मुंबईच्या उन्हाळ्यात, रणरणत्या घामट उन्हात बसने प्रवास करताना सामान्य माणसाच्या मनात ‘कधी एकदा पंख्याखाली बसतो’ किंवा ‘उतरल्या उतरल्या थंड पाणी कुठे मिळेल?’ असे विचार येतील. पण असामान्य प्रतिभा असलेल्या एका इसमाला त्याच उन्हात ८ नंबरच्या बी. ई. एस. टी.च्या बसमध्ये मंत्रालय ते चेंबूर या प्रवासात चक्क गाण्याची चाल प्रसवली. ‘शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे..’ ट्रॅफिकच्या गोंगाटात मंगेश पाडगांवकरांच्या या सुरेख ओळींना सुरात सजवण्याची कल्पना करणं दुरापास्त आहे. बसच्या इंजिनच्या आवाजात चाल तयार होत होती.. ‘या झऱ्याचा सूर आता, मंद झाला रे..’ इतकं सुंदर गाणं ज्या बसमध्ये जन्माला आलं, ती बसही भाग्यवानच म्हणायला पाहिजे. बसच्या घंटीच्या आवाजात, अनेक लोकांच्या चढण्या-उतरण्याच्या गलबलाटात ‘नीज माझ्या नंदलाला’ या अंगाईची चाल सुचणं हा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे? सरस्वतीचा वरदहस्त लाभल्याशिवाय ही किमया साधणं केवळ अशक्य. ती किमया ज्यांना साधली
होती आणि ज्यांच्या डोक्यावर साक्षात् सरस्वतीचा हात होता, ते होते सरस्वतीचे निस्सीम भक्त, संगीतकार श्रीनिवास खळे. आमचे सगळ्यांचे लाडके ‘खळेकाका’!
खळेकाकांचं नाव खूप लहान असल्यापासून मी ऐकत आलो आहे ते त्यांच्या संगीताकरता नव्हे. माझा मामा खळेकाकांचा बऱ्याचदा उल्लेख करत असे. १९६३ मध्ये तो काही महिने आकाशवाणीत इंजिनीअर म्हणून काम करायचा. त्याचं नाव- श्रीनिवास खरे! त्याच्या आणि खळेकाकांच्या नावातल्या साधम्र्यामुळे आकाशवाणीत अनेक लोकांना माझा मामाच संगीतकार आहे असं वाटे! पुढे थोडंफार संगीत ऐकण्याच्या वयात आल्यावर खळेकाकांना त्यांच्या गाण्यांमधून खूप वेळा भेटलो होतो. पण काकांची आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट २००३ च्या सुमारास त्यांच्या वर्सोव्याच्या घरी झाली. खांद्यावर रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र केसांचा हा ऋषितुल्य माणूस समोर आल्यावर विलक्षण काहीतरी वाटलं. त्यांनी इतक्या प्रेमळ आवाजात माझं स्वागत केलं, की मला एकदम आजोळी गेल्याचा भास झाला. मी हेलावून गेलो. त्यांना वाकून नमस्कार केल्यावर मी माझी ओळख सांगितली. त्यांना मी संगीतकार म्हणून आधीच माहीत होतो, हे ऐकून माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं! अर्थात त्या दिवशी मी संगीतकार म्हणून नव्हे, तर झी मराठीच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमातल्या खळेकाकांवर होणाऱ्या भागाचा दिग्दर्शक या नात्याने त्यांना भेटायला गेलो होतो. संगीताची जाण असलेला माणूस कार्यक्रम दिग्दर्शित करतो आहे म्हटल्यावर खळेकाकादेखील खूश झाले. आमचं बोलणं एका बैठकीत संपणं शक्यच नव्हतं (मला संपू द्यायचंही नव्हतं.). त्यामुळे आमच्या वारंवार भेटी होऊ लागल्या.
या सगळ्या भेटींमधून एक गोष्ट मला प्रकर्षांनं जाणवली, ती म्हणजे- सुरांचा हा जादूगार अत्यंत प्रेमळ, साधा, पण मनस्वी माणूस आहे. खळेकाकांच्या बोलण्यात मार्दव होतं आणि प्रचंड जिव्हाळाही. ते कुठलीही गोष्ट सांगताना, समजावताना वाक्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी ‘राजा’ म्हणत. त्यामुळे ऐकणारा हरखून जात असे. त्यांना संगीतावर भाषण देता येत नसे, किंवा फार वैचारिक बोलताही येत नसे. अप्रतिम बांधलेल्या चालींमधून ते आपल्या संगीतविषयक ज्ञानाची चुणूक दाखवून देत असत. गाणी करण्याविषयीची त्यांची मतं पक्की होती. त्यांनी उभ्या आयुष्यात कधीही चाल आधी केली नाही. त्यांचे सूर कायम शब्दांचा मागोवा घेत आले. मग गाणं कुठलंही असो. ‘गोरी गोरी पान’सारखं बालगीत असो, ‘कळीदार कपुरी पान’सारखी लावणी असो, ‘जय जय महाराष्ट्र माझा’सारखं स्फूर्तीगीत असो, किंवा ‘शुक्रतारा मंद वारा’सारखं भावगीत असो; खळेकाका कायम शब्दांना सुरात मढवत असत. सूरदेखील असे- की ऐकणाऱ्याच्या काळजाला भिडलेच पाहिजेत. वरवर ऐकायला सोपी वाटणारी त्यांची गाणी गाताना भल्या भल्या गायकांचा कस लागायचा. याच कारणासाठी अनेक नावाजलेले गायक खळेकाकांची गाणी म्हणण्यासाठी उत्सुक असत.
एकाच अल्बममधली सगळीच्या सगळी गाणी लोकप्रिय होणं हे महाकठीण काम. पण सरस्वतीच्या या उपासकानं ‘अभंग तुकयाचे’मधली सगळी गाणी अशी संगीतबद्ध केली, की एक-एक गाणं कितीही वेळा ऐकलं तरी लोकांचं समाधान होत नाही. ‘सुंदर ते ध्यान’, ‘भेटी लागी जीवा, ‘अगा करुणाकरा..’ एकूण एक गाणी ऐकताना मन भरून येतं. अगदी सुरुवातीचा ‘जय जय रामकृष्ण हारी’चा साधा गजरदेखील अद्भुत वाटायला लागतो. ‘अभंग तुकयाचे’मधल्या खळेकाकांच्या चाली, लता मंगेशकर यांचा दैवी आवाज आणि अनिल मोहिलेंचं साधं, पण साजेसं संगीत संयोजन यांचा मिलाफ ऐकताना आपण एका सर्वागसुंदर गणेशमूर्तीकडे बघतो आहोत असाच भास होतो.
काही भेटींमध्येच खळेकाकांची आणि माझी गट्टी जमली. ‘तुम्हाला अशा कमाल चाली कशा सुचतात हो?’ माझा खळेकाकांना वेडा, भाबडा प्रश्न. ‘अरे राजा, तू स्वत: संगीतकार आहेस ना? तुला हा प्रश्न का पडावा? चल माझ्याबरोबर..’ असं म्हणून काका मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. तिथे एक सरस्वतीची देखणी मूर्ती होती. तिच्याकडे बोट दाखवत काका म्हणाले, ‘ही करते चाली. मी फक्त माध्यम आहे.’ त्यांच्या आवाजातला सच्चेपणा ऐकून एक क्षण माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं- की ती मूर्ती काकांच्या कानात चाली गुणगुणते आहे आणि काका नोटेशन लिहून घेत आहेत! पण खरोखरच ते त्या कलेच्या देवीसमोर विलक्षण तंद्री लागलेल्या अवस्थेत अनेकदा ध्यानस्थ बसलेले असतात, असं मला त्यांच्या निकटच्या लोकांनी नंतर सांगितलं.
‘तुमचे कोमल धैवत आणि तीव्र मध्यम मला खायला उठतात हो!’ मी एकदा गप्पांच्या ओघात त्यांना बोललो. हाताची विशिष्ट हालचाल करत ते हसले आणि त्यांनी दोन्ही हात वरच्या दिशेला केले. हा माणूस कुठलंच क्रेडिट घ्यायला तयार नाही. सगळं श्रेय वरच्याला देऊन मोकळा होतो. पण त्यांना कुठेही असताना अप्रतिम चाली सुचण्यामागचं हेच कारण तर नसेल, असा प्रश्नही मला पडत असे.
त्यांच्याच एका गाण्याच्या जन्माची गोष्ट ऐकण्यासारखी आहे. पाडगांवकर आणि खळे घनिष्ट मित्र. दोघेही आकाशवाणीत नोकरी करायचे आणि रोज लोकलनी बरोबर यायचे-जायचे. खळेकाका चेंबूरला बसायचे आणि त्याच गाडीत ठरलेल्या डब्यात पाडगांवकर पुढच्या स्टेशनला चढायचे. एक दिवस सकाळी लोकलमध्ये बसल्या बसल्या पाडगांवकरांनी नुकतंच लिहिलेलं गाणं खळेकाकांच्या हातात ठेवलं. आपल्या मित्राने आपल्यासाठी कवितेच्या रूपात काय खाद्य आणलं आहे हे बघण्यासाठी काका उत्सुक होतेच. त्यांनी गाणं डोळ्यांखालून घातलं आणि शब्दांवर काम सुरू केलं. लोकलच्या खडखडाटातही सरस्वतीचं कुजबुजणं खळेकाकांच्या कानावर पडलं असावं. कारण व्ही. टी. स्टेशन येईपर्यंत मुखडा तयार झाला होता! अंदाजे पन्नास वर्षांपूर्वी लोखंडी सांगाडय़ांच्या दणदणाटात तयार झालेलं हे गाणं म्हणजे- ‘श्रावणात घन निळा बरसला..’ खळेकाकांच्या असामान्य प्रतिभेचं अजून एक उदाहरण! पुढे लता मंगेशकरांच्या स्वरात हे सुमधुर गाणं ध्वनिमुद्रित झालं, खूप गाजलं. आणि आजही ते कमालीचं लोकप्रिय आहे.
खळेकाकांना संगीताच्या बाबतीत तडजोड करायला आवडत नसे. स्वत:च्या मुलांबद्दल नसतील एवढे ते त्यांच्या गाण्यांबद्दल पझेसिव्ह होत. सहस्रचंद्रदर्शनाच्या वयापर्यंत आलेला हा तपस्वी स्वत: कार्यक्रमात गाणाऱ्या गायकांच्या तालमी घ्यायला उत्सुक असे. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाच्या संगीत संयोजनाची सूत्रं काकांबरोबर १२ र्वष काम केलेल्या कमलेश भडकमकरकडे सोपवण्यात आली होती. तरीही खळेकाका स्वत: जातीनं कोण गायक कुठलं गाणं गाणार आहे याकडे बारीक लक्ष ठेवून होते. त्यांची ही गाण्यांबद्दलची आत्मीयता बघून मला अचंबा वाटत असे. आपल्या कामाच्या बाबतीत तडजोड न करण्याची अमूल्य शिकवण मला कायमची मिळाली. जसजसा कार्यक्रमाचा दिवस जवळ येऊ लागला, तसतशी सगळ्यांचीच लगबग वाढू लागली. मला तर परीक्षेच्या दिवसांत आलं नसेल एवढं दडपण आलं होतं. आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं इतके दिवस सतत मिळणारा संगीताच्या या महान योग्याचा सहवास संपेल याची हुरहुरही होतीच.. (पूर्वार्ध)
राहुल रानडे rahul@rahulranade.com

चूकभूल..

‘आधी कोंबडी की..’ या लेखामध्ये ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना’ या गाण्याचे गीतकार बा. भ. बोरकर आहेत, असा चुकीचा उल्लेख झाला आहे. वास्तविक हे गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा