मराठी, हिंदी, उर्दू (थोडीशी इंग्रजी) कविता वाचली. मन लावून, बुडून, पिशासारखी. स्वत:च्या लेखनाविषयी काही भ्रम असतील तर ही मंडळी ताळ्यावर आणतात. डोक्यात हवा गेली असेल तर फुग्याला टाचणी लावतात. शब्दांचा वारेमाप वापर केला किंवा दुरुपयोग केला तर कान पिरगाळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म. फुले,   डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळराव आगरकर, राजवाडे.. ही मंडळी तुमच्या मेंदूला वैचारिक दंश करतात. ज्याला आंधळा अनुयायी बनून संघटना बांधायच्या नाहीत त्या माझ्यासारख्या पामराला ही घुसळणही शहाणे करीत नसली, तरी सजग ठेवते. ललितलेखन फुलांप्रमाणे असेल, तर त्यासाठी वैचारिक लेखन खत-मातीचे कार्य करते.
प्रेप्यार अगर थामता न पथ में
उंगली इस बीमार उमर की
हर पीडा वेश्या बन जाती
हर आँसू आवारा होता
नीरज
म! सगळ्याच वैश्विक चलनाचा मूलाधार. अगदी ‘नाठाळाचे माथा। हाणू काठी’ म्हणण्याचे कारणही, ज्यांना कासेची लंगोटी द्यायची आहे, त्या ‘भले’ लोकांविषयी प्रेम! त्यांना त्रास होऊ नये ही इच्छा! ज्ञानेश्वरांना तर दुष्टांविषयी, ‘खळां’विषयीदेखील प्रेम. म्हणून खळ वा खलपुरुष संपावे असे ते अनवधानानेही म्हणत नाहीत. तर खळांची ‘व्यंकटी सांडो’ किंवा त्यांचे ‘वाकुडे’पण मोडो’, असे ते सांगतात.
प्रेम या भावनेच्या अनेकानेक तऱ्हा आणि छटा जरी आपण पाहिल्या, तरी प्रेमाचे सर्वव्यापी रूप लक्षात येते. कोणाविषयी तरी कशाविषयी तरी वाटणारी ती अडीच अक्षरांनी शब्दरूपधारण करणारी भावना. पांडित्य, श्रीमंती, राजसत्ता.. साऱ्यासाऱ्यांपेक्षा वरची. म्हणून असे प्रसिद्ध आणि सार्थ संतवचन –
पोथी पढि पढि जग मूआ
पंडित भया न कोय
ढाई अक्षर प्रेम के
पढे सो पंडित होय
कशासाठी कुसुमाग्रज ‘प्रेमयोग’ लिहितात? कशासाठी मेधा वसंत खानोलकर नावाची कविता लिहिणारी मुलगी मेधा पाटकर होऊन जलसमाधी घेण्याच्या तयारीने नर्मदेच्या पात्रात उभी राहते? कशासाठी सत्ताधारी माणसेदेखील ६ आणि ९ ऑगस्टला हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर आज इ.स. २०१३ पर्यंत ६८ वर्षे संयम बाळगतात? कशासाठी शास्त्रज्ञ एखाद्या रोगावरची लस शोधून काढण्यासाठी स्वत:च्या शरीरावर जीवघेणे प्रयोग करून बघतात? कशासाठी जगभर वणवण करीत आणि हालअपेष्टा सोसत मार्क्‍स अर्थविचार मांडतो? किंवा कशासाठी आपण पाकिस्तानात भूकंप झाला तर (तरी!) अब्जावधी रुपयांची मदत पाठवतो? किंवा का आपण रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मध्येच झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावरून गाडी न दामटता, शिवी देत-चडफडत का होईना, वेग कमी करून बाजूने गाडी काढतो? किंवा कशासाठी आमटे, बंग आणि कोल्हे नवरा-बायको शहरात सुखात रममाण होण्याऐवजी लाभ-हानीच्या पलीकडे जाऊन वंचितांच्या जखमांवर हलक्या हाताने  मलमपट्टी करतात?
या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘प्रेम’ हे आहे. प्रेम-व्यक्तीविषयी, समाजाविषयी, तत्त्वाविषयी, ध्येयाविषयी, विचारधारेविषयी, स्वप्नाविषयी, ध्यासाविषयी.. शास्त्रज्ञ असोत, गांधी-मंडेलांसारखे नेते असोत, अर्थतज्ज्ञ असोत, संशोधक असोत, संगीतकार असोत, कवी-लेखक असोत- प्रत्येक जण हे जग सुंदर व्हावे, सुसह्य़ व्हावे, माणसाला राहण्याजोगे व्हावे म्हणूनच काम करतो. कोणाचा वाटा घारीचा, कोणाचा खारीचा.
माणसानं जगावं कसं हा मोठा विचार झाला. पण वागावं कसं हा विचारही कमी महत्त्वाचा नाही. या संबंधी प्रवचन कंटाळवाणे होऊ शकते. उपदेशाचे डोस पाजले तर राग येऊ शकतो. पण निदा फ़ाजली जेव्हा काही प्रेमळ सूचना करतात, तेव्हा माणूस एकदम नतमस्तकच होतो (थोडासा ओशाळतोही).
बाग में जाने के भी आदाब हुआ करते है
किसी तितली को न फूलों से उडाया जाए
आज असं काही लिहिण्याचं कारण म्हणजे ‘ऱ्हस्व आणि दीर्घ’ या सदरातील हा शेवटचा लेख. पु. ल. देशपांडे त्यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले होते, की मला एकसष्टावं वर्ष पहिल्यांदाच लागत असल्यामुळे या प्रसंगी काय बोलावं, मला कळत नाही.
माझा थोडासा गोंधळ उडाला. सतत सदरलेखन करणारे सराईत असतात, त्यांना या निरोप समारंभाची सवय होऊन जात असावी. मी मात्र या प्रसंगी गहिवरायचे, की सद्गदित अंत:करणाने अश्रुपात करायचा याचे नियोजन करू लागलो. पण माझ्या लगेच लक्षात आले की असले नाटक आपल्याच्याने होणे नाही आणि नियोजन, काटेकोरपणा आपल्या स्वभावात नाही. ‘ऱ्हस्व आणि दीर्घ’चा अनुवाद (की अपभ्रंश?) कमी आणि जास्त, उणे आणि अधिक, पासंग आणि धडा, आणा आणि रुपया असाही होऊ शकतो. साहित्य-साहित्यिक-साहित्य क्षेत्र या क्षेत्रातील पर्यावरण आणि वातावरणनिर्मिती आणि निर्मितीप्रक्रिया या क्षेत्रातील काही दिलासादायक व सुखावह वृत्ती आणि खटकणाऱ्या अपप्रवृत्ती यांचा परामर्श घ्यावा असा ढोबळमानाने आराखडा डोळ्यासमोर ठेवला. एक गोष्ट मात्र ठरविली, की मुद्दा कितीही कठीण, जटिल, गुंतागुंतीचा असो, भाषा सोपी वापरायची. (मराठीचा मास्तर म्हणून विद्यार्थ्यांना जे सांगतो तेच स्वत:ला सांगितले- बाळ, एका प्रदीर्घ पल्लेदार वाक्याऐवजी चार वाक्ये कर. वाचकांचे सोड, ते ‘तयार’ असतात. लेखकालाच धाप लागायला नको आणि त्याने आशयाचाच गडबडगुंता करायला नको.) तसे मलापण भारदस्त आणि ऊरजड लेखन करता येते बरं का. उदा. सदरहू लेखनामागील आशयगर्भ संकेतांचा व्यामिश्र संकल्पनाव्यूह संवेदनसूत्रांच्या समग्रतेने समजायचा, तर मराठीच्या इतिहासदत्त संस्कृतप्रचुर विपरीतशैलीचा गुंता मानसशास्त्रीय परिभाषेत उलकावा लागेल.. हुश्श!
..पण जेव्हा लिहायला लागलो तेव्हा लक्षात आले, की हे भयंकर त्रासदायक आणि कसोटी पाहणारे काम आहे. ज्या कोण्या चांगल्या गोष्टीवर, मूल्यांवर, परंपरांवर, व्यक्तींवर आपले प्रेम आहे, त्यांचे जतन करण्यासाठी शब्दांचे कवच उभे करणे सोपे. कणसातील दाणे पाखरांनी खाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर गोफणीने दगडांचा मारा करायचा म्हणजे केवढे कठीण कर्म. त्यापेक्षाही आपले बुजगावणे होऊ नये याची काळजी. मर्ढेकरांना काय जाते, ‘भावनेला येऊ दे गा, शास्त्रकाटय़ाची कसोटी’ – असे म्हणायला! इथे तर शब्दासारखे निसरडे माध्यम वापरताना, क्षणोक्षणी तोंडावर आपटण्याची भीती. संतुलन राखणे म्हणजे कमाल कौशल्याची मागणी करणारे काम आणि इये साहित्याचिये नगरी तर सगळीकडे किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू!
व्यक्ती नाही, तर वृत्ती-प्रवृत्तींवरच रोख असावा तो ढळू नये, नाही तर मुद्दा म्हणजे प्रतिपादनांचा हेतू हरवतो आणि वैयक्तिक राग-लोभ, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात होते. असे होऊ नये याची काळजी घेऊनही काही जणांनी ती वैयक्तिक टीका मानली. काही जणांनी त्यांच्या जाती-जमातीविषयी आकस माझ्या मनात असल्याचे सांगितले. ई-मेल, फोन, एसेमेस वगैरे. आता झोपेचे सोंग आणणाऱ्यांना कसे जागे करणार? मला माझ्या अवताल-भवतालविषयी लिहिण्याचा अधिकार काय? असे प्रश्न दुर्लक्षिल्याशिवाय इलाज नव्हता. मला ते सांगायचे नसेल आणि फक्त चंद्र-चांदणे, पाने, फुले, दव-धुके याविषयीच लिहिण्याची सक्ती असेल, तर मी लेखणी मोडून टाकावी आणि किराणा दुकान टाकावे! काही वेळ ग़ालिब म्हणतात तसा अनुभव येतो आणि क्षणभर(च) माणूस निराश होतो.
या रब वो ना समझे हैं ना समझेंगे मेरी बात
दे उन को दिल और जो न दे मुझको जुबाँ और
मी काही सर्वसंचारी किंवा सर्वज्ञ नसतो म्हणून माझ्याशी संबंधित पर्यावरणात घुसणाऱ्या दूषित वाऱ्याला माझ्या परीने धरबंद घालणे हे माझे कर्तव्य ठरते. सुरुवात आतून व्हायला पाहिजे. एक माझी मेरिटमध्ये आलेली- मराठीत एम.ए.च्या परीक्षेत -विद्यार्थिनी पीएच.डी.साठी गाइड व्हा म्हणून विनंती  करण्यासाठी ज्या विद्वानांकडे गेली ते पन्नाशीच्या वरचे, संतसाहित्य कोळून  प्यालेले आणि पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारे गृहस्थ. त्यांनी तिच्याकडे जी मागणी केली ती ऐकून पोरगी थरथरूच लागली. नंतर तिने भीतभीत ही गोष्ट सांगितली, तेव्हा मी तिच्यावरच ओरडलो- ‘कारटे, त्यांच्याकडे जायला तुला सांगितले कोणी?’ पण प्रश्न सुटतात. प्रेम, श्रद्धा, माणुसकी, चांगुलपणा यावर माझा विश्वास आहे. भाबडेपणा म्हणा तुम्ही. उगीच नाही निराशावादी मानलेले मर्ढेकर म्हणाले, ‘अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते..’ मी त्या पोरीला सज्जन कविमित्र डॉ. सुखदेव ढाणके यांच्याकडे पाठवले न् म्हणालो, ‘सुखदेव, ही तुझी मुलगी समजून तिला गाइड कर.’ अंधार विरळ झाला. प्रकाश प्रवेशला.
इथे जे काही घडत असतं, त्यातील बऱ्या-वाईटाच्या जबाबदारीतून मी स्वत:ला वगळत नाही. एक माणूस म्हणून, कुटुंबाचा सदस्य म्हणून, नागरिक म्हणून, एक शिक्षक म्हणून मी जबाबदार ठरतोच. अस्तित्ववादी सार्त् म्हणाले होते, की माझ्या काळात जी युद्धे झाली त्यालाही मी जबाबदार आहे.
तरी बरे झाले की दोन गोष्टी घडल्या. मराठी, हिंदी, उर्दू (थोडीशी इंग्रजी) कविता वाचली. मन लावून, बुडून, पिशासारखी. स्वत:च्या लेखनाविषयी काही भ्रम असतील, तर ही मंडळी ताळ्यावर आणतात. डोक्यात हवा गेली असेल तर फुग्याला टाचणी लावतात. शब्दांचा वारेमाप वापर केला किंवा दुरुपयोग केला तर कान पिरगाळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळराव आगरकर, राजवाडे, राजारामशास्त्री भागवत, ताराबाई शिंदे, कार्ल मार्क्‍स, थोरो, म.गांधी, भगतसिंग.. आणखी काही. ही मंडळी तुमच्या मेंदूला वैचारिक दंश करतात. मेंदूतील केरकचरा निघून जातो. यांचे विचार भिनतात. कधी ते परस्परांना छेद देतात. पण ज्याला आंधळा अनुयायी बनून संघटना बांधायच्या नाहीत त्या माझ्यासारख्या पामराला ही घुसळणही शहाणे करीत नसली तरी सजग ठेवते. ललितलेखन फुलांप्रमाणे असेल, तर त्यासाठी वैचारिक लेखन खत-मातीचे कार्य करते.
मज़्‍ारुह सुलतानपुरी यांची एक ओळ आहे- रक्स करना है तो पाँव की जंजीर न देख.’ नृत्य करावंसं वाटतंय ना मग नाच, पायात साखळ्या आहेत याची पर्वा करू नकोस. कवितेची तत्त्वज्ञान सांगण्याची आणि विचार उमलण्याची शैली किती विलक्षण आणि सुंदर असते! नारायण सुर्वे जेव्हा सांगतात, की ‘पोरा, आदमी झाला सस्ता आणि बकरा महाग झाला’ तेव्हा वाचक विषण्ण होतो आणि विंदा करंदीकर जेव्हा म्हणतात
काय खुळेपण त्या येशूचे
रक्त दिले अन् सोडविला नर
रक्तात तुझ्या बुडवून यांनी
रुचकर केली अपुली भाकर
तेव्हा वाचक कासावीस होतो आणि आरशापासून तोंडही लपवतो. ‘ऱ्हस्व आणि दीर्घ’च्या लेखकावर या कविलेखकांचा आणि विचारवंतांचा संस्कार आभारापलीकडचा आहे. कृतज्ञताच योग्य.
वाचकांच्या अनुकूल-प्रतिकूल मतप्रदर्शनामुळे लेखन नीट वाचले जात आहे असा संदेश मिळाला. आपले आभार.
जाता जाता, जाहीरपणे आभार ‘ऱ्हस्व-दीर्घ’साठी चित्रे-रेखाटने काढणाऱ्या नीलेशचे. त्याच्या चित्रांनी लेखांचे सौंदर्यच नाही तर वजनही वाढविले. (फक्त एखादे वेळी त्याचा राग यायचा, जेव्हा एखादा वाचक असे म्हणायचा, की कवठेकर, तुमच्या लेखावरील नीलेशचे चित्र अप्रतिम हां! माझ्या लेखाविषयी मात्र चकार शब्द नाही. खवचट कुठले. असो.)
तुकोबांकडून शब्द उसने घेऊन आपला निरोप घेतो. फक्त त्यांच्या अभंगातील ‘देव’ शब्दाऐवजी ‘लोक’ असा शब्द घालण्याचे कष्ट आपण घ्यावेत. कारण तुकोबांना महत्प्रयासाने देव सापडला होता. माझे प्रयास कमी पडले. असो.
करविली तैसी। केली कटकट
वाकुडी की नीट। देव जाण
(समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा