भातुकलीमध्ये रमणाऱ्या छोटय़ा आशाला अप्रतिम गात्या गळ्याची निसर्गदत्त देणगी लाभली होती. आणि गळादेखील कसा? नितळ.. निर्मळ.. पाण्यासारखा- जो रंग मिसळाल, त्या रंगाचा होणारा गळा! या गळ्याला कुठलाही गानप्रकार वज्र्य नव्हता. लहानपणी ओसरीवर खेळताना ‘झाले युवती मना’, ‘परवशता पाश दैवे’, ‘कठिण कठिण कठिण किती’ यासारखी अनेक अत्यंत अवघड नाटय़पदं लहानग्या आशाच्या कानावर पडत होती आणि नकळत त्या जादूई सुरांची पक्की नोंद तिच्या डोक्यात होत होती. उत्कृट गायक आणि प्रतिभावंत संगीतकार असलेल्या मा. दीनानाथांच्या प्रयोगशील गाण्याचे संस्कार छोटय़ा आशावर झाले ते कायमचेच. रागांची सरमिसळ करणे, तालाला झोल देत गाणे, मधेच रागात नसलेला एखादा सूर लावणे.. असले प्रकार करण्यात आणि फिरता गळा असल्यामुळे बाबांसारख्या ताना मारण्यात त्यांना खूप मजा येत असे. शास्त्रीय संगीताचा पाठपुरावा करायचा मनसुबा असलेल्या आशा मंगेशकरची १९४९ साली आशा भोसले झाली आणि सांगलीतून मुंबईतल्या गिरणगावात त्यांचं बस्तान हललं. सांगली आणि शास्त्रीय संगीत सुटलं, ते कायमचंच. काहीशा नाखुशीनंच आशा भोसलेंना पाश्र्वगायनाच्या नवीन दालनात शिरावं लागलं.
वास्तविक पाहता आशाताई पहिल्यांदा माईकसमोर उभ्या राहिल्या होत्या १९४३ साली. मास्टर विनायक दिग्दर्शित ‘माझा बाळ’ या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी आयुष्यातलं पहिलं पाश्र्वगायन केलं. तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे ७३ वर्षांत अंदाजे १३,००० नवीन गाणी आशाबाईंनी ध्वनिमुद्रित केली आहेत! इतर कार्यक्रमांत स्टेजवर गायलेली गाणी वेगळीच!! ‘गोरी गोरी पान’, ‘जिवलगा’, ‘येऊ कशी प्रिया’, ‘या रावजी बसा भाऊजी’, ‘प्रभाती सूर नभी रंगती’, ‘झोंबतो गारवा’, ‘मी मज हरपून बसले गं’, ‘दम मारो दम’, ‘सलोना सा सजन’, ‘सुन सुन सुन दीदी’, ‘परदे में रहने दो’, ‘खाली हाथ शाम आयी है’.. किती नावं घ्यावीत? अखंड विश्वात इतका वैविध्यतेने नटलेला ‘गाता गळा’ दुसरा कुठलाच नसावा. आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यांच्या भेंडय़ा खेळायचं ठरलं, तर कुठल्याही पार्टीनी भेंडी न चढवता खूप वेळ खेळ चालू राहील, असं मला त्यांच्या गाण्यांची संख्या पाहून वाटतं!
एवढा मोठा पल्ला गाठण्यासाठी कलाकाराने केवळ प्रतिभासंपन्न असून चालत नाही, कारण दैव प्रत्येक माणसाची कसून परीक्षा घेत असतं. एक अवघड प्रश्न सोडवून होतोय न होतोय तोच दुसरा त्याहीपेक्षा अवघड आणि जास्त मार्काचा प्रश्न समोर उभा ठाकतो. ही जगाची रीतच आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून पुढे जाण्याकरिता लागते अमर्याद जिद्द, सातत्य, स्वत:वर आणि स्वत:च्या कामावर असावं लागतं निस्सीम प्रेम.. आणि असावा लागतो प्रचंड आत्मविश्वास! आशाताईंकडे हे सगळे गुण असल्यामुळेच आयुष्याने घातलेल्या अवघड प्रश्नांना सामोरं जात त्या इथवर पोहोचल्या आहेत.
मुंबईत स्थायिक झाल्यापासूनच परिस्थितीमुळे त्यांच्यावर पसे कमावण्याची जबाबदारी येऊन पडली, आणि त्या पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात स्थिरावण्याचा प्रयत्न करू लागल्या. मोठी बहीण लता मंगेशकर, गीता दत्त, शमशाद बेगम या सारख्या िहदीत बस्तान बसलेल्या गायिकांशी त्यांची तुलना केली जाऊ लागली. घरात आणि स्टुडिओत- दोन्हीकडे या गुणी, महत्त्वाकांक्षी मुलीचं जोरदार ‘स्ट्रगल’ चालू होतं. पदरात पडेल ते काम स्वीकारण्याशिवाय पर्यायच नव्हता. सुरुवातीच्या काळात अनेक छोटय़ा बॅनरच्या सिनेमांची आणि फार प्रसिद्ध नसलेल्या संगीतकारांची गाणी आशाच्या वाटय़ाला आली, पण संगीत क्षेत्रातल्या पारखी नजरांना हा हिरा आहे हे कळण्यासाठी फार काळ जावा लागला नाही.
गुलाम मोहम्मद, हंसराज बेहेल, सी. रामचंद्र, एस. एन. त्रिपाठी, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन या हिंदीतल्या दिग्गज संगीतकारांनी या हिऱ्याला पैलू पाडले. आशाबाई िहदी चित्रपटसृष्टीत प्लेबॅक सिंगर म्हणून स्थिरावू लागल्या. मराठीत दत्ता डावजेकर, वसंत देसाई, वसंत प्रभू, वसंत पवार, श्रीनिवास खळे, सुधीर फडके यांनीदेखील त्यांच्याकडून उत्तम गाणी गाऊन घेतली. कामातली सचोटी, कमालीचा फिरता गळा आणि कोणत्याही प्रकारचं गाणं गायची हातोटी या गुणांमुळे आशा भोसले यांनी गायिका म्हणून आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. १९५२ सालच्या ‘छम छम छम’ या चित्रपटापासून ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले यांची जोडी जमली. या जोडगोळीनं नंतरच्या काळात एकसे एक सुपरहिट म्युझिकल सिनेमे बॉलीवूडला दिले. आशा भोसले िहदी संगीतसृष्टीत स्थिरावल्या. राहुल देव बर्मन यांच्याबरोबर केलेल्या ‘तीसरी मंजिल’ (१९६६) मधल्या गाण्यांनी तर कळसच केला. आशा भोसले हे नाव भारतात दुमदुमू लागलं. पुढच्या काळात पंचमदा आणि आशाबाई या दोघांनी मिळून िहदी सिनेसंगीतात अक्षरश: धुमाकूळ घातला. १९८० साली हे दोघे अधिकृतरीत्या विवाहबंधनात अडकले आणि पंचमदा अनंतात विलीन होईपर्यंत एकत्र राहिले (१९९४).
देव मात्र सतत आशाबाईंची परीक्षा घेत होता. ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठिण’ ही म्हण तंतोतंत पटण्यासारखंच आशाबाईंचं आयुष्य आहे. एका बाजूला प्रचंड मान आणि व्यावसायिक यश मिळत असताना वैयक्तिक आयुष्यात त्यांना फार मोठे धक्के पचवायला लागले. पण न डगमगता त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीपणे सांभाळत आयुष्याचा गाडा मोठय़ा मेहनतीने आणि हिमतीने पुढे रेटला. त्यांच्या या जिद्दी स्वभावामुळेच पद्मविभूषित आशा भोसले वेगवेगळ्या ढंगाची गाणीही अप्रतिमरीत्या गाऊ शकल्या. \
१९८३ साली ‘मिराज-ए-गझल’ हा गुलाम अली यांच्या बारा गझलांचा अल्बम करण्याचा संकल्प एच.एम.व्ही. कंपनीने केला. त्यातल्या गझल गाण्यासाठी एक भारतीय गायिका हवी होती. गुलाम अलीसाहेबांच्या रचना अस्खलित उर्दूमध्ये त्यांच्याइतक्याच ताकदीने गाणारा भारतीय आवाज त्या वेळी एच.एम.व्ही.ला हवा होता. याच सुमारास आशाबाईंना ‘उमराव जान’ या चित्रपटातल्या ‘दिल चीज क्या है’ या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही घोषित झाला होता. एच.एम.व्ही. कंपनीने ‘मिराज-ए-गझल’मध्ये गाण्याचा प्रस्ताव आशाबाईंसमोर ठेवला. थोडे आढेवेढे घेत शेवटी आशाबाईंनी या अल्बममध्ये गायची तयारी दर्शवली. गुलाम अलीसाहेबांबरोबर गझल गायची म्हणजे जिकिरीचं काम होतं. रेकॉìडगच्या तारखा ठरल्या. गुलाम अली यांनी रेकॉìडगच्या आधी तालीम करण्याचं आश्वासन देऊनही ते दिल्लीला निघून गेले. तालमीला फिरकलेच नाहीत. सरळ रेकॉìडगच्या दिवशी स्टुडिओत हजर झाले. आशाबाईंची एकही रिहर्सल न झाल्यामुळे इतर वादकांनाच दडपण आलं होतं. ज्येष्ठ बासरीवादक पं. पन्नालाल घोष रेकॉर्डिगला हजर होते. त्यांनी आशाबाईंना बाजूला घेऊन सावध केलं. ते म्हणाले, ‘दीदी, सम्हल के! खाँसाब बहोत टेढी धुने बनाते हैं, और टेढा गाते भी हैं! आपको गाने में फंसा देगें. िहदुस्थान की नाक कट जाएगी.’ हे ऐकून आशाबाईंच्या भुवया वर गेल्या. पदर खोचून त्या जिद्दीनं गायला सरसावल्या आणि त्यांनी ‘मिराज-ए-गझल’ मधली सगळी गाणी आपल्या अस्खलित उर्दू शब्दोच्चारांनी आणि बहारदार गायनानं अजरामर करून टाकली! हिंदुस्थानचं नाक कापलं तर गेलं नाहीच, उलट वर झालं! अर्थात आशाबाईंनी उर्दू लहेजाचं बाकायदा शिक्षण घेतलं होतं आणि भरपूर मेहनत केली होती हे सांगणे न लगे. सर्व गाणी रेकॉर्ड झाल्यानंतर गुलाम अलीसाहेबांनीही आशाबाईंच्या गाण्यामुळे अल्बमचं सार्थक झाल्याची कबुली मोकळेपणाने देऊन टाकली. अशी ही मानी गायिका.
‘‘कलाकाराला गर्व नसावा, पण त्याने स्वाभिमानी मात्र निश्चित असावं. कारण स्वाभिमानामुळेच कष्ट करण्यासाठी तो प्रवृत्त होतो.’’- गप्पांच्या ओघात एकदा आशाबाई मला सांगत होत्या. ‘‘दीदीची आणि माझी लोक उगाच तुलना करतात. दीदी फार मोठी गायिका आहे. आम्ही दोघी एकत्र गात असताना मी कधीही तिच्यासारखं गायचा प्रयत्न केला नाही. हां- तिच्याइतकंच चांगलं गायचा मात्र जरूर प्रयत्न केला.’’- प्रांजळपणे आशाबाई कबूल करतात. ‘‘तिच्याबरोबर गायचं असलं, की मी पण माझं सर्वोत्तम द्यायची. माझाही कस लागायचा. अर्थात माझं गाणं वेगळं आहे, तिचं गाणं वेगळं आहे.’’ दोन्ही बहिणींचं गाणं आपापल्या परीनं श्रेष्ठ आहे यात वादच नाही. आणि साहजिकच आहे म्हणा. दोघी एकाच मुशीतून जन्माला आल्या आहेत! तरीही ‘लता श्रेष्ठ की आशा’ हा वाद अनेक लोकांनी अनेक तास घातला आहे, घालत राहतील! वास्तविक पाहता खुद्द परमेश्वरालाही या बहिणींमध्ये डावं-उजवं करणं अवघड जाईल. एक गोष्ट मात्र खरी- ‘पिया तू अब तो आजा’ पासून ‘पिया बावरी’पर्यंत आणि ‘रेशमाच्या रेघांनी’पासून ‘रवी मी’पर्यंत विविध प्रकारची गाणी आशाबाई लीलया गातात. देवानं त्यांच्या भात्यात थोडे जास्त बाण दिले आहेत, असं काही लोकांचं मत असेल, तर त्यात वावगं काहीच नाही.
आशाबाईंना मी ‘आई’ कधी म्हणायला लागलो हे मला नेमकं आठवत नाही, पण सख्ख्या आईप्रमाणेच या आईकडूनही मी अनेक धडे घेतले. संगीताबरोबरच आयुष्याचं तत्त्वज्ञानही शिकलो. ‘लोक आपल्याशी कितीही वाईट वागले, तरी वाईट वागणं हा त्यांचा धर्म आहे असं समजावं आणि आपला धर्म चांगलं वागण्याचा आहे हे गृहीत धरून आपण कायम चांगलंच वागावं’- हा एक धडा! ‘वयाने कितीही मोठे झालो, तरी बालपण सांभाळत, मस्ती करत जगावं,’ हा दुसरा! आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा आईंच्या संपूर्ण जीवन प्रवासाकडे बघून मला मिळाला. आयुष्य सापशिडीच्या खेळासारखं असतं. ९८ पर्यंत पोहोचून सापानं गिळून खाली आलो, तरी पुन्हा आपल्या वाटय़ाला शिडी नक्की येईल याची खात्री मनात बाळगून न कंटाळता सचोटीनं दान टाकत राहणं, हेच आपलं कर्तव्य आहे!
(उत्तरार्ध)
rahul@rahulranade.com