मकरंद देशपांडे
जन्म देणारी आई आणि देवाघरी जाणारी आई.. माझ्यासाठी शरीरातील रक्त आणि जीवनाचं आलेखन करण्यासाठी मिळालेली शाई.. माझी आई! खरं तर आईचा जन्मदिवस आई जिवंत असताना आपल्याला आठवतोच असं नाही. आई गेल्यावर मात्र तिचा मृत्युदिन आठवायचा अट्टहास असतो असंही नाही. कारण आईला आईपण मिळाल्यावर मुलं-बाळंच तिचं सर्वस्व!
साहित्यात अंगाई गीताला मान्यता आहे की नाही माहीत नाही, पण डोळे मिटले की आईचा स्पर्श आठवावा लागत नाही. आईचं असणं- नसणं यामध्ये जीवनाचा निबंध पूर्ण होत नाही. शोकांतातून श्लोक जन्मला आणि रामायण लिहिलं गेलं. नीती-अनीतीच्या युद्धात सत्याचा विजय करण्यात महाभारत रचलं गेलं. जीवनाचा अर्थ शोधत वेद-उपनिषदे लिहिली गेली. उपदेशासाठी आणि बोधासाठी पुराणं! आईसाठी मात्र ‘आई होणं’ याला दुसरा पर्याय नाही. आईपासून आईपर्यंत- आईची बाराखडी, आईचं व्याकरण, आईचं काव्य, आईची सुखांतिका, आईची शोकांतिका.. आईचंच सगळंच आईचंच वेगळं! आई आपण निवडत नाही, पण आपल्या मृत्यूपर्यंत आईला सोडवत नाही.
माझी आई गेली त्या सकाळी मी घरी नव्हतो. सकाळी फोनवर बरेच मिस्ड कॉल्स आणि भाच्याचा एक मेसेज ‘पाल्र्याची आजी गेली.’ सकाळच्या वेगवान मुंबईत प्रवास करताना सगळं काही थांबल्यासारखं वाटलं. जणू काही अचानक अर्थपूर्ण वाक्याच्या शेवटी आपोआप पूर्णविराम आला. घरी परतताना आई घरी नाहीये, आई गेलीये हा विचार, जाणीव शर्ट भिजवून गेली. घरी पोहोचलो. आईला पाहिलं. डोळे बंद करून शांत झोपलेली- तिला आता जागं करणं शक्य नव्हतं. रात्री मी कितीही उशिरा पोहचलो तरी आई जागी व्हायची. शेवटी शेवटी अर्धागवायुमुळे दरवाजा उघडू शकायची नाही, पण डोळे उघडून घटकाभर पाहायची. कधी कधी मी रात्री पाय चेपून द्यायचो. उगाच हळू आवाजात काय केलं ते सांगायचो. मग आई खुणेनं सांगायची- ‘‘झोप आता.’’ बेडवर आडवी असताना तिला उगाच मिठी मारायचो आणि मग दिवस संपवायचो. आज मात्र मिठी मारली तेव्हा अंगावर शहारा येईल एवढं थंडगार शरीर. आईची ऊब मृत्यू पळवून घेऊन गेला.
मोठय़ा भावाबरोबर दहाव्याला का बाराव्याला- आता आठवत नाही, पण स्मशानात विधी करताना गुरुजी म्हणाले, ‘‘हे आहे तुमच्या मातोश्रींचं भोजन. (द्रोणामध्ये भाताचे पिंड) आता मातोश्री नदीकाठी आहेत. त्या नदी पार करतील तेव्हा प्रवासात अंतिम यात्रेत हे त्यांचे भोजन.’’ माझ्या आसवांनी भरलेल्या डोळ्यांत एक प्रसंग तरंगस्वरूप उभा राहिला. मला खरंच स्मशानातल्या त्या सकाळी नदीकाठी आई उभी असलेली दिसली. विधी पूर्ण झाले, पण मनातले तरंग नदीचा तट शोधत राहिले.
काही दिवस, आठवडे, महिने गेले.. पण आईचं कायमचं जाणं मनाला मान्य होणारं नव्हतं. काही थोरामोठय़ांनी, विचारवंतांनी असंही सांगितलं की, ‘‘तिला थांबवू नकोस, तुझ्या आठवणींनी ती जाऊ शकणार नाही.’’ पण मला त्यात काही तथ्य वाटलं नाही आणि एक दिवस मी आईला भेटायचं ठरवलं आणि नाटक लिहिलं गेलं.. ‘माँ इन ट्रान्झिट’!
पहिला प्रवेश अगदी तसाच, स्मशानातल्या विधीसारखा. फक्त नाटय़ तेव्हा सुरू होतं, जेव्हा मुलगा गुरुजींना विचारतो, ‘‘आई कोणत्या नदीच्या तटाशी उभी आहे?’’ गुरुजी म्हणतात, ‘‘तुला पाहिजे ती नदी. नर्मदा, गंगा, कावेरी.’’ त्यावर मुलगा म्हणतो, ‘‘नक्की एखादी सांगा, म्हणजे मला आईला भेटता येईल.’’ त्यावर गुरुजी दु:खात बुडालेल्या मुलाला सांगतात, ‘‘नदी ही काल्पनिक आहे. ते एक प्रतीक आहे, या विश्वातनं त्या विश्वात जायला.’’ आता मात्र मुलाला राग येतो, कारण शास्त्र फसवणूक कशी करू शकतं? शास्त्रात लिहिलेलं सगळं खरं, असं लहानपणी ऐकलेलं, त्यामुळे आता तो गुरुजींच्या मागेच लागतो आणि सांगतो की, मला माझ्या आईला भेटण्याची ही शेवटची संधी आहे, ज्याची शास्त्रांनीच व्यवस्था करून ठेवली आहे. जेणेकरून जर कुणी आईला शेवटच्या क्षणी भेटू शकत नसेल; किंवा काही बोलायचं राहून गेलं असेल तर भेटता यावं म्हणून! गुरुजी शोकग्रस्त मुलाच्या वेडेपणाला होकार देत स्मशानातल्या एका दगडाचं भूमिपूजन करतात आणि नदीचा तट निर्माण होतो.
मुलगा त्या नदीच्या तटावरच्या शांततेत, जिथे फक्त नदीच्या पाण्याचा आवाज आणि कोणताही जीव नाही, आईला तो हाक देतो.. ‘आई.. आई.. आई.. आई!’ त्याच्या नावानं हाकेला प्रतिसाद देताना तो आईला पाहतो आणि आनंदानं जमिनीवर बसतो. त्याची शुद्ध हरपते. आई त्याला सांगते, ‘‘डोळे उघड आणि मला पाहा. रडू नकोस. बघ, आता मी चालू शकते. वॉकरची गरज नाही. मी आता नदी पार करणार आहे.’’ मुलगा भानावर येतो. आईला सांगतो, ‘‘आता जायची घाई करू नकोस. इथे कुणीही तुला न्यायला आलेलं दिसत नाहीये. मला तुझ्याबरोबर राहायचंय, बोलायचंय.’’ पण आई म्हणते, ‘‘ज्या शास्त्रानुसार तू हा नदीचा तट बनवला आहेस, त्याच शास्त्रानुसार मला जावं लागेलच.’’ आई पुन्हा जाणार, या कल्पनेनेच मुलगा काल्पनिक नदीच्या तटावर अस्वस्थ होतो आणि आईला सांगतो, ‘‘तू तुझ्या शिदोरीतलं जेवून घे. मी तोपर्यंत शास्त्रानुसार वेळ वाढवून येतो. मुलगा पुन्हा गुरुजींसमोर उभा. गुरुजी म्हणतात, ‘‘आईची भेट झाली, आता आपण विधी पूर्ण करू या.’’ पण मुलगा म्हणतो, ‘‘ही सुरुवात आहे. आई आत्ता भेटली आहे, जरा शास्त्रानुसार तिचं जाणं थांबवता येईल का?’’ गुरुजी मुलाचं दु:ख आणि प्रेम पाहून त्याला सांगतात, ‘‘आई शास्त्रानुसार भोजन करायला थांबू शकते, याचा अर्थ काय तो लाव!’’ मुलगा पुन्हा आईकडे जातो. तिथे आई त्याची वाट पाहत असते. आईला सांगतो, ‘‘शास्त्रानुसार भोजनाच्या निमित्ताने काही कारणानं तुला थांबवता येईल. याचा अर्थ मी असा लावला आहे की, तुझ्यासाठी मी स्वयंपाकघर बनवलं तर?’’ मुलगा एक ट्रंक उघडतो, ज्यात एक मॉडय़ुलर किचन असतं. मीठ, मसाले, भाज्या.. सगळं काही असतं. आई स्वयंपाक करते. वांग्याचं भरीत आणि भाकरी. मुलाला घास भरवते आणि त्याच वेळी नदीचं पाणी जवळ यायला लागतं. आई म्हणते, ‘‘गंगा मला न्यायला आली आहे.’’ मुलासमोरून गंगा आईला घेऊन जाते. मुलगा गंगेची आरती करतो. प्रार्थना करतो, पण काही उपयोग होत नाही.
मुलगा निपचित स्मशानात पडलेला असतो तेव्हा गुरुजींचा मुलगा येतो- जो मुलाला आधार म्हणून सांगतो, ‘‘आई कुठेही गेली तरी पिंडाला कावळा शिवला नाही तर तिला परत यावंच लागतं.’’ स्मशानात कावळा येतो. मुलाला कावळ्यात आईच दिसते. आई त्याला शास्त्रानुसार योनीचक्र समजावते आणि त्याला सांगते की, आता मला पिंडाला शिवू दे. मुलगा शिवू देत नाही. कावळा उडून जातो. गुरुजींचा मुलगा आणि गुरुजी या दोघांत छोटंसं भांडण होतं. गुरुजींचं म्हणणं पडतं की गुरुजींच्या मुलाला शास्त्र नीट माहीत नाही आणि त्याचं म्हणणं पडतं की क्लाएंटला जे हवं असेल ते करावं. तो मुलाला विचारतो, ‘‘आईची अशी कोणती इच्छा आहे जी तुला पूर्ण करावीशी वाटते?’’ मुलाला- आईला हिमालयात- बर्फात न्यायचं होतं. गुरुजींचा मुलगा म्हणतो, ‘‘माझ्या वडिलांनी तुझ्यासाठी नदीचा तट निर्माण केला, आता आपण हिमालय तयार करू.’’
त्या हिमालयात आई बर्फातल्या यात्रेकरूंसारखी रंगीबेरंगी जाड स्वेटर, जॅकेट, गॉगल, टोपी घालून येते. आई मुलाने तिच्यासाठी कधीकाळी लिहिलेली कविता ऐकवते. हिमालय ती कविता ऐकून कोसळायला लागतो. मुलगा ओरडतो, ‘‘सगळ्यांना माझ्या आईला न्यायचं आहे. आधी अग्नी, मग पाणी आणि आता हिमालय.’’ आणि तो बेशुद्ध पडतो. आई त्याच्या स्वप्नात त्याला अंगाई गीत गात भेटते. मुलगा शुद्धीत येतो. गुरुजींना सांगतो, ‘‘विधी पूर्ण झाले. मी आपल्या आईच्या सांगण्यावरून आईशी जडलेलं नातं, दुसऱ्यांदा नाभीची गाठ कापून तोडतो. आई आता मला गोष्टीत, दुसऱ्या कुणाच्या आईत किंवा अचानक आठवणीत भेटेल. आई आता नदी पार करून विश्वाची आई झालेली आहे.’’
हे नाटक वाचून दाखवल्यावर सगळेच रडत होते. एहलम खाननं (अमजद खानची मुलगी) आईच्या भूमिकेत सगळयात अवघड प्रवेश केला तो कावळीण बनून योनीचक्रातनं भ्रमणाचा! तिनं काढलेल्या पक्ष्या-प्राण्यांच्या आवाजानं ती एका योनीतून दुसऱ्या योनीत प्रवेश करत होती. रंगमंचावर असा अभिनित प्रसंग मी कधीच पाहिला नाहीये. तरुण कुमार या सीनिअर नटानं केलेला गुरुजी फारच शास्त्रोक्त होता. त्याच्या मुलाचं पात्र केलं अंजुम शर्मा यानं. त्यानं हास्याचं पूट जोडलं या आई-मुलाच्या शोकांतिकेला. मी ‘मुलगा’ जगलो प्रत्येक तालमीत आणि प्रयोगात.
टेडी मौर्य (कला दिग्दर्शक) नाटक ऐकल्यावर मला म्हणाला, ‘‘हे एखाद्या ब्रॉडवेसारखं आव्हान तू माझ्यासमोर ठेवलं आहेस. म्हणजे क्षणात स्मशानातनं गंगा नदीचा काशी घाट तर क्षणात हिमालय.. आणि टेडीनं तो निर्माण केला. त्याला त्यासाठी खास टाळ्या मिळाल्या. शैलेंद्र बर्वेनं संगीताच्या साहाय्यानं उभा केलेला गंगा घाट, हिमालय आणि अंगाई गीत हे प्रेक्षकांच्या मनात बराच काळ रेंगाळत राहिलं असणारंच!
नसिरुद्दीन शाह प्रयोगानंतर एवढंच म्हणाले, ‘‘आय एम मूव्हड.’’ ते भावूक होऊन गेले. जवळजवळ प्रत्येक प्रेक्षक या अनुभवातून गेला. अगदी दुबईत बुरखा घालून आलेल्या महिलासुद्धा!
आई सर्व धर्मात आईच आहे. काही मुलं-मुली आवर्जून मला भेटले आणि म्हणाले की, आज आम्ही नाटकाच्या शेवटी आमच्या गेलेल्या आईची नाळ तुमच्याबरोबर कापली. आम्हीही आईला सोडू शकत नव्हतो. नाटक हे माध्यम खूप जिवंत आहे. अगदी मृत्यूलाही जिवंत करण्याएवढं!
mvd248@gmail.com