आठवी-नववीत पुण्यात असताना मावशीची हार्मोनियम काढून दिवाळी अंकात आलेल्या कविता/ गझल यांना हौसेखातर चाली लावण्याचा मी प्रयत्न करीत असे. त्याच काळात भेंडीबाजार घराण्याचे पंडित त्र्यंबकराव जानोरीकर आणि भारत गायन समाजाचे श्रीराम कृष्णाजी वैद्य यांनी मला गाणं शिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला! माझी गायनकला काही फार बहरली नाही, पण शास्त्रीय संगीताची चांगली ओळख मात्र झाली. पहिली ते सातवी मुलुंडला असताना सी. व्ही. जोशी यांच्याकडे आणि आठवीत असताना बाबा पुण्याला शिफ्ट झाल्यावर पांडुरंग मुखडे यांच्याकडे मी तबल्याचे धडेही गिरवले. आईचं प्रोत्साहन आणि पाठिंबा नसता तर मी संगीताच्या वाटेलाही गेलो नसतो. कारण रानडय़ांकडे डॉक्टर्स, वकील आणि जास्तीत जास्त इंजिनीअर्स निपजले होते. म्हणूनच दहावीत ७९% मार्क्स (तेव्हा खूप होते हो!) मिळून फग्र्युसनला अॅडमिशन मिळत असूनदेखील बाकी अॅक्टिव्हिटीज् करता याव्यात म्हणून आईच्या आग्रहाखातर शेवटी मी तिच्याच माजी कॉमर्स कॉलेजमध्ये- बी. एम. सी. सी.मध्ये पोहोचलो! (आईचा आजन्म ऋणी राहण्याचं अजून एक कारण!)
मी लावलेल्या चालींना माझी आई आणि माझे कॉलेजमधले मित्र हेच श्रोते होते. पण एकदा आई-बाबांचे मित्र- थिएटर अॅकॅडमीचे सेक्रेटरी श्रीधर (अण्णा) राजगुरू आमच्याकडे आले असताना त्यांनी माझ्या काही गझला ऐकल्या आणि मला थिएटर अॅकॅडमीच्या लहान मुलांची नाटकं करणाऱ्या ‘शिशुरंजन’मध्ये संगीत दिग्दर्शन करायला बोलावलं. साल होतं १९८३. माझ्या वाटय़ाला नाटक आलं होतं- ‘चंद्र हवा, चंद्र हवा’! दिग्दर्शक होता- शिरीष लिमये. आणि कलाकार होते- मृणाल देव (आता कुलकर्णी), गौरी जोशी (आता लागू) वगैरे. तोपर्यंत स्वान्त सुखाय चाली लावणारा मी- कमिशन्ड चाली लावायचं काम अंगावर पडल्यामुळे एकदम गांगरून गेलो. मला चाली सुचेनात. कमालीचं टेन्शन आलं होतं. एक दिवस तालमीला अण्णांनी माझी ओळख थिएटर अॅकॅडमीचे संगीतकार आनंद मोडक यांच्याशी करून दिली आणि त्यांना माझी अडचण सांगायला सांगितली. मोडक सरांनी पेटी काढली आणि तिथेच माझा क्लास घेतला. गायन-वादन शिकविणारे हजारो क्लासेस आणि इन्स्टिटय़ूट्स असतात, पण ‘चाल कशी लावावी’ किंवा ‘पाश्र्वसंगीत कसे करावे’ हे शिकवणारे वर्ग जगाच्या पाठीवर कुठेही नाहीत. मोडक सरांना स्वानुभवावरून माझी अडचण लगेच कळली असावी. ते मला चाल लावण्याचे बेसिक्स समजावू लागले. त्यांनी वानगीदाखल नाटकातलंच एक गाणं घेतलं. त्याचे शब्द होते-
‘लीनाराणी, लीनाराणी, डोळ्यामधे का गं पाणी,
सांग मला तू सांग मला, काय हवे लीनाराणीला
झाडाच्या मागे लपलेला, चंद्र हवा मज चंद्र हवा’
‘या गाण्याचं मीटर काय आहे? कुठल्या तालात आहे असं तुला वाटतंय?’ मोडक गुरुजींनी मला प्रश्न केला. ‘मला वॉल्ट्झमध्ये (दादऱ्यात) हे गाणं बसेल असं वाटतंय..’ मी चाचरत उत्तर दिलं. ‘व्हेरी गुड! आता सूर काय सुचताहेत?’ मोडक सरांचा प्रश्न. मी गडबडलो. ‘दोन दिवसात प्रयत्न करतो.. चाल लावून आणायचा!’ मी ग्वाही दिली. आनंद मोडक यांनी दोन दिवसांनी तालमीला यायचं मान्य केलं. या वेगळ्याच विषयाचं मोडक सरांनी दिलेलं होमवर्क घेऊन मी घरी गेलो. माझ्या दहा वर्षांच्या शालेय जीवनात इतकं मन लावून घरचा अभ्यास मी कधीच केला नव्हता! कधी एकदा माझा अभ्यास तपासला जातोय अशा विचित्र- आजपर्यंत मनात कधीही न आलेल्या भावनेशी माझी नव्यानेच ओळख झाली. पाटी नव्हे, तर पेटी घेऊन सोडवायला लागणारा हा पेपर आनंददायी, पण कठीण होता. सुरांनी डोक्यात थैमान घातलं होतं. ऑप्शन्स खूप होत्या. त्यावेळी क्रिएटिव्हिटीमधला पहिला धडा मी शिकलो- ‘कलानिर्मितीत चूक, बरोबर असं काही नसतं. आतून, मनापासून जे स्फुरेल, तेच खरं.’ मनासारखी चाल होण्यास बरेच कष्ट पडले. पण शेवटी सुचली. लहानपणी सायकल शिकत असताना पाय टेकत टेकत पायडल मारताना अचानक तोल सांभाळता आल्यावर जसा थरार अनुभवला होता, तसाच थरार मनासारखी चाल लागल्यावर मी अनुभवला! दोन दिवसांनी मोडक सरांना चाल ऐकवली. त्यांनी मला उत्तम गुणांनी उत्तीर्ण केलं. नाटकातल्या सगळ्या गाण्यांचं कोडं उलगडत गेलं. वयाच्या सतराव्या वर्षीच माझं पेपरमधल्या जाहिरातीत नाव यायला लागलं.. ‘संगीतकार- राहुल रानडे.’ मी सुखावून गेलो. ‘चंद्र हवा’च्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर उठून घाईघाईनं आधी जाहिरातीचं पान बघू लागलो. माझ्या पहिल्याच संगीत दिग्दर्शनाच्या प्रयत्नात मोडक गुरुजींनी बोट धरून मला वाट दाखवली. नंतर पुढे अनेक द्रोणाचार्याचा मी एकलव्य झालो. काही प्रत्यक्षात भेटले, काही सुरांमधून भेटले, तर काही शब्दांतून.
याच सुमारास फग्र्युसन कॉलेजमधल्या ‘किमया’ या ओपन एअर थिएटरच्या उद्घाटनाच्या निमित्तानं थिएटर अॅकॅडमी निर्मित, बा. सी. मर्ढेकर रचित संगीतिकेचा- ‘बदकांचे गुपित’चा प्रयोग होणार होता. दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन आनंद मोडक यांचं होतं. मुख्य पात्रं चंद्रकांत काळे आणि वीणाताई देव करायचे. त्यातल्या ‘वसंत दाणी’ या पात्राचं काम करणारा मकरंद ब्रह्मे याला प्रयोगाच्या दिवशी वेळ नव्हता. सर्वानुमते मी ते काम करावं असं ठरलं. रोल असा काही फार नव्हता, दोन छोटी गाणी म्हणायची होती. पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या हस्ते ‘किमया’चं उद्घाटन झालं. आणि माझं भाग्य एवढं थोर, की त्या उभयतांसमोर थिएटर अॅकॅडमीमध्ये माझं गायक नट म्हणून पदार्पण झालं.
फक्त गाण्यांमधून नाटक उलगडवून दाखविण्याचा ‘संगीतक’ हा प्रकार संगीत दिग्दर्शकासाठी खरोखरच एक चॅलेंज आहे. मोडक गुरुजींनी या नाटकात बदकांच्या कोरसचा खूप सुंदर वापर केला होता. या नाटकाच्या तालमींमध्ये पहिल्यांदाच मला हार्मनी, कॉर्डस् यासारख्या सांगीतिक संज्ञा मोडक सरांकडून शिकायला मिळाल्या. कपाटात कधीकाळी लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले की जेवढा आनंद होतो, तेवढाच आनंद मला या नवनवीन गोष्टी समजल्या की होत असे. मला आजही ‘बदकांचे गुपित’ जवळजवळ संपूर्ण पाठ आहे.
मोडकांच्या सान्निध्यात मी सर्वाधिक शिकलो, ते म्हणजे थिएटर अॅकॅडमीच्या मेगा प्रॉडक्शनच्या- ‘पडघम’च्या निर्मितीप्रक्रियेत. अरुण साधूलिखित ‘पडघम’ हे महा-युवानाटय़ करण्याचा घाट जब्बार पटेल यांनी घातला. ६० कलाकारांच्या संचात हे संगीत नाटक सादर होणार होतं. ‘पडघम’मध्ये सर्व प्रकारचं संगीत होतं. यातली गाणी लोकसंगीत, नाटय़संगीत आणि मॉडर्न, पॉप म्युझिकवर आधारित होती. ब्रॉडवे म्युझिकल स्टाईल एकाच वेळी स्टेजवर चाळीस मुलं-मुली एकत्र नाचणार, लाइव्ह गाणार होती. ‘पडघम’मध्ये माझं कास्टिंग प्रमुख गायक नट म्हणून झालं आणि आपोआपच मी मोडक सरांचा असिस्टंटही झालो. ‘पडघम’मध्ये पंचवीसेक गाणी होती. मोडक चाली लावून आणायचे आणि आम्हाला शिकवायचे. काही चाली तालमीतच लावायचे. मी चाल शिकून घ्यायचो आणि मग इतरांना शिकवायचो. या प्रोसेसमध्ये माझी चाल तर पक्की व्हायचीच, पण इतरांना चाल समजावत असताना त्यातले बारकावेही कळायचे. जब्बार पटेल तालमीला आले की ते मोडकांनी लावलेल्या चाली ऐकायचे आणि कधी कधी दिग्दर्शकीय दृष्टीतून त्यांना काय अभिप्रेत आहे ते सांगायचे. पटेल संगीत शिकले नसले तरी त्यांच्याकडे संगीताचा योग्य वापर करण्याचं आणि संगीतकाराकडून चांगलं काम काढून घेण्याचं कसब होतं. दिग्दर्शकाच्या सांगण्याबरहुकूम चाली करण्याचं माझं ट्रेनिंग ‘पडघम’च्या दरम्यान झालं.
‘पडघम’मधली गाणी म्युझिक ट्रॅकवर म्हणायची ठरली. आज जरी ‘काराओके’- म्हणजे नुसत्या साऊंड ट्रॅकवर गाणी म्हणण्याची पद्धत रुळली असली तरी ३२ वर्षांपूर्वी हा प्रकारच अत्यंत नवीन होता. उत्तम निर्मिती करणं हे थिएटर अॅकॅडमीचं ध्येय होतं. ‘पडघम’चा साऊंड ट्रॅक मुंबईत मोठय़ा स्टुडिओत फिल्म इंडस्ट्रीतले प्रख्यात वादक घेऊन करायचा असं ठरलं. मोडकांचा साहाय्यक म्हणून रेकॉर्डिगला मलाही नेलं गेलं. अशा प्रकारे मुंबईच्या स्टुडिओमध्ये माझं पहिलं पाऊल पडलं.. (क्रमश:)
राहुल रानडे rahul@rahulranade.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा