डॉ. आशुतोष जावडेकर

रेळेकाकांचा मेसेज वाजला तेव्हा तेजस नेमका सारसबागेच्या गणपतीला जोरदार नटलेल्या प्रेक्षणीय जनांसह प्रदक्षिणा घालत होता. दिवाळीचा पहिला दिवस होता. प्रदक्षिणा करता करताच त्याने सरावाने मेसेज उघडला. रेळेकाकांनी त्याला अमेरिकेतून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या, आशीर्वाद दिले होते आणि मग सोबत मंगेश पाडगावकरांची त्यांना आवडणारी ‘आनंदयात्री’ ही कविताही पाठवली होती.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..

तेजस तेवढं चाळून पटकन् बाहेर आला आणि पायऱ्यांजवळ त्याची वाट बघत उभ्या असलेल्या माही आणि अरिनच्या दिशेने त्याने हात हलवला. माही फार सश्रद्ध नसूनही दिवाळीच्या दिवशी इथे यायला तिला मस्त वाटायचं. एक सामूहिक आनंद, प्रसन्नता तेव्हा तिला तिथे भेटायची. सगळीकडे असलेल्या पणत्या, नटलेले लोक, चांगली थंड हवा.. आणि अरिनला पुण्यातल्या ज्या काही मोजक्याच गोष्टी आवडायच्या, त्यातलं हे एक देऊळ होतं. थोडय़ा वेळाने ते शांतपणे देवळाच्या मागच्या बाजूच्या पायऱ्या उतरून खाली आले. खालच्या पाण्याच्या छोटय़ाशा तलावात असंख्य कमळे फुलली होती.

तेजसला एकदम वाटलं की त्याची आजी सांगायची ती ज्ञानेश्वरीमधली आनंदसरोवरींची कमळे अशीच असणार! तिकडे अरिन ताबडतोब सेल्फी घ्यायला लागला- त्या कमळांसह. माही त्याचा उत्साह बघत शेजारी  उभ्या असलेल्या तेजसला म्हणाली, ‘‘कसले प्रसन्न आणि हसरे, आनंदी असे असतो रे या विशीच्या वयात आपण! पुढे कामाला लागलो की तो पहिला आनंदच हरवतो की काय असं मला वाटतंय.’’

‘‘ओय! माझे कान आहेत काय तुमच्याकडे..’’ असं हसत अरिन म्हणाला आणि मग सेल्फी सत्र पूर्ण करून ते दोघे उभे होते तिथे जात तो म्हणाला, ‘‘माही, सगळे माझ्या वयाचे असे आनंदात नसतात हा! डिप्रेशन केवढं आहे माझ्या कॉलेजच्या पोरांमध्ये.’’

‘‘डोंबलाचं  डिप्रेशन! काय रे तुम्हा पोरांना कसल्या असतात चिंता? मार्क्‍स आणि गर्लफ्रेंड आणि काय ते इंस्टावरचे लाइक्स कमी आले वगरे.. हेच ना?’’ माही हसत उत्तरली. अरिन काही बोलणार तेवढय़ात तेजसने पटकन् म्हटलं, ‘‘अऱ्या, पटकन् मागे बघ. काय हॉट पोरगी आहे!’’ अरिनने गर्रकन् मान मागे फिरवली, तसे तेजस आणि माही हसायला लागले. मागे एक टक्कल पडलेला मध्यमवयीन आणि मध्ययुगीन फॅशनचे कपडे घातलेला पुरुष होता.

‘‘तूच खेचू शकतोस असं नाही काही!’’ तेजसने हसत म्हटलं. माही म्हणाली, ‘‘प्रॉब्लेमच असतो यार तुम्हा पुरुषांचा पण. नुसतं मागे पोरगी आहे म्हणायचा अवकाश.. तुमची मान फिरलीच.’’

‘‘मग, दिवाळीला इथे आम्ही का आलोय दोघे असं तुला वाटतंय?’’ अरिनने डोळा मारत माहीला विचारलं आणि तिघे निरभ्र हसले. आज खूप दिवसांनी ते तिघेच भेटले होते. आणि ठरवून तिघेच भेटले होते. गीतामावशी, अस्मित, माहीचे आई-बाबा, तेजसचा लहान मुलगा आणि अगदी धीरजही नको होता त्यांना. आत्ता ते फक्त तिघेच होते आणि आनंदात होते. त्या आनंदाची जातकुळी त्या तिघांनाच माहीत होती. त्या आनंदाचा पासवर्ड त्या तिघांकडे होता. तिघे शेजारच्या कठडय़ावर बसले. शांत राहिले काही वेळ.

‘‘मस्त वाटतंय यार असं आपण तिघे असताना.’’ अरिन म्हणाला, ‘‘पुढच्या वर्षी दिवाळीत मी कुठे असेन.. भारतात तरी असेन का, हे मला माहीत नाही. ही माही तर लग्नच करणार आहे त्या धीरजशी. ती कुठे असेल माहीत नाही.’’

तेजस पटकन् म्हणाला, ‘‘पण मी असेन इथेच. आणि तुमची आठवणही मला खूप आनंद देईल पुढच्या दिवाळीत.’’

माही म्हणाली, ‘‘हॅलो! एक तर मी लग्न लगेच करते आहे हे कोणी तुम्हाला सांगितलं? दुसरं.. केलं, तरी धीरजला पकडून घेऊन येईन मी भेटायला. पण अऱ्या, तू परदेशात गेलास तर मात्र काही भेट नाही व्हायची. पण तेजस म्हणतो तसं मीही आनंदी असेन. आपले सगळे फोटो मी समोर ठेवून बघेन आणि मग मस्त प्रसन्न होऊन पास्ता बनवेन !’’

‘‘तो तू आजही बनवू शकतेस. आम्ही येऊ दोघे खायला. ऑलिव्ह ऑइल चांगलं वापर फक्त! तो आनंद आम्हाला आत्ताच मिळू दे.’’ अरिन खिदळत म्हणाला.

तेजस हसत म्हणाला, ‘‘आनंदाचं बोलताय तर हे ऐका.. आत्ताच रेळेकाकांनी पाठवलं आहे.. ‘आनंदयात्री मी आनंदयात्री..’ ’’

माही म्हणाली, ‘‘काय सुंदर शब्द आहे रे! आनंदयात्री!’’ पण मग तिला एकदम धीरज आणि तिचं एक ताजं आग्र्युमेण्ट आठवलं. ती सांगत होती की, ‘‘आनंद हा बेसिकली गोष्टी शेअर केल्यामुळे मिळतो.’’ तेव्हा धीरज तिला म्हणाला होता की, ‘‘शेअर करणं म्हणजे गुंतणं! आणि गुंतलं की प्रसन्नता हरवलीच. आनंद नाहीसा झाला.’’ माहीने तो संवाद तेजस आणि अरिनला सांगितला. अरिन क्षणभर विचार करीत म्हणाला, ‘‘आमच्या पाल्र्यामध्ये आशा भोसले यांची मुलाखत झालेली मधे. आई-बाबाने आग्रह केला म्हणून मीही गेलेलो. त्यात सुधीर गाडगीळांनी त्यांना विचारलं होतं की, ‘‘नक्की काय झालेलं ‘ऐ मेरे वतन के लोगो..’ या गाण्याच्या वेळेला?’’

तेजस म्हणाला, ‘‘अरे हो, ते गाणं आशाबाईंकडून काढून लतादीदींना मिळालेलं असं मी ऐकलंय.’’

अरिन म्हणाला , ‘‘ऐक रे तेजसदा. ते मला काही माहीत नाही. पण मला आशाताईंचं उत्तर फार आवडलं. त्या म्हणाल्या, ‘पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही..’ अर्थात मला क्लीअर कळत होतं यार, की त्यांना ते सगळं पॉलिटिक्स आत्ताही अख्खं आठवत असणार. तसं मी शेजारी बसलेल्या माझ्या बाबाला सांगणार तितक्यात आशाबाई थांबून म्हणाल्या, ‘ दुनियेमध्ये जी देण्यात मजा आहे, ती घेण्यात नाही. एखादी गोष्ट कुणाला आवडली तर सोडून द्यावी. त्याच्या मागे जाऊ नये आपण. जन्मभर जाऊ नये.’ आणि काय प्रचंड टाळ्या पडल्या यार. चक्क आत्ताही आठवताना माझ्या हातावर काटा आला आहे बघ. आणि मी हे माही अशासाठी सांगतोय, की धीरज मे बी राइट. आशाबाई गुंतून राहिल्या नाहीत आणि म्हणूनच प्रसन्न आहेत बघ. ते उत्तर देतानाही त्या प्रसन्नच होत्या.’’

माही विचारात पडली. तितक्यात तेजस म्हणाला, ‘‘परवाच आमच्या ऑफिसच्या ग्रुपवर चर्चा झालेली.. हॅपिनेस इंडेक्सवरती नेमकी. थांबा, त्यातली दोन वाक्ये वाचतो. आमचा चाळिशीचा आनंद आता असा आहे. हा माझ्या पलीकडे डेस्कवर बसतो तो सुश्रुत कुलकर्णी म्हणतो की, चाळिशीचा आनंद म्हणजे तारुण्याचा उत्साह, स्वप्नं आणि त्या सगळ्या आकांक्षा पुरी करायची ऐपतही!’’

अरिन गवतावर मस्त आडवा पडत म्हणाला, ‘‘परफेक्ट आहे. मी चाळिशीचा होईन तेव्हा आधी नॉर्दन लाइट बघायला ट्रॉम्सला जाईन. आत्ताही बाकी सगळं माझं सामान तयार आहे, पण नॉर्वे ट्रिप काही परवडणारी नाही.’’

‘‘आणि कुणी बायका आहेत का तुमच्या ऑफिस ग्रुपमध्ये? का त्यांचा हॅपिनेस इंडेक्स नवऱ्यांचे नखरे सांभाळण्यात निगेटिव्हला गेला आहे? त्या काय म्हणतात? कसा असणार आहे म्हणे आम्हा बायांचा चाळिशीचा आनंद?’’ माहीने विचारलं.

‘‘हे ऐक. ही माझी एक कलीग आहे- हिमानी पंडित नावाची. तिने लिहिलंय ग्रुपवर की.. ‘‘चाळिशी म्हणजे आनंदाचा संधिकाल! हवाहवासा.. पूर्णपणे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असलेला.’

अरिनने तेवढय़ात वाचणाऱ्या तेजसचा कँडिड फोटो काढत म्हटलं, ‘‘तुम्ही सगळे मोठे लोक एवढे आनंदाच्या कन्सेप्टने ऑब्सेस्ड का आहात? मिळतो यार तो. आणि जातोही हातातून निसटून. मी आणि इरा तर नेहमी म्हणतो की, आनंद हा असा आणि एकूणही ऑर्गनिक असतो! बेफाट, भन्नाट, पण क्षणापुरता. आणि चालतंय यार!’’

तेजस सावरून म्हणाला, ‘‘मग तर विशीचा तुमचा आनंद तो काय! तसाच क्षणभंगुर असायचा! फुटबॉल, पोरी आणि तुमचे ते माव्‍‌र्हल आणि डीसीचे पिक्चर!’’

डीसीचा भयानक भोक्ता असल्याने अरिन पेटून उठला आणि म्हणाला, ‘‘आणि तुमचा तिशीचा आनंद म्हणजे पगार. आणि चाळिशीचा आनंद म्हणजे मुलंबाळं आणि सुट्टय़ा! आमचा काय तो- चक्- क्षणभंगुर बरा! निदान खरा तरी असतो!’’ आणि मग एकदाच जोरकसपणे म्हणणं मांडावं म्हणून अरिनने गुगल करून डीसीच्या अ‍ॅक्वामॅनचं वाक्य बसल्या बसल्या फेकलं , ‘‘ऐका. True happiness is found along the middle road. तिथे बॅलन्स असतो, हार्मनी असते.’’

तेजस ताठ बसत मान हलवत म्हणाला, ‘‘च्यायला, तुमच्या सुपरहिरोंना इतपत डोकं असेल असं वाटलं नव्हतं.’’ आणि मग तिघे हसले आणि शांत बसले..

देवळाच्या परिसरात पहाटे लावलेल्या पणत्या आता विझू विझू झाल्या होत्या. लोक परतून घराघरात फराळ करायला निघाले होते. त्या आनंदी लोकांचे चेहरे असे होते की जगात दैन्य, दु:ख असं काही नसावंच. म्हणजे असतंच ते; पण प्रयत्नपूर्वक निदान एक दिवस ते मनामागे टाकण्याचा दिवाळीचा संकेत असतो. पणती तुम्हाला तेच तर शिकवत असते. आकाशकंदील तेच तर सांगत असतो. रांगोळ्यांचे लाखो रंग आकांत करून तेच तर आनंदी गाणं तुम्हाला म्हणायला सांगत असतात.

तेजसने मग ती रेळेकाकांनी पाठवलेली कविता शांतपणे वाचायला सुरुवात केली. ‘अफाट आकाश, हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती.. अक्षय नूतन मला ही धरित्री, आनंदयात्री मी आनंदयात्री..’ कविता वाचून संपल्यावर एकदम कधी नव्हे तो तेजस मोबाइल समोर धरत म्हणाला, ‘‘चला, बघा सगळे कॅमेरात. असा सेल्फी आपल्या तिघांचा मला घेऊ द्या.. जो कायम आयुष्यभर मला आनंद  देत राहील.’’

मग अरिनने नेहमी करतो ती बोटांची डेव्हिल साइन केली नाही. माहीने नेहमीसारखं ओठ पुढे आणत पाऊट केलं नाही. तेजसची नजर नेहमी झुकते तशी नकळत खाली झुकली नाही. तिघे शेजारी स्तब्ध बसले. एकत्र हातात हात घेऊन. आणि कॅमेऱ्यामध्ये त्यांनी असं काही बघितलं, की कुठला फिल्टर न लावताही आपसूक सेल्फीमध्ये सोबतीचा निखळ आनंद पणतीसारखा उजळत गेला..

ashudentist@gmail.com