माधव वझे

श्रेष्ठ नाटय़तपस्वी पीटर ब्रुक यांचे नऊ तासांचे ‘महाभारत’ कसे  आकारले, साकारले त्याची कहाणी..

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Leader of Opposition in Lok Sabha and Congress leader Rahul Gandhi.
Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?

पीटर ब्रुक त्यांच्या ‘US’ नाटकाच्या तालमी घेत असताना जेवणाच्या सुट्टीत त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांशी संवाद साधत असत. एक दिवस असिफ करीमभाई नावाचा एक भारतीय तरुण त्यांना भेटायला आला आणि एक सहा पानी नाटुकले त्याने ब्रुक यांना दिले. ते भगवद्गीतेवर आधारलेले असल्याचे त्या तरुणाने सांगितले. ‘भगवद्गीता’ या शब्दाचा अर्थ त्यावेळी ब्रुक यांना कळला नाही. इतकेच नाही तर तो शब्द उच्चारायला कठीण आहे असे त्यांना त्याचवेळी जाणवले. सर्वनाश घडविणाऱ्या युद्धाचा प्रारंभ करण्याच्या बेतात ठाकलेल्या एका योद्धय़ाने दोन्ही बाजूंच्या सैन्याच्या मधोमध त्याचा रथ अनपेक्षितपणे उभा केला आणि ‘कशासाठी हे युद्ध?’ असा प्रश्न केला, याबद्दलचे ते नाटुकले होते.

ब्रुक आणि त्यांच्या नटांना प्रश्न पडला की, व्हिएतनाम युद्धात अमेरिकेच्या सैन्याचा प्रमुख सेनापती जर असाच थांबला आणि हाच प्रश्न त्याने स्वत:ला विचारला तर काय होईल? ..पण सगळ्यांनाच कळून चुकले की- असे कधी घडणार नाही; कारण युद्धाच्या गती दिलेल्या चक्राला सेनापती बांधलेला असतो आणि ते चक्र क्षणभरही थांबत नसते. ‘कशासाठी हे युद्ध?’ असा प्रश्न करणारी त्या नाटुकल्यातली योद्धय़ाची प्रतिमा पीटर ब्रुक यांना मात्र सतत खुणावत राहिली. एका नाटकाची शक्यता त्या प्रश्नामध्ये शोधण्याचे आवाहन ती प्रतिमा करीत राहिली. शेवटी पीटर ब्रुक यांनी एका संस्कृत विद्वानाची भेट घेतली आणि युद्ध नको म्हणणाऱ्या त्या योद्धय़ाबद्दल त्यांना प्रश्न केला. आणि त्या विद्वानाने महाभारतामध्ये ती गोष्ट असल्याचे सांगितले. 

युद्ध नको असे म्हणणाऱ्या त्या योद्धय़ाबद्दल पीटर ब्रुक यांनी एक दिवस त्यांचा मित्र ज्याँ क्लोद कारिएरला (Jean Claude Carriere) सांगितले. त्याने त्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा बोलून दाखवली. दोघे मग फिलीप लावास्टिन (Philippe Lavastine) यांना भेटले. संस्कृतचा आयुष्यभर व्यासंग केलेले ते पंडित होते. त्या योद्धय़ाचे नाव अर्जुन असे होते हे त्यांनी सांगितलेच; शिवाय अर्जुनाच्या रथाचे सारथ्य कृष्णाने- प्रत्यक्ष परमेश्वराने का केले, तेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे असे ते म्हणाले. आणि मग सुरू झाले संपूर्ण महाभारत कथाकथन. भारतामध्ये घरातल्या वडीलधाऱ्यांकडून ज्याप्रमाणे लहान मुलांना महाभारतातल्या गोष्टी ऐकायला मिळतात, त्याप्रमाणे सतत तीस रात्री फिलीप लावास्टिन यांनी त्या गोष्टी सांगितल्याचे पीटर ब्रुक यांनी म्हटले आहे. फिलीप लावास्टिन यांच्या घरातून शेवटच्या दिवशी रात्री उशिरा बाहेर पडल्यानंतर महाभारतावर एक नाटक करायचा ब्रुक आणि ज्याँ क्लोद कारिएर यांनी त्याच रात्री निश्चय केला.

पुढची काही वर्षे पीटर ब्रुक त्यांच्या इतर काही नाटकांमध्ये आणि ज्याँ क्लोद त्याच्या नाटक-चित्रपटांच्या लेखनात गुंतले, तरी ज्याँ क्लोद महाभारतावरचे काही नाटय़लेखन करून ब्रुक यांना दाखवीत राहिला. दोघे त्यावर चर्चा करीत राहिले. वेळ मिळेल त्याप्रमाणे पीटर ब्रुक त्यांच्या नटांना घेऊन ते नाटय़प्रवेश करून पाहत राहिले. मग पुन्हा चर्चा, पुन्हा लेखन.. असे सतत दहा वर्षे सुरू होते. नाटक आकाराला येत असल्याचे जाणवून पीटर ब्रुक यांनी प्रयोगाच्या दृष्टीने विचार सुरू केला. सुरुवातीला ते आणि त्यांचे दोन-तीन सहकारी भारतामध्ये दोन-तीनदा आले ते केवळ निरीक्षण आणि संशोधन करण्यासाठी! आणि मग एका टप्प्यावर पीटर ब्रुक, ज्याँ क्लोद आणि त्यांचे सोळा देशांतले २१ नट भारताच्या दहा दिवसांच्या दौऱ्यावर आले.

त्या दौऱ्याचे इत्थंभूत वर्णन ब्रुक यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केले आहे.

 केरळमधील कलामंडलम्मध्ये नटांनी रंगभूषा-वेशभूषेविना ‘कथकली’चे प्रशिक्षण घेतले. नंतर उडिपीला जाऊन तिथे कृष्णमंदिरामध्ये यक्षगानाचे आणि पाठोपाठ कन्नोरला तेयमचे प्रशिक्षण. त्या दौऱ्यामध्ये कांचीपूरमला जाऊन त्यांनी शंकराचार्याशी चर्चा केली. मदुराईला असताना तिथूनच जवळच्या एका जंगलात एका मोकळ्या जागी पीटर ब्रुक यांनी सगळ्यांना नेले. तिथे त्यांनी एक खेळ सुचविला. भारतामध्ये आल्यापासून या देशाचे जे काही ठसे मनावर उमटले असतील ते प्रत्येकाने फक्त एकेका शब्दामध्ये व्यक्त करण्याचा तो खेळ होता. आणि एकामागोमाग एक शब्द आले : रंग, बेलगाम, शांतता, सवंगपणा, भूक, श्रद्धा, क्लेश, सौंदर्य, मातृसत्ताक, युग वगैरे. खेळ संपेचना. शेवटी खेळ संपवला आणि तिथेच महाभारतातील काही प्रसंगांवर आधारित उत्स्फूर्ताविष्कारही नटांनी करून पाहिले. त्या दौऱ्यामध्ये नटांसाठी मोकळा वेळ ठेवला होता. मोकळ्या वेळेमध्ये नटांनी स्वतंत्रपणे गावामध्ये चक्कर मारावी, रस्त्यामध्ये सोयीच्या ठिकाणी उभे राहावे आणि माणसांचे निरीक्षण करावे. नटांनी केलेल्या निरीक्षणांची चर्चा करताना त्यांचे त्यांना जाणवले की आजही भारतीय माणूस खदखदा हसतो, खुरमांडी घालून बसतो, मित्राच्या पाठीवर प्रेमाने दोन दणके देतो, पचकन् थुंकतो, दोन्ही हात पसरून मिठी मारतो, ओरडतो, थयथयाट करतो.. वगैरे.

पीटर ब्रुक यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हटले आहे की, ‘जिथे इतिहासातले सगळे कालखंड आजही एकत्र नांदतात, अशी एकच जागा आहे; ती म्हणजे भारत.’

 त्या भरगच्च दौऱ्याचे फलित काय? – तर ‘भारतात येताना आम्ही प्रवासाचे हलके सामान घेऊन आलो होतो; पण परतताना भावनिक आणि बौद्धिक असे खूप काही घेऊन चाललो होतो.’ – इति पीटर ब्रुक.

पॅरिसला परतल्यावर ‘महाभारत’च्या तालमी अधिक जोराने सुरू झाल्या. नटांनी अपार कष्ट करून धनुर्विद्या, काठीयुद्ध, तलवारयुद्ध, कराटे व जुडो यांवर प्रभुत्व मिळवले. योशी ओईदा हा जपानी नट त्या कलांमध्ये वाकबगार होता आणि इतर नटांनाही त्याने तयार केले. तसे आफ्रिकेतले नट वाद्यवादनामध्ये निपुण होते. तोशी सुचितोरी हा जपानी संगीतकार स्वत: तबला, घटम् आणि ऑस्ट्रेलियातील आदिवासींची बासरी वाजवू शकत होता. प्रयोगामध्ये त्याने रवीन्द्र संगीतही वापरले. आन्द्रे सेवरीन (Andre Seweryn) या नटाने त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘हाताच्या एकेका बोटाच्या हालचालींबाबतही पीटर ब्रुक यांचा कटाक्ष असायचा.’

महाभारत’ : प्रयोग

फ्रान्सच्या दक्षिणेला अविन्यू नावाचे एक टुमदार गाव आजही त्याचे मध्ययुगीन वातावरण जतन करून आहे. पोप यांचे अतिभव्य निवासस्थान गावामध्ये आहे. या गावामध्ये १९४७ पासून दरवर्षी जुलै महिन्यात निमंत्रित नाटय़प्रयोगांचा जगातील एक मोठा आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव आयोजित होतो. प्रस्तुत लेखकाने दोनदा ते पाहिले आहेत. पोप महाशयांच्या निवासस्थानी असलेल्या भव्य, सुसज्ज व खुल्या नाटय़गृहामध्ये महत्त्वाचे नाटय़प्रयोग होतात, तर गावामध्ये ठिकठिकाणी जी दहा-बारा सुसज्ज नाटय़गृहे खास महोत्सवासाठी बांधलेली असतात, तिथे बाकीची नाटके सकाळ, दुपार, रात्री होत राहतात. प्रेक्षकांनी त्यांना हवी तशी निवड करून नाटके पाहायची. पीटर ब्रुक यांच्या  ‘महाभारत’ला नाटय़महोत्सवाचे निमंत्रण होते. पण मध्ययुगीन ख्रिश्चन वातावरण असलेल्या त्या गावामधील पोप महाशयांच्या निवासस्थानी असलेल्या भव्य नाटय़गृहामध्ये ‘महाभारत’चा प्रयोग ही कल्पनाही पीटर ब्रुक यांना मानवली नाही आणि त्यांनी अविन्यूच्या जवळच बालबों  या गावी असलेल्या एका चुनखडीच्या खाणीमध्ये ‘महाभार’त करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

पायाखाली जमीन आणि डोईवर आकाश अशा खाणीतल्या अवकाशामध्ये ‘महाभारत’चा प्रयोग करायचे ठरले आणि तिथल्या प्रचंड दगडी शिळा, शंभरएक फूट उंचीचे सुळके नाटय़प्रयोगाच्या नेपथ्याचा सहजच एक अविभाज्य भाग झाले. नेपथ्यरचनाकारांनी शेकडो टन वाळू आणि मातीने जमीन आच्छादली. ‘महाभारता’मध्ये वारंवार नदीची प्रतिमा आलेली आहे याचे भान ठेवून त्यांनी एक तळे आणि एक ओढा तयार केला. अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून अग्निकुंड तयार केले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या साक्षीने पीटर ब्रुक यांनी  ‘महाभारत’चा प्रयोग सिद्ध केला. रंगभूमीच्या नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, संगीत आदी सगळ्या पूरक द्रव्यांचे त्यांनी अतिशय कल्पक व पुरेपूर उपयोजन प्रयोगामध्ये केले. प्रयोगाचा कालावधी नऊ तास होता. तीन दिवस तीन भाग स्वतंत्रपणे सादर झाले आणि नऊ तासांचा एक सलग प्रयोगही सूर्यास्त ते सूर्योदय या कालावधीत सादर केला गेला.

रंगभूमीचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या पीटर ब्रुक यांनी रंगभूमीची सर्व आयुधे वापरून ‘महाभारत’चा परिपूर्ण व संस्मरणीय नाटय़प्रयोग सादर केला याचे जगभर कौतुक झाले. पण जगभर अप्रूप वाटले ते याचे, की भारतीय व्यक्तिरेखा साकारण्यासाठी पीटर ब्रुक यांनी पाश्चात्य आणि आफ्रिकेतील नट-नटींची निवड केली. आणि त्यांनीही त्यांच्या निवडीचे सार्थक केले. ‘द्रौपदी’ची भूमिका केलेल्या मल्लिका साराभाई याच काय त्या एकमेव भारतीय. या थोर दिग्दर्शकाच्या या धाडसी प्रयोगाला अभिनयाविषयीच्या त्याच्या तत्त्वचिंतनाची पार्श्वभूमी आहे.

आर्तो आणि ग्रोटोस्की यांच्या प्रभावाचे ते फलित आहे. ‘बाहेरून आत’ आणि ‘आतून बाहेर’ अशा दोन अभिनयप्रक्रिया आहेत असे म्हटले तर ‘आतून बाहेर’ ही प्रक्रियाच कसदार निर्मितीला पूर्णत: साहाय्यभूत ठरते याबद्दल पीटर ब्रुक यांच्या मनामध्ये संदेह नाही. नट-नटी करू पाहत असलेल्या निर्मितीचा स्रोत त्यांच्या ऊर्मीमध्येच असल्याचे आर्तो आणि ग्रोटोस्की यांच्याप्रमाणे पीटर ब्रुक यांनाही केव्हाच जाणवले होते. नटाकडून आपल्याला काय अपेक्षित आहे याचा दिग्दर्शकाने विचार करण्यापेक्षा नटाच्या ऊर्मीकडे, त्याच्या ऊर्जास्रोताकडे दिग्दर्शकाने लक्ष ठेवायला हवे. पण त्याला ते जमण्यासाठी बराच वेळ लागतो असे त्यांनी म्हटले आहे. दिग्दर्शन करताना पीटर ब्रुक तालमीमध्ये नट-नटींच्या उत्स्फूर्ताविष्कारावर विशेष भर देतात; किंबहुना, त्यावर ते अवलंबून असतात. त्याचे कारण कलाकारांच्या ऊर्मी, त्यांचे आवेग त्यांना सर्वाधिक महत्त्वाचे वाटतात. प्रत्येक क्षणी त्यांच्या ऊर्मीनुसार नट व्यक्त होत राहिला तर त्या ऊर्मीना योग्य तो शारीरिक रूपबंध कसा द्यायचा याचा विचार करता येईल. पीटर ब्रुक यांची आणखी एक अपेक्षा अशी आहे की, नटाने सतत मोकळेढाकळे असले पाहिजे आणि प्राप्त परिस्थितीला प्रतिसाद दिला पाहिजे. शेक्सपिअरच्या ‘अ मिडसमर नाइट्स ड्रीम’चा एक प्रयोग एका खुल्या अवकाशामध्ये, कोणत्याही साहित्याशिवाय, प्रॉप्सशिवाय त्यांच्या नटांना त्यांनी करायला सांगितला आणि नटांनी उत्स्फूर्ताविष्काराचे तंत्र वापरून तसा तो केलाही. त्याच नाटकाचा एक प्रयोग फक्त लहान मुलांसमोर त्यांनी केला. अचानक समोर आलेल्या आव्हानाला मनमोकळेपणाने प्रतिसाद दिल्याने प्रयोगात ताजेतवानेपणा, रसरशीतपणा आल्याचे पीटर ब्रुक यांनी म्हटले आहे. शाळा, रुग्णालये, तुरुंग अशा ठिकाणी मधूनमधून प्रयोग केले तर नटांना एरव्ही सवयीचे झालेले प्रतिसाद तिथे मिळत नाहीत आणि त्यामुळे नट स्थिरावत नाहीत, त्यांच्या अभिनयामध्ये तोचतोचपणा येत नाही, ते बनचुके होत नाहीत.

‘महाभारत’च्या निमित्ताने त्यांच्या नटांनी कधी मुलाखतीमध्ये, तर कधी लेखामध्ये त्यांचे पीटर ब्रुक यांच्याविषयीचे अनुभव सांगितले आहेत. आन्द्रे सेवार्यनचा अनुभव असा आहे की, नटाच्या प्रत्येक बोटाच्या हालचालीकडे त्यांचे लक्ष असते. रंगभूमीवरचे ‘लाय डिटेक्टर’- खोटे शोधून काढणारा- असा त्यांचा गौरव एका नटाने केला आहे. ‘ओपन व्हा’ असे पीटर ब्रुक सतत सांगतात याची नोंद त्यांच्या सगळ्या प्रमुख नटांनी केली आहे. आणि ‘द्रौपदी’ची भूमिका केलेल्या मल्लिका साराभाई यांनी तालमी सुरू असताना पीटर ब्रुक यांच्याशी आपले कसे मतभेद होते, ते ‘द वायर’ या नियतकालिकामधील लेखात सांगितले आहे. पण त्याचबरोबर कांदा सोलावा त्याप्रमाणे व्यक्तिरेखेचा एकेक पापुद्रा सोलत तिच्या गाभ्यापर्यंत कसे पोहोचायचे ते पीटर ब्रुक यांनीच शिकविल्याचे आणि आज आपण कलाकार म्हणून जे काही आहोत ते केवळ पीटर ब्रुक यांच्यामुळेच आहोत, हे त्यांनी मोकळेपणाने मान्य केले आहे.                      

(‘समांतर रंगभूमी : पल्याड अल्याड’ या आगामी पुस्तकातील संपादित लेख)