माधव गाडगीळ
भारत हे अनेक वंश, अनेक धर्म, निरनिराळ्या भाषा, विविध संस्कृतींचे कडबोळे आहे. ईशान्य भारत आणि चिनी समाज यांच्यात खूपच साधर्म्य आहे. आणि याचाच गैरफायदा चीन घेत आहे. तेव्हा चिन्यांशी मुकाबला करायचा तर सहिष्णुता, मुख्य प्रवाहाहून वेगळ्या समाजांचा आदर आणि त्यांना स्वायत्तता देणे हेच प्रभावी शस्त्र ठरेल.
भारताच्या वेटलिफ्टर्सनी आपली मान उंच ठेवली आहे. यातले साईखोम मीराबाई चुनु, जेरेमी लालरिनुंगासारखे अनेक जण ईशान्य भारतातले आहेत. मला निसर्गरम्य ईशान्य भारत प्रत्यक्ष पाहण्याची प्रचंड उत्कंठा होती. ही संधी १९७६ मध्ये शिलाँगमधल्या नेहू विद्यापीठातल्या परिसंवादानिमित्ताने मिळाली. तिथले वनस्पतीशास्त्राचे प्रा. राधेश्यामजींच्या घरी जेवत होतो. अंधार पडला आणि बाहेर बेडकांची एक अफलातून संगीतसभा भरली. म्हणालो, ‘गोव्यात अशा मैफली ऐकल्या आहेत. पण त्यांना याची सर नाही.’ राधेश्यामजी म्हणाले, ‘म्हणजे हा बेडकांचा आवाज आहे?’ त्यांना झाडाझुडपांपलीकडे काहीच माहीत नव्हते. स्थानिक समाज सोडाच; अनेक वर्षे तिथे राहूनही खासी भाषेचा एकही शब्द ते शिकले नव्हते. मला तिथला ग्रामीण अरण्य प्रदेश बघायचा होता. सुदैवाने त्यांची विद्यार्थिनी स्वर्णा खासी शिकली होती. ती म्हणाली, ‘चला, तुम्हाला भटकवून आणते.’ पहाटे निघालो. तासाभराने अरण्याने वेढलेल्या ग्रामीण भागात पोहोचलो. एका घरात दार उघडे टाकून दोन स्त्रिया रेडिओ ऐकत होत्या. मी विचारले, ‘त्यांच्याशी बोलू या का?’ स्वर्णा आत जाऊन खासीत बोलायला लागली. त्या हिंदी चित्रपट ‘ऐकत’ होत्या. त्यांना विचारले, ‘हिंदी जानते हो?’ त्या खुशीत येऊन म्हणाल्या, ‘हां, सीख गये है.’ ते होतं सर्वसामान्यांना सहज कळणारं हिंदी-उर्दूचं मिश्रण- हिंदूस्थानी! मनोरंजनाच्या माध्यमातून ‘खासी’ भारताशी एकात्मतेच्या दिशेने वाट चालत होती.. स्वत:त गुरफटलेल्या प्राध्यापकांच्या सरकारी प्रयत्नांतून नाही! तिथे स्वातंत्र्यदिनी फुटीरतावाद्यांच्या भयापोटी पोलीस संरक्षणात ध्वजवंदन करावे लागे.
१९९२ मध्ये मणिपूरच्या नदीखोऱ्यातला नटबर माझ्याकडे पीएच. डी. करायला आला. मणिपूरच्या डोंगराळ मुलखात अगदी वेगळे समाज आणि संस्कृती आहे. फिरती शेती, वनोपज आणि शिकारीवर ते अवलंबून आहेत. नटबरला त्यांच्याबद्दल आस्था होती. ख्रिश्चन झाल्यावर त्यांनी निसर्गरक्षणाच्या परंपरा सोडून दिल्या. परंतु नंतर या परंपरांचे पुनरुज्जीवन केलेल्या काही समाजांबद्दल त्याने ऐकले होते. अशा एखाद्या गावाचा अभ्यास करू या असे सुचवल्यावर त्याने ते आनंदाने मान्य केले. आणि त्यासाठी चीन-म्यानमारच्या सरहद्दीवरच्या चुराचांदपूर जिल्ह्य़ातील कुकी आदिवासी समाजाचे सांटिंग हे गाव अभ्यासक्षेत्र म्हणून निवडले. वसंत ऋतूतल्या एका आल्हाददायक दिवशी आम्ही चुराचांदपूरला पोहोचलो. तिथल्या बाजारात जंगली प्राण्यांचे मांस विकले जात होते. इथल्या लोकांच्या मते, मणिपुरात वन्यजीव संरक्षण कायदा लागू नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळी डोंगरातल्या वेडय़ावाकडय़ा वळणांच्या निरुंद रस्त्यावरून सांटिंगकडे निघालो. रस्ता संपल्यावर पायवाटेने चालत तासाभराने सांटिंगला पोहोचलो. तिथे १९७० सालापासून व्यापारी मागणीमुळे मोठी झाडे तोडली गेली होती; केवळ तुरळक झाडेझुडपेच बचावली होती. झाडी संपल्याने फिरत्या शेतीचे चक्र आक्रसत गेले होते. देवराया तोडल्या गेल्यावर त्यांच्यापासून काही मोलाच्या परिसेवा उपलब्ध होत्या हे लोकांच्या लक्षात आले. विशेषत: फिरत्या शेतीच्या चक्रात जेव्हा लागवडीखाली आणण्यासाठी नव्या जागेतील झाडेझुडपे तोडून जाळत तेव्हा ती आग पसरण्यापासून रोखणाऱ्या घनदाट झाडीच्या हिरव्या भिंती म्हणून देवराया उपयुक्त भूमिका बजावत होत्या. हे ध्यानात आल्यावर अनेक गावांत देवरायांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. आम्ही सांटिंगला गावप्रमुखाचे पाहुणे होतो. त्याचे डोंगरउतारावर एका बाजूने खांबांनी उचलून धरलेले बांबूंनी बनवलेले भलेमोठे घर होते. घरात त्याची रुबाबदार बायको आपला अंमल गाजवत होती. चिलीम फुंकत दिवसभर हातमागावर ती रंगीबेरंगी वस्त्रं विणत असे. नटबर गावातल्या लोकांशी मणिपुरीत बोलत असताना मला फक्त दोन शब्द लक्षात येत- साबू आणि पैसा. सुदैवाने सीमा सुरक्षा दलातले सफाईने हिंदूस्थानी बोलणारे चार जवान सुट्टीवर गावाला आले होते, त्यांच्याशी छान गप्पा झाल्या.
मणिपूर हिंसाग्रस्त होते. त्यामुळे सर्वत्र सेनेच्या जवानांचा वावर असे. काही वर्षांपूर्वी मिझो नॅशनल फ्रंटने भारत सरकारबरोबर समझोता केल्याने आता तिथे शांततापूर्ण वातावरण होते. त्यामुळे मला मिझोरामबद्दल कुतूहल होते. २००९ साली इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अमृतमहोत्सवानिमित्त मला तिथे जाण्याची संधी मिळाली. अकॅडमीतर्फे फेलोज्ना हव्या त्या दोन ठिकाणी व्याख्याने देण्यासाठी निधी दिला जाई. मी मणिपूर आणि मिझोराम विद्यापीठांत भाषणे देतो असे म्हटले तेव्हा ते खूश झाले. कारण ईशान्य भारतात अकॅडमी काहीतरी उपक्रम करते आहे याचे श्रेय त्यांना मिळणार होते. पहिल्या टप्प्यावर मणिपुरात पोहचलो तेव्हा यजमानांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ते म्हणाले की, ‘चार दिवसांपूर्वीच विद्यापीठातील बांधकामाची जबाबदारी दिलेल्या प्राध्यापकाला ग्रंथालयात सगळ्या लोकांसमोर भरदुपारी फुटीरतावाद्यांनी तो पुरेशी लाच देत नाही म्हणून गोळ्या घालून ठार मारले होते. त्यामुळे वाटले की आता तुम्ही कसले येता?’ मी म्हटले, ‘मला कुठलाही वैयक्तिक धोका नसल्याची खात्री होती. आणि मी मणिपूरला येण्याची संधी दवडणे शक्यच नव्हते.’
नंतर पोहोचलो शांत मिझोरामला. विमानतळावर विद्यापीठात न्यायला टॅक्सी हजर होती. मिझोराम हे डोंगरी राज्य. जिकडे तिकडे चढ-उतार आणि अरुंद पठारे. सबंध राज्यात फुटबॉलचं मैदान बनवता येईल एवढंही सपाट पठार कुठेच दिसलं नाही. मी तिथे उत्क्रांती आणि लोकांच्या जैवविविधता नोंदपत्रकावर भाषणे दिली. पर्यावरण विज्ञानाच्या प्राध्यापकांनी पुढचे दोन दिवस माझी मिझोरामभर भटकायची व्यवस्था करतो असे आश्वासन दिले होते. तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे मी विद्यापीठातल्या दोन मिझो विद्यार्थ्यांबरोबर निघालो. ते घाबरलेल्या चेहऱ्यांनी गप्प बसून होते. मी त्यांना विचारलं, ‘तुम्ही कशाला एवढं भिताय?’ ते म्हणाले, ‘नाही हो. पण इथले अनेक प्राध्यापक बनारसचे आहेत. त्यांचे पाहुणेही तिकडचेच असतात. आम्हाला मिझोराम बघायला बरोबर घेऊन जातात. त्यांना भूक लागल्यावर ते विचारतात की, ‘इथे जिलेबी आणि बासुंदी असा काही नाश्ता मिळेल का?’ आम्ही म्हणतो, ‘नाही सर, या गोष्टी विद्यापीठाच्या अतिथीगृहात मिळतात. इकडे तुम्हाला फक्त डुकराचा रस्सा मिळेल.’ ते संतापून आमच्यावर ओरडायला लागतात, ‘तुम्ही रानटी लोक केव्हा सुधारणार?’ अशी कुरकुर करून म्हणतात, ‘चला परत.’ मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही बिनधास्त राहा. मला तुमचा डुकराचा रस्सा नक्कीच आवडेल.’ लागलीच खुशीत येऊन ते मोकळेपणी गप्पा मारू लागले. मग आम्ही एका रस्त्याकडेच्या टपरीवर डुकराच्या रश्श्यावर ताव मारला. स्थानिक मसाल्यांत शिजवलेला तो रस्सा मोठा स्वादिष्ट होता. मग आम्ही कोणाकोणाशी बोलायचं, काय काय बघायचं याची चर्चा सुरू केली. त्यांनी आधीच पर्यावरणाच्या रक्षणात खास काम करणाऱ्या मिझो युवा संघाच्या सदस्यांशी संपर्क केला होता. हा युवा संघ पूर्वी सतत चालणाऱ्या टोळीयुद्धांतील तरुणांनी स्थापन केला होता. आता त्याच्यामार्फत पर्यावरणरक्षण आणि नशाबंदी हे कार्यक्रम राबवले जात होते. मिझोराममधील देवराया बऱ्याच टिकून होत्या. अर्थात ख्रिश्चन बनल्यामुळे ते लोक आता त्यांना पवित्र समजत नव्हते. जिथून संयमाने लाकूडफाटा काढत त्यांना ‘पुरवठा वने’ म्हणत. आणि पूर्ण संरक्षण दिलेल्या देवरायांना ‘सुरक्षा वने.’ ही परंपरा शाबूत असल्याने मला भरपूर देवराया बघायला मिळाल्या. लोकांना त्यांच्या परिसेवांची स्पष्ट जाणीव होती.
ईशान्य भारतातील अनुभवांतून खूप शिकलो. डोळ्यांनी पाहिले, कानांनी ऐकले, जिभेने रस चाखला. माझे जीवन त्यातून आणखी समृद्ध झाले. भारत हे अनेक वंशांचे, अनेक धर्माचे, निरनिराळ्या कुलांतील भाषांचे, अनेक संस्कृतींचे खुसखुशीत कडबोळे आहे. कुठल्याही एका वंशाच्या, धर्माच्या, विवक्षित भाषा बोलणाऱ्यांच्या, संस्कृतीच्या, आहाराचे विधिनिषेध असणाऱ्या समाजाने इतरांना तुच्छ लेखणे म्हणजे या कडबोळ्याचा चुरा करून टाकणे आहे. आपण हे जितक्या लवकर सोडून देऊ तितक्या लवकर भारत एक होईल आणि फुटीरवाद आपसूकच विरून जाईल. अन्यथा ईशान्य भारत आणि चिनी समाज यांच्यात खूपच साधर्म्य आहे. आणि याचा गैरफायदा चीन घेतो आहे व घेत राहील अशी भीती आहे. माझ्या मते, चिन्यांशी मुकाबला करायला सहिष्णुता, मुख्य प्रवाहाहून खूप वेगळ्या समाजांचा आदर करणे, त्यांना स्वायत्तता देणे हेच प्रभावी शस्त्र आहे.
madhav.gadgil@gmail.com