|| मकरंद देशपांडे
‘पृथ्वी थिएटर’च्या आत नाटक करत असताना शनिवार-रविवार बाहेर होणारे प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सेस चालूच ठेवले होते. त्या ग्रुपचं नाव ‘Heads Together’ ठेवल्यानं एखादं भन्नाट डोकं येऊन आपटायचंच!
टेडी मौर्या हे नाव त्या आपटी बॉम्बचं! त्याच्या डोक्याला जिथे वाव मिळायचा तिथे आकाशातनं एखादी उल्का पडावी असा कलात्मक खड्डा विचारांचा व्हायचा आणि क्रिएटिव्हिटीचं तळं बनायचं! तो मला दिसला तेव्हा साडेसतरा वर्षांचा होता. त्याचं रूप म्हणाल तर प्रायोगिक नाटकाचं नेपथ्य! प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सेस सुरू करण्याआधी कॅफेटेरीयातनं किंवा आजूबाजूच्या परिसरातनं प्रेक्षक गोळा करण्यासाठी थाळी किंवा घंटा वाजवली जायची. पण त्या दिवशी मी टेडीला हातात एक ढोलकं देऊन, त्यावर थाप मारत ओपन-एअर स्टेजच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला चालत पाठवलं आणि त्याला बघायला लोक गोळा झाले. नाटक सुरू झालं आणि त्यानंतर टेडीच्या जीवनात आरपार नाटक इम्प्लांट झालं!
टेडी कोण? काय? कसा? का?.. उत्तरं अशी- टेडी हा विजय मौर्याचा भाऊ. अकरावीत पाचदा नापास. शेवटी कॉलेजच्या प्रिन्सिपलनी जवळपास पास करून बारावीत ढकलला. ‘पृथ्वी’ला माझ्या संपर्कात कसा आला? तर, ‘जंगल के पार’ हे नाटक ज्या निवडक प्रेक्षकांनी पाहिलं होतं, त्यातला तो एकमेव- ज्याने त्याचे सहा प्रयोग पाहिले होते.
त्याला मी ‘अंश’ ग्रुपमध्ये का घेतलं? कारण तो काय करतो, हे बघायला मी गोरेगावला त्याच्या घरी गेलो तर तो त्या परिसरातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सजावट करत होता. मला तो एखाद्या नाटकाचा सेट वाटला. तासन्तास माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये त्याला काम करताना पाहून जगातला ग्रेट शिल्पकार मायकेल अॅन्जेलोच्या एका वाक्याची आठवण झाली- ‘प्रत्येक दगडाच्या शिळेत एक शिल्प असतं, शिल्पकाराचं कार्य आहे ते शोधणं!’
‘‘उमरक़ैद शांति बारोट’ या नाटकाचं नेपथ्य तू कर’’ असं टेडीला सांगितल्यावर त्या अठरा वर्षांच्या मुलाला ‘पृथ्वी’च्या स्टेजची लांबी-रुंदी न दिसता उंची दिसली.. व्हर्टिकल स्पेस! आणि तो म्हणाला की, ‘‘सीनला लागणारे तंबू आपण आधीच एखाद्या स्लिपिंग बॅगप्रमाणे बांधून वर लटकवू. सीनच्या वेळी ते खाली येतील. पात्रं ते उघडतील आणि स्लिपिंग बॅग एक तंबू होईल.’’ दोरांनी पुली लावून त्यानं मला दोन दिवसांत ते करूनही दाखवलं!
मला नाटकात शांति बारोट या एका स्कूल टिचरच्या आयुष्याच्या चार गाठी दाखवायच्या होत्या. म्हणजे चार चरण! टेडी म्हणाला की, ‘‘वर्तुळसुद्धा गाठ आहे ना?’’ मला त्याचा वेगळा दृष्टिकोन आवडला. त्यानं पुन्हा वर चार लहान-मोठय़ा रिंग्स अडकवल्या. दोर लावून पुलीने त्यासुद्धा वर-खाली केल्या. त्यातल्या एका रिंगला त्यानं बांगडी बनवलं होतं. पुली खेचणारे प्रेक्षकांमध्ये बसले होते, त्यामुळे नाटकाला एखाद्या मेळ्यातल्या कठपुतळीच्या खेळाचं स्वरूप आलं होतं.
कथानक असं होतं की, हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धामुळे शहरात एक दिवस कर्फ्यू लागतो. स्कूल टिचर त्या कर्फ्यूमध्ये अडकते. त्या चौरस्त्यावर एक ब्रिटिश स्टॅच्यू असतो. शांति बारोटचं आयुष्य त्या कर्फ्यूसारखंच असतं. फक्त तिच्या आयुष्याचा कर्फ्यू तिनं स्वत: लावलेला आहे. हे नाटक दोन पातळीवर चालतं. एक शांति बारोटचं वैयक्तिक आयुष्य व दुसरं हिंदुस्थानची शांती, आणि ही दोन्ही आयुष्यं पाहत असतो ब्रिटिश स्टॅच्यू- ज्याचं नाव ठेवलं होतं ‘मेटल किंग’!
शांति बारोटचं अल्लड बालपण, किशोरावस्था हे एक वर्तुळ. मग कुमारी दुसरं वर्तुळ, स्कूल टिचर तिसरं वर्तुळ आणि निवृत्तीनंतर येणारं भविष्य हे चौथ वर्तुळ.
पहिलं-दुसरं वर्तुळ सादिया सिद्दिकीनं एखाद्या खारूताईसारखं साकारलं. म्हणजे सीनमधला अर्क खाऊन, कचरा इथं-तिथं फेकून जायची आणि कोणाचाही सीन असो, ती येऊन चावा घ्यायचीच. ही माझ्याकडून तिला कॉम्प्लिमेंट आहे.
तिसरं-चौथं वर्तुळ शबाना बदामी हिनं केलं. का कोणास ठाऊक, पण या नाटकानंतर तिनं नाटकात काम नाही केलं. नाटकावरच्या तिच्या या कर्फ्यूचं कारण मी विचारलं नाही आणि तिनंही सांगितलं नाही. नंतर कळलं, की तिनं लग्न केलं. पण त्या आधी तिला प्रेमाचा धक्का बसला होता. त्यातून सावरायला लग्न केलं होतं का? आता ती संपर्कात नाही, पण नाटकात शांति बारोटचंही काहीसं असंच होतं.
लहानपण ते किशोरावस्था हे जीवन म्हणजे शब्दांचं गीत, तर कुमारी ते प्रौढवस्था हे शब्दांचं गणित! शिक्षिका झाल्यानंतर शांतीला शाळेतले पी.टी. शिकवणारे सर आवडतात. पण पी.टी. शिकवणारे, शब्दाला कमी पडणारे मगरे सर काहीही न बोलता दुसऱ्या शहरात निघून जातात आणि ‘बोलायला माझ्याकडे तुमच्याएवढे शब्द नाहीत,’ असं सांगून तिच्या मनाला अपराधबोधाची गाठ मारून जातात. पुढे युद्धात गोरखा रेजिमेंटची एक तुकडी तिच्या शाळेत थांबते. तेव्हा थापा या सनिकाच्या राष्ट्रप्रेमाला आणि त्याच्या पहाडी जीवनाला सॅल्यूट करता करता ती प्रेमाची सल गाठ बांधते- जी युद्ध संपल्यानंतर सहज सुटूनही जाते.
‘मगरे सर’ आणि ‘थापा’ या दुहेरी भूमिका करताना विजय मौर्यानं त्याच्यातला नट म्हणून असलेला गोडवा समोर आणला. शेवटी नाटक कोणतंही असो, नट अथवा नटी प्रेक्षकांना गोड वाटले की ते नाटक गोड होऊन जातं. बघणारा मग कथानक नीट ऐकतो आणि प्रेक्षक व नाटकाची लव्ह स्टोरी सुरू होते. नाटक शेवटी आवडलं नाही तर ‘ट्रॅजेडी’ आणि आवडलं की नेक्स्ट डेट म्हणजे नेक्स्ट शो!
‘मेटल किंग’ची भूमिका कमलेश सिंग या कोलकात्याहून आलेल्या एका नटाने केली. त्याचे डोळे खूप मोठे होते. त्याने ‘जात्रा’ या बंगाली ओपन-एअर लोकनाटय़ शैलीतील बरीच नाटकं केली होती; त्यामुळे त्याचा आवाज हा ‘पृथ्वी’सारख्या इन्टिमेट स्टेजसाठी मोठा होता. पण आपल्या खुर्चीवरून स्वतंत्र भारताची दशा पाहणाऱ्या मेटल किंगचा आवाजच प्रेक्षकांना बांधून ठेवायचा.
शांति बारोटच्या आयुष्यातल्या प्रत्येक वर्तुळानंतर जेव्हा नाटक पुन्हा सध्याच्या कर्फ्यूमध्ये यायचं तेव्हा एक सनिक सेन्टर डोअरला गस्त घालत एकच वाक्य म्हणायचा, ‘‘सब ठीक है.’’ या वाक्यानं विलक्षण परिणाम साधला होता. उत्तम अभिनेते दिवंगत रवी बासवानी (‘चष्मेबद्दूर’) हे या वाक्यामुळे आणि या नाटकाच्या क्राफ्टमुळे कायमचे मित्र झाले.
त्यानंतर प्रत्येक नाटक ते येऊन पाहायचे, कलाकारांशी बोलायचे, आपला अनुभव त्यांना सांगायचे. एखाद्या सीनिअर आणि अप्रतिम नटानं नाटकानंतर नाटकातल्या कलाकारांशी बोलणं किंवा घरी बोलावून दुसऱ्या दिवशी त्यावर चर्चा करणं हे विरळाच, पण रवी बासवानी हे करायचे. स्वत: नाश्ता बनवायचे. स्वादिष्ट जेवण आणि ताक-लस्सीही. त्यांच्या घरून कधीच कोणी नट रिकाम्या पोटानं किंवा रिकाम्या डोक्यानं नाही परतला. I miss you Ravi!
खरंच काही नट-मित्रांना आठवल्यावरही मनात बेचनी निर्माण होते. आत्ता लिहिताना रवीजी मला दिसतायेत किचनमध्ये लस्सी बनवताना, ‘पृथ्वी कॅफे’मध्ये नटांना प्रेमानं झापताना, माझ्या हस्ताक्षरावर वैतागताना (कारण मी लिहिलेली अक्षरं त्यांना वाचता यायची नाहीत). ते माझ्या एका नाटकात कामही करणार होते. स्क्रिप्ट झालं. राज सुपेच्या लघुकथेवर आधारित नाटक लिहिलं होतं- ‘पांच बुढे बरगद’! त्यातलं गोखले हे महत्त्वाचं पात्र त्यांनी करावं अशी इच्छा होती, पण ते नाटक- कारण आत्ता आठवत नाही- झालंच नाही. कारण कदाचित रंगभूमीला तेव्हा त्याची गरज नसावी. पण त्या तालमीत पाहायला मिळालं, की हा नट एवढा श्रेष्ठ का आहे! तालमीला नेहमी स्वत:च्या स्क्रिप्टची कॉपी आणि पेन-पेन्सिल बरोबर, इम्प्रोव्हायझेशन स्क्रिप्टवर लिहून टाकायचे. ‘होऊन जाईल’, ‘समजलं रे’ असा दृष्टिकोन नाही. संवाद पाठ करायची घाई नाही. संवाद नीट पाठ झाल्याशिवाय डोकं वर काढायचे नाहीत. वेळेने त्यांना बघून वेळेवर यावं एवढी शिस्त!
मी मनालीत होतो तेव्हा कळलं की ते गेले. शेवटचं दर्शन हे आठवणींतच घेतलं गेलं. त्या रात्री तिथे बर्फ पडला. त्या थंडीनं सगळंच काही गोठून गेलं. आज वसंत ऋतूत त्या आठवणींना पुन्हा संजीवनी मिळाली. मी नशीबवान आहे, की मला रवीजींबरोबर गप्पा मारायला मिळाल्या होत्या. जर तुम्ही त्यांचा अभिनय पाहून बरीच र्वष झाली असतील तर सई परांजपे यांचा ‘चष्मेबद्दूर’ आणि कुंदन शाह यांचा ‘जाने भी दो यारो’ पुन्हा जरूर पाहा. नाटकवाल्यांकडून फिल्मवाल्यांना सलाम!
जय रवी! जय आपुलकी! जय मत्री!
mvd248@gmail.com