मलेशियाची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारीत आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नित्य नवे उपक्रम तिथे राबविले जातात. मर्यादित साधनस्रोतांचा अधिकात अधिक वापर करण्यावर त्यांचा भर असतो. या पाश्र्वभूमीवर आपल्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे भरपूर काही असताना आपली अवस्था मात्र ‘सारा गाव शेती, पण कण न ये हाती’ अशी का व्हावी?
शहर ते शहर.. माणसांच्या गर्दीचे, वाहनांच्या धुराने आणि भोंग्यांच्या कलकलाटाने भारलेले, गजबलेली मॉल्स, दुकाने अन् तेथील अंगावर येणारा प्रचंड कोलाहल.. अगदी जगाच्या पाठीवर कोणत्याही आधुनिक शहराच्या या ठाशीव लक्षणांना आश्चर्यकारक अपवाद म्हणजे मलेशियाच्या राजधानीचे शहर क्वालालम्पूर होय. आश्चर्यकारक अशासाठी की इथे येण्याआधी क्वालालम्पूरची खासियत भटका, मनसोक्त खरेदी करा अथवा मॉल्सची रपेट करा, खा, प्या, मौज करा अशीच ऐकिवात होती. माणसाच्या चैन, ऐषारामाची (अर्थात विदेशी पाहुण्यांच्या!) जी काही आधुनिक साधने आहेत ती सर्वच्या सर्व या शहरात एक-एक ऐवज जोडत गोळा केली गेली आहेतच. परंतु स्पोर्ट्स, अ‍ॅडव्हेंचर, कल्चर, हेरिटेज अशी भटक्यांना लुभावणाऱ्या अलीकडच्या अनवट वाटा चोखाळत म्युझियम्स, बगीचे, थीम पार्क्‍स, जोडीला हेल्थ टुरिझमची प्रचंड संसाधनेही येथे उभी आहेत. शिवाय क्वालालम्पूरचे ‘शॉपिंगचा स्वर्ग’ हे विशेषण अढळ राहील, किंबहुना अधिक ठसठशीत बनेल असे येथील प्रशासनाचे निरंतर प्रयत्न सुरू असतात.
भटकंती तीही विदेशात योजताना भारतीयांचे प्राधान्य नेमके कशाला असेल? नवीन ठिकाण पाहणे आणि मौजमजा तर आहेच, पण काहींना निसर्गसौंदर्य, प्राणी-पक्षी, फुलांची विविधता, इतिहास, संस्कृती, भाषेचा ध्यास असतो तर काहींना तेथील खान-पान, खरेदीत अधिक रस असतो. एकाच सहलीत हे सारे अनुभवायास मिळणे तसे कठीणच. पण मलेशियाच्या पर्यटन मंत्रालयाचा हवाला द्यायचा तर, काही वर्षांपर्यंत येथे येणारे तब्बल ८० टक्के विदेशी पाहुणे हे केवळ खरेदी आणि खानपानासाठी येत असत. पण आता त्या जोडीला मलेशियाला लाभलेली विपुल निसर्गसंपन्नता, सांस्कृतिक वैविध्य, विरळ लोकवस्तीची शांत बेटे, ऐतिहासिक वारसा स्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. संपूर्ण देशभरात पर्यटन उत्सवाला बहर आला आहे. आगामी २०१४ साल तर ‘व्हिजिट मलेशिया’ अर्थात मलेशियाच्या सैरसपाटय़ाचे वर्ष म्हणूनच सरकारकडून साजरे होत असून, देशभरात त्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे सहज ध्यानात येते.
मॉल्सचे शहर
भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येच्याही तुलनेत मुंबईपेक्षा जवळपास निम्मा होईल इतका क्वालालम्पूरचा परिघ, परंतु मुंबईपेक्षा दुपटीने मॉल्स, दुकाने, पंचतारांकित हॉटेल्स व उपाहारगृहांची रेलचेल.. अर्मानी, प्रादा, जिमी चू, हर्मीस हव्या त्या उंची फॅशन ब्रॅण्ड्सची मांदियाळी येथे पाहायला मिळते. जगातील सर्व हॉस्पिटॅलिटी शृंखलांची सप्ततारांकित हॉटेल्स येथे चढाओढीने उभी असलेली दिसतात. गंमत म्हणजे सव्वाशे वर्षे जुने (चिनी व्यापाऱ्यांनी वसविलेले) सेंट्रल मार्केट ते जगप्रसिद्ध पेट्रोनास दुहेरी मनोऱ्याच्या पायथ्याशी असलेले सुरिया केएलसीसी या बहुमजली मॉल्सपर्यंत येथे खरेदीदारांना ज्याची त्याची ऐपत आणि प्रतिष्ठेप्रमाणे (वेगवेगळ्या श्रेणीचे एकूण ३२ अतिप्रचंड मॉल्स) निवडीला भरपूर वाव देणारे अनेकविध पर्याय येथे उपलब्ध आहेत. शिवाय ‘डय़ुटी फ्री शॉपिंग’ हा खरेदीदारांच्या आनंदात भर घालणारा आणखी एक विशेष. भारतापेक्षा अदमासे ३०-३२ टक्क्यांनी स्वस्त आणि मुख्य म्हणजे खात्रीशीर इम्पोर्टेड ब्रॅण्ड मग ते तयार वस्त्र, फॅशन अ‍ॅक्सेसरीज् असो अथवा सौंदर्य प्रसाधन असो येथे हमखास मिळेल. अनेक आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांनी पॅरिस, हाँगकाँग आणि दुबईच्या पुढे क्वालालम्पूरला जगातील अव्वल खरेदीचे ठिकाण म्हणून मानांकन बहाल केले आहे.  
या खरेदी उत्सवाला चालना देण्यासाठी मलेशिया सरकारकडून वर्षभरात विविध उपक्रम नियमितपणे योजले जातात. मलेशिया जीपी सेल (मार्च-एप्रिल), मलेशिया मेगासेल कार्निव्हल (जून ते सप्टेंबर) आणि अधिकची सवलत आणि भेटवस्तूंची लयलूट असलेले नोव्हेंबरच्या मध्यापासून ते नववर्षांरंभापर्यंत चालणारे मलेशिया इयर-एन्ड सेल हे त्यापैकी तीन ठळक उपक्रम आहेत. मलेशियाच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंदाजाप्रमाणे, विदेशात येणाऱ्या पाहुण्यांकडून निवास खर्चाच्या खालोखाल खरेदीवर सर्वाधिक खर्च केला जातो. मलेशियाने पर्यटनातून २०१२ सालात ६०.६ अब्ज डॉलरचा महसूल कमावला, त्यापैकी खरेदी व्ययाचा हिस्सा २० अब्ज डॉलरच्या घरात जाणारा आहे. क्वालालम्पूरसारख्या महानगरातच नव्हे तर लंकावी अथवा कूचिंग-सारावाक यासारख्या बेटांच्या प्रदेशातही मॉल्स व बाजारपेठांची कमतरता नाही. संपूर्ण मलेशियात तब्बल ३२० मॉल्स आणि त्यांचे १० कोटी चौरस फुटांचे विक्री क्षेत्र फैलावले आहे.
संपूर्ण देशच पर्यटनयत्नाला!
दक्षिण चिनी सागराच्या किनाऱ्यावरील या देशावर असलेला पूर्वापार भारतीय संस्कृतीचा प्रभाव, शिवाय राष्ट्रकुलातील सदस्य देश असल्याने ब्रिटिश वसाहतीचा वारसा, तसेच मोठय़ा संख्येने असलेल्या भारतीयांचा (प्रामुख्याने तामिळी) निवास आणि उपाहारगृहांची उपलब्धता यामुळे भारतीयांना घरापासून दूर असल्याची भावना निश्चित होत नाही. गोऱ्या साहेबाच्या (मलेशियन मंडळी ज्याचा उल्लेख ‘व्हाइट राजा’ असा करतात.) खास खुणा म्हणजे व्हिक्टोरियन आणि निओ-गॉथिक वास्तुरचनेतून उभ्या जुन्या इमारती तर मलेशियाच्या प्रत्येक प्रांत आणि बेटांवर ठळकपणे दिसून येतात. बहुतांशांचा धर्म हा इस्लाम असला, तरी समाजमन बंदिस्त नाही. किंबहुना १४७ जमाती व आदिवासी आणि त्यांच्या विशिष्ट संस्कृतीचा समाजमनावर प्रभाव दिसून येतो. एकुणात पर्यटन व आतिथ्याला साजेसे भौगोलिक वरदानच नव्हे तर सांस्कृतिक-सामाजिक पर्यावरणही या देशाला निसर्गदत्त लाभले आहे. साहजिकच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात लक्षणीय योगदान आणि विदेशी चलन कमावून देणारे दुसरे मोठे उद्योगक्षेत्र म्हणून पर्यटन या देशात फुलले-फोफावले नसते तरच नवल ठरले असते. किंबहुना पर्यटनच देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाचे प्रमुख साधन बनेल असा सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचेच हे फलित असल्याचे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझ्झाक कबूल करतात. देशाची जवळपास एक-तृतीयांश रोजगारक्षम लोकसंख्येची रोजी-रोटी पर्यटनावर अवलंबून आहे. १९७० साली लोकसंख्येत ४३.३ टक्के असे असलेले गरिबीचे प्रमाण २०११ सालच्या जनगणनेत १.७ टक्क्यांवर घसरण्याइतकी लक्षणीय प्रगती केवळ पर्यटनातून शक्य झाली आहे. नजीब सांगतात, ‘याचे श्रेय या काळात राबविल्या गेलेल्या शैक्षणिक धोरणालाही आहे. शिक्षणातूनच संपत्तीच्या समन्यायी वाटपाचे ध्येयही साकारले गेले आहे. आजही शिक्षणखाते हे उपपंतप्रधानांकडून सांभाळले जावे इतके त्याला महत्त्व आहे.’
शालेय स्तरापासून  मुलांचे इंग्रजीवर प्रभुत्व राहील, यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. ब्रिटनमधून खास शिक्षकांची मदत घेऊन स्थानिक शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले. देशभरात तब्बल १५ हजार प्रशिक्षित टूर-गाइड्सची फौज उभी करणारी खास संकुले विकसित केली गेली. केवळ तारांकित हॉटेल्सच नव्हे तर मलेशियन सरकारने १९९५ पासून अनुसरलेल्या ‘होम स्टे’ धोरणाने, पाहुण्यांना घरगुती निवासासह दैनंदिन लोकजीवनाशी जवळीक साधण्याचा आगळा अनुभवही प्रयत्नपूर्वक प्रदान केला आहे. अगदी क्वालालम्पूरच्या परिघावर या शहरापासून २० मिनिटांच्या अंतरावर, पारंपरिक राहणीमान व जनजीवनाचा आनंद देणाऱ्या, स्थानिक कुटुंबांचाच एक घटक बनून राहण्याचा आनंद देणाऱ्या माफक मोबदल्याचे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत.
सार्वजनिक स्वच्छतेचा ध्यास!
कोणत्याही समाजाची सभ्यता, सुसंस्कृता, जबाबदारीचे भान आणि सहअनुभूती जोखायची तर जेवण-खानाबरोबरच लोकांच्या स्वच्छतेच्या पद्धतीही तपासल्या जाव्यात असे म्हटले जाते. मलेशियातील सार्वजनिक शौचालयांच्या स्थिती पाहताही याची प्रचीती येते. संपूर्ण मलेशियातील कैक हजारांमध्ये मोडणाऱ्या सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेला प्रोत्साहन म्हणून तेथे २०१० सालापासून वार्षिक मानांकनाची पद्धत सरकारने सुरू केली. विशेषत: शाळा, प्रार्थनास्थळे, सरकारी कार्यालये, शॉपिंग मॉल्स, उपाहारगृहे व अन्य वर्दळीच्या ठिकाणची शौचालये तरी तारांकित मानांकन मिळविणारी असावीत, असा यामागे उद्देश होता. स्थानिक प्रशासनाकडून यासाठी दरसाल रग्गड अनुदानही दिले जाते. मलेय बोलीत शौचालयांना ‘तंडास’ असे संबोधन आहे. काहीसे आपल्याकडील ‘संडास’शी नामसाधम्र्याचा हाच एकमेव दुवा, अन्यथा आपल्याकडे पैसे मोजावे लागणाऱ्या ‘सुलभ’ केंद्रात असो अथवा बडय़ा मल्टिप्लेक्सचे शौचालय असो प्रवेश करताच नाकाकडे हात आपसुक सरकतोच. पण मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाची खंत हीच की तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर सुमारे पाच हजार सार्वजनिक शौचालयेच- तीन ते पाच तारांकित श्रेणीत (पंचतारांकितांची संख्या ३५०) आली आहेत. पण ज्याच्याशी आपल्याकडच्या सरासरी संडासांची तुलनाही हास्यास्पद ठरेल अशा दोन तारांकित शौचालयांचा आकडाही सात हजारांच्या घरात जाणारा आहे, ही बाबच मुळात विस्मयकारक आहे.
आपण कुठे आहोत?
जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची कीर्ती आहे. लोकसंख्याशास्त्राच्या परिभाषेत याला ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ म्हणतात आणि याचे फायदे भारतीय अर्थव्यवस्थेला येत्या काळात उपभोगायला मिळतील, असे म्हटले जाते. पण भारताला लाभलेल्या ‘जिओग्राफिकल डिव्हिडंड’चा त्यामानाने खूपच अभावाने उल्लेख होताना दिसतो. भारताइतकी भौगोलिक विविधता-विशालता, क्वचितच कोणत्या राष्ट्र-प्रदेशाच्या वाटय़ाला आली असेल. बर्फाच्छदित हिमपर्वते ते लाटांनी फेसाळणारे लांबलचक समुद्रकिनारे, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, घनदाट पर्जन्यजंगले, वाळवंट, प्राणी-पशू-पक्षी, वनस्पती विविधता, असंख्य छोटी-मोठी बेटे, बंदरे, घाटमाथे, लेण्या, गड-किल्ले, प्राचीन देवालये असे निसर्गवैभव ठायी ठायी आपल्याला लाभले आहे. वापरयोग्य गोडय़ा पाण्याच्या महानद्या आणि त्याकाठी फुलत गेलेला प्रादेशिक-सांस्कृतिक वेगळेपणा ठासून सांगणाऱ्या मुबलक खुणा भारतात पाहायला मिळतात. पण आपली अवस्था ‘सारा गाव शेती, पण कण न ये हाती’ अशा म्हणीसारखी झाली आहे. पर्यटन विभाग आहेत; पण त्यांचा निष्काम, आकांक्षाहीन आणि जनतेशी फटकून राहिलेला कारभारही आहे. आणि जनतेचे विचाराल तर त्यांचे कशाशीच देणेघेणे नाही असाच भाव राहिला आहे. पर्यटनातून व्यक्तिगत उत्कर्षांचा मार्ग सापडतो हे जनतेला पटले तरच देशही आर्थिक प्रगतीच्या दिशेने भरधाव वेग पकडू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून मलेशियाकडे पाहता येईल. ‘सर्वागाने आशिया’ असे नामाभिधान मिरविणारा मलेशिया तोवर आपल्याला वाकुल्या दाखवत राहणार. छोटय़ा चणीच्या मलेय नागरिकाचा ‘सलामत दातांग’ अर्थात सुस्वागतम् मलेशियाचा निनाद अधिक उच्चरवाने उमटताना व घुमताना दिसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा