तिसरी घंटा घणघणली. पखावजच्या तालावर बालगंधर्व रंगमंदिरचा लाल मखमली पडदा बाजूला झाला. सेट असा फार नव्हताच. मागे (तिसऱ्या विंगेत) एक लांबलचक लेव्हल आणि मधोमध एक कमान. कमानीच्या मधे गणपतीचं शिल्प. एक भगत हातात पेटलेली आरती घेऊन पदन्यास करत प्रेक्षकांना वंदन करत आला. रंगमंदिरात वृंदाचे सूर घुमू लागले- ‘श्री गणराय.. श्री गणराय..’ धोतर, उपरणं, पगडी घातलेल्या ब्राह्मणांच्या दोन ओळी हाताची घडी घालून धीरगंभीर स्वरात ‘श्री गणराय’ म्हणत प्रेक्षकांमधून येत होत्या. हे बाल्कनीत बसलेल्या मला दिसायला जरा वेळ लागला. त्या समूहाच्या रवाने क्षणार्धात आसमंत भारावून गेला. ब्राह्मणांच्या या दोन्ही रांगा रंगमंचाच्या दोन बाजूने लावलेल्या पायऱ्यांवरून रंगमंचाच्या मध्यभागी पोहोचल्या आणि त्यांची एक रांग झाली. रांगेच्या मधोमध दोन निळी पगडीवाले ब्राह्मण. बाकीच्यांच्या पगडय़ा लाल रंगाच्या. सगळ्यात डावीकडच्या कोपऱ्यात एक गोड बुटका ब्राह्मण उभा. दिसायला हे कम्पोझिशन असिमेट्रिक, पण कमालीचं मोहक दिसत होतं. रांगेचे हात जोडले गेले. अत्यंत सुरेल, तालबद्ध नृत्य सुरू झालं- ‘श्री गणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामन हरी’! पुढचं सगळं नाटक विस्फारलेल्या डोळ्यांनी बघितल्याचं आजही माझ्या स्मरणात आहे. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला मी- माझ्या मित्रांबरोबर बाल्कनीतली तिकिटं काढून ‘घाशीराम कोतवाल’चा अविस्मरणीय अनुभव घेत होतो. त्यावेळेस ब्रह्मदेवाने जरी मला सांगितलं असतं, की लवकरच तू समोरच्या ब्राह्मणांच्या रांगेत उभा असशील, तरी त्यावर माझा कदापि विश्वास बसला नसता! पण बरोब्बर चार वर्षांनी- २० वर्षांचा मी- लाल पगडी घालून ‘..आम्ही पुण्याचे बामन हरी’ म्हणत होतो. तेदेखील न्यूयॉर्कला- ब्रॉडवेच्या ‘सिंफनी स्पेस थिएटर’मध्ये!
‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचं संगीत हा प्रत्येक संगीत दिग्दर्शकासाठी एक धडाच आहे. प्रेक्षक म्हणून बघताना ते संगीत भावतंच; पण रंगमंचावरून प्रत्यक्ष गाताना त्यातील बारकावे, खाचाखोचा उलगडत जातात आणि भास्करदांच्या प्रतिभेपुढे आपसूक हात जोडले जातात. पोवाडा, लावणी, भजन, कीर्तन, भारूड इत्यादी महाराष्ट्रातील लोकसंगीतातले प्रकार ‘घाशीराम’मध्ये भास्करदांनी वापरलेच; पण साकी, दिंडी या नाटय़संगीत प्रकारांबरोबरच कव्वाली, ठुमरी हे उत्तर भारतीय संगीतातले प्रकारही त्यांनी यात अत्यंत हुशारीनं पेरले. अर्थात तेंडुलकरांनी नाटकाच्या संहितेतच यातल्या बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. (उदा. : ‘श्री गणराय नर्तन करी’ हे ब्राह्मणांचा झुलणारा पडदा गातो- अशी स्पष्ट रंगसूचना आहे!) पण त्या पानावरच्या शब्दांना रंगमंचीय आविष्कारात अनुवादित करणारे दिग्दर्शक जब्बार पटेल, संगीतकार भास्कर चंदावरकर आणि नृत्य-दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अर्थात ‘घाशीराम’मधलं प्रत्येक गाणं तेंडुलकरांनी लिहिलं नव्हतं. ‘इथे लावणी सुरू होईल’ किंवा ‘इथे कव्वाली सुरू होईल’ असं फक्त संहितेत नमूद केलं होतं. त्या ठिकाणी कोणाची लावणी, कुठली ठुमरी आणि कोणती कव्वाली वापरायची, हे भास्करदा ठरवत असत. भास्करदांचा रिसर्च तर दांडगा होताच, शिवाय अप्रतिम चाली लावायची हातोटीदेखील होती. त्यामुळे ‘जागी सारी रतिया’, ‘दिल खुशाल करा’, ‘मालिक की मुहब्बत को शीशा बनाके पी’सारखी विविधढंगी गाणीदेखील ‘घाशीराम’चा अविभाज्य भाग असल्यासारखी त्यात अत्यंत चपखल बसली.
१९७२ साली नीळकंठ प्रकाशनचे प्रकाश रानडे यांच्या टिळक रोडवरच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर बसून तेंडुलकरांनी साधारण चार दिवसांत ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक एकटाकी लिहून काढलं! तेंडुलकर सलग लिहीत असत. एकदा लिहून काढलं की कंस, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्हांपर्यंत सर्व फायनल असे. चूक काय ती खिळे जुळवणाराच करू जाणे! या जबरदस्त नाटककाराच्या ओघवत्या लेखणीतून प्रसवलेल्या या स्फोटक संहितेने त्याकाळच्या तरुण नाटय़कर्मीना भुरळ घातली नसती तरच नवल. १६ डिसेंबर १९७२- ‘घाशीराम’चा पहिला प्रयोग प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनच्या बॅनरखाली महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत सादर झाला. प्राथमिक फेरीत प्रथम आलेल्या या नाटकाचा अंतिम फेरीत मात्र दुसरा क्रमांक लागला. (तेव्हाच्या परीक्षकांना नंतरच्या काळात नाटकाचं
बेसुमार कौतुक झाल्यावर कुठे तोंड लपवावं असं झालं असेल!) सुरुवातीच्या काही प्रयोगांत ‘दिल खुशाल करा’, ‘सख्या चला बागा मंदी रंग खेळू चला’ वगैरे लावण्या गायिका पिटात बसून गात असत. पण जब्बार पटेलांना नाटकाच्या फॉर्ममध्ये सूत्रधार (श्रीराम रानडे) आणि परिपाश्र्वक (रवींद्र साठे, चंद्रकांत काळे) यांच्याच तोंडी या लावण्या असायला पाहिजेत असं जाणवत राहिलं. चार-पाच प्रयोगांनंतर साठे आणि काळे यांनी या लावण्या शिकून त्या नाटकात सादर करायला सुरुवात केली. पुढे तात्त्विक मतभेद होऊन श्रीधर राजगुरू, जब्बार पटेल, सतीश आळेकर, मोहन आगाशे वगैरे लोकांनी पी.डी.ए.शी फारकत घेऊन थिएटर अॅकॅडमीची स्थापना केली आणि ‘घाशीराम’चे प्रयोग चालूच ठेवले.
‘घाशीराम’चा वाद्यवृंद चार लोकांचा. चार वादक घेऊन त्यात सगळी गाणी आणि पाश्र्वसंगीत बसवणे, हे महाकठीण काम. पण भास्करदांनी हे आव्हान लीलया पेललं. गंमत म्हणजे नाटकाची सुरुवात स्पर्धेतलं हौशी नाटक म्हणून झाली होती, पण पुढे त्याचे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयोग व्हायला लागले, तरी या चार लोकांमध्ये पाचवा वादक आला नाही. याचाच अर्थ चार वादकांमध्येच या नाटकाचं संगीत परिपूर्ण होईल अशी योजना संगीतकाराने करून ठेवली होती. हार्मोनियम- शाम बोंडे, पखावज/ तबला-श्रीकांत राजपाठक, ढोल/ ढोलकी- अशोक गायकवाड आणि सुंद्री (शहनाईची लहान बहीण)- प्रभाशंकर गायकवाड. नाटकात सुंद्री वापरायची आयडिया अफलातून होती. पण वाद्य हाताशी आहे म्हणून ते सतत वाजवायचा मोह भास्करदांनी टाळला. या सुंद्रीची एन्ट्री नाना फडणवीस आणि ललितागौरीच्या प्रणयनृत्याच्या वेळेस व्हायची. सुंद्रीच्या लांबलचक मिंडवर ललितागौरी लाजली, की हमखास टाळी यायची. गणपतीच्या मिरवणुकीच्या वेळेस अशोक गायकवाड ताशा काढायचा- त्याने एकदम माहौल बनायचा. हाच ताशा घाशीरामच्या वधाच्या प्रसंगी थरार निर्माण करायचा. एकाच वाद्याचे दोन भिन्न उपयोग! नानांच्या (मोहन आगाशे) वेगवेगळ्या मूडमधल्या पदन्यासासाठी भास्करदांनी वेगवेगळ्या वाद्यांवरच्या लग्ग्या वाजवून बहार आणली होती. नाना ललितागौरीचा पाठलाग करत असतात तेव्हा खर्जातला ब्राह्मणांचा कोरस आणि लाकडी घट्टय़ाने ढोलाच्या मधल्या भागावर केलेला प्रहार- यामधून वेगळाच ध्वनी तयार होत असे.
१९८६ च्या न्यूयॉर्कला झालेल्या प्रयोगापासून १९९२ साली थिएटर अॅकॅडमीने केलेल्या शेवटच्या प्रयोगापर्यंत ‘घाशीराम’च्या जवळपास १०० प्रयोगांमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. अमेरिका दौऱ्यासाठी जब्बार पटेलांनी माझी निवड केवळ मी ‘हरकाम्या’ असल्यामुळे केली होती! गायक मी होतोच; थोडाफार अभिनयही करायचो. तबल्याचं प्रशिक्षण घेतल्यामुळे तालवाद्य्ोही वाजवता यायची. शिवाय पेटीवरही हात बसलेला होता. त्यामुळे वेळप्रसंगी ‘कोरसमध्ये गाणारा ब्राह्मण’ यापेक्षा अधिक कामे माझ्या वाटय़ाला आली. एकदा मुंबईहून पुण्याच्या प्रयोगासाठी येणारा रवींद्र साठे ट्रॅफिक जॅममध्ये अडकला तेव्हा तो पोहोचेपर्यंत मी त्याची निळी पगडी घालून काळेंबरोबर परिपाश्र्वक म्हणून उभा राहिलो. एका प्रयोगाला आमचे पखावजवादक श्रीकांत राजपाठक अचानक आजारी पडले तेव्हा त्या प्रयोगात ब्राह्मणाचा कॉस्च्यूम उतरवून पखावजही वाजवला! शेवटचे तीस-चाळीस प्रयोग मी नाटकात हार्मोनियम वाजवत असे. हार्मोनियम वाजवत असताना भास्करदांनी अख्ख्या नाटकाची केलेली अद्भुत सांगीतिक रचना मला अधिक स्पष्ट दिसायला लागली. नाटक अनेक पट्टय़ांमधून फिरतं, पण कुठेही सूर बदलल्याचं कानाला खटकत नाही. अनेक कापडं एकत्र करून शिवलेल्या गोधडीची वीण बोचत नाही, तसं. आणि गाणी किती श्रवणीय! यमनवर आधारित ‘श्री गणराय’, जयजयवंतीमधलं कीर्तन, जोगकंसमधली ठुमरी, बिहागमधला तराणा. ‘राधे कृष्ण हरी, मुकुंद मुरारी’ ही ओळ तर इतक्या विविध प्रकारे मांडली आहे भास्करदांनी- की क्या बात है! ज्याच्या कृपेने ‘घाशीराम कोतवाल’सारख्या माइलस्टोन नाटकामध्ये मला सहभागी होता आलं, खूप शिकायला मिळालं, त्या ‘श्री गणराया’पुढे हा पुणेरी बामन आजन्म नर्तन करण्यास तयार आहे!
राहुल रानडे rahul@rahulranade.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा