– हृषीकेश जोशी

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षेपी सांगड घालणारे डॉ अ. रा. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता येत्या महिन्यात होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या लेखन आणि शैक्षणिक योगदानाची ओळख करून देणारा लेख…‘‘इतिहास नीट मनन करणे यासारखा गुरू नाही. ज्याला आयुष्याचे तत्त्वज्ञान म्हणतात ते इतिहासाच्या वाचनानेच निर्माण होते,’’ असे पराक्रमी फ्रेंच योद्धा आणि शासक नेपोलियन बोनापार्ट म्हणत असे. बाकी कोणाला समजो न समजो, पण अनंत रामचंद्र कुलकर्णी म्हणजेच डॉ. अ. रा. कुलकर्णी या विद्वान, अभ्यासू आणि साक्षेपी इतिहास संशोधकाला हे तत्त्व चांगलेच उमगले होते. महाराष्ट्राच्या पूर्वरंग आणि उत्तररंग इतिहासाचा भाष्यकार असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. अ. रा. कुलकर्णी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष! जन्म १९ एप्रिल १९२५. स्थळ- दड्डी, बेळगाव, कर्नाटक. व्हाट्सअॅप हेच सर्वोच्च ज्ञानपीठ मानणाऱ्या आजच्या पिढीला अ. रा. कुलकर्णी हे नाव माहीत नसणे यात काही नवल नाही. शिवाय गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात इतिहास या विषयाची जी हेळसांड सुरू आहे ती पाहता अ. रा. कुलकर्णी त्यांच्यासाठी अज्ञात असलेले बरे असे वाटते. इतिहास निवेदनाची आपली भूमिका विशद करताना ते म्हणतात, ‘‘सामान्य माणसाला विशेत: प्रौढ साक्षराला, आपल्या प्रांताचा इतिहास माहिती असावा म्हणून संशोधकाचा मुखवटा बाजूला ठेवून, पण शक्यतो अधिकृत इतिहास सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.’’

मध्यंतरी सिडनीमधील नॅशनल लायब्ररी ऑफ ऑस्ट्रेलियाची ग्रंथसूची चाळत असताना अचानक अ. रा. कुलकर्णी यांच्या ‘मराठाज् अॅण्ड द मराठाज् कण्ट्री’ या पुस्तकाचे नाव दिसले. शिवाय त्यांचे आणखी एक पुस्तक ‘मराठा हिस्टोरिओग्राफी : बेस्ड ऑन हेराज मेमोरियल लेक्चर्स’ हे देखील येथे उपलब्ध असल्याने समाधान वाटले. इतिहासकार इरफान हबीब यांची या ग्रंथास प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या पुस्तकांची समीक्षा करायची ठरवल्यास अनेक लेखांचे संचित सहज होईल. इंटरनेट अस्तित्वात नसण्याच्या काळात एवढा अभ्यास, व्यासंग बघितला की थक्क व्हायला होते. दुर्दैवाने त्यांच्याविषयी फारसे लिहिले गेले नाही. अपवाद फक्त गोविंद तळवलकर आणि अरुण टिकेकर यांचा! त्यांच्याविषयी इंटरनेटवर फारशी माहिती उपलब्ध नाही. काही संकेतस्थळांवर त्रोटक परिचय आढळून येतो. असा तळमळीचा इतिहास संशोधक विस्मृतीत जाणे खरे तर फारच क्लेशदायक आहे.

महाराष्ट्राचा पूर्वरंग

अ. रा. यांना खरी ओळख मिळाली ती त्यांच्या महाराष्ट्राचा पूर्वरंग या लेखमालेतून. सतराव्या आणि अठराव्या शतकातील महाराष्ट्राच्या जडणघडणीची हकिगत, इतिहासाला धरून सोप्या भाषेत सामान्य वाचकांसाठी त्यांनी ही मालिका लिहिली. याच अनुषंगाने पुढे त्यांची ‘अशी होती शिवशाही’, ‘पुण्याचे पेशवे’ आणि ‘कंपनी सरकार’ या नावाने तीन पुस्तके प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली याचा इतिहास मोठा रंजक आहे. मोहोलेश अथवा मोहोलाच्छो, मरहट्ट, मऱ्हाटी, महाराष्ट्री, महाराष्ट्रिक, महारठ्ठ, मऱ्हाष्ट्र राज्य या शब्दांचे उल्लेख प्राचीन शिलालेखांमध्ये, मराठी आणि अमराठी वाङ्मयात तसेच विविध ऐतिहासिक साधनांमध्ये आढळतात. महाराष्ट्र देश, मराठी भाषा आणि महाराष्ट्र राज्याचा विकास कसा झाला, याचा आढावा घेतला तर त्यामागे एक विस्तृत ऐतिहासिक प्रवास आहे. आजचा संयुक्त महाराष्ट्र – जो देश, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भूभागांनी बनलेला आहे – तो कसा निर्माण झाला, याचा संक्षिप्त परिचय ‘अशी होती शिवशाही’ या पहिल्या पुस्तकात देण्यात आला आहे.

सोपी विवेचनात्मक भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. इतिहासाची तर्कसंगत मांडणी; परंतु त्याचबरोबर आपले लेखन कुठेही एकसुरी अथवा रटाळ होणार नाही याचे त्यांना भान होते. महाराष्ट्राचा पूर्वरंग या मालिकेतील ‘पुण्याचे पेशवे’ हे दुसरे पुष्प गुंफताना ‘लोकसत्ता’चे माजी संपादक अरुण टिकेकर यांचाही अप्रत्यक्षपणे हातभार लागला आहे. त्याविषयीची आठवण सांगताना कुलकर्णी म्हणतात, ‘‘लोकसत्ताचे संपादक अरुण टिकेकर यांचे मला विशेष आभार मानले पाहिजेत. पुण्यासंबंधीच्या एका ग्रंथासाठी पुण्याचे पेशवे एक प्रकरण त्यांनी मला लिहावयास दिले. त्याचेच विस्तारित रूप म्हणजे माझे हे पुस्तक होय.’’

ज्येष्ठ संपादक गोविंद तळवलकर ‘ललित’ मासिकात ‘सौरभ’ या नावाने एक सदर लिहीत असत. या सदरामध्ये (ऑक्टोबर २००१) त्यांनी कुलकर्णी यांच्या ‘कंपनी सरकार’ या पुस्तकाची विशेष दखल घेऊन त्यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहिले आहे. तळवलकर म्हणतात, ‘‘महाराष्ट्राचा पूर्वरंग मालिकेतील हा त्यांचा अखेरचा ग्रंथ आहे. मराठेशाहीची अखेर व कंपनी सरकारचा उदय याची कहाणी प्रा. कुलकर्णी यांनी उचित पुराव्यानिशी सुबोधपणे कथन केली आहे. तिची शिवकालीन महाराष्ट्रासंबंधीची दोन प्रकरणे विशेष उल्लेखनीय असून शिवाजी महाराजांच्या राजनीतीची यावरून चांगली कल्पना येऊ शकेल.’’ तळवलकरांनी कंपनी सरकार या पुस्तकाचे वेगळ्या अंगाने परीक्षण केले असून ते अतिशय वाचनीय आहे. (सौरभ खंड- २, मॅजेस्टिक प्रकाशन) अर्थात अ. रा. यांचे लेखन कार्य फक्त महाराष्ट्राचा पूर्वरंग यापुरते मर्यादित नाही. त्यांनी स्वत: लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या पुस्तकांची यादी बघितली तर थक्क व्हायला होते. उदाहरणेच द्यायची झाल्यास ‘प्राचीन भारत : संस्कृती आणि इतिहास शिवकालीन महाराष्ट्र’, ‘जेम्स कनिंगहॅम ग्रॅट डफ’, ‘जेधे शकावली करीना’, ‘आज्ञापत्र’, ‘मध्ययुगीन महाराष्ट्र’, ‘मराठे व महाराष्ट्र’, ‘गेले ते दिन’, ‘मराठ्यांचे इतिहासकार’ (इतिहासलेखन पद्धती) अशी बरीच मोठी यादी तयार होईल.

शिवकालीन महाराष्ट्र

शिवकालीन महाराष्ट्र हे अ. रा. कुलकर्णी यांच्या ३५-४० वर्षांच्या संशोधनाचे फलित म्हणता येईल. ‘शिवकालीन महाराष्ट्राचा सामाजिक, आर्थिक अभ्यास’ हा त्यांचा पीएच. डी प्रबंधाचा विषय. १९५४ सालापासून त्यांनी स्वत:ला या विषयासाठी वाहून घेतले होते. दुर्दैवाने त्यांना आपला प्रबंध आणि डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. विद्यापीठीय राजकारण, मार्गदर्शकांच्या होणाऱ्या बदल्या आणि विद्यापीठांची गुंतागुंतीची क्लिष्ट प्रक्रिया यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळण्यास विलंब झाला. कल्याणकारी राज्याचा विस्तार करताना आर्थिकदृष्ट्या त्याला स्थैर्य येण्यासाठी शिवाजी महाराजांनी केलेल्या प्रयत्नाचे विवेचन यामध्ये आहे. हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य.

शिवाजी महाराजांच्या चरित्रात्मक इतिहासात त्यांच्या आर्थिक धोरणांचा किंवा त्यांच्या व्यापारविषयक भूमिकेचे व्यापक स्वरूपात विवेचन केल्याचे दिसत नाही. कुलकर्णी यांनी याच अंगाने शिवकालीन महाराष्ट्र या ग्रंथात महाराजांच्या आर्थिक धोरणाचा ऊहापोह केला आहे. जो आजच्या काळात अतिशय उपयोगी आहे. ‘‘शिवाजी महाराजांनी नवजात मराठी सत्ता आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यासाठी प्रामुख्याने शेती व्यवसाय कसा सुधारता येईल, उद्याोगांचा विकास कसा करता येईल. राज्याच्या उत्पन्नात कशी वाढ करता येईल याचा सतत विचार करून आपले आर्थिक धोरण आखले’’ असे ते म्हणतात.

समुद्रकिनारी असलेल्या बंदरांचे महत्त्व त्यांनी फार पूर्वीच ओळखले होते. ‘‘त्याकाळी कोकण हा मराठी राज्याचा कणा होता. कोकण म्हणजे नवनिधी म्हणजेच नवी संपत्ती निर्माण करण्याचे नैसर्गिक ठिकाण मानले जात असे. शिवकालीन कोकणात मीठ हे एक प्रमुख महत्त्वाचे उत्पादन होते. शेती व्यवसाय सांभाळून शेतकरी मीठ उत्पादनाचा जोडधंदा करीत. मिठाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी महाराजांनी खास गलबतांचा तांडा तयार केला होता. कल्याण, भिवंडी येथे त्यांचा बोटी बांधण्याचा कारखाना होता,’’ असा उल्लेख यामध्ये आढळतो.

‘कोकणाचा कॅलिफोर्निया’ करण्याच्या बाता मारणाऱ्या मराठी राजकरण्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. या सगळ्या घडामोडींची साद्यान्त हकिगत अ. रा. यांनी आपल्या शिवकालीन महाराष्ट्र या ग्रंथात विस्ताराने नमूद केली आहे. त्यांचे ‘प्राचीन भारत : संस्कृती आणि इतिहास’ हे पुस्तक एक आदर्श संदर्भ ग्रंथ आहे. यामध्ये संस्कृती या शब्दाच्या व्युत्पत्तीपासून वेदपूर्वकालीन भारत वाङ्मय, नाट्यधर्म, सामाजिक आणि आर्थिक जीवन, तत्त्वज्ञान, कला, विशाल भारत, मौर्यपूर्वकाल, मौर्यकाल यावनी आक्रमणे, गुप्तकाल, उत्तर व दक्षिण भारत आणि शेवटी मुसलमानी परचक्र याचा समग्र धांडोळा घेण्यात आला आहे.

‘‘प्राचीन काळापासून भारतावर अनेक परचक्रे आली. ग्रीक, हूण, शक, यवनी आणि पाश्चिमात्य लोकांनी भारतावर राज्य केले आणि त्यापैकी काहींनी कमीअधिक प्रमाणात काळ आपली राजवट भारतात प्रतिष्ठापित केली होती. परंतु त्यांच्या सान्निध्याने भारतीय संस्कृती काही नष्ट झाली नाही. भारतीय संस्कृतीने या सर्व आक्रमकांना आपल्या विशाल उदरात समाविष्ट करून घेतले. त्यांच्यापासूनदेखील भारताने आपली संस्कृती अकलंकित राखली. उलट त्यांच्या आगमनाचा फायदाच करून घेतला.’’ या शब्दात भारतीय संस्कृतीची महती वर्णन करण्यात आली आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे याच ग्रंथामध्ये वैदिक काळात स्त्रियांची स्थिती कशी होती यावर ‘स्त्रियांचा दर्जा’ नामक एक स्वतंत्र प्रकरण असून ते अतिशय वाचनीय आहे. ‘‘वैदिक काळात स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते, अध्ययनाचा अधिकार होता. राजकीय व सामाजिक जीवनात भाग घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य होते. पुरुषांप्रमाणेच सर्व धार्मिक संस्कार त्या करीत असत. आर्य संस्कृती दीर्घकाळ टिकून राहिली याचे कारण स्त्रियांना असलेले मानाचे स्थान होय.’’ असे कुलकर्णी लिहितात.

शैक्षणिक कार्य

इतिहास संशोधनाखेरीज अध्यापन क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी १९५३ ते १९६४ अशी नऊ वर्षे सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. तेथील ख्यातनाम मध्ययुगीन इतिहासतज्ज्ञ प्राचार्य श्रीराम शर्मा हे त्यांचे इतिहास संशोधनातील मार्गदर्शक आणि गुरू !

अ. रा. कुलकर्णी यांच्याच प्रयत्नांमुळे डेक्कन महाविद्यालयाशी संलग्न असलेला इतिहास विभाग १९६९ साली पुणे विद्यापीठात समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून १९८८ पर्यंत कुलकर्णी यांनी या विभागाचे प्रमुखपद भूषविले. नंतर ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूदेखील झाले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेच्या ( ICHR) स्थापनेत त्यांचे महत्त्वाचे योगदान असून, ते या संस्थेचे १९७८ ते १९८१ या काळात संस्थापक अध्यक्ष देखील होते. १९९२ साली नवी दिल्ली येथे भरलेल्या इंडियन हिस्टरी काँग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले. २४ मे २००९ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी घशाच्या कर्करोगाने त्यांचे पुण्यात निधन झाले. अ. रा. कुलकर्णी यांनी सोप्या आणि विवेचनात्मक शैलीत मांडलेला महाराष्ट्राचा इतिहास भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल, अशी अपेक्षा आहे!

ग्रंथसंपदा

मराठी

शिवकालीन महाराष्ट्र, १९९३ अशी होती शिवशाही, १९९९ पुण्याचे पेशवे, १९९९ कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी), २००२ जेम्स कनिंगहॅम ग्रॅट डफ, २००६ जेधे शकावली करीना, २००७ आज्ञापत्र, २००३ मध्ययुगीन महाराष्ट्र मराठे व महाराष्ट्र, २००७ गेले ते दिन, २००६ मराठ्यांचे इतिहासकार (इतिहासलेखन पद्धती), २००७
परशराम चरित्र (सहसंपादक – नरेंद्र वागळे) पेशव्यांची बखर (सहसंपादक – वि.म.कुलकर्णी, अ. ना. देशपांडे)
मराठ्यांचा इतिहास खंड १ (सहसंपादक – गणेश हरी खरे) मराठ्यांचा इतिहास खंड २ (सहसंपादक – गणेश हरी खरे)
मराठ्यांचा इतिहास खंड ३ (सहसंपादक – गणेश हरी खरे) महाराष्ट्र : समाज आणि संस्कृती मेस्तर चारलस डोयवा साहेब फ्रान्सीस मराठ्यांचा इतिहास : साधन परिचय (सहसंपादक – म.रा.कुलकर्णी,) महात्मा जोतीराव फुले

इंग्रजी

Maharashtra in the Age of Shivaji, 1969
The Marathas 1600-1848
Medieval Maharashtra
Medieval Maratha Country
Maharashtra : Society and Culture
History in Practice
Region, Religion and Nationalism (Co. Ed. N. K. Wagle)
History of Modern Deccan Vol.1 (Co. Ed. M. A. Nareem)
Medieval Deccan History (Commemoration Volume in honour of Pushottam Mahadeo Joshi) ( – Co. Ed. M. A. Nayeem , T. R. De souza), 2002
James Cuninghame Grant Duff
Maratha Historiography

(लेखक सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे संज्ञापन व जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत.)

joshrishikesh@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra history dr a ra kulkarni birth centenary year writing educational contribution ssb