विदर्भाच्या आठही जिल्ह्य़ांत वैदर्भीय बोली बोलली जाते. प्राचीन काळी विदर्भाची भूमी ही रणक्षेत्र झाली असल्यामुळे यवनांचे आगमन, इंग्रजांची सत्ता आणि विदर्भी लोकांची विलासी, आळशी वृत्ती आणि ज्ञानोपासनेची उपेक्षा यामुळे येथील भाषेवर फार परिणाम झाले. तशात इंग्रजी काळात पुणेरी भाषेतून ग्रंथनिर्मिती आणि अभ्यासक्रमातही तिचेच वर्चस्व असल्यामुळे वैदर्भी बोली मागे पडल्याचे दिसून येते. संस्कृत, अरबी व फारशी भाषेचे या बोलीवर सतत आघात झाल्यामुळे या बोलीवर बराच परिणाम होऊन या बोलीत संस्कृत, अरबी आणि फारशी या भाषांतील हजारो शब्द सरळ व अपभ्रंशित होऊन आलेले दिसतात.
अलीकडे विदर्भात बोलीभाषेतून म्हणजेच वैदर्भी बोलीतून वाङ्मयनिर्मिती बऱ्याच प्रमाणात होत आहे. नवीन कवी-लेखकांकडून तर बोलीभाषेत लिहिण्याची जणू स्पर्धाच निर्माण झाली आहे असे दिसते. एकेकाळी बोलीभाषेत लेखन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बहिणाबाई चौधरी, डॉ. वि. भि. कोलते, वामन कृष्ण चोरघडे, शंकरराव सुरवडकर, पां. श्री. गोरे, गोपाळ निळकंठ दांडेकर, मधुकर केचे, उद्धव शेळके, वामन इंगळे, मनोहर तल्हार इत्यादी अनेक लेखकांनी या बोलीभाषेत साहित्यनिर्मिती केली आहे.
विदर्भाच्या आठही जिल्ह्य़ांत वैदर्भी बोली बोलली जाते. थोडाफार काही शब्दांचा उच्चारभेद सोडल्यास सर्वत्र सारखे प्रमाण आढळते. पूर्व विदर्भात ही बोली बोलली जात असल्यामुळेच तिला वैदर्भी बोली म्हणतात. आज विदर्भात कोटय़वधी लोकांचे प्रतिनिधित्व हीच भाषा करत आहे.
मनुष्याला व्यवहाराकरता भाषेचा उपयोग करावा लागतो. बालपणात व्यक्ती मातृभाषा सहज शिकते. ठराविक भाषेतून विशिष्ट शब्दांचा अर्थ काय होतो हे निश्चित माहीत असल्याशिवाय शब्दांपासून काहीच बोध होऊ शकत नाही. कोणत्याही समाजात जे ध्वनी उच्चारले जातात त्यांच्याद्वारे मनुष्याच्या मनातील भाव, विचार, कृती इत्यादी व्यक्त होतात. त्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने आणि बोलीभाषेतील प्राचीनता अवगत करण्याकरता तिचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
वैदर्भी बोलीचे स्वाभाविक दर्शन ग्रामीण स्वरूपात घडते. बोलीभाषा या जिवंत भाषा असल्याने भाषिक वृत्तीचे अध्ययन करण्यास खरे साह्य़ होते, ते केवळ लोकभाषेकडूनच. आज वैदर्भी बोली जगविली आहे ती ग्रामवासीयांनीच.
प्राचीन विदर्भाची मर्यादा लक्षात घेता मराठीचा उगम हा विदर्भातच झाला आहे असे दिसून येते. प्राचीन भाषेचा वारसा मिळालेली ही एकमेव बोली आहे. असे म्हणण्याचे कारण एवढेच की, आज विदर्भात जी भाषा बोलली जाते तिच्यातील हजारो शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी प्राचीन मराठी साहित्याचे अवलोकन केल्यास त्यात दृष्टीस पडतात.
१९२८ साली विदर्भातील कवी वा. ना. देशपांडे यांनी ‘विविधज्ञानविस्तारा’त ‘वऱ्हाडी लोकभाषा’ हा लेख लिहून वऱ्हाडी भाषेचा मराठी वाचकास प्रथम परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. वि. भि. कोलते यांनी १९२८-२९ साली ‘विविधज्ञानविस्तारा’तच ‘वऱ्हाडीतील काही प्राचीन प्रचलित शब्द’ या मथळ्याखाली तीन लेख प्रसिद्ध करून वऱ्हाडी बोलीच्या शब्दसंपत्तीचे ज्ञान सर्व मराठी वाचक वर्गास करून दिले. भोपाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरूनही त्यांनी बोलीभाषेच्या विकासाशिवाय मराठी साहित्य पूर्णागानी परिपूर्ण होऊ शकत नाही असे विचार मांडले होते.
प्राचीन काळी विदर्भाची भूमी ही रणक्षेत्र झाली असल्यामुळे यवनांचे आगमन, इंग्रजांची सत्ता आणि विदर्भी लोकांची विलासी, आळशी वृत्ती आणि ज्ञानोपासनेची उपेक्षा यामुळे येथील भाषेवर फार परिणाम झाले. तशात इंग्रजी काळात पुणेरी भाषेतून ग्रंथनिर्मिती आणि अभ्यासक्रमातही तिचेच वर्चस्व असल्यामुळे वैदर्भी बोली मागे पडल्याचे दिसून येते. संस्कृत, अरबी व फारशी भाषेचे या बोलीवर सतत आघात झाल्यामुळे या बोलीवर बराच परिणाम होऊन या बोलीत संस्कृत, अरबी आणि फारशी या भाषांतील हजारो शब्द सरळ व अपभ्रंशित होऊन आलेले दिसतात.
मोगलाच्या अमलाखाली विदर्भ आल्यानंतर या बोलीला फारशी व अरबी भाषेचा सासूरवास सहन करावा लागला. उदा. माहीत, मालूम, देखत, इमला, अजब, अखेर, इलम, उऱ्हाई, कमसकम अशासारखे हजारो शब्द या बोलीत आलेले आहेत. यात माहीत, मालूम, देखत, इमला वगैरे शब्द सरळच आलेले असून आखीर-अखेर, अजायब-अजब, कुसूर-कसूर, इल्म- इलम, जुल्म-जुलम अशासारखे कितीतरी अरबी-फारशी शब्द अपभ्रंशित होऊन या बोलीत आलेले आहेत.
प्राचीन भाषेतील प्राकृत शब्द तर या बोलीत खच्चून भरलेले दिसतात. उदा. बे, ठस, डिंगूर, टुक, तुहं, वावर, डिंडी, कवाड, भल्लं, मल्लं, आसकूड इत्यादी.
वेगवेगळ्या भाषेतून शब्द येण्याच्या काही क्रिया दिसतात. तसेच या भाषेला व्याकरण असल्याचेही दिसते.
या बोलीत वर्णप्रक्रिया फार होताना दिसते. अन्त्य दीर्घ स्वर ऱ्हस्व उच्चारले जातात. उदा. मी, माहि. ग्रांथिक भाषेत अन्त्य स्वर ‘ए, येतो’ त्याऐवजी वैदर्भीत ‘अ, येतो’ असे बोलले जाते. उदा. सांगितले-सांगलं, मागितले-मांगलं, म्हणले-म्हनलं, दिले-देल् लं.
ए किंवा य ऐवजी इ स्वर होतो. उदा. वेळ-इळ. इ ऐवजी ये किंवा ओ ऐवजी वो स्वर येणे हा कानडीमधला प्रकार दिसतो. उदा. एक-येक, ओंगळ-वोंगळ, अव आणि अविऐवजी ओ हा स्वर उच्चारतात. उदा. जवळ-जोळ, उडविला-उडोला. तसेच अनुनासिकाचा उच्चार अर्धवट न करता अगदी स्पष्ट करतात. उदा. तू-तूनं, देवाशी-देवाशीन, माझ्याशी-माह्य़ाशीन.
त्याचप्रमाणे ळ चा उच्चार य, र, ल, ड लावून केला जातो. उदा. केळ-केय, केर-केड, जवळ-जवय, जवर-जवड. डोळाऐवजी डोरा, डोया. ण ऐवजी न सर्रास वापरला जातो. भविष्यकालीन ल आणि न हे वर्ण एकमेकाबद्दल येतात. उदा. मारील-मारीन, मारल-मारन.
विभक्ती प्रत्यय प्रमाण मराठीप्रमाणे असले तरी चतुर्थीच्या ला प्रत्ययाऐवजी ले वापरण्यात येतो. उदा. तुला-मला ऐवजी तुले-मले. प्रश्नार्थक सर्वनाम का म्हणून याची पंचमीची रूपे काहून, काम्हून अशी होतात.
आज्ञार्थी द्वितीय पुरुषी एकवचनी रूपे य कारान्त होतात. उदा. जाय, खाय, पाह्य़. त्याचप्रमाणे भविष्यकाळात ओ कारान्त रूपे होतात. उदा. जाजो, करजो, घेजो, खाजो, निजजो.
गोविंद प्रभू चरित्रावरून असे दिसते की, द्वितीयचा ला प्रत्यय या ग्रंथात नाही. हा प्रत्यय शिवकालानंतर आलेला आहे असे कै. वि. का. राजवाडे म्हणतात. म्हणून मराठीत रूढ असलेला ले प्रत्यय ला चे रूप असून तोच शुद्ध आहे. तसेच या ग्रंथात तृतीयेचे म्या हे रूप असून मीनं, तुनं ही रूपे सुद्धा वापरली जातात. तशीच षठीची माहा, तुहा किंवा मापलं, तुपलं ही रूपेदेखील आहेत.
प्राचीन मराठीच्या दृष्टीने ज्ञानेश्वरकालीन रूपाशी म्हणजेच अवधारिजो, पाविजो या रूपाशी करजो, जाजो, जेवजो ही रूपे मिळती असून मिया या तृतीयान्त सर्वनामाच्या जागी म्या हे रूप वापरतात.
वैदर्भी बोलीचे व्याकरण प्राचीन मराठीला अधिक जवळ आहे असे दिसते. या बोलीचे महत्त्व, शुद्धता व व्याकरण पाहिले असता ही शुद्ध भाषा आहे असे म्हणावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा