सतीश कामत
फेब्रुवारीपासून आंबाप्रेमींची रसहौस कोकणातील उत्पादक आणि व्यावसायिक भागवतात. पण हापूस आंब्यांचा देशभर मोठय़ा प्रमाणावर आस्वाद घेतला जातो, तो एप्रिलच्या मध्यापासून ते मे महिन्याच्या अखेरीपर्यंत. यंदा चार दशकांत पहिल्यांदाच कोकणात आंबा पीक सर्वात कमी आले. या महिन्यातच हंगाम संपेल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, वादळ-वारा आणि तापमानवाढीपासून ते रोगांचा सामना करीत आंबा पीक लढत आहे. यंदा परिस्थिती इतकी बिकट का झाली आणि पुढील महिन्यात आंबा खादाडी अवघड बनेल का, या प्रश्नांचा घेतलेला शोध..
निसर्गात विविध प्रकारची फळं असतात. ऋतुमानानुसार त्यांची झाडं बहरतात. फलधारणा होते. फळं पिकतात. लोक त्यांचा मनमुराद आस्वादही घेतात. पण एखाद्याच फळाचं असं भाग्य असतं की, ते केवळ लोकांच्या खाण्याचा विषय नसतं, तर ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो’, अशा लडिवाळ कौतुकाने त्यांच्या जीवनसंस्कृतीत ते फळ स्थान मिळवतं. त्याची चर्चा आगमनापूर्वी सुमारे सहा महिन्यांपासून सुरू होते आणि पुढेही दोन-तीन महिने केवळ त्याचीच चर्चा असते. कोकणात पिकून सातासमुद्रापार ख्याती पसरलेल्या हापूस आंब्याला हे भाग्य लाभलं आहे. ऐन उन्हाळय़ात आगमन होणाऱ्या या राजाचं असं रसभरित प्रेमानं केलं जाणारं वर्णन त्याचा तोरा अधोरेखित करतं. स्वाभाविकच ‘फळांचा राजा’ हे बिरुद ते सार्थपणे मिरवतं. पण राजा म्हटलं की शत्रूही आलेच. हाही राजा त्याला अपवाद नाही आणि सध्या तर तो इतक्या विविध प्रकारच्या शत्रूंनी घेरला गेलाय की, जणू आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. यामागची कारणं शोधायला गेलं तर त्याबद्दल निसर्ग आणि मानव या दोघांनाही जबाबदार धरावं लागेल.
गेल्या दहा-बारा वर्षांत या आंब्याचं सारंच वेळापत्रक कमालीचं बिघडलं आहे. नेमकं सांगायचं तर २००९ च्या नोव्हेंबर महिन्यात ‘फयान’ या चक्रीवादळाचा फटका रत्नागिरीच्या किनारपट्टीला बसला. त्या वर्षी मोहोर धरण्यापासून सर्व टप्पे लांबत गेल्याने मोठा फटका बसला. त्यानंतर गेल्या दहा-बारा वर्षांत असंच काही ना काही अस्मानी संकट आंब्याला घायाळ करत आहे. लांबणारा पावसाळा, कमी काळ टिकणारी थंडी आणि भाजून काढणारा उन्हाचा कडाका, असं तिन्ही ऋतूंचं विपरीत वर्तन त्याचा घात करत आहे. हे कमी होतं म्हणून की काय, २०२०/२१ ही लागोपाठ दोन वर्ष ऐन मे-जूनमध्ये आलेल्या ‘निसर्ग’ आणि ‘तोक्ते’ या चक्रीवादळांनी इथल्या बागायतदारांच्या तोंडचा घास काढून घेतला.
आपल्याला बाजारात आंबा फेब्रुवारी-मार्चनंतर दिसायला लागत असला तरी त्याची झाडावरची प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून सुरू होते. आधी नवीन पालवी फुटते. ती जून होऊन झाडं मोहोरायला लागतात आणि इथूनच एखाद्या गर्भार बाईसारखी या झाडाची काळजी बागायतदार घेऊ लागतो. यंदाच्या हंगामात दरवर्षीच्या तुलनेत ९० टक्के झाडांना पालवी आली होती. पालवी जून होण्यासाठी पोषक वातावरण पुढे तयार होईल अशी आशा होती; परंतु ती फोल ठरली. कारण या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी थंडी जेमतेम आठवडाभर टिकली. नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. डिसेंबर महिन्यातही हीच परिस्थिती राहिली. परिणामी, पालवी जून होण्यास विलंब झाला आणि फक्त १० ते १५ टक्के झाडांवर मोहोर दिसू लागला. त्यातच जानेवारी महिन्यात ‘थ्रिप्स’ या कीडरोगाने हल्ला चढवला. तातडीने धावपळ करून कीटकनाशकांच्या मदतीने तो थोपवून बागायतदार जरा स्वस्थ झाले तोच फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर उन्हाचा तडाखा बसला. त्याआधी पारा ३७ ते ४० अंश राहिला. या तडाख्याने आवळय़ाच्या आकाराहून थोडी मोठी झालेली कैरी गळून गेली, तर उन्हाच्या दिशेने असलेल्या मोठय़ा आकाराच्या फळाला चट्टे पडले. या उष्म्याचा पहिल्या टप्प्यातील उत्पादनाला फटका बसला. तयार झालेला आंबा काढण्यासाठी बागायतदारांकडून घाई सुरू झाली. कमी तयार झालेली फळंही बाजारात पाठवली जाऊ लागली. त्यामुळे वाशी बाजारात यंदा आंब्याचं तुलनेनं लवकर आगमन झालं. फेब्रुवारीच्या अखेरीस बऱ्यापैकी पेटय़ा वाशीमध्ये विक्रीला पाठवल्या गेल्या. गुढीपाडव्याच्या दिवशी सण म्हणून अनेकांना आंबा हवा असतो, हे लक्षात घेऊन कोकणातील बागायतदार त्या दृष्टीने आंबा बाजारात आणण्याचं नियोजन करू लागला आहे. त्यामुळे दरवर्षी या मुहूर्तावर सुमारे एक लाख पेटी आंबा वाशीच्या घाऊक बाजारपेठेत जातो. यंदा हा आकडा २१ हजारांवर अडकला. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात ३५ हजार पेटय़ांची नोंद झाली. यामध्ये रत्नागिरीतून चाळीस टक्के, तर उर्वरित सिंधुदुर्ग, रायगडमधील पेटय़ांचा समावेश आहे. चालू महिन्यात आवक घटणार असल्याचं चित्र आंब्याच्या बागांमध्ये दिसत आहे.
परकीय आक्रमण
एके काळी या हंगामात बाजारपेठेत हापूस आंब्याचं साम्राज्य असायचं. पण गेल्या १५-२० वर्षांत हे चित्र खूपच बदललं आहे. कोकणातल्या हापूसच्या जोडीला कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू या राज्यांमधून आंबा बाजारात येतो. त्यापाठोपाठ पुढल्या महिन्यात गुजरातमधला आंबा बाजारात येतो. या सर्व राज्यांमध्ये लागवडीचं प्रमाणही वाढलं आहे. चवीला हापूसच्या तोडीस नसलेला, पण गोड आणि दरवर्षी उत्पन्नाची हमी असलेल्या केशर आंब्याची हजारो एकरांत लागवड होत आहे. त्यामुळे कोकणच्या राजाला तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागत आहे.
पुरवठय़ाचं निसर्गचक्र
या फळाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यात ते एकाच वेळी सर्वत्र पिकत नाही. समुद्रकिनारी भागातील अनेक बागांमध्ये आंबा लवकर तयार होतो. त्या मानाने अंतर्गत म्हणजे समुद्रापासून दूर असलेल्या भागात त्याचे आगमन उशिरा होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध देवगडचा आंबा सर्वात आधी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच बाजारात दाखल होतो. त्यामुळे त्याचा हंगामही लवकर संपतो. ‘रत्नागिरी हापूस’ म्हणून जगप्रसिद्ध आंबासुद्धा जिल्ह्यात सर्वत्र पिकत नाही. जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर आणि दापोली-मंडणगड या तालुक्यांमध्ये या आंब्यासाठी अनुकूल जमीन आणि हवा आहे. देवगडनंतर राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी, पावस, जयगड, संगमेश्वर, मंडणगडमधील बाणकोट या परिसरातील आंबा तयार होऊ लागतो. जंगल भाग किंवा नदीकिनारी परिसरातील आंबा म्हणजेच संगमेश्वर, चिपळूणमधील आंबा साधारणत: एप्रिल-मे महिन्यात पिकतो. अशा प्रकारे आंब्याचा एकूण हंगाम सुमारे साडेतीन-चार महिने चालू राहतो.
कीटकनाशकांची मात्रा फोल..
फुलकिडा, तुडतुडा, बुरशीजन्य रोगांनी बागायतदार दरवर्षी त्रस्त होत आहेत. यामधून सावरण्यासाठी खते, औषधांच्या फवारण्या वाढतात. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते, पण उत्पादन घटतं. यंदा थ्रिप्स या रोगाने भंडावून सोडलं. विशेष म्हणजे, खास आंब्यावरील रोगांना आळा घालण्यासाठी औषधं जेमतेम दोन टक्के आहेत. बाकी इतर फळांसाठी वापरली जाणारी औषधं इथं वापरली जातात. म्हणून खास इथल्या हवामानात संशोधन करून आंब्याला लागू पडणारं औषध विकसित करण्याची गरज प्रसिद्ध बागायतदार राजेंद्र कदम यांनी व्यक्त केली.नाजूक प्रकृतीच्या या फळांना गेली काही वर्ष हवामानबदलाचे फटके सहन करावे लागत आहेत. त्यातच बागांची निगा स्वत: राखून आंबा पीक घेणं आणि विक्री करण्यापेक्षा अनेक बागायतदार व्यापाऱ्यांना विशिष्ट काळासाठी बाग भाडय़ाने देतात. कराराच्या कालावधीत जास्तीत जास्त पीक ओरबाडण्यासाठी संजीवके (कल्टार) आणि इतर खतांचा अतिरेकी मारा केला जातो. त्यामुळे अल्प काळात भरपूर उत्पादन, पण नंतर वठण्याचाही (नरम होण्याचा) धोका या फळांच्या नशिबी आला आहे. हवामान बदलाचं अरिष्ट टळण्याचीही नजीकच्या काळात शक्यता दिसत नाही. अशा परिस्थितीत ‘नगदी पीक’ हे बिरुद मिरवण्यासाठी किमान उत्पादन आणि दराची हमी, हे दोन्ही निकष हा राजा गमावून बसण्याची भीती आहे.
चार दशकांत प्रथमच..
रत्नागिरीचे प्रसिद्ध बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी यंदाचा हवामानाचा फटका जबरदस्त असून, गेल्या ४३ वर्षांच्या वाटचालीत इतकं कमी पीक प्रथमच पाहत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, एप्रिल महिन्यापुरतं बोलायचं तर दरवर्षी या महिन्यात माझ्या बागेत दररोज सरासरी हजार-बाराशे पेटी आंबा निघतो. वाईट परिस्थिती असेल तरी सात-आठशे पेटी होतो. यंदा काही वेळा ही संख्या २९ पर्यंत घसरली. अशी परिस्थिती आजतागायत कधी पाहिली नव्हती. आंब्याच्या हंगामात बागांची राखण आणि इतर कामांसाठी नेपाळमधून गुरखे आणण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून रूढ झाली आहे. हे गुरखे साधारणत: जून महिन्यापर्यंत इथं राहतात. पण एकूण बागांमध्ये चित्र पाहून काही प्रमुख बागायतदारांनी त्यांना आत्ताच नेपाळला परत पाठवणं सुरू केलं आहे.
भीती कोणती?
या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कोकण हापूसच्या १ लाख ९७ हजार ९५८ पेटय़ा, तर परराज्यांतील हापूसचे १ लाख २८ हजार ८५७ क्रेट (तिकडे आंब्याचे व्यवहार वजनावर होतात) मिळून ३ लाख २६ हजार ८१५ पेटय़ा दाखल झाल्या. पण त्यानंतर मात्र उत्पादन घटत चाललं आहे. आता पुढल्या महिन्यात काही प्रमाणात पुन्हा आंबा बाजारात उपलब्ध होईल. मात्र त्याचं प्रमाण दरवर्षीपेक्षा कमी राहण्याची भीती आहे.
जीआय मानांकन
भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळालेल्या उत्पादनांमध्ये नोंदणी करण्यात हापूसचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. डाळिंब पहिल्या, तर द्राक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत कोकणातील १ हजार ६२५ बागायतदार आणि प्रक्रियाधारकांनी हापूससाठी नोंदणी केली आहे. अशा प्रकारे अधिकृत मान्यतेमुळे दर चांगला मिळतो. म्हणून बागायतदार नोंदणीसाठी सकारात्मक आहेत.
बहराचा थोडा इतिहास..
हापूस आंब्याचा इतिहास अगदी पोर्तुगीजांशी जोडलेला असला तरी सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वीपर्यंत त्याची कोकणातही फार मोठय़ा प्रमाणात, व्यापारी तत्त्वावर लागवड नव्हती. १९९३-९४ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेअंतर्गत येथे फळबाग लागवड मोहीम हाती घेण्यात आली. तेव्हापासून या फळपिकाने अशी गती घेतली की, आजमितीला रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६७ हजार हेक्टर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ हजार हेक्टरवर आंबा लागवड झाली. जमीन आणि हवामानाच्या अनुकूलतेमुळे उत्पादनाचा आलेखही दरवर्षी उंचावू लागला आणि लवकरच कोकणातील पहिल्या क्रमांकाचे नगदी पीक, अशी ओळख निर्माण झाली.
यंदाचा बाजार उठला?
कोकणात पिकणाऱ्या आंब्यापैकी सुमारे ६०-७० टक्के आंबा व्यापारी- दलालांमार्फत विकला जातो. त्या दृष्टीने वाशीची घाऊक बाजारपेठ हा इथल्या बागायतदारांचा मुख्य आधार. या बाजारपेठेचे संचालक संजय पानसरे यांनी यंदाची परिस्थिती दीर्घकाळानंतर उद्भवली असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले की, यापूर्वी १९९७ मध्ये बाजारपेठेत आंब्याची आवक अशा प्रकारे कमी राहिली होती. सुमारे पंचवीस वर्षांनी यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात जवळजवळ हंगाम संपल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मे महिन्यामध्ये आंबा काही प्रमाणात उपलब्ध होईल, पण त्याचं प्रमाण किती असेल हे आत्ताच सांगता येणार नाही आणि त्यामुळे त्याच्या दराबाबतही अंदाज बांधता येणार नाही. अशा परिस्थितीत दर स्थिर ठेवण्यासाठी काही दिवसांपूर्वी वाशीतील दलाल आणि रत्नागिरीतील आंबा बागायतदार यांच्यात बैठक झाली. त्यानुसार पाच डझनच्या पेटीला तीनशे रुपये जास्त दर देण्यात आला. ही वाढ कमी असली तरीही यंदा प्रथमच असा बदल झाल्याचं बागायतदार सांगत आहेत. तसंच याचा फायदा देशातील इतर बाजारपेठांमध्येही मिळाला, असं पानसरे यांनी नमूद केलं.
करोना – एक इष्टापत्ती!
देशात दोन वर्ष धुमाकूळ घातलेली करोना महासाथ बागायतदार आणि ग्राहकांसाठीही इष्टापती ठरली आहे. आंब्याची सुमारे ७० टक्क्यांपेक्षा जास्त बाजारपेठ दलालांच्या हातात असते. करोनाकाळातील निर्बंधांमुळे वितरण व्यवस्थेतील हा घटक थोडय़ा प्रमाणात का होईना बाजूला गेल्यामुळे बागायतदार थेट ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे. गेली दोन वर्ष ही प्रणाली राबवून काही बागायतदारांनी स्वतंत्र विक्री यंत्रणा निर्माण केली आहे. त्याचा फायदा यंदाही झाला आहे. राज्य पणन मंडळाच्या पुढाकाराने मोठय़ा शहरांमध्ये निर्माण केली जात असलेली थेट विक्री यंत्रणा किंवा ‘आंबा महोत्सव’ही त्याला साथ देत आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांमध्ये हापूस प्रथमच जास्त प्रमाणात पोहचू लागला आहे आणि तेथील व्यापारीही थेट शेतकऱ्याच्या दारात येऊ लागले आहेत.
राज्य कृषी पणन मंडळाने गेल्या
१ एप्रिलपासून पुण्यात मार्केट यार्डमध्ये ‘आंबा महोत्सव’ सुरू केला आहे. येत्या २१ ते २८ एप्रिल या कालावधीत मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणात आणि १ ते ११ मे या कालावधीत ठाण्यामध्ये संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे गावदेवी मैदानात ‘आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त राज्यात आठ निर्यात सुविधा केंद्रे उभारली आहेत. अमेरिका, न्यूझीलंड, जपान, दक्षिण कोरिया, इंग्लंड इत्यादी देशांमध्ये हापूसला मागणी असून संबंधित देशांच्या नियमांनुसार प्रक्रिया करून आंबा पाठवण्याची यंत्रणा फक्त महाराष्ट्रात आहे.