साहित्यिक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले. त्यानिमित्ताने त्यांच्या काही पुस्तकांतील लेख एकत्रित करून ‘निवडलेले खर्डे’ हे नवे पुस्तक त्यांच्या पत्नी व ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांनी सिद्ध केले आहे. मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या या पुस्तकानिमित्ताने विजयाबाईंनी जागविलेल्या त्यांच्या हृदयस्थ आठवणी..
मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले. त्यानिमित्ताने त्यांच्या काही पुस्तकांतील लेख एकत्रित करून एक स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करायचे असा संकल्प केला होता. तो आज ‘निवडलेले खर्डे’ या संकलनाच्या रूपाने पूर्ण होत आहे. संकलन मी (मुक्ता, राधा, निरंजन, सायली यांच्या सहकार्याने) केले. त्यासाठी राजाध्यक्षांची पुस्तके पुन्हा एकदा वाचताना मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या पुस्तकांच्या आणि त्यांच्याही. त्यापैकी पुस्तकांबद्दलच्या आठवणी बाजूला ठेवून राजाध्यक्षांबद्दलच लिहिते. जरा संकोचाने, जरा अवघडलेल्या मनाने.
आठवणीच्या प्रदेशाला सीमारेषा नसतात. कुठूनही रेघ आखावी. मी रेघ मारली आहे (स्थळ : कोल्हापूर) सप्टेंबर १९५२ या बिंदूवर. तो बिंदू पुढे पुढे जात कदाचित २०१० या वर्षांवर थबकेल. कदाचित थोडा मागेही. कारण २०१० च्या आधीच अनुभव संपले आणि फक्त आठवणी उरल्या. एका समृद्ध सहजीवनाच्या आठवणी.
सप्टेंबर १९५२ : मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष या नावाचे कोणी प्राध्यापक एल्फिन्स्टन कॉलेजातून बदलून आमच्या- म्हणजे राजाराम कॉलेजात येणार अशी बातमी आली. ते आले, त्यांनी पाहिले आणि जिंकले, असे त्यांच्या आगमनानंतर मुळीच झाले नाही. कारण हे राजाध्यक्ष कोण, हेच आम्हाला ठाऊक नव्हते! नंतर कळले की, ते लेखक आहेत. त्यांचे ‘५ कवी’ नावाचे एक संपादित पुस्तक आहे; शिवाय ‘अभिरुचि’ या नियतकालिकात ते एक सदर लिहितात. पण ही नुसती माहिती. हे साहित्य पाहिलेले नव्हते, वाचलेलेही नव्हते. त्यामुळे आमच्या लेखी ते एक प्राध्यापकच. ते प्राचार्य व्ही. के. गोकाक या आम्हाला प्रिय असलेल्या प्राध्यापकांच्या जागी आलेले असल्यामुळे आम्ही नाराज होतो.
पहिल्याच दिवशी, निषेध म्हणून, ते वर्गात येताच काही विद्यार्थ्यांनी स्टँपिंग सुरू केले. राजाध्यक्ष त्यांना शिकवायचे असलेले ‘ऑथेल्लो’ हे नाटकाचे पुस्तक घेऊन स्वस्थ उभे राहिले. हाच प्रकार आणखी काही दिवस चालला. राजाध्यक्षांचा प्रतिसाद तोच. एकदा म्हणाले, ‘‘येस, गो अहेड! आय हॅव इन्फिनिट पेशन्स!’’ हळूहळू त्यांच्या अध्यापनाची गुणवत्ता किती श्रेष्ठ आहे हे विद्यार्थ्यांना कळले. वर्ग शांत, भारल्यासारखा बसू लागला. माझी अवस्था तशीच. फक्त त्यांच्या अध्यापनामुळे नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हळूहळू जाणवत गेलेल्या अनेक पैलूंमुळे. ते अधिकाधिक समजावेत यासाठीच मी बी. ए. ला मराठीच्या जोडीला इंग्रजीचे दोन पेपर्स घेतले. मनापासून अभ्यास केला. एका सहामाहीच्या परीक्षेत तर अक्षर कोरून कोरून काढून लिहिलेल्या पेपराबद्दल मौखिक शेरा आला, ‘‘सुपर्ब पेपर!’’
अशी छोटी-मोठी संभाषणे व्हायची, ती राजारामपुरीतून निघणाऱ्या बसमध्ये. (तीच अकराच्या सुमारास ठरावीक वेळी निघणारी बस.) साधारण ग्रे कलरचा सूट, डोळ्याला गॉगल अन् तोंडात पान. त्यांच्या शेजारी बसायला जागा मिळावी ही माझी धडपड क्वचितच सफल व्हायची. पण मी त्यांचे लक्ष वेधलेले असायचे. एवढेच माझ्यासाठी खूप होते. परत येताना मात्र राजाध्यक्ष शिवाजी चौकातून निघणाऱ्या बससाठी स्टॉपवर उभे असतील का, या अपेक्षेमुळे मनात धडधड असायची. कधी भेट व्हायचीही. त्यावेळी होणारा आनंद कसा वर्णावा?
त्या दोन वर्षांत जवळीक वाढली. मी त्यांच्या घरी जाऊ लागले, त्यांच्याकडून पुस्तके आणू लागले; त्यांना माझे अर्धेकच्चे लेखन दाखवू लागले; आणि राजाध्यक्षही मार्जिनमध्ये त्यावर शेरेवजा लिहू लागले. पुस्तके आणायची ती बहुतेक कवितेची. तो मराठी कवितेचा बहराचा काळ होता. त्यावेळी प्रसिद्ध झालेले मर्ढेकर, पाडगांवकर, बापट, करंदीकर, इंदिरा संत, पु. शि. रेगे यांचे कवितासंग्रह अगदी ताजे असताना वाचले. विंदांच्या ‘मृद्गंध’ या संग्रहाचे काही फॉम्र्स राजाध्यक्षांनी मला पोस्टाने पाठवल्याचे स्मरते- आणि ‘शीळ’ची प्रस्तावना त्यांच्या अक्षरात वाचल्याचेही. मला कवितेची गोडी लागली, कवितेसंबंधी मर्मदृष्टी प्राप्त झाली ती केवळ राजाध्यक्षांमुळेच. ते आमच्या दोघांच्याही मनात जुळत राहिलेल्या आणि शेवटी ‘मुद्रित’ झालेल्या कवितेचे दिवस होते, आणि ते पुढेही अखंडपणे बहरतच राहिले. ‘कधी बहर, कधी शिशिर’ असे कधीच झाले नाही.
आमचे लग्न झाल्यानंतर कुलाब्याच्या घरात मी १९५६ च्या शेवटी आले. त्या घरात पुस्तकेच पुस्तके होती. वाचाल तेवढे थोडे. या पुस्तकसंग्रहाची आठवण झाली की लक्षात येते- राजाध्यक्षांची वाचनाची कक्षा फार व्यापक होती. फक्त साहित्य असा प्रकार नव्हता. राजकारण, तत्त्वज्ञान, चरित्रे, आत्मचरित्रे, कादंबऱ्या, नाटके सगळ्यांना त्या पुस्तकसंग्रहात जागा होती. रात्रीच्या वेळी टेबल-लँप लावून लेक्चरची तयारी करत बसलेले राजाध्यक्ष अजून माझ्या नजरेसमोर आहेत. कधी पुस्तकांवर, तर कधी छोटय़ा पातळ कागदांवर खुणा, नोट्स काढत असत. इंग्रजी उत्तम, वाणी ओघवती. त्यामुळे विद्यार्थी (विद्यार्थिनीही!) खूश असत. त्यांनी शिकवलेल्या पुस्तकांच्या आठवणी काढणारे विद्यार्थी आजही मला भेटतात अन् मग सरांच्या आठवणी निघतात. इतका ‘संस्मरणीय’ शिक्षक क्वचितच भेटतो. राजाध्यक्षांनी फक्त उत्तम शिकवले, एवढेच नाही तर शिकवण्यातून प्रेरणा दिली, भान दिले, संस्कार दिले. ते संस्कार आजतागायत त्यांचे विद्यार्थी जपत आहेत. माझ्या मनावर तर तेच संस्कार कायमचे कोरले गेले आहेत. म्हणूनच ते माझे गुरू, स्नेही, मार्गदर्शक- सर्व काही!
केवळ पती-पत्नीच्या नात्याच्या पलीकडे पोचलेले असे हे नाते होते. ‘देणाऱ्याने देत जावे’ हे खरेच. ते राजाध्यक्षांनी भरभरून दिले. पण घेणाऱ्याला ते घेता आले पाहिजे ना? मला ते जमले का?.. पण हा प्रश्न राजाध्यक्षांनी कधीच माझ्या मनात येऊ दिला नाही. मला कधी परके, एकटे वाटू दिले नाही. नेहमीच पुढे जाण्याची वाट दाखविली. त्यामुळे माझ्या मनात माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली. तिच्यावर राजाध्यक्षांनी कधी स्वत:ची सावली पडू दिली नाही. मी कॉलेजात शिकवू लागले ती त्यांच्यामुळेच. आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात गेले तीही त्यांच्याच आग्रहामुळे- १९९० साली.
सिडनहॅम, इस्माईल युसूफ या कॉलेजांतून एल्फिन्स्टनला माझी बदली झाली ती १९६३ साली. एल्फिन्स्टन परके नव्हते. तिथले काही प्राध्यापक, विद्यार्थी माझ्या परिचयाचे होते. कारण राजाध्यक्षांनी याही जीवनात मला सहभागी करून घेतले होते. तरीही एल्फिन्स्टनमधल्या पहिल्या दिवशी माझ्या मनावर प्रचंड दडपण होते. इथले अतिरथी-महारथी प्राध्यापक, बुद्धिमान विद्यार्थी अन् मुख्य म्हणजे माझ्या लेखी कॉलेजचा केंद्रबिंदू असणारे राजाध्यक्ष. वाटत होते, त्यांच्या नावलौकिकाला साजेसे यश आपण या क्षेत्रात मिळवू शकू का? मला वाटते, राजाध्यक्षांनीच दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझे दडपण हळूहळू कमी होत गेले अन् हळूहळू नाहीसे झाले. पुढे तर माझे विद्यार्थी त्यांचेही विद्यार्थी झाले आणि एक संयुक्त गुरुकुल अस्तित्वात आले.
आम्ही कितीतरी गोष्टी एकत्र केल्या. क्रिकेटच्या मॅचेसना मी काही काळ त्यांच्याबरोबर जात असे. संगीताच्या मैफिली, नाटके, चित्रपट- सगळे एकत्र. त्यावर कधी कधी संभाषणेही. हे सगळे मला आजही प्रिय आहे, हेही राजाध्यक्षांचे देणे आहे. त्यांचे स्नेहीही मला सामावून घेणारे होते. कितीतरी बैठकी आमच्या कुलाब्याच्या घरी आणि १९७० नंतर आमच्या ‘साहित्य सहवासा’तल्या घरी रंगल्या. सामिष भोजन करण्यात मला रस वाटू लागला. राजाध्यक्षांना मासे फार प्रिय. कुलाब्याला घरापासून काही अंतरावरच मार्केट होते. राजाध्यक्ष दर रविवारी कधी मुक्ता-राधाला, तर कधी निरंजनला घेऊन स्वत: मासळी आणायला जात. मासळी आणणे, तसेच तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ आणणे, हा त्यांचा बोरीवलीला राहत असल्यापासूनचा छंद होता. म्हणून कुटुंबातल्या बच्चेकंपनीला ‘भाई’ फार आवडत असत. शेवटच्या आजारातही जेवणाच्या वेळी ‘आज मासळी नाही?’ हा प्रश्न असायचा. कधी निरंजनकडे ‘मामा काणे’च्या बटाटेवडय़ाची आठवण काढायचे. कारण रुची ताजी होती अन् अभिरुचीही. शेवटी शेवटीही वर्तमानपत्र चाळणे, कॅरम खेळणे चालू होते. पण अबोल, एकटे झाले होते. संवाद- जो त्यांना फार मोलाचा वाटे- तो क्षीण झाला होता. पण त्या अवस्थेतही त्यांचा शांतपणा, त्यांची आत्मप्रतिष्ठा, त्यांचे सौजन्य शाबूत होते. त्या दिवसांत मला राजाराम कॉलेजमधल्या वर्गातले त्यांचे ते वाक्य नेहमी आठवायचे : ‘आय हॅव इन्फिनिट पेशन्स!’
‘निवडलेले खर्डे’च्या ‘जरा जवळून, जरा दुरून’ या प्रास्ताविकात मी लिहिले आहे ते दोन्ही अंतरांवरून. हे मात्र जवळूनच आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाला खूप काही दिलेल्या राजाध्यक्षांबद्दलचे प्रेम व कृतज्ञता- दोन्ही व्यक्त करण्यासाठी. पण सगळेच व्यक्त करता येत नाही; काही अव्यक्तच राहते!
त्या अव्यक्तापाशी थांबताना आम्हा दोघांनाही आवडणाऱ्या आरती प्रभू यांच्या एका अप्रतिम कवितेतील तो अव्यक्त ‘गंधार’ मनात दरवळत राहतो..
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.
..तारांवरी पडावा केव्हा चुकून हात :
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.
कवीला ‘विस्तीर्ण पोकळीत’ला ‘गंधार’ सापडल्यानंतर निरभ्र मनाने निरोप घ्यायचा होता. राजाध्यक्षांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याभोवती ती ‘विस्तीर्ण पोकळी’ नव्हतीच. कारण त्यांना आपले समृद्ध आयुष्य जगताना तो ‘गंधार’ सहजपणे सापडला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा