माझे पणजोबा हौसेखातर दिलरुबा वाजवायचे असं मी ऐकलं होतं. आजोबादेखील कधी कधी व्हायोलिन वाजवत असत. पण ते तितपतच. स्वान्त सुखाय. न्हाणीघरात गुणगुणण्याव्यतिरिक्त आमच्या रानडेंच्या किंवा आजोळच्या खरे कुटुंबात कोणी गाणंबिणंही फारसं म्हणत नसे. त्यामुळे फारसं संगीतमय वातावरण नव्हतं आमच्या घरात. मावशीसाठी हौसेने घेतलेली एक हार्मोनियम होती. पण ती कायम एका मोठय़ा निळ्या पेटीत बंद असे. दुसऱ्या इयत्तेत गेल्यावर मी तबला शिकायला लागलो आणि माझी तबलावादनातली प्रगती बघून आईच्या लक्षात आलं की याला संगीत उपजतच येतंय. ती मला तिच्या पद्धतीने प्रोत्साहन देत असे. एका सुट्टीत पुण्याला आल्यावर मी त्या निळ्या पेटीतली हार्मोनियम काढून त्यावर बोटं फिरवायचा प्रयत्न करू लागलो. आणि अहो आश्चर्यम्! माझ्या बोटांतून सूर उमटू लागले. मला खूप मजा वाटली. त्या दिवसापासून पेटीच्या त्या काळ्या-पांढऱ्या पट्टय़ांशी माझी घट्ट मत्री झाली. तबला मी शिकत होतोच; पण न शिकताही पेटीशी, तिच्यातून उमटणाऱ्या सुरांशी माझी खऱ्या अर्थानं जवळीक निर्माण झाली. माझ्या कानाला चांगल्या वाटणाऱ्या सुरांवरून माझी बोटं फिरत असत. ‘कुठला राग वाजवतो आहेस रे?’ असा प्रश्न आईने केला तर मात्र माझी भंबेरी उडत असे. कारण मी नेमकं काय वाजवतो आहे, ते माझं मलाच माहीत नसायचं! ‘असू दे. असू दे. चांगलं वाटतंय ऐकायला.’ आईदेखील काय ते समजून दाद देत असे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा