, मनोहर शहाणे या लेखकांनी एकांकिका हा साहित्यप्रकार म्हणून प्रतिष्ठित केला होता. (रमेश पवारांची ‘भाजी, पाव आणि ऱ्हिदम’ कशी विसरता येईल?) आताही नवे लेखक नवे लेखन करीत आहेत; पण स्पर्धेच्या निमित्ताने! एक वाङ्मयप्रकार म्हणून नाटकाचे वजन असलेल्या एकांकिकांचे लेखन आज फारसे होताना दिसत नाही.
नाटय़छटा हा प्रकार काही वर्षांपूर्वीपर्यंत निदान शाळांमधल्या स्नेहसंमेलनांमध्ये लिहून सादर केला जात असे. पण आता गॅदरिंगमध्ये सात ते दहा वर्षांची मुले आणि मुली ‘चिकनी चमेली’ आणि ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ सादर करतात. मराठी नाटय़छटेला तिथे उभे राहण्यास जागाच नाही.
मधे कथेला वाईट दिवस आले की काय असे वाटत होते. शिवाय रा. रा. ‘हिंदू’रावांनी फतवा काढला होता की, उदाहरणार्थ कथा हा फालतू आणि तकलादू साहित्यप्रकार आहे! पण त्यांच्या अनुयायांनीच फक्त हा फतवा गंभीरपणे घेतला. (कारण त्यांचे अनुयायी त्यांच्यासारख्याच कादंबऱ्या लिहीत होते. कथा लिहीतच नव्हते!) खरे तर कथेला वाईट दिवस कधीच येणार नाहीत. याचे कारण तिच्या रचनाबंधामध्ये आहे. खंडित, विभाजित, तुकडे होत चाललेल्या जीवनाचे रूप बंदिस्त करण्यासाठी कथेइतका अनुरूप वाङ्मयप्रकार नाही. ‘कथा म्हणजे गोष्ट’ अशी एक साधी व्याख्या केली की मानवी मनाचे कुतूहल शमविण्याची तिची क्षमता लक्षात येते.
सध्या जोमात आणि जोरात असलेला एकमेव वाङ्मयप्रकार म्हणजे कादंबरी. (इतका, की पुन्हा एकदा कोणीतरी ‘नावलांची कीड’ असा लेख लिहील की काय, अशी भीती वाटते आहे. असो!) आज मराठी कादंबरीच्या विषयांमध्ये आणि मांडणीमध्ये इतकी विविधता आणि प्रयोगशीलता येत आहे, की नव्या कादंबरीकारांचे कौतुक आणि स्वागतच केले पाहिजे. ते होतही आहे. सध्याचा मोसम हा कादंबरीसाठी बहराचा आणि पारितोषिकांचा मोसम आहे. (असेही कधी कधी वाटते की, दहा-बारा वर्षांपूर्वी भारताच्या राष्ट्रपतींनी असा वटहुकूमच काढला होता की काय, की पुढील दहा वर्षे मराठी भाषेतील साहित्य अकादमीचे पारितोषिक फक्त कादंबरी या साहित्यप्रकारातच देण्यात यावे.)
समाजाची अभिरुची वेगवेगळ्या काळांत बदलली आहे असे दिसते. काही वेळा काही राजकीय वा सामाजिक समूह काही लेखकांना वा लेखनप्रवाहांना उचलून धरताना दिसतात. प्रलोभन आणि दडपण यांना बळी पडून केलेले लेखन गुणवत्तेचे निकष कधीच पूर्ण करू शकत नाही. त्यांचे आयुष्यच मग दहा-वीस वर्षांत संपून जाते. पण काळाला तोंड देत लव्हाळीसारखे टिकून, जिवंतपणे डोलणारे लेखन मराठीत गेल्या साडेसातशे वर्षांत बरेच निर्माण झाले आहे, ही समाधानाची बाब आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा