दिवस नेहमीचा. सक्काळ सक्काळी उठलो तर वाटले, दुपारचाच प्रहर आहे. का, की आमच्या खोलीवर एरवीही ग्लोबल वॉìमग, अल् निनो आणि अस्बेस्टॉस सीमेंटचे लंबे साल चलनेवाले टिकाऊ पत्रे यांची गडद छाया असतेच. पण आज ती अधिकच दाट व कडक भासत होती. अंगातून तर जणू वसंतबंधारे फुटले होते. त्यावर अखेरचा रामबाण उपाय म्हणून फॅन पाचवर नेला. त्याखाली स्टूल ठेवला व त्यावर चढून बसलो. परंतु उपेग शून्य. नुसताच भर्रभर वारा. हवा नाहीच. घरात ग्लोबल वॉìमग असले ना, तर पीएमपीओवाला फॅनपण कामी येत नाही!  
आता अशा वेळी बाजूस लाख पत्रचघाळ पडले आहे तुमच्या; परंतु समस्या ऐशी, की वाचायचे म्हटले तरी ते वाचणार कैसे? आता तुम्ही म्हणाल की, त्यात काय बरे कठीण?
आहे. महाकठीण आहे व त्यामागे भौतिकशास्त्रीय कारण आहे. ते असे की, कोणतेही वृत्तपत्र विधिमंडळाच्या दोन्ही वा कोणत्याही एका सभागृहात तसेच घरातील फॅन जेव्हा पाचवर असतो तेव्हा घरात फडकते वा फडफडतेच.
तर या शास्त्रीय नियमामुळे आम्हांस वृत्तपत्रे वाचण्याचा धीर होईना. मनीं म्हटले, वृत्तपत्रे काय कचेरीत जाऊनही निवांतपणे वाचता येतील. परंतु सक्काळ सक्काळच्या ब्रेकफास्टाचे काय?
समोर चमचमीत बातम्या नसतील तर तो गर्मागरम कषायपेयाचा कोप, ती चार चपात्यांची बशी यांचा सुग्रास ब्रेकफास्ट गोड कसा लागणार? बातम्यांविना हे कॉन्टिनेन्टल घशाखाली कसे उतरणार?
अखेर नाइलाजाने आम्ही दूरचित्रवाणी संचाकडे वळलो.
‘पप्पा, मी छोटा भीम पाहतेय ना!’ या ज्येष्ठ सुकन्येच्या (वय वष्रे १८, यत्ता १२) निषेधसुराकडे निर्धारपूर्वक दुर्लक्ष करून आम्ही वृत्त-च्यानेल लावले.
तुम्हांस सांगतो- आम्हांस सक्काळ सक्काळी वृत्त-च्यानेले पाहणे अणुमात्र आवडत नाही. एक तर त्यावर रात्रीच्याच कार्यक्रमांची रीपिट टेलिकास्टे सुरू असतात. आता कालचा शिळा भात हळद, तिखट व कोिथबिरीची चार पाने टाकून कितीही परतून दिला तरी त्यास काय व्हेज दम बिर्याणीची मज्जा येते काय?
दुसरी गोष्ट म्हणजे त्यावरच्या बातम्या. सरळ सक्काळचे पेपर वाचून दाखवतात. म्हणजे त्यांस काय वाटते? आमच्या घरी पेपरे येत नाहीत, की आमच्या काळी सर्वशिक्षा अभियान नव्हते?
वृत्त-च्यानेले फिरवून फिरवून पाहिली तर सगळीकडे म्यागीवरची बंदीच शिजत होती. मनी म्हटले, सगळीकडे हेच एक वृत्त ब्रेकिंग होऊन राहिले आहे याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे आज परमपूज्य प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांचे मौनव्रत असेल, किंवा मग म्यागीवरील बंदी हीच जगातील सर्वात मोठी घटना असेल.
असेल काय, होतीच! बातम्याच पाहा ना! चारी दिशांत, सर्व राज्यांत तीच एक चर्चा. कोणास त्या विलायती शेवयांत अजिनोमोटो (या पदार्थामुळे माणसास मोटापा येतो, हे नावावरून किती खरे वाटते, नाही?) गावले होते. कोणास ते गावता गावत नव्हते. कोणी त्यावर बंदी टाकत होते. कोणी निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देत होते. एका खाद्यपदार्थाने माध्यमांना केवढे खाद्य पुरवले होते!
म्यागीच्या त्या राष्ट्रीय महत्त्वाच्या वृत्तमहोत्सवात आम्हीच काय, आमची सुकन्याही (‘छोटा भीम’वाली!) आकंठ बुडून गेलो होतो, तर नेहमीप्रमाणे आतून व्यत्यय आलाच.
‘‘अहो, चहा पायजे का अजून?’’ हिने किचनच्या ओटय़ापासून साद दिली.  
आम्ही आनंदाने होकारार्थी मान हलवली. त्या अमृततुल्यास कोण बरे नकार देईल? (हे चहाबद्दल हं! गरसमज नको!!)
गाळणीवर पातेले खाड्खाड् आदळीत आमुच्या कोपात चहा ओतत ती म्हणाली, ‘‘आता पुन्हा मिळणार नाही! महागाई केवढी वाढलीय मेली. आठवडय़ाचा किराणा भरायचा तर पिशवीभर पसे लागतात हल्ली.’’
तिकडे म्यागी आणि खाद्यपदार्थातील विषारी पदार्थ यांवरील चर्चा रंगली होती.
ही बोलतच होती, ‘‘अजू
न पाऊसपण पडत नाही मेला! घामानं नुसती चिकचिक. एकदा गॅसजवळ उभे राहून पाहा म्हंजे कळेल.. यंदा त्यात दुष्काळपण पडणार म्हणतात..’’
तिच्या या बोलण्यात म्यागी उत्पादकांचा बाइट नेमका निसटला. किती महत्त्वाचा बाइट होता तो..
ही मात्र बोलतच होती, ‘‘त्या मराठवाडय़ात पाण्याचे काय हाल चाललेत. शेजारच्या पाटीलकाकू सांगत होत्या. यंदा डाळी चांगल्याच महागणार. आता रोज रोज वरणाची चन विसरा.. ८८ टक्के पाऊस पडणार आहे म्हणे यंदा. ८८ टक्के म्हणजे चांगलाच झाला ना हो?’’
आम्ही ‘हूं’ केले.
‘‘पण यांना कमीच वाटतोय तो. हे म्हणजे दहावीच्या मार्कासारखंच झालं बाई. कितीही पडले तरी आपले कमीच! पण यंदा दुष्काळाचं काही खरं नाही.. काय हो, काय म्हणतेय मी? लक्ष कुठाय तुमचं?’’
आता ती काय म्हणतेय, ते न समजण्यास आम्ही काय राज्य मंत्रिमंडळात आहोत का? आणि तिला सांगावे तरी कसे, की लक्ष कुठेय आमचे?
तिची ती पिचलेली कटकट, हा उन्हाळा, तो पाचवर फिरूनही हवा न देणारा फॅन, ती पावसाची घटलेली सरासरी, तो येऊ घातलेला दुष्काळ.. या या सगळ्यापासून लक्ष विचलित व्हावे म्हणून तर आम्ही म्यागीच्या शेवयांत स्वतला गुंडाळून घेत होतो ना?
तिला आम्ही सांगणार होतो, बाई गं, अशा न-घटनांच्या बातम्यांतच हल्ली मनाला गारवा मिळतो.
पण नाही सांगितले. कसे सांगणार?
च्यानेलवरची म्यागी-चच्रेची म्यागीफायनल मिस झाली असती ना!                                       

– balwantappa@gmail,com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा