‘ओ सजना, बरखा बहार आयी’ (शैलेंद्र- सलील चौधरी), ‘मोरा गोरा अंग लई ले, मोहे शाम रंग दई दे’ (गुलझार- एस. डी. बर्मन), ‘ये नयन डरे डरे’ (कैफी आझमी- हेमंतकुमार), ‘मेरी भीगी भीगी सी.. अनामिका तू भी तरसे’ (मजरूह सुलतानपुरी- आर. डी. बर्मन), ‘रोजा जानेमन’ (पी. के. मिश्रा- ए. आर. रहमान), ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना’ (बा. भ. बोरकर- सुधीर फडके), ‘हा माझा मार्ग एकला’ (शांता शेळके- सुधीर फडके), ‘दयाघना..’ (सुधीर मोघे- हृदयनाथ मंगेशकर), ‘मी राधिका, मी प्रेमिका’ (नितीन आखवे- श्रीधर फडके), ‘खेळ मांडला..’ (गुरू ठाकूर- अजय-अतुल).. ही सगळी गाणी श्रवणीय आणि लोकप्रिय आहेत, याबरोबरच या गाण्यांचं आणखी एक वैशिष्टय़ आहे. या सगळ्या गाण्यांची चाल आधी झाली, त्यानंतर शब्द लिहिले गेले! इतके सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द चालीत चपखल बसवण्याची या गाण्यांच्या गीतकारांची किमया आपल्याला अचंबित करून जाते, हेच खरं. फक्त हीच नव्हे, तर यासारखी शेकडो गाणी आहेत, ज्यांचे शब्द चाल झाल्यानंतर लिहिले गेले. शब्द लिहिण्याआधी चाल करणं कितपत योग्य आहे? चाल आधी केली तर शब्दांना पुरेसा न्याय मिळतो का? कवीचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात नाही का? असे अनेक प्रश्न उद्भवतात; ज्यांची समर्पक उत्तरं आजपर्यंत मिळालेली नाहीत. चाल आधी करण्यामागची नेमकी कारणमीमांसा आणि कार्यपद्धती काय असावी, याचा शोध घेताना मला काही गोष्टी आढळून आल्या.
एका भाषेत गाजलेला चित्रपट दुसऱ्या भाषेत जसाच्या तसा बनवणे हे काही आपल्याला नवीन नाही. गाण्यांच्या बाबतीतही तसंच आहे. संगीतकाराने केलेलं मूळ गाणं एका भाषेत असेल- आणि तेच गाणं तसंच्या तसं वेगळ्या भाषेत वापरायचं असेल तर त्याच चालीवर शब्द लिहिले जातात. सलील चौधरी, एस. डी. बर्मन, हेमंतकुमार, आर. डी. बर्मन यांसारख्या अनेक संगीतकारांची अनेक लोकप्रिय बंगाली गाणी नंतर हिंदीमध्ये आणली गेली. ए. आर. रहमान यांची अनेक गाजलेली हिंदी गाणी मूळ तमीळ भाषेतली आहेत. बाळासाहेब मंगेशकरांची मराठी गाणीदेखील हिंदीचा मेकअप् करून आलेली आपल्याला माहीत आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेलं ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’ हे अप्रतिम मूळ मराठी गाणं बंगालीतही तितकंच प्रसिद्ध आहे (‘दुरे आकाश शामियाना’). अजय-अतुल यांची काही गाजलेली मराठी गाणी हिंदी चित्रपटांमध्ये वाजताना आपण बघतो आहोतच. थोडक्यात, भाषांतर हे चाल आधी असण्याचं आणि शब्द नंतर लिहिण्याचं एक कारण झालं.
अनेक संगीतकारांना चित्रपटाची गोष्ट आणि गाण्याचा प्रसंग कळला की प्रसंगानुरूप चाल करायला आवडते. मग ‘डाडा डीडी’, ‘लाला लाला’ किंवा ‘तारा तुरु’ असले शब्द वापरून संगीतकार सुचलेली चाल रेकॉर्ड करतात आणि गीतकाराकडे पाठवतात. गीतकार या ‘डाडा डीडी’वर शब्द लिहितात. काही संगीतकार जुन्या गाण्यांचेच शब्द वापरून नवीन चाल तयार करतात आणि नंतर शब्द बदलून घेतात. पंचमदा गाण्याची चाल करण्यासाठी मोजक्या वादकांना घेऊन त्यांच्या खारच्या सीटिंग रूममध्ये बसत असत. ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटामधलं एक गाणं करत असताना मुख्य ओळीसाठी ‘रूप तेरा मस्ताना होगा जी’ आणि इतर ठिकाणी ‘डारा डूरू’ असे शब्द वापरून त्यांनी एका प्रसंगाला साजेसं गाणं तयार केलं. पुढे ते ऐकून गुलशन बावरा यांनी त्याच चालीवर ‘प्यार हमें किस मोड पे ले आया’ असे शब्द लिहिले!
काही संगीतकार चाल करण्यासाठी सोयीचं जावं म्हणून स्वत:च तात्पुरते (डमी) शब्द लिहितात. त्यातला एक शंकर महादेवन. शंकर बऱ्यापैकी कवितादेखील करतो हे अनेक लोकांना माहीत नसेल. ‘बंटी और बबली’साठी कव्वाली करायची ठरल्यावर त्याला ‘कजरा रे कजरा रे तेरे काले काले नैना’ या शब्दांसकट चाल सुचली. उरलेलं गाणं शंकरनी ‘डमी’ शब्द वापरून पूर्ण केलं. ही कव्वाली गुलझारसाहेब लिहिणार होते. त्यांनी गाणं ऐकलं. शंकरनी लिहिलेली ‘कजरा रे’ ही ओळ आवडल्याचं गुलझार यांनी मोठय़ा मनानं मान्य केलं आणि ती ओळ तशीच ठेवली. फक्त त्यात त्यांनी एक बारीकसा बदल केला. ऐश्वर्या रायचे नैना ‘काले काले’च्या ऐवजी ‘कारे कारे’ असे काव्यात्मक करून घेतले! चालीवर शब्द लिहिण्याची प्रथा फक्त हिंदीमध्येच आहे असं नाही. अनेक मराठी गाणीदेखील चालीवर लिहिली गेली आहेत. महान कवयित्री शांताबाई शेळके यांना चालीवर शब्द लिहिण्याची प्रोसेस खूप आवडत असे आणि त्यात मजाही वाटत असे! गुरू ठाकूरने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘वाजले की बारा’, ‘माऊली माऊली’, ‘खेळ मांडला’ अशी अनेक अप्रतिम गाणी अजय गोगावलेनी म्हटलेल्या ‘डाडा डीडी’वर लिहिली आहेत. सौमित्र, श्रीरंग गोडबोले, वैभव जोशी हे गीतकारदेखील चालीवर शब्द लिहिण्यात माहीर आहेत. कवी आणि गीतकार यांतला फरक हाच आहे, की कवी त्याला हव्या त्या वृत्तात आणि छंदात कविता लिहू शकतो. गीतकाराला चालीवर गाणं लिहिताना गाण्याचा विषय, चाल आणि ताल याचं भान ठेवून गाणं लिहावं लागतं.
तिसरी पद्धत म्हणजे ‘टय़ून बॅंके’तल्या गाण्यांवर शब्द लिहून घेणे. चित्रपटाचा विषय काय आहे, हे माहीत नसतानाही काही संगीतकार चाली तयार करून त्या आपल्या खात्यात जमा करून ठेवतात! त्याला ‘टय़ून बॅंक’ असं समर्पक नावदेखील दिलं गेलंय. ही बॅंक करण्याची प्रथा हिंदीमध्ये जास्त फोफावली आहे. चित्रपटाची गोष्ट माहीत नसताना गाणी करणार कशी, असा प्रश्न काही पामरांना पडला असेल तर त्यांनी सध्या चित्रपटांत वाजत असलेली गाणी ऐकावीत. आयटम सॉंग, प्रेमगीत, विरहगीत आणि लग्न/ होळी/ बैसाखीमध्ये वाजणारं एखादं सणवाराचं गाणं- यापलीकडे गाण्यांचे प्रसंग चित्रपटांमध्ये नसतात. त्यामुळे गाण्यांचा संचय करणाऱ्यांना सोप्पं जातं. ‘ज्याच्या गंगाजळीत जास्त गाणी, तो संगीतकार मोठा’ असा इंडस्ट्रीतल्या काही लोकांचा समज आहे! निर्माता किंवा दिग्दर्शक आपल्या मित्रमंडळींना घेऊन संगीतकाराच्या म्युझिक रूममध्ये बसतात आणि अनेक ‘व्हरायटीज्’ बघतात. ‘ये सुनाओ, वो और खोलके दिखाओ’ असं त्यांचं साडय़ांच्या दुकानात आल्यासारखं चालू होतं. २०-२५ आयटेम्स बघितल्यावर एखाद्या साडीचा पोत, पदर पसंत पडला तरच पुढे फॉल, पिको करायला- म्हणजेच त्यावर शब्द लिहायला चाल पाठवण्यात येते. अन्यथा नऊवारीची पाचवारी, निळ्याची गुलाबी असे बदल करून ‘साडी’ हिट् होईल याची खात्री पटल्यावरच ती बुक केली जाते. यात एक फार मोठा धोका संभवतो, तो म्हणजे एकच माल दोघांना विकला जाण्याचा. एकदा एका संगीतकाराने दोन वेगळ्या गिऱ्हाईकांना एकच चाल विकल्याचं दोन्ही सिनेमे रिलीज झाल्यावरच लक्षात आलं होतं!
चोरलेल्या चालींवर नवीन शब्द लिहून घेणे ही चित्रपटसृष्टीत चालत आलेली पूर्वापार परंपरा आहे. पूर्वी जग आजच्याइतकं जवळ आलेलं नसल्यामुळे तेव्हा लगेच चोऱ्या सापडायच्या नाहीत. पण आज त्या उघडकीस येतात. चाली चोरणारे संगीतकार त्यांच्या चोरीला ‘इन्स्पिरेशन’ असं गोंडस नाव देतात. पण चोरी ती चोरीच! आजही काही बडी धेंडं मूळ संगीतकारांना क्रेडिट न देता त्यांच्या गाण्यांवर बिनदिक्कत डाके घालत असतात. इंग्रजीत याला ‘प्लेजिअरिझम’ म्हणतात. वाईट याचं वाटतं, की सर्रास चोरी करून ही मंडळी उजळ माथ्यानं फिल्मी जगतात मिरवत असतात. असो. सांगायचा मुद्दा हा, की चालीनंतर शब्द येण्यासाठीची ही चार कारणं होय. काही संगीतकारांना आधी चाल करणं कदापि मान्य नसतं. त्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे श्रीनिवास खळे. त्यांच्या मते, शब्दांनी सुरांचा हात धरून त्यांना गाण्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. म्हणूनच खळेकाकांच्या चार अंतऱ्यांच्या गाण्यांमधली प्रत्येक अंतऱ्याची चाल वेगळी असायची. एरवी पहिल्या आणि तिसऱ्या अंतऱ्याची चाल एकच असण्याची रूढ पद्धत आहे.
माझ्या मते, गीतकाराकडे शब्दभांडार, कवितेची जाण आणि संगीताचं ज्ञान मुबलक प्रमाणात हवं. अर्थात संगीतकाराचाही भाषा आणि व्याकरणाचा अभ्यास हवाच. ज्या गीतकारांना भाषा अवगत नसते, त्यांचे चालीत कोंबलेले शब्द ऐकले, की जेवताना दाताखाली खडा आल्यावर होतं तसं होतं. मीटरमध्ये बसणारा प्रतिशब्द सुचला नाही की गाण्यामध्ये परभाषेतले शब्द घातले जातात. बोलीभाषेतलं तरुणाईचं गाणं आहे ही सबब सांगून अर्वाच्य शब्द घुसडले जातात. या असल्या गाण्यांमध्ये छंदाचा आणि वृत्ताचा तर पत्ताच नसतो. भंपक यमकं जुळवणाऱ्यांना यम लवकरात लवकर का बरं उचलत नाही? असा प्रश्नही पडतो! अशी कमस्सल गाणी ऐकली, की सुमधुर, अर्थपूर्ण गाणं तयार होण्यासाठी मोत्यासारखे टपोरे शब्द लागतात हेच मनोमन पटतं. पण शेवटी चाल आधी का शब्द आधी, हा चिरंतन प्रश्न अनुत्तरितच राहतो.
राहुल रानडे –  rahul@rahulranade.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा