-सुप्रिया देवस्थळी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय राजस्व सेवेत कार्यरत असणाऱ्या संग्राम गायकवाड यांची ‘मनसमझावन’ ही दुसरी कादंबरी. ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीनंतर आलेली ‘मनसमझावन’ ही वेगळया विषयावरची आणि अभिव्यक्तीमध्येसुद्धा वेगळं तंत्र आजमावणारी कादंबरी. या कादंबरीचं कथानक हे वेगवेगळया पात्रांच्या मनोगतातून पुढे सरकतं. ही पात्रं फक्त माणसंच आहेत असं नाही, त्या निर्जीव वस्तूसुद्धा आहेत. सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या मनोगताच्या माध्यमातूनच संपूर्ण कादंबरीचा पट चितारण्याचा मराठीतला हा कदाचित पहिलाच प्रयोग असेल. प्रकाशित होऊ घातलेलं पुस्तक, बाभुळगावातला लालबाबाचा दर्गा आणि याच दग्र्याच्या शेजारी सुखाने राहणारा म्हसोबा, अयोध्येच्या राममंदिराच्या उभारणीसाठी निघालेली वीट, एवढंच नाही तर व्हॉट्सअॅपसारख्या बहुरंगी आणि बहुढंगी पात्रांच्या मनोगतातून कथा पुढे सरकत राहते. महाराष्ट्राच्या किंवा देशातल्या प्रामुख्याने ग्रामीण भागात हिंदू आणि मुस्लीम संस्कृती परंपरेने एकत्र नांदत आल्या आहेत. बाभुळगावातला लालबाबाचा दर्गा आणि म्हसोबा ही त्या परंपरेची प्रतीकं. हिंदू-मुस्लीम सामायिक संस्कृती अशी नेमकी शब्दयोजना लेखकाने इथे केली आहे. या सामायिक संस्कृतीचं रूप पालटायला कसं लागलं, त्यात दोन्ही धर्माच्या निवडक मंडळींचा कसा हातभार लागला याचं विवेचन या कादंबरीत येतं.

कादंबरीचा नायक चिन्मय लेले हा मंजिरी आणि केशव लेले यांचा दत्तक मुलगा. आपल्या जन्मदात्या आईचा शोध घेण्याची त्याची इच्छा होते आणि त्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नातून समोर येतं की त्याची जन्मदात्री आई मुस्लीम आहे. चिन्मय लेले हा उजव्या विचारसरणीचा माणूस. मुस्लिमांवर टीका किंवा त्यांचा द्वेष हा त्याच्या आचारविचारांचा एक भागच. त्याची वैचारिक जडणघडण त्याच्या कौटुंबिक वातावरणाशी निगडित आहे. सोशल मीडियावर आपली मतं मांडण्यात तो सक्रिय आहे. अशा पार्श्ववभूमीवर आपली जन्मदात्री आई मुस्लीम आहे हे तो कसं स्वीकारणार हा कादंबरीच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. पण कादंबरीचा पट यापेक्षा खूप मोठा आहे. हिंदू-मुस्लीम सामायिक संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास, यातून उभे राहणारे हेवेदावे-द्वेष कादंबरीत येत राहतात. सामायिक संस्कृतीचा भाषेवर, वाङ्मयावर पडलेला प्रभाव ‘मनसमझावन’सारख्या कादंबरीतून जाणवतो. मध्ययुगीन भारतातली महत्त्वाची भाषा दखनीबद्दल खूप सविस्तर विवेचन या कादंबरीत येतं. ही कादंबरी दखनीलाच अर्पण केलेली आहे. लेखक मूळचे सोलापूरचे, त्यामुळे तिथल्या किंवा महाराष्ट्र, कर्नाटक सीमावर्ती भागातल्या मराठीचा लहेजा त्यांनी लेखनात छान आणला आहे. मोहम्मद मुजावरच्या मनोगतात ‘नई बोले तो नैच’, ‘जाना तो हैच मुजे’अशी वाक्यं येत राहतात.

आणखी वाचा-शिकवताना शिकण्याचा प्रवास..

कादंबरीच्या सुरुवातीच्याच काही पृष्ठांमधून हे स्पष्ट होतं की राबियाही चिन्मयची जन्मदात्री आई असणार. हे स्पष्ट झाल्यावर कादंबरीची वाचकावरची पकड थोडी ढिली होते. सामायिक संस्कृती, त्यामागची विचारधारा, ही सामायिक संस्कृती लोप पावायला लागल्यावर समाजाच्या काही घटकांमध्ये आलेली अस्वस्थता, एकाच कुटुंबात कट्टर विचार आणि मुक्त विचार असणारी मंडळी, तरुण पिढीच्या विद्वेषी आणि विखारी दृष्टिकोनामुळे होणारी वयोवृद्धांची कुचंबणा असे अनेक पदरी विवेचन कादंबरीत येते. हे विवेचन थोडं लांबतंय का असं वाटत राहतं. ही कादंबरी आहे की वैचारिक लेख आहे अशी शंका क्वचित मनात येते. तरीही आपण कादंबरी वाचायचं सोडत नाही. पहिली काही पृष्ठं वाचल्यावर शेवट वाचायचा मोह होऊ शकतो. विशेषत: जेव्हा कथानकातली उत्सुकता कमी होते आणि कथानक पुढे जाण्याचा वेग कमी होतो तेव्हा असा मोह होऊ शकतो. उदारमतवादी विचारधारा, विविध संस्कृतींनी एकत्र गुण्यागोविंदाने नांदणं, एकमेकांच्या विचारांबद्दल आदर असणं या तत्त्वांवर विश्वास असणारा कोणीही वाचक ही कादंबरी नक्कीच आवडीने वाचेल. आजूबाजूचं गढूळलेलं, काही अंशी विखारी वातावरण संवेदनशील माणसाला कसं अस्वस्थ करू शकतं, त्याची यात कशी घुसमट होऊ शकते हे या कादंबरीतून जाणवत राहतं. वैचारिक असहिष्णुता फार नेमक्या शब्दांत मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

आणखी वाचा-स्त्रियांच्या स्वप्नपंखांना बळ देणारं चरित्र

आपल्या देशाची एक सहिष्णू परंपरा संपते आहे त्यातून पुढचे चित्र कसे असणार आहे? आपण जुन्या परंपरा पुन्हा रुजवायच्या की आधुनिक मूल्यांचा स्वीकार करायचा हा वैचारिक तिढा ही कादंबरी समजूतदारपणे आपल्यासमोर ठेवते. आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल लेखक आशावादी आहेत याची जाणीव कादंबरीत अधूनमधून होत राहते. गोमांस भक्षण विरोध चळवळीत सक्रिय सहभागी असणारा चिन्मय आपली आई मुस्लीम आहे हे सत्य स्वीकारतो, त्यावरचं भाष्य फारच वेधक आहे. ‘‘सध्याच्या काळात अजिंक्य भासणाऱ्या आणि चिन्मय आणि केशवकाकांसारख्या लोकांचा ताबा घेणाऱ्या मुस्लीमद्वेष्टया विचारांचं गुरुत्वीय बळ भेदून जाणारी शक्ती निराळीच म्हणायची.’’ कादंबरीचा शेवट वाचकावरची लेखनाची पकड घट्ट करणारा आहे. चिन्मय आपली जन्मदाती आई राबिया हिला म्हटलं तर भेटतो, पण ती त्यांची पहिली आणि शेवटचीच भेट ठरावी हा करुण अंत मनाला चुटपुट लावतो. चिन्मय आणि राबिया यांच्यात कुठलाच शाब्दिक संवाद होऊ शकला नाही याची हुरहुर वाचकालाही वाटल्याशिवाय राहत नाही. राबियाआईवर पुस्तक प्रकाशित करून त्याची प्रत लालबाबाच्या दग्र्यावर अर्पण करण्याचा निश्चय चिन्मय करतो तेव्हा लालबाबाच्या आशीवार्दाने सुरू झालेलं त्याचं जीवन एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचल्याचं आपल्याला जाणवतं.

आणखी वाचा-भाषागौरव कशाचा?

राजस्व सेवेतल्या जबाबदाऱ्या सांभाळत अशी अभ्यासपूर्ण कादंबरी लिहिणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे. सरकारी सेवेत नोकरी करत विपुल लेखन करणाऱ्यांची महाराष्ट्रातली परंपरा उज्ज्वल आहे. संग्राम गायकवाड हे या परंपरेतलेच एक प्रवासी म्हणायचे. लेखनासाठी आवश्यक वैचारिक बैठक जमवणं, मग लेखनासाठी अभ्यास आणि प्रत्यक्ष लेखन हे सगळे टप्पे लेखकाने लीलया पार पाडलेले दिसतात. कादंबरीतली वैचारिक मांडणी थोडी आटोपशीर केली असती तर संपूर्ण कादंबरी सलग सामान उत्साहाने वाचण्याचा आनंद वाचकांना मिळाला असता. कादंबरीची पकड मध्येच कमी होत असली तरी भारतीय समाजाच्या उदार, सहिष्णू आणि सर्वसमावेशक परंपरेवर ठाम विश्वास असणाऱ्या कुठल्याही वाचकाला आवडेल अशीच ही कादंबरी आहे.

‘मनसमझावन’, संग्राम गायकवाड, रोहन प्रकाशन, पाने-२५४ , किंमत-३७५

supsdk@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manasamajhavan a disturbing novel by sangram gaikwad mrj
Show comments