अंजली चिपलकट्टी
सोविएत रशियामध्ये स्टालिनच्या काळात लायसेंको या शास्त्रज्ञाने ‘विशिष्ट परिस्थिती निर्माण करून भरघोस पिकं घेता येतात’ असा एक सिद्धान्त डार्विनचे उत्क्रांतीवादाचे प्रमेय धाब्यावर बसवून मांडला; आणि जो त्या काळात स्टालिनच्या सोयीचा असल्याने तत्काळ स्वीकारला गेला. त्यातून शेतकरी आणि देशाचं अपरिमित नुकसान झालं. मात्र, तरीही लायसेंकोच्या विरोधात लोकांनी उठाव केला नाही. या प्रवृत्तीला ‘लायसेंकोइझम’ म्हणतात. ती सध्या लोकशाही देशांतूनही ‘राष्ट्रवादा’च्या नावाखाली बिनबोभाट फोफावली आहे.
मॉस्कोमध्ये म्हणे एक सरकारी ‘डार्विन म्युझियम’ आहे. त्याच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच लेमार्क या उत्क्रांती संशोधकाचा अर्धाकृती पुतळा बसवला आहे. (अजूनही आहे की नाही, माहीत नाही बुवा!) डार्विनच्या म्युझियममध्ये लेमार्कचा पुतळा..? तोही स्वागताला? म्हणजे एखाद्या रिपब्लिकन पार्टीच्या ऑफिसमध्ये मार्क्सयचा पुतळा बघून जसं वाटेल, तितकंच हेही खटकणारं. लंबी कहानी है ये!
आपल्याला डार्विन माहीत असतो. पण हा लेमार्क कोण? उत्क्रांतीचा अभ्यासक, संशोधक. डार्विनच्या आधीच्या पिढीचा. लेमार्कच्या उत्क्रांतीविषयक मांडणीचा अभ्यास करून डार्विननं वेगळी मांडणी करून त्याची थिअरी खोडून काढली होती. लेमार्कच्या मांडणीनुसार, कोणताही सजीव जी कौशल्यं आयुष्यात आत्मसात करतो, शिकतो, ती कौशल्यं पुढच्या पिढीला आपोआपच जन्मजात मिळतात. लेमार्कची थिअरी मांडणारं जिराफांचं एक प्रसिद्ध चित्र आहे. त्यात असं दाखवलंय की जिराफाचे पूर्वज उंच झाडावरची पानं खाण्यासाठी मान ताणून उंच करायला शिकले. मग मेहनतीनं मान उंच झालेल्या जिराफाला जी पिल्लं झाली त्यांची मान जन्मत:च उंच होती! असं प्रत्येक पिढीत पिल्लांना आधीच्या जिराफांनी कमावलेल्या उंच मानेचा गुणधर्म जन्मत:च मिळाला. या तर्कानुसार खूप मेहनत घेऊन गणितज्ञ झालेल्या एखाद्या माणसाची मुलगी तोंडात गणिताचा चमचा घेऊनच जन्माला येणार! किती भारी! डार्विनचं म्हणणं याच्या उलट होतं. डार्विनच्या काळात त्याला त्यावेळी ‘जनुकं’ असतात हे माहीत नसलं तरी जन्मजात गुण पुढच्या पिढीत संक्रमित होतात आणि स्वत: शिकून आत्मसात केलेली कौशल्यं पिल्लांना आपोआप मिळत नाहीत, तर ती नव्यानं शिकावी लागतात.. हा फरक त्याला नक्कीच माहीत होता. लेमार्कियन थिअरीच्या हे विरोधी होतं.
तर मूळ मुद्दय़ाकडे येऊ. मुळात डार्विनच्या नावाने उघडलेल्या म्युझियममध्ये त्याच्या विरोधी विचारांच्या लेमार्कचा पुतळा सुरुवातीलाच असणं म्हणजे औचित्यभंगच नाही का? तसं का बुवा केलं असेल म्युझियम तयार करणाऱ्यांनी? तो पुतळा नादिया कोतनं (Koht) बसवला होता. तिनं आणि तिचा नवरा अलेक्झांडर यांनी डार्विन उत्क्रांती म्युझियम उभं करायला खूप मेहनत घेतली होती. डार्विनची थिअरीच योग्य आहे असंच तिला वाटत होतं. मग लेमार्कचा पुतळा उभं करायचं काय कारण?
सिनेमासारखं थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ या. हा स्टॅलिनचा काळ. रशियात बोल्शेविक क्रांती झाल्यानंतर १९२९ च्या आसपास सोव्हिएट सरकारनं शेतकऱ्यांकडून सर्व जमिनी काढून घेऊन सरकारी मालकीच्या केल्या आणि सामूहिक शेती करायची असं ठरवलं. जमिनी काढून घेतल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी शेतीवर काम करायचं नाकारलं. ते दुखावले गेले होते. मग बेरोजगार मजुरांना आणून सरकारनं शेतीच्या कामाला जुंपलं. आता हे पडले अकुशल कामगार! त्यांच्याकडे शेतीची काहीच कौशल्यं आणि ज्ञान नसल्यामुळं अन्नधान्याचं उत्पादन एकदम कमी झालं आणि रशियामध्ये मोठा दुष्काळ पडला. याच काळात लायसेंको नावाचा एक गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा युक्रेनच्या शेतकी संस्थेत शेतीविषयक काही प्रयोग करत होता. गव्हामध्ये हिवाळी आणि पावसाळी अशा दोन जाती असतात; त्यातल्या हिवाळी गव्हाला अंकुर फुटण्यासाठी काही काळ तरी थंडीची गरज असतेच. पण रशियात इतकी कडाक्याची थंडी असते. त्या थंडीत गव्हाचे पीक तग धरू शकत नाही, म्हणून हिवाळी गव्हाच्या बियांना अंकुर फुटण्याआधी थंडीची ट्रीटमेंट देऊन त्यांची पेरणी वसंत ऋतूत करता आली तर चांगलं उत्पन्न येईल का (vernalization), याविषयी लायसेंको संशोधन करत होता. या संशोधनासाठी त्याला त्या काळात आघाडीचा वनस्पतीतज्ज्ञ आणि जनुक वैज्ञानिक वाव्हिलोव यानंही प्रोत्साहन दिलं होतं. या प्रयोगात लायसेंकोला जेमतेमच यश मिळालं असावं. पण या तुटपुंज्या प्रयोगांच्या आधारे आणि अगदी कमी नोंदींचा चुकीचा अर्थ लावत आपला प्रयोग जोरदार यशस्वी झाल्याचा शोधनिबंध लिहून त्यानं जाहीर करून टाकलं!
या शोधनिबंधामुळे बऱ्याच वैज्ञानिकांचं आणि लोकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. आपण खत न वापरताही भरपूर उत्पन्न मिळवू शकतो; अझरबैजानसारख्या माळरानावर वाटाण्याचे मळे पिकवू शकतो; मग माणसांनाच नव्हे, तर गुरांनाही अन्न कमी पडणार नाही असे मोठमोठे दावे तो करू लागला. माध्यमांनी त्याच्या या चमत्कृतीपूर्ण दाव्यांना भरपूर प्रसिद्धी दिली. ‘बेअरफूट सायंटिस्ट’ अशी त्याची ख्याती पसरवून त्याला उचलून कडेवर बसवलं. रशियाचा सर्वेसर्वा स्टॅलिनही त्याच्यामागे उभा राहिला. फार काही न करता लोकांनी एवढं का बरं डोक्यावर बसवलं त्याला?
आता हा काळ आपण लक्षात घेऊ. सरकारने सामूहिक शेतीच्या नावे जमिनी हिसकावून घेतल्याने लोक दुखावले होते. शेतीचं उत्पन्न घटलं होतं. ही परिस्थिती कशी हाताळावी, शेतकऱ्यांना शेती करायला कसं प्रवृत्त करावं, या विवंचनेत सरकार जेरीस आलं होतं. अशा परिस्थितीत कडाक्याच्या थंडीतही चांगलं गव्हाचं उत्पन्न मिळवून देऊ शकणारा लायसेंको सरकारच्या आणि लोकांच्या नजरेत भरला. गरीब शेतकरी कुटुंबातून आलेला म्हणून लोकांना त्याचं विशेष कौतुक होतं. त्यानं शेतकऱ्यांना शेतीवर परतण्यासाठी केलेल्या आवाहनाला अनेक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला पाहून स्टॅलिनही प्रभावित झाला आणि त्यानं सरकारी सामुदायिक शेतीची सर्व सूत्रं त्याच्या हाती सोपवून टाकली!
थंडीची ‘ट्रीटमेंट’ दिलेलं गव्हाचं बियाणं आणि रोपं नीट उत्पन्न देतील ही समजूत एक वेळ ठीक; पण थंडी सोसण्याचा हा त्यांचा गुण त्यांच्या पुढच्या पिढीतही उतरेल आणि ते बियाणं थंडीची ‘ट्रीटमेंट’ दिल्यासारखंच कडक थंडीत तगून उत्पन्न देईल, ही समजूत लेमार्कच्या थिअरीनुसार होती. लेमार्कची थिअरी चुकीची असून, डार्विनचं निसर्ग निवडीचं तत्त्व, जनुकीय संक्रमण व म्युटेशन ही उत्क्रांतीची तत्त्वं एव्हाना पाश्चात्त्य विज्ञानजगतात स्वीकारली जात होती. अनुकूल वातावरणानुसार उत्पादन काही प्रमाणात बदलता येत असलं तरी वनस्पतींमधले अंगभूत गुणधर्म जनुकांवर ठरतात आणि तेच पुढच्या पिढीत जातात, हे पाश्चात्त्य वैज्ञानिकांना माहीत झालं होतं. लायसेंको मात्र सजीवांचे गुणधर्म जनुकांवर अवलंबून असतात (जनुकं थिअरी) हे पूर्णपणे नाकारत होता. ‘ट्रीटमेंट’ देऊन, संस्कार करून माणसांना/ समाजाला आमूलाग्र बदलण्याच्या ‘पार्टी’च्या राजकीय तत्त्वांशी जनुकीय थिअरीची तत्त्वं मेळ खात नव्हती. माणसांना सर्व काही शिकवता येतं आणि ते गुण पुढच्या पिढीत उतरतात, ही गृहीतकं पार्टीच्या राजकीय विस्तारासाठी सोयीची होती. लायसेंकोनं जनुकीय विज्ञान अमान्य करण्याचा पर्याय निवडला.
मग काय, त्यानं स्वत:चं ‘स्वयंसिद्ध’ जुगाड प्रत्यक्ष जमिनीवर उतरवायला सुरुवात केली. सरकारचा- म्हणजे स्टॅलिनचा पठिंबा होताच. हिवाळी गव्हाच्या बियाण्यांवर ‘थंडीचे संस्कार’ करून त्यानं लाखो एकर जमिनीवर कोटय़वधी रुबल्स खर्च करून शेतकऱ्यांना बियाणं पेरायला लावलं. ते सर्व बियाणं वाया गेलं. मग उन्हाळी गव्हावर बाष्प आणि उष्णतेचे संस्कार करून लाखो एकर जमिनीवर पुन्हा पेरणी केली गेली. तोही गहू उगवलाच नाही. पैसे तर वाया गेलेच, पण रशियाला भीषण दुष्काळाला तोंड द्यावं लागलं. लक्षावधी माणसं अन्नावाचून मेली. जी मेली, ती अर्थातच गरीब होती. पहिल्या लागवडीनंतर सात लाख लोक मेले आणि दुसऱ्यानंतर तर त्याहूनही जास्त. ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ अशी थोर घोषणा करून सुरू केलेल्या कार्यक्रमाअंतर्गत चीननेही ५० च्या दशकात लायसेंकोच्या प्रभावाखाली याच पद्धतीने लागवड केली! तिथंही थोर दुष्काळ पडला. लाखो गरीब लोक मेले. याचा अर्थ इतकाच, की लायसेंको पद्धतीचं अपयश रशियन सरकारनं दडवलं. प्रसार माध्यमांनी खोटय़ा बातम्या देऊन चीनमध्ये त्या पद्धतीचा प्रसार होऊ दिला.
दुधाचं उत्पन्न हे गाईच्या जनुकांवर किंवा जातींवर अवलंबून नसून, केवळ आपण त्यांना कसं वागवतो यावरच अवलंबून असतं, असा त्याचा ठाम विश्वास होता. वाब्लर नावाच्या पक्ष्याच्या पिल्लांना लहानपणापासून केसाळ सुरवंटं खायला घातली तर त्यांनी घातलेल्या अंडय़ातून कोकीळ पक्षी जन्म घेतो, एका जातीच्या प्राण्यापासून केवळ आहार आणि वातावरण बदलून दुसऱ्या जातीचा प्राणी तयार करता येतो (सशापासून कोंबडी!) असे बिनपुराव्याचे दावे तो करत असे.
सजातीय सजीवांमध्ये सततचा संघर्ष आणि स्पर्धा होतच उत्क्रांती घडते असा सोयीचा अर्थ काढणारे काही ‘कॅपिटॅलिस्ट वैज्ञानिक’ एका टोकाला, तर सजातीय सजीव केवळ सहकार्यामुळेच उत्क्रांत पावतात असं मानणारा कम्युनिस्ट लायसेंको दुसऱ्या टोकाला. त्यानं हे टोक ‘पार्टी’च्या निष्ठेमुळं इतकं घट्ट पकडलं होतं की तो शेतकऱ्यांना शेतात गठ्ठय़ागठ्ठय़ानं रोपांची लावणी करायला सांगायचा! रशियाच्या उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले तर कडाक्याच्या थंडीला अटकाव करता येईल या हेतूनं उत्तर सीमेवर उंच झाडांचा कुंपणवजा आडोसा करण्याचं त्यानं ठरवलं, इथपर्यंत ठीकच म्हणायचं. पण पुढे त्यांनी फतवा काढला की, रोपं एकेकटी न लावता गठ्ठय़ानं लावावीत. का? तर सजातीय सजीव स्पर्धा न करता सहकार्य करतील आणि सर्व झाडं जोमानं वाढतील! प्रत्यक्षात सूर्यप्रकाश आणि अन्नाच्या कमतरतेमुळे ९५ टक्के झाडं मरून गेली.
या दारुण अपयशानंतरही त्याला कोणीच जाब विचारला नाही? विचारला ना! अनेक वैज्ञानिकांनी, बुद्धिमान लोकांनी त्याच्यावर टीका केली, त्याला विरोध केला. अनेक जनुक वैज्ञानिकांनी त्याच्या अवैज्ञानिक प्रयोगांमधल्या चुकांवर बोट ठेवलं. त्या सर्वाना सरकारनं (स्टॅलिन = सरकार) जेलमध्ये टाकून मारून टाकलं. वाव्हिलोव हा त्याकाळी मोठा संशोधक म्हणून गणला जात होता. पण लायसेंकोच्या चुका सांगायला सुरुवात केल्यावर त्यालाही तुरुंगात टाकून उपाशी ठेवून मारण्यात आलं. लायसेंकोला विरोध करणाऱ्या अनेक बुद्धिमान, दूरदर्शी लोकांना तुरुंगात डांबून कुजवलं गेलं. लायसेंकोची अवैज्ञानिक मांडणी शाळा-विद्यापीठांतल्या पुस्तकांमधून मुलांना शिकवण्याची तजवीजही सरकारनं केली!
लायसेंकोला टीका का आवडायची नाही याचा आपल्याला अंदाज करता येतो. पाश्चात्त्य वैज्ञानिकांनी केलेल्या टीकेला लायसेंकोनं उत्तर दिलं ते विज्ञान पद्धतीनुसार नाही; त्यानं त्यांची ‘साम्राज्यवादी वैज्ञानिक’ अशी हेटाळणी केली. ‘साम्राज्यवादी’ असा बागुलबुवा तयार केला की टीका कितीही योग्य असली तरी त्याला बाजूला सारता येतं. लोकांना असा धोबीपछाड टाकता येतो. जनुकांविषयी संशोधन करताना वैज्ञानिक फळमाशीवर प्रयोग करत असत. त्याची हेटाळणी करत लायसेंकोनं त्यांना ‘माशीप्रेमी, पण जनद्वेषी’ असं संबोधलं. एकेकाळी- म्हणजे १९३० च्या आधी जगात जीवशास्त्र आणि जनुकशास्त्राच्या संशोधनात मिळवलेलं अग्रगण्य स्थान रशियानं या काळात गमावलं.
नादिया कोतसारख्या लोकांना हे सर्व कळत होतं. पण इतर वैज्ञानिकांची झालेली दारुण अवस्था पाहून ते गप्प बसले. धाक बसवून विरोधी आवाज दडपणं हाच स्टॅलिनचा उद्देश होता. मग सामान्य लोक का गप्प बसले? खुद्द त्यांचीच इतकी दारुण अवस्था झाल्यानंतरही त्यांनी का नाही आवाज उठवला? कारण लायसेंको त्यांच्यासारखाच एक गरीब माणूस आहे, ही त्याची प्रतिमा बनवली गेली होती. तो त्यांच्यासाठी आशेचा किरण होता. सरकारनं जमिनी घेतल्यानंतर दुखावलेल्या शेतकऱ्यांना एकत्र आणणारा तो दुवा होता. काही चमत्कार करून तो आपली संकटं दूर करेल अशी आशा गमवायला लोक तयार नव्हते. त्याचे प्रयोग फसले असले तरी त्याचा हेतू चांगला असणार असं लोकांना वाटत असणार. समाज माध्यमांनीही त्याला डोक्यावर बसवलं होतं. लोकांचा पाठिंबा असणाऱ्याला पाठिंबा देणं स्टॅलिनच्या फायद्याचं होतं. स्टॅलिनची कम्युनिझमची समज कमकुवत होतीच; त्यात तो सत्ताकांक्षी होता. माणसाच्या नैसर्गिक अंत:प्रेरणांचा विचार न करता समाजरचनेची वाटेल तशी तोडमोड रशियात चालू होती.
लायसेंकोचं खरंच काही तत्त्वज्ञान होतं का? आपल्या समजुती, तत्त्वं काम करत नाहीत हे कळूनही तो हे मुद्दामहून करत होता का? सांगता येत नाही. त्याच्याबाबतीत निर्णय घेताना विज्ञानापेक्षा ‘अंतर्मनाच्या ग्वाही’ला जास्त महत्त्व देणं, हे ठळकपणे दिसतं. त्याच्या ‘प्रयोग’ करण्यात विज्ञानात लागतो तसा काटेकोरपणा नव्हता. निष्कर्ष योग्य आलेले नसले तरी अपयश मान्य न करता तो तेच पुढे रेटत न्यायचा. आणि तेही अत्यंत एककल्ली आत्मविश्वासानं.. ही त्याची खासियत होती.
यामुळं नुसती विज्ञानाची पीछेहाट झाली असं नाही तर संपूर्ण देशात लक्षावधी माणसं मेली, आर्थिकदृष्टय़ा देश ५०-६० र्वष मागे गेला, गरीब झाला. सत्तेला प्रश्न विचारण्याची सवय लोक विसरून गेले.
तर आता या पार्श्वभूमीवर नादियानं काय केलं ते पाहू. मोठय़ा कष्टानं तिनं व तिचा नवरा अलेक्झांडरनं उभं केलेलं उत्क्रांती म्युझियम हातून निसटलं तर त्याची वाट लागेल याचा तिला अंदाज होता. लेमार्कचा सिद्धान्त विज्ञानाच्या निकषावर चुकीचा असला तरी लायसेंकोची आणि राज्यकर्त्यांची त्यावर मेहेरनजर आहे हे दिसत होतं. म्हणून मग सरकारी नजरेपासून वाचण्यासाठी तिनं लेमार्कचा पुतळा दारातच उभा केला. इतकंच नाही तर लेमार्कच्या दोन मुलींचे पुतळे त्याच्या शेजारी उभे करायचे म्हणून ती स्वत: मॉडेल बनली आणि दोन पुतळे बनवून म्युझियममध्ये मांडले. लेमार्कच्या नाकाखाली आपलं संशोधनाचं काम चालू ठेवलं. तिचा अनेक अमेरिकन वैज्ञानिकांबरोबर पत्रव्यवहार होता. प्राण्यांचे वर्तनशास्त्र, विशेषत: चिम्पान्झीवर ती बरेच प्रयोग करत होती. तिचे अनेक शोधनिबंध देशाबाहेर पाठवत होती. पकडले जाण्याच्या सततच्या भीतीमुळे आपला पत्रव्यवहार आणि इतर काही टिपणे, फाईली त्यांनी म्युझियममधल्या पेंढा भरलेल्या प्राण्यांच्या शरीरात दडवल्या होत्या!
सरकारच्या नजरेत ती देशद्रोही होती. सत्तेला उघडपणे प्रश्न विचारण्याचे सर्व मार्ग खुंटतात तेव्हा योग्य कामासाठी गनिमी काव्यानं काही वेगळे उपाय करणं आवश्यक असतं, आणि तसं ती वागली. तिच्यामुळे रशियातील विज्ञानाची धुगधुगी टिकून राहिली असं म्हणता येईल.
लायसेंकोच्या या पर्वानंतर ‘लायसेंकोइझम’ हा शब्द छद्मविज्ञानासाठी (pseudoscience) रूढ झाला. पण ‘लायसेंकोइझम’ ही त्यापेक्षा व्यापक वृत्ती आहे.. ती जगात सर्वत्र दिसते. लायसेंकोचं वागणं हे फक्त विज्ञानाशी प्रतारणा दाखवत नाही, तर स्वत:च्या एककल्ली अंतर्मनाच्या आधारे, फाजील आत्मविश्वासानं पूर्ण देशावर परिणाम करणारे निर्णय अत्यंत लहरीपणे घेऊन लाखो लोकांना आणि देशाला देशोधडीला लावण्याची प्रवृत्ती दर्शवतं आणि आपल्याला एक धोक्याची घंटा वाजवून सजग करतं.
काही जण कम्युनिझमच्या वेडापायी हे झालं असा विचार करून खूश होत असतील तर गडबड आहे, कारण आपण वृत्तींबद्दल बोलतोय- राज्यकर्ते आणि सामान्य लोकांच्या वृत्ती! राज्यकर्ते जनतेला किती गृहीत धरतात, जाब विचारणाऱ्या लोकांना कसं नाहीसं करतात, हे तर लोकशाही देशांमध्येही दिसतंच. लोकांना नादाला लावण्यासाठी कम्युनिझम लागतो असं नाही. मूलभूत आर्थिक प्रश्न सोडवता येत नसतील तर वंश, धर्माचा नादखुळाही खूप कामाला येतो.
लायसेंकोचा प्रभाव स्टालिननंतर हळूहळू कमी होत गेला तरी लोकांनी आपल्या बरबादीसाठी त्याला जबाबदार धरलं नाही. यात जनतेच्या-म्हणजे आपल्या काही टिपिकल वृत्ती दिसतात..
१. एखाद्याला मसिहा मानलं की त्याच्यावरचा विश्वास इतका प्रभावशाली असतो, की जे वाईट झालं ते दुर्दैवी होतं, पण हेतू वाईट नव्हता असं म्हणायची जनतेची आशावादी वृत्ती. २. आपला नेता आपल्यासारखाच गरीब कुटुंबातून आलेला आहे, त्यामुळं तो आपल्याला फसवणार नाही असा विश्वास बाळगणं. ३. परिस्थिती खूप हलाखीची असेल तर आपलं दु:ख कमी करण्यासाठी कोणी चमत्कार करतो म्हटलं तर त्याबाबत साशंक राहणं मेंदूला परवडत नाही. ४. लायसेंकोच्या रूपात लोक कदाचित ‘राष्ट्रवाद’ शोधत असावेत. हा अंदाज अशासाठी खरा असावा, कारण रशियात अलीकडेच पुन्हा एकदा लायसेंकोचे कौतुकभरले रकाने प्रसिद्ध होऊ लागले आहेत. पाश्चात्त्य भांडवलदारांना एकटय़ा लायसेंकोने कशी टक्कर दिली, हे तिथल्या लोकांना महत्त्वाचं वाटतं! त्याच्यामुळं रशिया कसा डबघाईला आला हे न आठवणं म्हणजे एक प्रकारचा ‘आयडेंटिटी क्रायसिस’ असतो. ‘आपलं बरं चाललं नाहीये’ असं जेव्हा लोकांना वाटत असतं तेव्हा ते आपल्या दिव्य भूतकाळातून ‘मोती’ शोधायला लागतात.
आपल्या आवडत्या नेत्याला कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत, अशी सोयीची नीतिमत्ता जनतेत बळावली की तेल लावलेल्या पैलवानासारखे नेते जबाबदारीतून सुळकन् निसटून जातात. लायसेंकोनं भ्रष्टाचार केला का? रशियाच्या बरबादीला तो कारणीभूत होता का? या प्रश्नांची उत्तरं स्वत:लाच देऊन पाहा.
आपण रशियाकडे बाहेरून त्रयस्थपणे पाहू शकतो म्हणून कदाचित त्याची प्रामाणिक उत्तर आपण देऊ शकू.
इतिहासातल्या लायसेंकोसारख्या नकारात्मक नोंदींची दखल जरूर घ्यायला हवी ती त्याचा द्वेष करण्यासाठी नव्हे, तर वर्तमानातल्या लहरी, आत्मकेंद्री, बोगस लायसेंकोंना वेळेतच ओळखून सन्मानपूर्वक रोखण्यासाठी!
anjalichip@gmail.com