एक दिवस पंचावन्न वर्षांच्या बाई माझ्याकडे आल्या. चांगल्या सुशिक्षित, टापटीप, सौंदर्याची जाण अजून शाबूत असल्याचं दर्शविणारं राहणीमान; पण चेहऱ्यावर मात्र उदास, चिंतेचे भाव. चालणंसुद्धा अतिशय हळू, खांदे पडलेले, जणू शरीराची हालचालही नराश्याकडे बोट दाखवत होती. त्या खुर्चीवर बसल्या. पिशवीतून पाण्याची बाटली काढली व पाणी प्यायल्या. म्हणाल्या, ‘छातीत सारखं धडधडतं. घसा कोरडा पडतो म्हणून पाणी प्यायले. तसं सगळ्या तपासण्या केल्यात, त्या नॉर्मलच आहेत. अगदी काय म्हणतात ती मोठी टेस्ट- अँजिओग्राफी, तीही नॉर्मल आहे. पण मी आज तुमच्याकडे वेगळ्याच कारणासाठी आले आहे. माझा संसार मी पूर्ण केला आहे. मुलांची लग्ने वगरे सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आणि म्हणूनच आता मला माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे. तुम्ही म्हणाल, ‘मग माझ्याकडे कशासाठी आलात, वकील का नाही गाठला?’, पण मुळात हा विचार मी माझ्या बहीण-भावांकडे, मुलांकडे मांडला तर सगळ्यांनी मला वेडय़ात काढलं. बहीण तर एवढी चिडली, मला  म्हणाली, ‘तुझं डोकं तपासून घे एकदा. म्हणूनच मी ठरवलं, आपण स्वत: जाऊन तुमची भेट घ्यायची व विचारायचं की, माझा विचार योग्य आहे का? खरंच हो, मला अगदी वीट आलाय संसाराचा. मुले लांब गेल्याने तर अगदी वाळवंट झालं आहे संसाराचं! अहो डॉक्टर, गेले काही महिने तर मी रात्री झोपलेलेच नाही. सतत विचार येत राहतात. दिवसभर डोकं भणभणलेलं राहतं. भूकही लागत नाही. वाचन करावंसं वाटत नाही, टीव्ही बघावासा वाटत नाही. मग नुसती फेऱ्या मारत राहते. किंवा आढय़ाकडे बघत झोपून राहते. यांचा तर इतका राग येतो की, वाटतं सगळं सोडून द्यावं. काय करू आता? तुम्हीच सांगा डॉक्टर.’
‘अहो, एकदम असे टोकाचे विचार येण्याएवढे काय मतभेद झालेत तुमच्यात? कोणत्या गोष्टींवरून पटत नाही तुमचं?’
‘लग्न झाल्यापासून तसं आम्ही एकत्र कुटुंबात राहिलोच नाही, वेगळ्याच फ्लॅटमध्ये राहिलो. कारण, यांची नोकरी वेगळ्या शहरात आणि मूळ कुटुंब पुण्यात त्यामुळे सासुरवास झालाच नाही. उलट त्या खूपच चांगल्या, समंजस, आईसारख्याच प्रेमळ होत्या. पण नवऱ्याने ती कसर चांगलीच भरून काढली. नवरेशाही गाजवली. सुशिक्षित असूनही मला काही करू दिले नाही. घरात सगळा त्यांचाच वरचष्मा. माझ्या मताला किंमतच नाही दिली त्यांनी कधी. मत व्यक्त करायला गेले की केलीच अवहेलना. शिस्तीचा बडगा तर एवढा की, जणू आर्मीतच राहून आलेत. थोडी जरी चूक झाली, शिस्त बिघडली की, लागलीच त्या माणसाची वाट! मुलांनी त्यांचे ऐकले नाही तरी राग सगळा माझ्यावरच निघे. मग जिभेला हाड नसल्यासारखे काहीबाही बोलणे सुरूच. अजूनही चित्र बदललेले नाही. प्रशंसा तर नावालाही कधी नाही. पण उणिवा अगदी खोऱ्याने सापडतात यांना! अक्षरश: माझं पोतेरं करून टाकलं आहे. मुलांकडे बघून मी सर्व सहन केलं. त्यांच्यात जीव रमवला, नव्हे अडकवला सगळा. मायेची पखरण सगळी त्यांच्यावर केली म्हणून असेल कदाचित, मुलांवर इतका परिणाम झाला नाही. पण आता कामानिमित्ताने मुलं पांगली. यांचा स्वभाव काही बदलला नाही. बदलणारच नाही कधी, ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. मग कशाला राहायचे अशा माणसाबरोबर? मुलं म्हणतात, ‘आमच्याकडे येऊन राहा. पण आपण त्यांच्या संसारात लुडबुड का करावी, आपला त्रासच होईल त्यांना. त्यापेक्षा मग हा मार्ग माझ्या मनात आला आहे. ते बदलले असते तर मला काय नको होतं? काय करू डॉक्टर, तुम्हीच सांगा आता!’
मग मी त्यांना समजावलं. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना जे नराश्य आलं आहे त्याची खूपच गडद छाया त्यांच्या मनावर पडली आहे. ती प्रथम दूर करणं गरजेचं आहे. मगच आपण एकत्र बसून मार्ग काढणं इष्ट ठरेल. म्हणून औषधोपचार सुरू केले. जेणेकरून त्यांना थोडं बरं वाटेल, झोप लागेल, भूक व्यवस्थित होईल, अस्वस्थपणा कमी होईल. कारण ही लक्षणं असताना काही समजावणं, समुपदेशन करणं म्हणजे िभतीवर डोकं आपटण्यासारखंच ठरलं असतं. पुढच्या वेळेस दहा दिवसांनी त्या आल्या तेव्हा त्या बाई अगदी बऱ्या वाटत होत्या. त्यांचा अस्वस्थपणा, चिडचिड खूपच कमी झाली होती. मनाला बऱ्यापकी उभारी आली होती. मग मी त्यांना विचारलं की, ‘आता तुमचा विचार अजूनही तसाच पक्का आहे काय?’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘डॉक्टर, काय करावं तेच अजूनही कळत नाही. घटस्फोट घ्यायचा विचार जर बदलला तरी काय करावं ते सुचतच नाही.’
मग मी त्यांना समजावलं की, ‘कालच्या तुमच्या बोलण्यातल्या एका वाक्यातच तुमच्यावर झालेल्या परिणामाचे कारण सामावले आहे.’ ‘ते बदलले असते तर मला काय नको आहे का?’ या वाक्यातून त्यांनी बदलावे असा  तुमचा अट्टहास दिसतो. जो तुम्ही लग्न झाल्यापासून बाळगत आलात. सामाजिक बंधनांमुळे, मुलांसाठी वगरे अशी कारणं देऊन तुम्ही आजची परिस्थिती पुढे ढकलत आलात, एवढंच. पण तो अट्टहास मनात तसाच होता. पण जेव्हा तुम्ही दोघंच राहिलात व तुमचा अट्टहास प्रत्यक्षात उतरणार नाही हे पटलं; तेव्हा तुम्ही या निराशेच्या गत्रेत सापडलात व तुमचे विचार  ‘डीरेल’ झाल्यासारखे झाले. थोडक्यात, तुमचा अट्टहासी अविचार, अविवेक तुम्हाला निराशेकडे नेत आहे. त्यामुळे आता तुम्ही आधी जसं स्वत:ला मुलांमध्ये गुंतवलं तसंच आता तुमच्या छंदांमध्ये, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कामांमध्ये रमवा, जेणेकरून तुमचं स्वत:चं स्थान घटस्फोट न घेता तुमच्या मनात निर्माण होईल. आपण आपली प्रतिमा निर्माण करू शकलो नाही, ही खंत त्यामुळे कमी होईल. कारण व्यावहारिक विचार करता वेगळे झालात तर घर, खर्च सर्वासाठी पुन्हा अवलंबून राहणं या वयात आता करावंच लागेल. मग त्यापेक्षा आहे त्या वैवाहिक जीवनात ‘स्वत:चं अवकाश’ तुमच्या मनात आनंदाची अनुरूप भावना निर्माण करेल. ‘माझं म्हणणं त्यांना पटल्यासारखं वाटलं. ‘तुमचा पर्याय मी नक्की अनुसरीन,’ असं म्हणून त्या गेल्या.
वस्तुस्थिती अशी आहे की, ‘तुमचं’ आयुष्य व ‘माझं’ आयुष्य ‘आपलं’ आयुष्य बनल्यानंतरही ‘माझं’ आयुष्य आणि ‘तुमचं’ आयुष्य शिल्लक राहतं. ‘आपलं’ आयुष्य म्हणजे ‘विवाह’ नावाचा मनोहर अवकाश. वैवाहिक सुख अवलंबून असतं ते दोन्ही जोडीदार ‘आपल्या’ अवकाशाशी कसं नातं जोडतात आणि हा अवकाश प्रत्येक सरत्या वर्षांबरोबर कसा विकास पावतो यावर. पुरुषाला त्याचं व स्त्रीला तिचं आयुष्य लाभायला हवं. वास्तविक तिला स्वत:च्या अवकाशात जाऊन पुन्हा  ‘आपल्या’ अवकाशात परतता आलं तरच ती ‘आपल्या’ अवकाशात उत्कृष्टपणे वावरू शकते. तुम्ही एकमेकांच्या अवकाशाचा आदर करू लागता, एकमेकांच्या आवडीची, प्राधान्यक्रमाची कदर करू लागता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाच्या नावाखाली तुम्ही एकमेकांना गुदमरून टाकणार नाही, याची खात्री राहते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा