कला, साहित्य, उद्योग आदी विविध क्षेत्रांतील भेटलेल्या आणि मनात साठलेल्या व्यक्तींची स्नेहचित्रे चितारणारे सदर दर पंधरवड्यास…

घरात असोत की बाहेर… खासगी गप्पांत किंवा जाहीर कार्यक्रमात एलकुंचवार आपल्या मताला आणि मनाला जराही मुरड घालत नाहीत. ज्याच्याविषयी बोलायचंय, मत व्यक्त करायचंय त्याचा धडधडीत उल्लेख करतात. ‘‘त्याला सांगू नको बरं का मी असं म्हणाल्याचं’’ असं एकदाही त्यांच्या तोंडून निघालेलं नाही. अशांविषयी मला अपार आदर वाटतो. मराठी सारस्वतात अशी माणसं फारच दुर्मीळ…

पत्रकारितेत चार दशकांहून अधिक काळ गेल्यानंतर त्वचेला एक आपसूक निबरपणा येणं तसं साहजिक. साहित्य, कला वगैरे प्रांतातले आपण ज्यांना मोठे समजत होतो ते अगदीच किरकोळ आहेत; हे अनेकांबाबत एव्हाना लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आदरणीयांच्या यादीतून वर्षाला दोन-चार, दोन-चार नावं कमी होताना पाहावं लागतं. ज्यांच्याविषयी आदर बाळगावा असे फारच कमी उरल्याची एक विषण्णता दाटून येत असते. आणि अशा वेळी महेश एलकुंचवार हे मोठाच आधार वाटतात. काही नावं या यादीतली तशीच्या तशी आहेत याचा दिलासा वाटतो.

वास्तविक एलकुंचवारांना परिचित असेल अशी माझी साहित्यिक पूर्वपुण्याई अजिबात नव्हती. आजही नाही. इंग्रजी पत्रकारितेत- त्यातही अर्थविषयक दैनिकात- बराच काळ गेल्यानं मराठी साहित्यविश्वाशी नाळ टिकून होती ती केवळ वाचक/प्रेक्षक म्हणून. एलकुंचवारांच्या ‘वाडा चिरेबंदी’चं त्रिनाट्यधारा अनेकदा अनुभवलेलं. श्रीराम लागू आणि शुभांगी संगवईच्या ‘आत्मकथा’नं भारून टाकलेलं. ‘पार्टी’ कित्येकदा पाहिलेला. त्यांच्या ‘मौज’ दिवाळी अंकातल्या लेखांची वाट बघितलेली. पण तरी त्यांची कधी भेट झालेली नव्हती. आणि झाली असती तरी जवळीक झाली असती की नाही माहीत नाही. उगाच कोणाच्या गळ्यात पडायला मला जमत नाही आणि आता लक्षात येतंय, उगाच जवळ करायला एलकुंचवारांनाही नकोच असतं. त्यांचा स्वभाव… किंवा स्वभावाबाबतचा लौकिक… त्यांना अनेकांपासून सुरक्षित अंतरावर ठेवतो. एकदा झालं असं… माझ्या एका कार्यक्रमाला नागपूरमध्ये एलकुंचवार प्रमुख पाहुणे असणार होते. ही पंधराएक वर्षांपूर्वीची गोष्ट. ती पहिलीच भेट. माझ्या छातीत धडधड. त्या वेळी संपादक म्हणून काही कटू निर्णय घ्यायला लागले होते. त्याचा बराच बभ्रा तिकडे झालेला होता. तर कार्यक्रमाच्या आधी मंचाच्या मागे अचानक एलकुंचवार समोर आले आणि ज्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागला होता त्यातला एक त्यांच्याबरोबर. अशा वेळी एक अवघडलेपण येतं. पण तसं काही व्हायच्या आधीच एलकुंचवार बरोबरच्याकडे हात दाखवून कारवाईचा उल्लेख करत म्हणाले, ‘‘हे तू उत्तम केलंस…’’

पहिल्याच भेटीत पहिल्या काही क्षणातच लक्षात आलं, हा स्ट्रेट बॅटनं खेळणारा माणूस आहे ते! उगाच पोलिटिकली करेक्ट असण्याची चलाखी नाही.
तेव्हापासून एलकुंचवार जाम आवडायला लागले आणि हे पहिल्या भेटीतलं निरीक्षण अधिकाधिक बळकट करत गेले. त्याच वेळी दुसऱ्या दिवशी घरी भेटायचं ठरलं त्यांच्या. स्थानिकांनी बजावलं, वेळ एका मिनिटानंही चुकवू नकोस! बरोबर देवेंद्र गावंडे होता. आम्ही वेळेआधीच जाऊन थांबलो. त्या वेळेच्या ठोक्याला गेटमध्ये. एलकुंचवार तयार होते. छान बंगला. अगदी नेटका. बागही तशीच नेटकी आणि मोजकी. आपलं निसर्गप्रेम वगैरे मिरवण्याचा हव्यास नाही. बरेच साहित्यिक/ कलावंत त्यांच्या बागेबगिच्याबाबत अनेकदा वात आणतात. ‘‘हे अमुक रोपटं मी कुठून आणलं असेल?’’ किंवा ‘‘ही फांदी कोणाच्या अंगणातल्या झाडाची आहे माहितीये?’’ या अशा प्रश्नांनी हा वैताग सुरू होतो. आता झाडांच्या बाबत (सुदैवानं) ‘‘चेहरा अगदी अमुकतमुकच्या वळणावर गेलाय… वाटलंच मला,’’ असं काही म्हणायची सोय नसते. त्यामुळे या प्रश्नांना काय उत्तरं देणार? गप्प बसावं लागतं. आपण त्यांच्या परसबागेत असतो आणि सौजन्य आड येत असतं. एलकुंचवारांची बाग सुटसुटीत. एखाद्या झाडा/ वेलीच्या नावे भावनांचे कढ वगैरे प्रकार नाही. दिवाणखानाही असाच. अगदी सोपं नेपथ्य. आणि महत्त्वाचं म्हणजे कुठून कुठून आणलेले दगडधोंडे, चित्रविचित्र चहाचे कप इत्यादी इत्यादी ‘शोकेस’ नामे काचेच्या ठोकळ्यात कोंबण्याच्या लायकीची एक गोष्ट नाही. पुस्तकांचं फडताळ. छान कव्हरं घातलेली पुस्तकं. बऱ्याच गप्पा झाल्या. पहिल्यांदाच गेलो होतो घरी. एलकुंचवारांचा गावाकडचा जुना प्रशस्त वाडा, एकत्र कुटुंब, नंतर त्या कुटुंबातल्या एकेका फांदीचं वेगळं वाढत जाणं… वगैरे ‘वाडा चिरेबंदी’कथा त्यांच्याच तोंडून निघत गेली…

नंतर नागपूरच्या भेटीत एखादी तरी चक्कर त्यांच्या घरी व्हायला लागली. कधी तेच कार्यक्रमात असायचे. या सगळ्यात एक लक्षात आलं, घरात असोत की बाहेर… खासगी गप्पांत किंवा जाहीर कार्यक्रमात एलकुंचवार आपल्या मताला आणि मनाला जराही मुरड घालत नाहीत. ज्याच्याविषयी बोलायचंय, मत व्यक्त करायचंय त्याचा धडधडीत उल्लेख करतात. ‘‘त्याला सांगू नको बरं का मी असं म्हणाल्याचं’’ असं एकदाही त्यांच्या तोंडून निघालेलं नाही. अशांविषयी मला अपार आदर वाटतो. मराठी सारस्वतात अशी माणसं फारच दुर्मीळ. अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच. एकदा नितीन गडकरींच्या घरून कार्यक्रमाला जायचं होतं. गडकरीही असणार होते त्या कार्यक्रमाला. त्यांचा कारभार ऐसपैस. नागपुरात जरा जास्तच. त्यांना म्हटलं, ‘‘एलकुंचवारही येतायत त्या कार्यक्रमाला.’’ तर त्यांनी एकदम आवरतं घेतलं आणि म्हणाले, ‘‘मग वेळेत जायला हवं.’’ गडकरी असोत की अन्य कोणी, एलकुंचवार स्वत:हून पुढे गेलेत, लवलवून हात जोडून स्वागत करतायत… एकदाही असं झालेलं नाही. ते आपल्या मठीत मस्त असतात. त्यांना पाहिलं की वाटतं कलाकारानं असं आपल्या मस्तीत, आपल्या मठीत राहावं. त्यांच्याकडे जाताना ‘तुझे आहे तुजपाशी’मधल्या काकाजीचं वाक्य आठवतं- ‘‘ताजमहाल पाहायचा तर आगऱ्याला जावं लागतं… तुमच्या दारासमोर नाचत येतात ते मुहर्रमचे डोले.’’ तेव्हा नागपुरात गेलं की हे एलकुंचवार-दर्शन हा रिवाज झाला. अनेकदा जेवायलाही गेलो त्यांच्याकडे. कधी कधी तर सगळा स्वयंपाक स्वत: त्यांनी केलेला असतो. अगदी साग्रसंगीत. पोळीही अगदी घडीची. आपल्यालाच ओशाळं झालं तर म्हणतात, ‘‘मला आवडतं स्वयंपाक करायला.’’

एलकुंचवारांचे जगण्याचे स्वत:चे नियम आहेत. फोन कधी करायचा, मेसेज कधी करायचा सगळं ठरलेलं. रात्री नऊला त्यांचा दिवस संपतो. पहाटे चारला सुरू होतो. जगण्यातली टापटीप पाहून ‘सहस्राचंद्रदर्शन’ होऊन अर्धदशक झालंय असं अजिबात वाटणारही नाही. खरं तर त्यांच्याशी ‘गप्पा मारल्या’ असं म्हणणंही प्रौढी झाली. ती टाळायची तर एलकुंचवारांना ‘ऐकलं’ असं म्हणणं योग्य. त्यांच्यासमोर आपण विद्यार्थी व्हायचं आणि त्यांना इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी वाङ्मयातलं काहीही विचारायचं. मी त्यांना ‘सर’ म्हणतो. साहेब या अर्थानं नाही. आपण प्राध्यापकांना सर म्हणतो तसं. एकाच वेळी टेनिसन ते तुलसीदास, बायरन आणि भास किंवा भवभुती आणि ब्राऊनिंग अशांचं ते काय काय सांगू शकतात. अफाट पाठांतर आहे त्यांचं. अनेकांना माहीतही नसेल; पण एलकुंचवार हिंदी साहित्याचे उच्च दर्जाचे जाणकार आहेत. खरं तर मराठीपेक्षा हिंदीच्या अंगणात काय काय चाललंय याची त्यांना खडानखडा माहिती असते आणि त्याचा अभिमानही असतो.

‘‘हिंदी साहित्य खूप पुढे गेलंय… ‘गोदान’पासून ‘मैला आचल’पर्यंत इतक्या वजनाची एकही कादंबरी मराठीत लिहिली गेलेली नाही.’’ त्यांचं मत. मराठीबाबत विचारलं तर तसं हातचं राखूनच बोलतात. बोलताना नाकपुड्या फुगल्या आणि चेहऱ्यावर एका बाजूनं स्मित उगवू लागलं की हमखास समजायचं: एक तिरकी, सणसणीत कॉमेंट येणार. एकदा त्यांच्या घरी होतो त्या वेळी मुंबईत ‘लोकसत्ता’चा कार्यक्रम होता. एक विख्यात मराठी अभिनेत्री येणार होत्या. त्यांना कार्यक्रमाचा हालहवाल विचारायला मी फोन केला. तो संपता संपता यांच्या नाकपुड्या फुगू लागलेल्या. म्हणाले, ‘‘सांभाळ हो… उद्याचा ‘लोकसत्ता’ तिचं वर्णन विदुषी म्हणून करायचा…’’ त्यांच्यादेखत एखाद्याचं/ एखादीचं वर्णन ‘विचारी, अभ्यासू’ असं केलं की एलकुंचवारांच्या जिभेची धार किती तेज आहे, हे कळतं. माध्यमातल्या मीडिओक्रिटीवर त्यांचा खास राग. ‘‘कोणी काही वाचत नाही काही नाही आणि उगाच दिसण्यावर भाळून अमुकतमुकच्या कवितेला चांगलं म्हणता,’’ हे त्यांचं निरीक्षण. मग ‘त्या’ कवीबरोबर त्याच काळातले किती उत्तम कवी काय काय लिहितायत हे ते असं सादर करतात की ‘लोकप्रिय’ असणं हे किती रिकामं ओझं असतं ते जाणवून जातं. त्यांची प्रत्येक भेट डझनभर पुस्तकं वाचण्याची पुण्याई मिळवून देते. त्यांच्या काही काही गप्पा तर मी निर्लज्जपणे रेकॉर्ड केल्यात…!

एकदा झालं असं की, नागपुरात नरेश आणि जया सब्जीवाले यांच्या घरी जेवायला भेटलो. जेवणाच्या टेबलावरच राजकारण, हिंदुत्व वगैरे विषय निघाला. सरांचा सूर लागला. एकदम वेद-उपनिषदांत शिरले. त्यातलं त्यांचं पाठांतर दशग्रंथी म्हणवणाऱ्यांच्या तोंडात मारेल असं. अगदी ऋचा वगैरे म्हणत गेले. त्या सगळ्याचं मोठेपण सांगता सांगता त्यांचं एक निरीक्षण टोचून गेलं. ते म्हणाले, ‘‘यात एकाही ठिकाणी हिंदू असा एक उल्लेखही नाहीये कुठे. सर्व काही आहे ते माणूस, निसर्ग आणि जगणं याविषयी.’’ मग या गप्पांत त्यांनी ‘मधुपाकविधी’चं षोडशोपचारे वर्णन केलं. या विधीत गोमांसाच्या पदार्थाची रेसिपी आहे. ती कशी ‘डेलिकसी’ होती हे सांगता सांगता शाकाहारी, मांसाहारी वगैरे वादाची त्यांनी अशी कत्तल केली की त्या ‘दिव्यदर्शना’नं सामान्यजन रक्तबंबाळ होतील. ‘‘कोणताही धर्म इन्स्टिट्युशनलाईज झाला की त्याचा ऱ्हास सुरू होतो…’’ हे त्यांचं एक सोदाहरण ब्रह्मसूत्र उद्धृत करत केलेलं विधान. प्रतिवाद करता येणं अशक्य. ‘‘तत्त्वविचार आणि धर्मविचार यात फरक आहे. तत्त्वविचार ‘मला जे कळलं ते असं असं आहे’ इतकंच सांगतो. धर्मविचार ते अंतिम सत्य असल्यासारखं तो तत्त्वविचार पाळण्याची जबरदस्ती करतो… ते मला पटत नाही… मी आणि परमेश्वर यांत कोणीही असण्याची गरज नाही… अगदी धर्माची देखील नाही.’’ हे सर जेव्हा सांगतात तेव्हा त्यांची रेंज अचंबित करते. कधी ऋत्विक घटक कधी सत्यजित रे असा विषय तर कधी भास आणि भवभुती. त्यांची मांडणी शंभर टक्के ओरिजिनल. त्यांना एकदा कालिदासाविषयी छेडलं. ‘‘हा (कालिदास) पन्नाशी-साठीतला माणूस कॉलेजकुमारासारखा तरुण मुलीबाळींच्या मागे लागतो… त्यांना निरोप पाठवतो त्याचं कसलं कौतुक करता,’’ हा त्यांचा प्रश्न. मग कालिदासाच्या समकालीन कवींचं काहीबाही ते म्हणून दाखवतात. आपल्याला पटतो हा मुद्दा. बाणभट्टापासून अगदी अलीकडच्या अनेकांपर्यंत सर सहज काय काय उद्धृत करतात.

भारतीय संस्कृतीच्या या अफाट व्यासंगामुळे खरं तर सरांची अडचणच केलीये. ‘‘माझा प्रॉब्लेम असा की डावे मला उजवा समजतात आणि उजवे डावा’’ अशी एकदा त्यांनी बोलून दाखवलेली वेदना. वेगवेगळ्या विषयांवरचं असं दोन-तीन बैठकातलं तरी रेकॉर्डिंग असेल माझ्याकडे. आणि गंमत अशी की, हे सगळं ऐकलेलं त्यांच्याकडून ते कधी लिहून देण्यासाठी फोन केला की एलकुंचवार जाम चिडतात. मजा येते. एखादा ‘लेख लिहाच’ असा आग्रह धरला की त्यांची सुरुवात असते : ‘‘माझं आता वय झालंय.’’ मग त्यावर आपण विचारायचं… ‘असं कोण म्हणतं?’ मग ते प्रतिप्रश्न करणार : ‘‘कोणी कशाला म्हणायला पाहिजे.’’ त्याला आपण प्रत्युत्तर द्यायचं : ‘‘कोणीच तसं म्हणत नसेल तर तुमच्या म्हणण्याला काय अर्थ…!’’ मग एलकुंचवार आणखी चिडणार. तरीही हेका सोडायचा नाही. शेवटी ते ‘हो’ म्हणतात. वेळेत लेख देतात. आणि वर सुनावतात, ‘‘हे असलं वर्तमानपत्रासाठी वेळेच्या चौकटीत लिहायला मला अजिबात आवडत नाही. हा माझा शेवटचा लेख. परत मागू नकोस…’’ पण मग नंतर इब्राहिम अल्काझी यांचं निधन झालं होतं तेव्हा एलकुंचवारांना लेखासाठी फोन करण्याशिवाय पर्याय नसतो. कधी ‘लोकसत्ता’च्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त चालवलेल्या लेखमालेचा समारोप असतो… ‘कलाविचार आणि मराठी अभिरुची’ यावर एलकुंचवारांशिवाय कोण लिहिणार? मग त्यांना पुन्हा फोन… ‘सांस्कृतिक आणि राजकीय दांभिक’ या विषयावर तर त्यांच्याकडे इतके डेटापॉइंट्स आहेत की वाटतं ते पुन्हा एकदा चिडतील असं वागावं लागणार…! ‘लोकसत्ता’च्या ‘गप्पांत’ त्यांना बोलवायचं आणि हे सगळं ‘काढून’ घ्यायचं असं ठरलं. तेही तयार झाले. पण काही ना काही कारणांनी राहून गेलं. कधी करोना तर कधी निवडणुका वगैरे.

अलीकडे गप्पांत कधी ते काहीसे अस्वस्थ हळवे होतात. मध्यंतरी एकदा गेलो होतो तर नुकतीच एका कलाकाराच्या गंभीर आजाराची बातमी आलेली. बोलता बोलता आणखी एकाच्या आजारपणाचा उल्लेख झाला. मग त्या दिवशीच्या गप्पांवर एक उदास तवंग पसरला तो काही जाईना. तासादीड तासाने निघालो. एलकुंचवार गेटपर्यंत आले. तिथे परत आम्ही बोलत उभे. देवेंद्रही होता. त्यांची अस्वस्थता काही जात नव्हती. म्हणाले, ‘‘छे… एक सिगरेट ओढायला हवी…!’’ मग ‘सरां’बरोबर धूम्रपानाचं औद्धत्य…

शेवटी काही तरी बोलायचं म्हणून त्यांना विचारलं, ‘‘आता मुंबईला कधी येताय?’’ सर एकदम म्हणाले, ‘‘मुंबई वगैरे काही नाही… आता निघायची वेळ झाली…!

girish.kuber@expressindia.com

Story img Loader