१९८४ साली अरुण साधू लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित ‘पडघम’ नाटकाच्या रेकॉर्डिगसाठी वरळीच्या ‘रेडिओजेम्स’ स्टुडिओत संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांच्याबरोबर मी पहिलं पाऊल टाकलं. स्टुडिओत शिरताच माझे डोळे आणि कान विस्फारले गेले. (‘कान विस्फारणे’ असा शब्दप्रयोग नाहीये मराठी भाषेत; पण तसंच काहीसं झालं माझ्याबाबतीत.) स्टुडिओत येणारा विशिष्ट वास, मोठ्ठा आवाज, भलामोठ्ठा मिक्सर असलेली कंट्रोल रूम, असंख्य मीटर्स आणि लुकलुकते दिवे बघताना एखाद्या लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात गेल्यावर होतं, तसं माझं झालं! रेकॉर्डिगचं पहिलं सेशन साधारण एक आठवडा चाललं. तीन महिन्यांच्या कालावधीत तीन-चार सेशन्समध्ये ‘पडघम’च्या गाण्यांचे ट्रॅक्स पूर्ण झाले. या प्रत्येक सेशनला मी हजर होतो. अठराव्या वर्षी एवढं एक्स्पोजर मिळणं हे माझं भाग्यच म्हणावं लागेल. या रेकॉर्डिगला मला अनेक थोर मंडळी भेटली. लीऑन डिसुझा आणि अशोक पत्कींसारखे अरेंजर. रमाकांत म्हापसेकर, सुरेश ललवाणी, माधव पवार, दीपक बोरकरसारखे वादक. झुबेरीसाहेबांसारखा साऊंड रेकॉर्डिस्ट. सगळेच मातब्बर. मला त्या सगळ्या वातावरणाचं प्रचंड आकर्षण आणि कमालीचं कुतूहल वाटत होतं. झुबेरीसाहेब आणि त्यांच्या असिस्टंट्सवर इक्वलायझर म्हणजे काय, कंप्रेशन कशाला म्हणतात, डिले/रिव्हर्बचं टायमिंग कसं अ‍ॅडजस्ट करायचं, अशी प्रश्नांची सरबत्ती करून आणि ते काय काय करताहेत ते बारकाईने पाहत मी साऊंड रेकॉर्डिगचे पहिले धडे गिरवले.
दीपक बोरकर तेव्हा नुकताच तालवाद्यवादक म्हणून स्थिरावला होता. त्याने माझ्या अत्यंत आवडीच्या गुलाम अली- आशा भोसले यांच्या ‘मीराज-ए-गझल’ या अल्बममध्ये वाजवलं आहे, हे कळल्यावर मी त्याचा कम्प्लीट फॅन झालो. हजारो प्रश्न विचारून मी त्याला भंडावून सोडत असे. तोही मला न कंटाळता उत्तरं देई. मला तालाचं ज्ञान आहे हे कळल्यावर तो मला ‘टेक’मध्ये घुंगरू, टॅम्बुरिन वगैरे छोटी छोटी वाद्ये वाजवायला देऊ लागला. मी पण आनंदाने कानाला हेडफोन लावून गाण्याबरहुकूम वाजवण्याचा प्रयत्न करत असे. गेली ३६ र्वष दीपक तालवाद्यवादक म्हणून कार्यरत आहे. आत्तापर्यंत शेकडो संगीतकारांबरोबर त्याने काम केलंय. उत्तम कलाकार आणि लाखमोलाचा माणूस कसं व्हावं, हे दीपककडून शिकण्यासारखं आहे. विविध देशांत दौऱ्यावर असताना इतरांसारखं इकडेतिकडे फिरत बसण्यापेक्षा चित्रविचित्र तालवाद्य्ो गोळा करणं हा दीपकचा छंद आहे. त्याच्या वाद्यांच्या पेटीला मी ‘जादूची पोतडी’ म्हणतो. तो त्या पोतडीतून काय बाहेर काढेल आणि त्यातून कसला ध्वनी निर्माण होईल, ते सांगता येत नाही. ‘कुर्बानी’ चित्रपटातलं ़बिट्टू-नाझिया हसनचं ‘आप जैसा कोई’ या गाण्यात ‘बात बन जाए’ ओळीनंतर ‘टूंऽऽऽऽ’ असा आवाज आहे. ‘पडघम’च्या रेकॉर्डिगला तसाच आवाज काढणारं ‘सिंड्रम’ (सिंथेसाइज्ड ड्रम) नावाचं काडय़ापेटीच्या आकाराचं मशीन दीपकने आणलं होतं. एका गाण्यात टेकमध्ये मला हवं तिथे ‘टूंऽऽऽऽ’ आवाज काढायची परवानगी मोडकांनी दिली. जत्रेत पिपाणी वाजवत फिरणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावरून जेवढा आनंद ओसंडून वाहत असेल, तेवढाच माझ्या चेहऱ्यावर तो सिंड्रम वाजवताना दिसत असणार! एकूणच त्या ध्वनिमुद्रणादरम्यान झालेलं शिक्षण बारावीत असलेल्या माझ्यासाठी पोस्टग्रॅडच्या मोलाचं ठरलं. शिकवणाऱ्यांइतकेच शिकू देणारेही महत्त्वाचे असतात असं आज मागे वळून पाहताना मला वाटतं. जब्बार पटेल, आनंद मोडक आणि थिएटर अ‍ॅकॅडमीचे शतश: आभार.
‘पडघम’च्या रेकॉर्डिगच्या अनुभवानंतर मला मुंबईत रेकॉर्डिग करण्याची चटक लागली. ८६-८७ साली पुण्यातल्या क्लायंट्सच्या जिंगल्स करण्यासाठी मी वेळोवेळी पुण्याहून मुंबईला जाऊ लागलो. या शहरातील लोकांचा कामाबद्दलचा अप्रोच मला पहिल्यापासूनच आवडला होता. सलग दहा-बारा तास विनातक्रार काम करणारी (दुपारी १ ते ४ न झोपता!), ‘अध्र्या-एक तासात येतो’ असं मोघम न सांगता ७.५४ किंवा ८.३२ ची लोकल पकडणारी, मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रोज न कंटाळता, हसत हसत घामट प्रवास करणारी माणसं मला भावली. मुंबईकडून मी प्रोफेशनॅलिझम- व्यायसायिक शिस्त शिकलो. शक्यतो कामाला ‘नाही’ म्हणायचं नाही असा या शहराचा बाणा. म्हणूनच मुंबापुरीलादेखील मी सर्वार्थानं माझी गुरू मानतो. अर्थात काम संपल्या संपल्या माहेरी- म्हणजेच पुण्यनगरीकडे कूच करण्याची ओढ होतीच. आजही असते!
१९८८ मध्ये मला मुंबईत रमेश टेकवानी भेटला. त्याच्या कंपनीचं नाव होतं- ‘टेक वन ऑडिओ व्हिजुअल्स’! कॉर्पोरेट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीज् करायचा तो. त्याच्या एका ऑडिओ व्हिजुअलचं म्यूझिक करण्याच्या निमित्ताने आमची ओळख झाली. मला हा जाडगुला, सस्पेंडर्स घालणारा अतरंगी माणूस सॉलिड आवडला. तो काम करत असलेलं व्हिडिओचं माध्यम संगीताच्या माध्यमापेक्षा वेगळं होतं. मला या माध्यमाचं आकर्षण वाटू लागलं. याची माहिती आपल्याला हवी असं वाटू लागलं. रमेशला मी तसं बोलून दाखवलं. त्याने तात्काळ मला त्याचा साहाय्यक बनवून टाकलं. ‘टेक वन’च्या फिल्म्सचं साऊंड डिझाइन आणि एडिटिंग करण्यापासून ते क्लायंटला प्रेझेंटेशन करण्यापर्यंत सर्व कामे मी करू लागलो. ‘हॅन्ड्स ऑन ट्रेनिंग’ किती महत्त्वाचं असतं याची प्रचीती मला तेव्हा आली. रमेशच्या एका डॉक्युमेंटरीच्या निमित्तानं शंतनूराव किर्लोस्करांना भेटण्याचा योग आला. त्यांनी चार मोलाच्या गोष्टी सांगितल्याचं मला लख्ख आठवतंय. त्या छोटय़ाशा भेटीचा पगडा आजही माझ्या मनावर आहे.
रमेश मला पूर्ण क्रिएटिव्ह मुभा द्यायचा. वर चार पैसेही द्यायचा! एक वर्ष त्याच्यासोबत काम केल्यानंतर मी स्वतंत्रपणे माझी पहिली डॉक्युमेंटरी प्रोडय़ुस-डिरेक्ट केली. त्यानंतर जवळपास १४-१५ कंपन्यांसाठी मी फिल्म्स बनवल्या. डॉक्युमेंटरी/कॉर्पोरेट फिल्म्सचं स्ट्रक्चर कसं असावं, स्क्रिप्टिंग, शूटिंग, व्हॉइस ओव्हर यांचा विचार कसा करावा यांचं अनमोल मार्गदर्शन मला रमेशकडून मिळालं होतंच. स्वतंत्रपणे काम करता करताही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. कॅमेरा अँगल्स, एडिटिंग, ध्वनीमिश्रण या सगळ्याचं तेव्हा मिळालेलं ज्ञान मला चित्रपटाचं पाश्र्वसंगीत करताना खूप उपयोगी पडतं.
सई परांजपे- माझ्या आईची सख्खी मैत्रीण- माझी सईमावशी. तिने मोठय़ा विश्वासानं संगीतकार म्हणून मला पहिलं व्यावसायिक नाटक देऊ केलं- ‘माझा खेळ मांडू दे’ (१९८७). पाश्र्वसंगीतकार म्हणून माझा पहिला चित्रपटही तिचाच. १९८९ सालचा ‘दिशा’! (योगायोग म्हणजे या चित्रपटातली गाणी आनंद मोडक यांनी केली होती.) त्याच सुमारास सईमावशीबरोबर काही टेलीफीचर फिल्म्सही मी केल्या. तिच्याबरोबर काम करताना धमाल यायची. अर्थात तिचा धाकही जबरदस्त होता. अत्यंत शिस्तीची आणि शीघ्रकोपी म्हणून ती प्रसिद्ध! (भाचा म्हणून मला काही सवलत मिळेल तर शप्पथ!) नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांवरची तिची पकड जबरदस्त होती. बारीकसारीक गोष्टींची नोंद करून ठेवणं- ही तिची सवय. मला वाटायचं, प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायची काय गरज आहे? पण माझ्या नकळत तिची ही सवय माझ्यात झिरपली. आणि त्याचा फायदा आज माझ्या लक्षात येतोय. तिचा वक्तशीरपणा, मनाचं समाधान होईपर्यंत एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणं, अशा अनेक गोष्टी मला खूप शिकवून गेल्या आहेत, हे कळायला बरीच र्वष लागली. पण तिच्या अनेक शिकवण्या माझ्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.
ज्या व्यक्तीकडून आपण कुठलीही गोष्ट आत्मसात करतो, तो आपला गुरू- असं माझं मत आहे. गुरूची शिकवण लेक्चरच्या स्वरूपात असेल असं अजिबात नाही. कान आणि डोळे उघडे असतील तर कोणाकडूनही ज्ञान मिळवता येतं. शिवाजी मंदिरला नाटक सुरू व्हायच्या आधी आणि इंटरव्हलच्या विश्रामात गेली कित्येक र्वष आमचा बाळू चहावाला हसतमुखाने आणि आपुलकीने बॅकस्टेजला सगळ्यांना चहा आणून देतो. नेमून दिलेलं काम न कंटाळता हसतमुखाने करावं, ही बाळूकडून खरोखरच शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे चहावाल्या बाळूलाही मी माझा गुरू मानतो.
माझ्या आजवरच्या प्रवासात कलाक्षेत्रातील असो वा जगण्यासंबंधी असो, मला वेळोवेळी विविध गुरू भेटले. अर्थात् जसं अनेक गुरूंकडून मी काय आणि कसं करायचं ते शिकलो, त्याचप्रमाणे अनेकांकडून मी काय आणि कसं करायचं नाही, हेही शिकलो! शेवटपर्यंत विद्यार्थीदशेत राहून शिकत राहणं, हीच माझी मनीषा आहे. कारण तीच माझ्या सर्व गुरूंना खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा ठरेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल रानडे
rahul@rahulranade.com

राहुल रानडे
rahul@rahulranade.com