संगीतातील अनवट, अपरिचित गोष्टी, तसंच घटना-घडामोडींबद्दलचं गोष्टीवेल्हाळ पाक्षिक सदर..
सचिन देव बर्मन ‘शर्मिली’ या चित्रपटाचं पाश्र्वसंगीत ध्वनिमुद्रित करायच्या तयारीत होते. पण एरवी त्यांची म्युझिक अ‍ॅरेंजमेंट करणारे बासू चक्रवर्ती आणि मनोहारी सिंग हे दोघे मद्रासला आर. डी. बर्मनबरोबर दुसऱ्या रेकॉर्डिगमध्ये अडकून पडले होते. एस. डी. दादा त्यांच्या फटकळ स्वभावाकरिता प्रसिद्ध! बरीच वाट पाहून त्यांनी दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली. लतादीदींनी बर्मनदांना अनिल-अरुण या जोडीचं नाव सुचवलं. या मराठी जोडगोळीने हिंदीत अचानक मिळालेल्या या पहिल्याच संधीचं सोनं केलं. ‘शर्मिली’नंतर मोठय़ा बर्मनदांनी ‘सगीना महातो’, ‘जुगनू’, ‘प्रेमनगर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’ या चित्रपटांच्या अ‍ॅरेंजमेंटची जबाबदारीही अनिल-अरुण या द्वयीवर सोपवली. कल्याणजी-आनंदजी यांच्याकडेही अशीच काहीशी अडचण निर्माण झाली आणि त्यांचं अ‍ॅरेंजमेंटचं कामही आयत्या वेळी अनिल-अरुण यांना मिळालं. पुढे अनिल-अरुण या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत संयोजक म्हणून भरपूर काम केलं आणि नावही कमावलं.
अगदी लहान वयातच लता मंगेशकरांचा आशीर्वाद घेऊन अनिल मोहिले संगीत क्षेत्रातल्या सफरीवर निघाले होते. (अगदी मोजक्याच लोकांच्या नशिबी हे भाग्य आलं आहे बरं!) भाईंची ही सफर सिंदबादच्या सफरीहून अधिक चित्तथरारक आणि अधिक रोमांचक होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! या सफरीत भाईंना अरुण पौडवाल यांच्यासारखा सख्खा साथीदार भेटला. सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, श्रीनिवास खळेंसारखी गुरुतुल्य माणसं भेटली. मनापासून प्रेम करणारे अनेक गायक-वादक भेटले. आणि दीदीरूपी दीपस्तंभ होताच कायम मार्ग दाखवायला. भाई व्हायोलिनवादक म्हणून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत झाले, तेही दीदींमुळेच.
थोडंसं मागे वळून पाहू या. साल १९७०. दहा र्वष व्हायोलिनवादक म्हणून इमानेइतबारे केलेली आकाशवाणीची सरकारी नोकरी सोडून चंदेरी दुनियेच्या मायानगरीत प्रवेश करावा की नाही, या द्विधा मन:स्थितीत भाई होते. दोनाचे चार हात होण्याची घटिकाही समीप आली होती. त्यामुळे भाई अधिकच भ्रमात पडले. त्यांनी घाबरत घाबरत लतादीदींच्या कानावर ही गोष्ट घातली. दीदींनी मोहिलेंना घरी बोलावून घेतलं आणि काही लोकांना फोन केले. ‘अनिल अच्छा लडम्का है, व्हायोलिन अच्छा बजा लेता है. वो आकाशवाणी की नौकरी छोडम् रहा है, कभी भी रेकॉर्डिग के लिए मिल सकता हैं..’ असे फोन आर. डी. बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांसारख्या तेव्हाच्या टॉपच्या संगीतकारांना गेले. स्वरसम्राज्ञीशी पंगा घेणं म्हणजे करिअरला अलविदा करणं, असं समीकरणच होतं त्याकाळी! त्यामुळे ‘मिल सकता है’ म्हणजे ‘याला बोलावत जा’ अशी आज्ञाच आहे, हे सुज्ञ संगीतकार समजून घेत! दीदींचा शब्द शिरसावंद्य मानून या ‘लडक्या’ला अनेकांनी व्हायोलिन वाजवायला बोलावलं. अर्थात अनिल मोहिले अत्यंत प्रतिभावान आणि मेहनती असल्यामुळे त्यांनी दीदींनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.
‘शर्मिली’नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद्यवृंद संयोजकाच्या भूमिकेत या व्हायोलिन वाजवणाऱ्या ‘लडक्या’ची कारकीर्द भरास येऊ लागली. कामाचा ओघ वाढू लागला. एका वर्षांतच अनिल मोहिले बिझी अ‍ॅरेंजर झाले. १९७१ साली कलकत्त्याचा तरुण, हरहुन्नरी बंगाली संगीतकार बप्पी लाहिरी मुंबईच्या चित्रसृष्टीत आपलं नशीब आजमावायला येऊन दाखल झाला. खारला एका छोटय़ाशा खोलीत वास्तव्य करणाऱ्या या तरुण संगीतकाराला काम तर मिळालं; पण त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटासाठी (‘नन्हा शिकारी’) अ‍ॅरेंजर मिळेना. सगळेच नामांकित अ‍ॅरेंजर्स व्यस्त होते. बप्पीदा होतकरूकलाकार फिरतात तसे विविध रेकॉर्डिग स्टुडिओत जाऊन अ‍ॅरेंजर्सना भेटू लागले. भाई तेव्हा ‘प्रेमनगर’ चित्रपटाच्या पाश्र्वसंगीताचं रेकॉर्डिग बांद्र य़ाच्या मेहबूब स्टुडिओत करत होते. तिथे जाऊन बप्पीदा त्यांना भेटले आणि आपल्या चित्रपटाची अ‍ॅरेंजमेंट करण्याची विनंती केली. पण भाई एस. डी. बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांचं काम करण्यात कमालीचे व्यस्त असल्यामुळे त्यांनी या बंगाली बाबूला नम्र नकार दिला. बप्पीदा हिरमुसले आणि त्यांनी सरळ धाव घेतली ती अख्ख्या संगीतसृष्टीवर राज्य करणाऱ्या लतादीदींकडे. दीदींनी मोहिलेंना स्टुडिओतच फोन केला आणि बप्पीला नकार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मग काय? साक्षात् वरून फर्मान निघाल्यावर भाईंना बप्पीदांचं काम करावंच लागलं. (इतक्या सुकुमार, कोमल आवाजाची, तरीही एवढी दहशत असलेली लतादीदी ही जगातील एकमेव व्यक्ती असावी!) पुढे बप्पी लाहिरी आणि अनिल-अरुण या त्रिकुटानं ‘चलते चलते’, ‘हिम्मतवाला’, ‘शराबी’, ‘नमकहलाल’ यांसारख्या हिट चित्रपटांमधून अनेक सुपरहिट गाणी दिली.
निष्णात व्हायोलिनवादकअनिल मोहिले आणि कसलेले अ‍ॅकॉर्डियनवादक अरुण पौडवाल यांची सांगीतिक मनं एवढी जुळली होती, की हृदयनाथ मंगेशकरांच्या सूचनेनुसार अ‍ॅरेंजमेंटबरोबरच या दोघांनी एकत्र संगीत दिग्दर्शनही करायचं ठरवलं. या जोडीच्या नावावरचं पहिलं गाणं कवी शांताराम नांदगावकर यांचं, उषा मंगेशकर यांनी गायलेलं- ‘धुंदित गंधित होऊनी सजणा’ आजही लोकप्रिय आहे. अनिल-अरुण हे सुपरहिट अ‍ॅरेंजर्स तर होतेच, पण या जोडीने संगीत दिग्दर्शक म्हणूनही अप्रतिम गाणी दिली. ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा’, ‘रूपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘शोधू मी कुठे कशी प्रिया तुला’ अशी अनेक श्रवणीय गाणी या जोडीने रचली. संगीतकार म्हणून अनिल-अरुण यांच्या नावावर जवळपास ८० चित्रपट आहेत. दोघांनाही अ‍ॅरेंजमेंटचा अफलातून सेन्स असल्यामुळे त्यांनी स्वत: संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची अ‍ॅरेंजमेंटही कल्पक असायची. त्यांच्या बऱ्याच गाण्यांमध्ये सॅक्सोफोनचा वापर मोठय़ा खुबीनं केल्याचं दिसून येतं. तज्ज्ञ अ‍ॅरेंजरनी लिहून काढलेला पीस वाजवणारा वादकपण तज्ज्ञच हवा. इथे मला मुद्दाम अशा एका वादकाचा उल्लेख करावा लागेल, ज्यांनी सॅक्सोफोनवादक म्हणून अनेक वर्षे अनिल-अरुण यांच्याबरोबर काम केलं.. सुरेश यादव.
सुरेश यादव यांची आणि माझी भेट मी दिग्दर्शित केलेल्या झी मराठी सारेगमपच्या ‘सूर नव्या युगाचा’ या सत्रात झाली. ग्रँड फिनालेला पाहुणे वादक म्हणून सुरेशजींना आम्ही आमंत्रित केलं होतं. वयाच्या ६८ व्या वर्षीदेखील सुरेशजींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आणि सॅक्सचा टोन तरुणांना लाजवेल असा! अनिल-अरुण या जोडीची साथ सुरेशजींनी अगदी ‘धुंदित गंधित’पासून दिली. त्यांच्या बहुतांश गाण्यांमध्ये सुरेशजींनीच सॅक्स वाजवला आहे. सुरेशजी भाईंना ‘कॉम्प्युटर’ म्हणत. कारण कुठलंही सुराचं वाद्य (पेटी, पियानो, व्हायोलिन) न घेता हा माणूस स्टुडिओच्या एका कोपऱ्यात बसून बॅकग्राऊंड स्कोअरचं नोटेशन लिहीत असायचा. असं नोटेशन लिहिणं म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून कॅनव्हासवर हुबेहूब शिवाजी महाराजांचं चित्र काढण्याइतकंच अवघड आहे!
मी भाईंना एकदा हळूच विचारलं होतं- ‘माझ्यासाठी गाणं अ‍ॅरेंज कराल?’ ते नेहमीसारखं गडगडाटी हसले आणि म्हणाले, ‘ऑफ कोर्स. करेन ना. नक्की करेन. तुझं काम मला आवडतं. वेगळं काहीतरी करत असतोस.’ मी सुखावलो आणि अनिल मोहिलेंनी अ‍ॅरेंज करण्यायोग्य गाणं माझ्याकडे यायची वाट बघू लागलो. एक दिवस ‘तू बुद्धी दे’ हे ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातलं गाणं नानांनी माझ्या ओंजळीत टाकलं! मी मनात म्हटलं- हेच ते भाईंचं गाणं! पण तोपर्यंत विश्वनियंत्याने आपल्या मेगा प्रॉडक्शनचं म्युझिक करण्यासाठी भाईंच्या पुढच्या सगळ्या डेट्स ब्लॉक करून ठेवल्या होत्या! आता ही जबाबदारी कोणावर द्यावी? माझ्या डोळ्यांसमोर एकच नाव आलं. खळेकाका आणि मोहिलेंचाच शिष्य असलेल्या कमलेश भडकमकरचं! मला अनेक लोक म्हणतात, ‘‘तू बुद्धी दे’ ऐकताना ‘गगन सदन’ची आठवण होते.’ साहजिक आहे. दोन्ही स्त्रीच्या आवाजातल्या, सोपे शब्द असलेल्या प्रार्थना आहेत. एक गाणं अनिल मोहिलेंनी अ‍ॅरेंज केलंय आणि दुसरं त्यांच्या शिष्याने. लाइव्ह व्हायोलिन्ससाठी भाई लिहायचे तसा सुंदर स्कोअर लिहिण्याची कुवत आमच्या पिढीतल्या कमलेशकडे आहे असं मी मानतो. हे गाणं बनवत असताना भाईंचा प्रेमळ हात माझ्या डोक्यावर नक्कीच असला पाहिजे. संगीतातल्या या महान, प्रतिभावान, सज्जन ‘भाई’ला माझा साष्टांग दंडवत.
अनिल-अरुण चाल तयार करताना..
राहुल रानडे – rahul@rahulranade.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा