तुम्हांला आले का हो पत्र?.. तुम्हांला?
आम्हांला आले!
आले म्हणजे काय आदळलेच!
छान गुळगुळीत गुलाबी पाकीट. उत्सुकतेने खोलले..
आणि काय सांगू? पायांतील त्राणच गेले! अंगास कोरड पडली! घशास दरदरून घाम फुटला! काही सुचेनासे झाले! कचेरीत मेमो हाती पडता येते तीच तंतोतंत स्थिती!
काय झाले काय विचारता? संत व्हॅलंटाईन दिनी पाकिटातून असे अत्तरबाज पत्र निघाल्यावर कोणाही सभ्य, सौंसारी, आतख्याली माणसाचे असे नाही होणार, तर काय होणार?
थरथरत्या हाताने आणि धडधडत्या अंत:करणाने तो कागद वाचू लागलो..
माझ्या दिल्लीच्या दिलवरा,
किती रे छळशील मला? तुझ्या वाटेकडे मी कधीची डोळे लावून बसले आहे. तुझ्यासाठी कधीपासून हे कमलदलाचं काप्रेट अंथरलं आहे. पण मेलं, आमचं लक्ष तुमच्याकडं आणि तुमचं आपलं भल्तीकडं!
मला समजलंय, तुला नवी झाडूवाली आवडू लागलीय. पण लक्षात ठेव- नवा झाडूसुद्धा सहा महिनेच टिकतो! आणि झाडूवाली फार फार तर घर साफ करील; घर सजवायला माझ्यासारखीच हवी! ती सटवाईपण कशी निलाजरी! कुणाचाही हात धरून मिरवतेय! मेलं, झाडूवालीबद्दल एवढं कसलं आकर्षण?
अरे माझ्या मतवाल्या मवाल्या, तुझ्यासाठी मी किती किती स्वप्नं पाहिलीत! तुझं-माझं सुंदरसं घर असेल. त्यापुढं झिलमिल सिताऱ्यांचं अंगण असेल. अंगणापुढं रस्ता असेल. रस्त्यावर टोल नसेल. भय नसेल. भूक नसेल. तुझ्यासाठी मी रोज रोज ढोकळा, खाकरा, उंधियो बनवीन. आपला एक चिमुकला असेल. त्याचं नावसुद्धा मी ठरवून ठेवलंय. विकास! आणि तू.. पण लक्षात ठेव- आता मीच आहे तुझ्या काळजाच्या गडाची गडकरीण!
हे वाचून आम्हांस फेफरे येणेच बाकी होते, तोच हातात दुसरा कागद आला. तोही पुन्हा गुलाबीच.. (की भगवा? हल्ली सगळे रंग एकसारखेच दिसतात!)
माझ्या मतवाल्या मावळ्या,
आधीचं सगळं पत्र माझंच समजून वाच. (फक्त ढोकळा, खाकरा सोडून. तिथं ‘वडापाव’ असं वाच.)
तू मर्दाचा बच्चा आहेस. बाहेर कुठंही शेण खाऊ नको. तसा तुझ्या हातात मी मंतरलेला गंडा बांधलाच आहे. तरीही लक्षात ठेव, तुला आई भवानीची आण आहे. मी धनुष्य आणि तूच माझा बाण आहे!
बाकी प्रत्यक्ष सामना झाल्यावर बोलूच.
हे नेमके काय चाललेय तरी काय, या विचाराने आम्ही दोन्ही मेंदू शिणवण्यास घेणार, तर पाकिटात आणखी एक चिठ्ठी दिसली. वाचणे भागच होते..
माझ्या असंतोषी असंतुष्टा, तू स्वत:ला काय समजतोस? हल्ली सतत मला नावं ठेवत असतोस. म्हणे मी एवढय़ा वर्षांत तुझ्यासाठी काय केलं? अरे विसरभोळ्या विघ्नसंतोष्या, एवढय़ात विसरलास? दहा वर्षांपूर्वी तुझ्याकडं काय होतं? पेजर वापरत होतास. मी तुला मोबाइल दिला. एटीएम कार्ड दिलं. साधा रस्ता माहीत नव्हता तुला. मी तुला विमान दाखवलं. तुझ्या खाण्यापिण्याचं सांभाळलं. आणि आता तू माझा हात सोडण्याच्या वार्ता करतोस? त्या झाडूवालीने तुझ्या मनात विष कालवलंय. ती कमळी गावभर सांगतेय की, मला लकवा झालाय. मला खाय-खाय सुटलीय. मी कोळसा खाते. आणि माझ्या बाहेरख्याली बावळटा, तू त्यावर विश्वास ठेवतोस? कोळसा म्हणजे काय डोसा आहे? तुला काहीच कसं रे कळत नाही? असं नको रे करूस राजा. तुला काय हवंय ते सांग. सगळं देते. अगदी मोफत! पण माझा हात सोडू नकोस.
हा काय चावटपणा आहे? व्हॅलंटाईन दिन झाला म्हणून काय झाले? एकाच पाकिटातून तीन तीन प्रेमपत्रं? तीही वेगवेगळ्या व्यक्तीची? आणि ती आम्हांलाच का? आम्ही का इतके उल्लू आहोत?
गुपचूप जाऊन आमचे परमशेजारी रा. रा. लेले यांच्या कानी हे प्रकरण घातले. तर ते खीखी हसूच लागले. म्हणाले, ‘अप्पा, काळजी नॉट! मलाही असंच एक पाकीट आलंय! सगळ्यांनाच आलं असणार.’
‘ते का बरं?’ आम्ही पहिल्यापासून असेच निरागस.
‘अहो, विसरलात काय?’
‘काय? आज व्हॅलंटाईन दिन आहे ते..?’
‘एका दिवसाचं काय घेऊन बसलात अप्पा? अहो, हे आख्खं वर्षच व्हॅलंटाईन वर्ष आहे!’
 

Story img Loader