स्थळ – बांद्रय़ाचा मेहबूब स्टुडिओ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
साल – १९७७
प्रसंग – ‘कोतवाल साब’ या चित्रपटाच्या ‘ओ साथी रे, भूल न जाना मेरा प्यार’ या गाण्याचं ध्वनिमुद्रण.
पात्र – संगीतकार रवींद्र जैन, दिग्दर्शक- हृषीकेश मुखर्जी, गायिका- आशा भोसले आणि ८० वादक.
दृश्य – आशा भोसले माईकवर.. मॉनिटर रूममध्ये काहीसे अस्वस्थ रवींद्र जैन. अस्वस्थतेचं कारण- जैन यांनी संगीतबद्ध केलेल्या, शास्त्रीय अंगाने जाणाऱ्या आणि अत्यंत अवघड चाल असलेल्या गाण्याची वादकांबरोबर केवळ एक रिहर्सल करून आशा भोसले ध्वनिमुद्रणाला उभ्या राहिलेल्या. वास्तविक जैन यांनी आशाताईंना ‘ये गाना बहोत मुश्किल बना है- रेकॉर्डिग से पहले कमसे कम ३-४ दिन रिहर्सल करनी होगी’ असे अनेकदा निरोप पाठवूनदेखील बाई थेट रेकॉर्डिगच्या दिवशीच हजर झाल्याचं बघून हा संगीतकार डिवचला गेला होता.
त्या काळी आजच्यासारखं ओव्हर डबिंग किंवा गायकांचा आवाज म्युझिक ट्रॅक झाल्यावर रेकॉर्ड करण्याची पद्धत नव्हती. ऐंशी-नव्वद वादक असतील, तरी गायक आणि वादक यांचं ध्वनिमुद्रण एकत्रितच करावं लागत असे. त्यामुळे ध्वनिमुद्रणाच्या आधी या सगळ्यांची भरपूर तालीम होत असे. ध्वनिमुद्रकाची जबाबदारीही प्रचंड असे. चालू गाण्यात जरी शेवटाकडे कोणी चुकलं, तरी अख्खं गाणं सुरुवातीपासून करावं लागे.
अरेंजरनी काउंट दिला.. ‘‘वन-टू-थ्री-फोर’’- व्हायोलिन्सचं इंट्रो म्युझिक सुरू झालं-टेकचा बाण सुटला. आता मागे वळून बघणे नाही. इंट्रो संपल्यावर बाईंचं गायन सुरू झालं. ‘साथी रे..’ रवींद्र जैन अत्यंत बारकाईनं गाणं ऐकू लागले. जणू बाई चुकण्याची आणि ‘कट’ म्हणण्याची ते वाटच बघत होते! गाणं संपत आलं. बाई एकही जागा चुकल्या तर नाहीतच, पण बहिरी ससाणा ज्या सफाईनं आणि डौलानं आकाशातून झेपावत जमिनीवरच्या भक्ष्याचा अचूक वेध साधतो, तितक्याच सफाईनं आणि नजाकतीनं त्या पूर्ण गाणं गायल्या.
‘..भूल ना जाना मेरा प्यार’. गाणं संपलं. रवींद्र जैन यांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला- ‘वा’. दुसरा टेक घेण्याची त्यांची आंतरिक इच्छा बाईंनी पूर्ण होऊन दिली नाही! संपूर्ण गाण्यात गायनावर बोट ठेवायला जागाच नव्हती. वादकांबरोबर केवळ एकदा तालीम करून या बाईंनी आठवडाभर रोज रियाज केला असल्याच्या आत्मविश्वासाने गाणं गायलं! आशाताईंचा रिहर्सल्स करण्याविषयी बिलकूल आक्षेप नव्हता, कारण त्या काळची पद्धतच ती होती. रवींद्र जैन यांनी ‘मी केलेलं एक अत्यंत अवघड गाणं तुम्हाला गायचं आहे. त्याची तुम्हाला भरपूर तालीम करावी लागेल, त्याला पर्याय नाही.’ या छापाचे अनेक निरोप पाठवल्यामुळे या मानी गायिकेचा अहंकार दुखावला गेला होता. तो अहंगंडा मुळे नव्हे, तर केवळ स्वत:च्या गळ्यावर आणि संगीताच्या ज्ञानावर विश्वास असल्यामुळेच. आशाताईंनी जैन यांनी अप्रत्यक्षपणे दिलेलं आव्हान स्वीकारलं आणि टेचात पेललंदेखील. आजही आपण ‘साथी रे भूल न जाना मेरा प्यार..’ ऐकलं, तर तोच पहिला आणि एकमेव टेक आपल्याला ऐकायला मिळतो.
अख्ख्या विश्वातली संगीत क्षेत्रातली सात आश्र्चय निवडायची ठरवली, तर त्यातलं एक आश्चर्य ‘आशा भोसले’ असेल, यात तीळमात्र शंका नाही. ‘जगातला सगळ्यात जास्त गाणी गायलेला आवाज’ (११००० गाणी) अशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होणं, हा खरं म्हणजे गिनीज बुकचा बहुमान आहे. अनेक लोकांनी उभ्या आयुष्यात ११००० गाणी ऐकलीदेखील असतील की नाही याची मला शंका आहे! विशेष म्हणजे भारतातील जवळपास सर्व भाषांमध्ये आणि काही अभारतीय भाषांमध्येही या हरहुन्नरी गायिकेने गाणी गायली. या गळ्याला संगीताचा कुठलाच प्रकार वज्र्य नाहीए! नाटय़संगीत असो वा लावणी, कॅबेरे साँग असो वा भजन, प्रेमगीत असो वा गझल, बाईंच्या कंठाने सर्वच गानप्रकारांना पुरेपूर न्याय दिला आहे. वयाने मुलं शोभतील, अशा बॉय जॉर्ज आणि नेली फर्टाडो या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायकांबरोबरदेखील ‘आईंनी’ या पोरसवदा कलाकारांइतक्याच उत्साहात गाणी म्हटली.
माझी आणि या खळाळणाऱ्या झऱ्यासारख्या आईंची पहिली भेट ९३ सालच्या सुमारास झाली. माझं गाणं त्यांनी गायची पहिली वेळ! अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर देव प्रसन्न होऊन समोर उभा ठाकल्यावर भक्ताच्या मनात भावनांची जी सरमिसळ होत असेल, ती मी प्रत्यक्षात अनुभवली! साक्षात ‘आशा भोसले’ यांना मी चाल समजावून सांगायची? ‘वन, टू, थ्री, फोर’ असा काउंट देऊन ठेका दाखवणारे हातवारे करायचे? हे म्हणजे प्रसन्न झाल्यानंतर भक्तानेच देवाला, ‘काय? कसा आहेस? बरं चाललंय का सगळं स्वर्गात?’ असं विचारण्यासारखं आहे. पहिल्या ध्वनिमुद्रणाचा तो प्रसंग निभावून गेला खरा-पण तो अख्खा दिवस मला जरा उंच झाल्यासारखं वाटत होतं.. माझे पाय जणू जमिनीपासून उचलले गेले होते! माझं स्वरबद्ध केलेलं गाणं त्या सोनेरी गळ्यानं गायलं होतं याचा मला प्रचंड अभिमान वाटत होता आणि मी कल्पनादेखील न केलेल्या माझ्याच गाण्यातल्या अनेक जागा मला या अचाट ज्ञानाच्या आणि शक्तीच्या गायिकेनी दाखवल्या होत्या. त्यानंतर अनेक वेळा आमच्या भेटी होत राहिल्या. मी त्यांना ‘भिकबाळीवाला’ म्हणून लक्षात राहिलो होतो! सुरुवाती सुरुवातीला मला ‘अहो’ म्हणणाऱ्या आशाबाई हळूहळू ‘अरे’ म्हणू लागल्या. ‘पुण्याचा भिकबाळीवाला रानडे’ असं माझं नामकरणही त्यांनी करून टाकलं. गाण्याव्यतिरिक्त आमच्या इतर गप्पाही होऊ लागल्या. या महान गायिकेशी माझी एवढी जवळीक होईल असं मला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. जेव्हा गप्पा मारता मारता त्या अचानक गाणं गायला लागत, तेव्हा पाळण्यातलं तान्हं बाळ चिमणाळं बघून जसं चेकाळतं, तसं माझं व्हायचं.
एकदा तर त्यांनी कमालच केली. मी मुंबईच्या आजीवासन स्टुडिओत रेकॉर्डिग करत असताना अचानक तिथे गडबड सुरू झाली. ‘आशाताई राहुलला भेटायला आल्या आहेत’ अशी बातमी माझ्या कानावर आली. ही वदंता आहे की काय असं वाटेपर्यंत स्वत: आशा भोसलेच माझ्यासमोर उभ्या ठाकल्या! त्यांनी हात पुढे करून माझ्या हातावर एक छोटी निळ्या मखमलीने मढवलेली डबी ठेवली. ‘हे काय?’ असं मी विचारताच त्यांनी डोळ्यांनीच ‘उघडून बघ’ असा इशारा केला. मी डबी उघडून बघतो तो काय? आत एक सुबक भिकबाळी होती! माझ्या तोंडून शब्दच फुटेना. खास माझ्यासाठी बनवून घेतलेली ती भिकबाळी द्यायला स्वत: ‘दी ग्रेट आशा भोसले’ वाकडी वाट करून मला भेटायला आल्या, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? भारावलेल्या अवस्थेतच मी त्यांना वाकून नमस्कार केला. ‘चांगलं म्युझिक कर’ त्यांनी मला आशीर्वाद दिला. ‘माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत’. अजून काय बरं हवं माणसाला?
आशाताईंच्या गाण्यामधल्या विविधतेचं मला कायम आश्चर्य वाटत आलं आहे. एकाच गळ्यामधून इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी तितक्याच सफाईनं कशी निघू शकतात हा प्रश्न मला नेहमी पडत असे. गाणं जेवढं गळ्यात असतं, त्याहून अधिक ते गायकाच्या मेंदूत असतं, हे कालांतराने माझ्या लक्षात आलं. गायकाचा स्वभावच त्याच्या गाण्यामधून प्रतीत होत असतो हेच खरं. आशाताईंच्या स्वभावाचा मागोवा घेतला, तर त्यांच्या विविधरंगी गाणी कमालीच्या सहजतेने गाण्यामागचं रहस्य कळतं. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं, तर त्यांचा स्वभाव लहानपणापासूनच हुडदंग! भातुकली खेळण्याची, दंगामस्ती करण्याची त्यांना विशेष आवड. वडील दीनानाथ गायला बसले, की छोटी आशा दाराआडून गाणं ऐकून त्यांचं अनुकरण करत असे. आशा नऊ वर्षांची असतानाच वडील निवर्तले, पण त्यांचे गाण्यामध्ये विविध प्रयोग करण्याचे आणि फिरत्या गळ्याचे जे संस्कार छोटय़ा आशाच्या गळ्यावर झाले, ते कायमचे. शिवाय मूळच्या अल्लड स्वभावामुळे सुरांशी मस्ती करणं हेही ओघानं आलंच. रागांची सरमिसळ करणे, गाण्यात मध्येच अनवट स्वर लावणे आणि कुठल्याही प्रकारचं गाणं गाताना स्वत:चा गळा झोकून देणे, हा स्थायीभाव असल्यामुळे त्यांनी गायलेलं कुठल्याही प्रकारचं गाणं लज्जतदार होतं, यात शंका नाही. पाश्र्वगायनापेक्षा शास्त्रीय संगीतात जास्त रुची असणाऱ्या आशाला पाश्र्वगायन करण्यास भाग पाडलं, ते परिस्थितीने..
राहुल रानडे – rahul@rahulranade.com
( पूर्वार्ध)