शंकर महादेवन, अजित परब, कमलेश भडकमकर हे श्रीनिवास खळे यांचे पट्टशिष्य. खळेकाकांचा मी काही गंडाबद्ध शिष्य नव्हे; पण मी त्यांना मनापासून गुरू मानत आलो आहे. त्यांनी माझं गुरुत्व पत्करलं नसेल तरी ते माझे गुरू कसे? गुरूची नेमकी व्याख्या काय? आपण कोणालाही गुरू मानू शकतो का? असे प्रश्न मला नेहमी पडत. गुरू तो असतो- ज्याच्याकडून आपण ज्ञान मिळवतो, नवनवीन गोष्टी शिकतो. गुरूकडून आपण प्रेरणा घेतो आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. पण मग भर उन्हा-पावसात चौकात उभं राहून रहदारीचं नेटकं नियोजन करणाऱ्या ट्रॅफिक हवालदाराकडूनही आपल्याला प्रेरणा मिळू शकते की! खाली मान घालून अत्यंत एकाग्रतेने चपलेला नेटकी शिवण घालणाऱ्या चांभाराकडूनही आपण धडे गिरवू शकतो. आईने दिलेला खाऊ मित्रांसाठी खिशात कोंबून नेणारा एखादा चिमुरडाही खूप काही शिकवून जात असतो! हे सगळेच आपले गुरू नाहीत का? कोणाकडून काय, कसं आणि किती आत्मसात करायचं हे केवळ शिकणाऱ्यावर अवलंबून असतं असं माझं मत आहे. खळेकाकांकडून कळत- नकळत मी अशा अनेक गोष्टी शिकलो; ज्या केवळ अनमोल आहेत.
कुठल्याही परिस्थितीत कामाच्या बाबतीत तडजोड न करणे, हा खळेकाकांचा स्थायीभाव. काम चोख हवं. त्यात हयगय होता नये. काका आपल्या कामात कोणाचीही ढवळाढवळ खपवून घेत नसत. एका प्रथितयश निर्माता-दिग्दर्शकाच्या विनंतीवरून त्या दिग्दर्शकाच्या गाणाऱ्या कन्येची रेकॉर्ड काढायची असं ठरलं आणि खळेकाकांनी तिच्याकडून गाणी म्हणून घेतली. गाणी ध्वनिमुद्रित झाल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा काकांनी ती ऐकली, तेव्हा त्यांना ती फारशी रुचली नाहीत आणि ही रेकॉर्ड काढायची नाही असं त्यांनी ठरवलं. तशी सूचनाही त्यांनी रेकॉर्ड कंपनीला देऊन टाकली. दिग्दर्शक महोदयांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी काकांना फोन करून बोलावून घेतलं. आपल्या मुलीचं गाणं लोकांसमोर येणार नाही ही बाब महोदयांना अर्थातच डाचत होती. रेकॉर्ड बाहेर न काढण्याचं कारण खळेंना विचारताच काकांनी निर्भीडपणे, पण नम्रतेनं त्यांच्या कन्येची गायकी अपेक्षेनुसार नसल्याचं सांगितलं. ‘संगीत- श्रीनिवास खळे’ या बिरुदाखाली कमअस्सल गोष्टी रसिकांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत, हा खळेकाकांचा बाणा! दिग्दर्शक महोदयांनी पुढचे काही चित्रपट देण्याचे आमिष दाखवूनही काका ढळले नाहीत. आपल्या मतावर ठाम राहून त्यांनी रेकॉर्ड प्रदíशत करण्यास नम्र नकार दिला. अर्थातच त्यांना त्या दिग्दर्शकाचा पुढचा एकही चित्रपट मिळाला नाही, हे सांगणे न लगे. काकांचा हा निर्णय अव्यवहार्य होता यात शंका नाही. पण सुरांच्या या बादशहाने आयुष्यभर कोणाचीही हांजी हांजी केली नाही. या इंडस्ट्रीत राहायचं असेल तर थोडंफार कृत्रिम वागावं लागतं, हे त्यांना मान्यच नव्हतं. ‘गाणं काटेकोरच व्हायला हवं. आणि तेही माझ्या पद्धतीनं!’ असं त्यांचं कायम म्हणणं असायचं. त्याबाबतीत कोणाहीकरता कुठलीही तडजोड करणं काकांना पचायचंच नाही. एका अत्यंत नावाजलेल्या हिंदी गायकासाठी गाणी करण्याचा प्रस्ताव खळेकाकांच्या एच. एम. व्ही.मधल्या बॉसनी काकांसमोर ठेवला. तो गायक ‘अभंग तुकयाचे’मधली गाणी ऐकून काकांचा फॅन झाला होता. एवढय़ा मोठय़ा गायकासाठी गाणी करायला मिळणार म्हणून काका हरखून तर गेले नाहीतच; उलट त्यांनी ‘ये गाता बहुत अच्छा है, लेकिन मेरे गाने नहीं गा पाएगा. आप दूसरे किसी से इनके लिए गाने करवा लेना..’ असं धडधडीत सांगून तो प्रस्ताव धुडकावला! आपल्या अशा बोलण्याने आपल्या नोकरीवर गदा येऊ शकते याची फिकीरही नव्हती त्यांना. त्यांच्या असल्या रोखठोक स्वभावामुळे साक्षात् सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या या कलाकारावर कुबेराची मात्र फारशी मेहेरनजर झाली नाही.
‘काका, चित्रपटांचं तुम्हाला वावडं होतं का? तुम्ही केवळ पाच-सहा मराठी चित्रपट केले. हिंदी तर एकही नाही. असं का?’ मी जरा घाबरतच काकांना प्रश्न विचारला. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात दाखवण्यात येणाऱ्या चित्रफितीसाठी मी खळेकाकांची ऑन-कॅमेरा मुलाखत घेत होतो. ‘एक आला होता िहदीमधला खूप मोठा दिग्दर्शक.’ डोळे मोठे करत काहीशा कुत्सितपणे काका उद्गारले. ‘मला म्हणाला, आप मेरे पिक्चर का म्युझिक करो. कुछ टय़ुने सुनाइये.’ मी त्याला विचारलं, ‘टय़ुने? वो क्या होता है?’ यमन रागाची आलापी करताना नवोदित गायकाकडून चुकून कोमल ऋषभ लागल्यावर ऐकणाऱ्याला जेवढा त्रास होईल, तेवढाच त्रास काकांच्या चेहऱ्यावर हा किस्सा सांगताना दिसत होता! ‘मैं टय़ुनेबिने नहीं जानता. गाने लिखवाकर लाओ, मं बना दूंगा.’ आधी चाली करून त्यावर शब्द लिहून घेण्याची सवय असलेल्या त्या िहदीतल्या महान हस्तीला वाटलं असावं- गाणी करण्याची ही कुठली विचित्र पद्धत? त्यांनी काकांसमोर दोन्ही हात जोडून काढता पाय घेतला!
मराठीतदेखील ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘बोलकी बाहुली’, ‘जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘सोबती’, ‘पळसाला पाने तीन’ एवढे मोजकेच चित्रपट काकांनी केले. ‘जिव्हाळा’ या राम गबाले दिग्दíशत चित्रपटातली सगळीच गाणी एकसे एक होती. संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेलं ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’, आशा भोसले यांची दोन गाणी- ‘प्रिया तुज काय दिसे स्वप्नात’ आणि ‘चंदाराणी’, कृष्णा कल्ले यांची ‘आईपण दे रे देवा’, ‘देश हीच माता’ ही दोन आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘या चिमण्यांनो परत फिरा रे..’ केवढी ही विविधता! गदिमांचे अप्रतिम शब्द आणि अनिल मोहिले यांचं साजेसं संगीत संयोजन- सगळंच जमून आलं होतं. ‘या चिमण्यांनो..’ हे गाणं निर्वविाद तुमच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपकी एक आहे.’ आमच्या एका बैठकीच्या दरम्यान मी काकांना म्हटलं. ‘थांब, तुला एक गंमत ऐकवतो,’ असं म्हणत काकांनी त्यांच्या कॅसेट्सच्या ढिगाऱ्यातून एक कॅसेट काढली आणि मला एक गाणं ऐकवलं. ‘फार लोकांना माहीत नाहीये, की आईने ‘परत फिरा रे घराकडे आपुल्या’ म्हटल्यानंतर मुलं आईला उत्तर देतात, असं गाणंदेखील मी केलं आहे.’ मी भारावल्यासारखा ते गाणं ऐकत होतो. अत्यंत कमी लोकांनी ऐकलेलं खळेकाकांच्या संग्रहातलं ते गाणं ऐकण्याचं भाग्य मला लाभलं होतं.
त्यानंतर त्यांनी ‘रामशाम गुणगान’मधली गाणी त्यांच्या माहितीसकट ऐकवली. ‘दोन भारतरत्नं माझ्याकडे एकाच अल्बममध्ये गायले आहेत,’ हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाच भरून आलं. लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी. भारतातलेच नव्हे, तर जगातले दोन अग्रगण्य गायक. या दोन्ही गंधर्वानी खळेकाकांची अनेक गाणी गायली. पंडितजींनी गायलेले खळेकाकांचे अभंग म्हणजे जणू अमृतात घोळून सोन्याचा वर्ख लावलेले शब्द.. ‘राजस सुकुमार’, ‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ‘जे का रंजले गांजले’.. यादी न संपणारी आहे. भीमसेनजी खूप मोठे गायक. ते वयानेदेखील काकांपेक्षा चार वर्षांनी वडील. पण रेकॉìडगच्या आधी काका त्यांच्याकडूनही गाण्याचा एक-एक शब्द आणि सूर घोटवून घेत असत. अर्थात भीमसेनजीही खूप साधे, जमिनीवर असणारे शास्त्रीय गायक होते. त्या दोघांचं सांगीतिक नातं इतकं घट्ट विणलं गेलं होतं, की तेदेखील विनातक्रार गाणं खळेकाकांच्या पसंतीस उतरेपर्यंत गात असत. याव्यतिरिक्त माणिकबाई वर्मा, शोभा गुर्टू, रामदास कामत, मालती पांडे, शाहीर साबळे, पुष्पा पागधरे, वीणा सहस्रबुद्धे, बकुळ पंडित, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, सुमन कल्याणपूर, पं. उल्हास कशाळकर, आशालता वाबगावकर, कविता कृष्णमूर्ती, सुरेश वाडकर, देवकी पंडित, साधना सरगम, शौनक अभिषेकी, भरत बळवल्ली, अजित परब, पद्मनाभ गायकवाड, आर्या आंबेकर या चार पिढय़ांतल्या साधारण शंभरहून अधिक गळ्यांनी खळेकाकांचे सूर अभिमानाने मिरवले आहेत! संत तुकाराम, संत नामदेव, कुसुमाग्रज, प्र. के. अत्रे, गदिमा, पाडगांवकर, गंगाधर महांबरे, राजा बढे, शांताबाई शेळके यांसारख्या १३६ कवींचे शब्द काकांनी सुरात मढवले. बालगीते, स्फूर्तिगीते, चित्रपटगीते, नाटय़गीते, लावण्या, अभंग, भावगीते, गझल, भजनं.. सुरांच्या या मांत्रिकाला सर्व प्रकार वश होते. त्यांच्या सुरांच्या गारुडातनं बाहेर येऊच नये अशी हमखास तंद्री लागते त्यांची गाणी ऐकताना.
..तिसऱ्या घंटेचा घणघणाट कानावर पडला आणि मी भानावर आलो. पडदा उघडला. टाळ्यांच्या गजरात ‘नक्षत्रांचे देणे- श्रीनिवास खळे’ हा कार्यक्रम सुरू झाला. खळेकाकांनी आजवर केलेल्या अद्भुत गाण्यांचा सिलसिला सुरू झाला. पाडगांवकर आणि खळे ही १९५७ पासून एकत्र काम करणारी मित्रांची जोडगोळी पहिल्या रांगेत शेजारी शेजारी बसली होती. या दोघांनी एकत्र केलेली गाणी जेव्हा रंगमंचावर सादर होत, तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावरचे कौतुकमिश्रित समाधानाचे भाव बघण्यासारखे होते. दोन शाळकरी मित्र आपल्या भागीदारीने जिंकून दिलेल्या क्रिकेट मॅचचा रीप्ले पाहत असावेत तसे! काकांच्या सत्काराची घोषणा झाल्यावर कार्यक्रमाचा दिग्दर्शक या नात्याने काकांना मी रंगमंचावर घेऊन गेलो. ज्या बोटांमधून आजवर असंख्य अलौकिक चाली निर्माण झाल्या होत्या, त्या बोटांनी माझा हात घट्ट धरला होता. केवढं हे भाग्य! कार्यक्रम उत्तम झाला. दुसऱ्या दिवशी काकांचा मला फोन आला- ‘अरे राजा, खूप छान केलास कार्यक्रम. अशाच चांगल्या चालीही करत जा. शब्दांशी, सुरांशी इमान राख. देव तुझं भलं करो!’ साक्षात् सरस्वतीच्या भक्तानं दिलेला हा आशीर्वाद ऐकून मी धन्य झालो. मनोमन मी ज्यांना गुरू मानलं होतं, त्यांच्या काही काळ मिळालेल्या निकटच्या सहवासाने माझी अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे’ अशी झाली होती!
राहुल रानडे rahul@rahulranade.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा