डॉ. चैतन्य कुंटे – keshavchaitanya@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंदिर म्हटलं की आपल्या मनात घंटानाद जागतो. वैष्णव हवेली, शिवमंदिरांत पखवाजचा धीरगंभीर नाद गुंजतो. दाक्षिणात्य मंदिरांत नादस्वरम, वेणू, वीणा, तविल, मृदंगम्, खंजिरा अशा वाद्यमेळाने ‘कीर्तनसभा’ होते. शीख गुरुद्वारामध्ये रबाब, इसराज, सरिंदा, ढोलक, चिमटा, धामा-जोडी इ. वाद्यांच्या साथीने ‘रागी’ सबद कीर्तन गातात. ख्रिश्चन चर्चमधील बेलचे टोल आणि ऑर्गनचे सूर सहज अंतर्मुख करतात. मुस्लीम दग्र्यात कव्वाल आपल्या कव्वाली गायनात हार्मोनिअम, ढोलक, बुलबुलतरंग अशा वाद्यांनी रंग भरतात आणि ‘समा’ बांधतात.

तिबेटी बौद्ध पंथात डमरू, लाग्ना, द्यानग्रो अशी अवनद्ध वाद्ये, गाँग, रोल्मो, सिलन्येन, शांग व द्रील-ब्रू या घंटा, तिन्ग्शा अशी घनवाद्ये, गेकू हे शिंग, ऱ्या-ग्लिंग, डुंगच्येन, झांग-डांग ही सुषिर वाद्ये अशी अनेक वाद्ये विशिष्ट विधींत खास कार्यासाठी वाजवली जातात. कांगलिंग हे सुषिर वाद्य तर माणसाच्या मांडीच्या हाडाचे बनवलेले असते आणि त्याचा नाद हा दुष्ट शक्तींना पळवून लावणे, साधकाचा अहंकार घालवणे अशी कामे करतो अशी समजूत असल्याने हे वाद्य काही विधींत महत्त्वाचे असते. ज्यूधर्मीयांत ‘शोफार’ हे शिंगासारखे वाद्य फारच महत्त्वाचे असून, एवढे एकच वाद्य सिनेगॉगमध्ये वाजवले जाते. तर.. पाहिलंत मंडळी, सर्व धर्माच्या उपासना पद्धतीत काही खास वाद्यांना विशिष्ट, मानाचं स्थान आहे. येत्या दोन लेखांत भारतीय धर्मसंगीतात ‘मंगलवाद्य’ मानलेल्या काहींविषयी जाणून घेऊ.

शंख : भारतीय संस्कृतीने शंखाला समुद्रातून उचलून थेट देव्हाऱ्यात स्थान दिले आहे. का? एकतर  शंख हा उत्पत्ती, सर्जन यांचं प्रतीक असून त्याचं शुद्धता, पावित्र्याशीही नातं आहे. दुसरे म्हणजे शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला आहे. कारण लक्ष्मी आणि शंख हे दोघे समुद्रातून उत्पन्न झालेले ‘सहोदर’ आहेत! शंखात औषधी गुणधर्मही असल्याने तो धन्वंतरी या आयुर्वेदाच्या देवतेचे प्रतीक म्हणून उपास्य आहे. पद्मपुराणाच्या मते, शंख हा पंचतत्त्वांचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘सात्विक अहं’चे प्रतीक आहे. शंखवादनाने अवकाशात निर्माण झालेल्या ध्वनिलहरी दुष्ट शक्तींचा नाश करून भवताल पवित्र करतात अशी धारणा असल्याने मंगलकार्यात, पूजाविधीत आरंभी शंख फुंकला जातो. मंदिरांत प्रात:कालीन पूजा व सायंआरतीत शंखध्वनी करतात. मात्र, पूजाविधीतील काही प्रसंगी शंखनाद निषिद्धही मानलाय. देवतेस प्रसाद चढवताना, शेजारतीच्या वेळी शंख वाजवणे अयोग्य मानतात.

मौज अशी की, शंखध्वनीला भारतीय संस्कृतीत दुसराही- अगदी विरुद्ध अर्थाचा संदर्भ आहे, तो म्हणजे युद्धारंभाचा! याचीही कारणे दोन : युद्धालाही पूजा वा यज्ञ मानले आहे. कारण युद्ध म्हणजे केवळ संहार वा हिंसा नव्हे, तर त्याद्वारे अमंगलाचा नाश व मंगलाची स्थापना करावी अशी भारतीय धारणा आहे. दुसरे असे की, शंखाचा नाद भरीव, दूरवर पोचणारा. त्यामुळे एकाच वेळी मोठय़ा जमावाला पूजा असो वा युद्ध असो- आरंभाची सूचना मिळते!

घंटा : बव्हंशी सर्वच प्रार्थनास्थळांत सभागृहाच्या दर्शनी भागावर घंटा विराजमान असते. देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्भगृहात प्रवेश करण्याच्या आधी घंटा वाजवली जाते. का? घंटा हे प्रतीक आहे घटावकाश, एकाग्र मन आणि जीवात्म्याचे अद्वैत याचेही! घंटानाद हा मनाचा वाहक आहे. तो मनाला एकाग्र करून बा, स्थावर जगातून आंतरिक, आध्यात्मिक जगात नेतो असे मानतात. आरती करताना दीपज्योतीने ओवाळण्याइतकेच महत्त्व घंटानादालाही आहे.

घंटा अगदी प्राचीन कालापासूनचे एक ‘घनवाद्य’ आहे. कांसे, पितळ, लोह, तांबे आणि कथिल किंवा शिसे व जस्त यांच्या मिश्रधातूने घंटा बनते. घंटेच्या आतील लोळी ही धातू किंवा लाकडाची असते. घंटेचा घेर, आतील पोकळीचा आणि लोळीचा आकार यावर घंटेचा नाद, तिचे गुंजन अवलंबून असते. घंटांचे आकारही किती विविध! ‘संगीतरत्नाकरा’त बोटाच्या पेराएवढय़ा क्षुद्रघंटिकेपासून पुरुषभर उंचीच्या जयघंटेचे उल्लेख आहेत. भारतीय मूर्तिशास्त्रात घंटा हे अनेक देवतांचे लांछन आहे. क्षुद्रघंटिका या नृत्यकाराच्या पदन्यासाला एक वेगळी ध्वनीची मिती देतात, म्हणून नृत्याविष्कार करणारे देव हे क्षुद्रघंटिकांचा कटिबंध ल्यालेले दिसतात.

युरोपमधील ख्रिश्चन चर्चमध्ये घंटा वाजवण्याची चाइमिंग, रिंगिंग, क्लॉकिंग आणि चेंज रिंगिंग अशी तंत्रे विकसित झाली. जगभरातील चर्चबेल्सना मोठा इतिहासही आहे. पुण्यातल्या पंचहौद मिशनच्या ‘पवित्र नाम देवालय’ या चर्चमध्ये शतकाहून जुना ‘बेल टॉवर’ आहे आणि त्यातील घंटांचे वादन आजही काही खास सणांच्या दिवशी करतात. बौद्ध धर्मातील महायान पंथ आणि तिबेटी बौद्ध उपासनेत वज्रमूठ असलेल्या घंटेला फार महत्त्व आहे. दैनंदिन उपासनेतील मंत्रपठण करताना बौद्ध भिक्षू हातात वज्रमुठीची घंटा आणि डमरू धरतात. या घंटेचा अनुरणन असलेला नाद अज्ञानाचा अंध:कार दूर करून सत्याच्या प्रकाशाकडे नेतो अशी धारणा आहे. डमरू आणि घंटा यांच्यासह केलेल्या मंत्रपठणाद्वारे बोधिसत्त्वास आवाहन केले जाते.

टाळ-चिपळी : वैष्णव कीर्तनाचे प्रवर्तक मानलेल्या महर्षी नारदांच्या हातांत चिपळी आणि वीणा असते, त्यामुळे कीर्तनकार हे चिपळीचा वापर आवर्जून करतात. वासुदेवाच्या हातातही टाळ-चिपळी असते. ही दोन्ही वाद्ये अगदी प्राचीन आहेत. ‘संगीतरत्नाकरा’त त्यांचा उल्लेख कांस्यताल व कम्रिका असा आहे. आकार व नादगुणानुसार टाळाचे मंजिरा, मंजिरी, झांज, झांजरी, झालरा इ. प्रकार आहेत. गुजरात, राजस्थानमध्ये मोठय़ा आकाराची चिपळी असते, तसेच चिपळीऐवजी समान नादगुणाचे करताल हे वाद्यही वाजवतात. टाळ-चिपळीच्या उल्लेखाशिवाय मराठी वारकरी संगीताची परंपरा पूर्ण होत नाही, इतकं महत्त्व या वाद्यांना आहे. वारकरी भजन, एकतारी भजन, नारदीय कीर्तन, गोंधळ, भारूड अशा जवळपास सर्व विधांत टाळ वाजवले जातात.

टाळ व चिपळी ही दोन्ही घनवाद्ये आहेत. टाळ धातूचे असतात. चिपळीची जोडी ही लाकडाची असते व धातूच्या चकत्या त्यात गोवलेल्या असतात. तसंच या वाद्यांत दोन अंगांची एक जोडी असते. ही दोन अंगे एकमेकांवर आपटून ध्वनिनिर्मिती केली जाते. तत्त्वज्ञ मानतात की, टाळ, चिपळी यांची ही दोन अंगे शिव-शक्तीचे प्रतीक आहेत. ही दोन्ही अंगे जेव्हा विलग असतात तेव्हा अचेतन, ध्वनिहीन असतात; मात्र ती एकत्र येतात तेव्हा नाद निर्माण होतो- म्हणजेच ऊर्जा, चेतना निर्माण होते. अर्थात हा नादही क्षणिक असतो; तद्वत जीवनही! साध्या दिसणाऱ्या या वाद्यांतही जीवनाचे केवढे तत्त्वज्ञान सामावलेले आहे, नाही का!

टाळांच्या धातूच्या गोल अंगाच्या मागे एक मणी असतो, ज्यातून दोरी ओवलेली असते. अंगठा व तर्जनीच्या बेचक्यात टाळ पकडून दोन्ही अंगे एकमेकांवर आपटून हवा तसा- खुला किंवा बंद- नाद काढतात. टाळात बंद, बद्द आणि खुला असे तीन नाद काढले जातात. मात्र, चिपळीमध्ये असे नादवैविध्य नाही. चिपळीत नाद दोनच : एक लाकूड एकमेकांवर आपटल्याचा व दुसरा  धातूच्या चकत्यांचा.

टाळ, चिपळी ही लयवाद्ये आहेत; तालवाद्ये नव्हेत. त्यामुळे तालाच्या काही महत्त्वाच्या मात्रा, बोलांचे आघात करून या वाद्यांत लय राखली जाते. पूर्ण तालाचे वादन इथे होत नाही. टाळ वाजवण्याचेही एक खास तंत्र आहे. तालानुसार उठान घेणे, तोड देणे, लग्गीच्या वेळी दुगुन, चौगुनमध्ये बोल टाकणे, विविध ठेक्यांच्या अनुषंगाने बोल भरणे यासाठी चांगलाच व्यासंग लागतो. भजनात सर्व सहभागी गायक टाळ वाजवतात. चिपळी मात्र विशेषत: मुख्य भजनगायकच वाजवतात.

ढोल-ताशा : अनेकदा धर्मसंगीतात रूढार्थाने धर्माशी संबंधित नसलेली बाबही लोकानुनयासाठी स्वीकारली जाते व कालांतराने मुळात उपऱ्या असलेल्या त्या गोष्टीचा धर्माशी संबंध अगदी घट्ट होतो. आपले ढोल-ताशे हेही असेच आहेत. मुळात ही रूढार्थाने ‘मंगलवाद्ये’ही नाहीत. ढोल-ताशे ही वाद्ये खरे तर मिरवणुकीत वापरत. आगमनाची वर्दी देण्यासाठीही वापरली जात. धार्मिक उत्सवांच्या प्रसंगी देवतेच्या मिरवणुकीत त्यांचा वापर सुरू झाला. जेव्हा गणेशोत्सव हा सार्वजनिक बनला, तेव्हा त्याचे स्वरूप हे केवळ धार्मिक उरले नाही.. ते सामाजिक, राजकीय झाले. मग यात उत्सव साजरा करणारी मंडळे, त्यांचे शक्तिप्रदर्शन या सर्वाना एक वेगळे स्वरूप आले आणि या सगळ्या प्रक्रियेत ढोल-ताशांना महत्त्व येत गेले.

सण, उत्सव हे धर्माच्या सामाजिक ऊर्जेचा आविष्कार असतात. अर्थातच त्यातील संगीत हे केवळ ‘धर्मसंगीत’ न उरता ते एक ‘सांस्कृतिक उद्गार’ बनते! एरवी शांत, संयत असणारे धर्मसंगीत, त्यातील वाद्ये अनेकदा धार्मिक उत्सवांत काहीशी उग्र उद्घोषक, ‘लाऊड’ होतात. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर तो महाराष्ट्राचा एक सामाजिक सण बनला आहे. त्यामुळे तरुणांच्या सळसळत्या ऊर्जेचा ध्वनिस्फोट ढोलताशाच्या रूपाने होतो! पूर्वी धार्मिक उत्सवांत सनई-चौघडा वाजवला जाई. मात्र आताशा ‘गणेशोत्सव म्हणजे ढोल-ताशा पथके’ असे समीकरणच बनले आहे. ढोलताशावर तरुणाई थिरकते, तालाच्या नशेत झिंगते, तंद्रीत जाते. ढोल वाजवण्यातून तरुणाईला एक सकारात्मक ऊर्जा, उत्साह मिळतो. आजच्या कमालीच्या तणावाच्या, अस्थिर जीवनमानात ही ऊर्जा महत्त्वाची आहे.

गणपतीचे आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक एवढय़ापुरत्या मर्यादित असलेल्या ढोलताशाला गेल्या आठ-दहा वर्षांत अचानक ग्लॅमर आले. ढोल-ताशा पथकांत चुरस निर्माण होऊन ‘सेलिब्रिटी’ कलाकार आणून प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार सुरू झाले. पथकांची संख्या वाढली, तसा ढोलताशांचा आवाज व उपद्रव वाढला. त्यातील ‘संगीत’ वजा होऊन तो कोलाहल, ‘नकोसा गोंधळ’ होऊ लागला. सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या ढोलताशांचे पाहता पाहता नकारात्मक निषेधांत रूपांतर झाले! गणेशोत्सवातल्या ढोलताशाने तरुणाईला एकीकडे खुळावले आहे, तर दुसरीकडे ध्वनिप्रदूषणाच्या अतिरेकामुळे समंजस लोक त्याला विरोधही करताहेत. कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तरच सुंदर वाटते; पण बेसुमार झाली तर नकोशी होते, हा साधा नियम आपण का विसरत आहोत?

(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज्’ या प्रयोगकला अध्ययन केंद्राचे संस्थापक-संचालक आहेत.)