नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत असे दोन भाग आपण आपल्या मनामध्ये ठरवून टाकलेले आहेत. सुगम संगीत हे कुठल्याही अर्थाने सुगम नसतं हे मी पूर्ण अनुभवाने सांगू शकतो. ज्याला आपण सुगम संगीत म्हणतो त्यातसुद्धा एक अतिशय मूलगामी असं शास्त्र आहे. आणि ज्याला आपण शास्त्रीय संगीत म्हणतो तेसुद्धा सुगम असलं तर लोकप्रिय होण्यास मदत होते, हे आपण वारंवार पाहिलं आहे. ढोबळमानाने आपण एवढंच म्हणू शकतो की, जे संगीत ऐकायला किंवा conceive अथवा ग्रहण करायला सोपं ते सुगम संगीत. आणि जे ऐकण्याकरता आणि पुरेपूर आनंद लुटण्याकरता ज्यातली थोडीशी माहिती असणं आवश्यक असतं, किंवा काही मूळ रागांची वा तालांची निदान तोंडओळख तरी झालेली असणं आवश्यक असतं, ते शास्त्रीय संगीत! अर्थात ही व्याख्यासुद्धा ज्यांना आपण सर्वसामान्य रसिकजन म्हणतो त्यांच्यासाठीच आहे. कारण सुगम संगीताचासुद्धा आस्वाद घ्यायचा असेल तर पाश्चात्त्य हार्मनी chords आणि जगभरातील विविध वाद्यांचा अभ्यास असेल तर अर्थातच तुम्हाला त्याचा जास्त आनंद लुटता येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर शास्त्रीय काय किंवा सुगम काय, दोन्हीत एक व्यापक शास्त्र असतं. फक्त सुगम संगीत ऐकणारे रसिक हे त्यामानाने फार अभ्यासू नसले तरीही आनंद घेऊ शकतात; पण शास्त्रीय संगीताचे खरे रसिक होण्याकरता मात्र तुमचा थोडा अभ्यास असेल तर फायदा होतो.

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
phulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar birthday Celebration photos
‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला वाढदिवस, फोटो शेअर करत म्हणाली…
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
India 2025 astrology predictions in Marathi
India 2025 Astrology Predictions: सोन्या-चांदीचा वाढत राहणार भाव; भारतासाठी २०२५ हे वर्ष कसे असणार? वाचा ज्योतिषाचार्य उल्हास गुप्तेंचा अंदाज

हाच नियम थोडय़ाफार फरकाने शास्त्रीय गायकांना आणि सुगम गायकांनाही लागू आहे. त्यामुळे असं लक्षात येतं की, शास्त्रीय मैफली गाजवणारे गायक हे सुगम संगीतात किंवा चित्रपट संगीतात त्यामानाने कमी रमतात. आणि सुगम संगीत गाणारे कलाकार हे शास्त्रीय संगीत नीट गाऊ शकत नाहीत. जेव्हा आपण मराठी संगीताचा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की, शास्त्रीय मैफली गाजवणारे अनेक गायक-गायिका कधी कधी चित्रपट संगीतात किंवा नाटय़संगीतात मुशाफिरी करताना दिसतात; पण त्यांचं शास्त्रीयपण लपत नाही. अलीकडच्या काळात नावाजलेले काही सुगम गायक-गायिका शास्त्रीय संगीताच्या मैफली करतानाही आपल्याला दिसून येतात; परंतु तिथेही काहीतरी गडबडच होते. आपला मूळ गाभा सोडून दुसऱ्या प्रकारचं गाण्याकरता जी unlearning ची प्रक्रिया होणं आवश्यक आहे, ती बऱ्याच गायकांच्या बाबतीत होत नाही आणि मग इकडची बलस्थानं दुसरीकडे मात्र दोष म्हणून बाहेर येतात. याच कारणाने दोन्ही प्रकारांवर आपली छाप पाडणारे खूप कमी- म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कलाकार आपल्याला दिसतात. आणि त्या सर्व कलाकारांमध्ये सगळ्यात मोठं नाव जर कुणाचं असेल, तर ते आहे माणिक वर्मा यांचं!

माणिकबाईंची प्रथम तालीम हिराबाई बडोदेकर आणि सुरेशबाबू माने यांच्याकडे झाली. हे दोन्ही गायक किराणा घराण्याचे फार मातब्बर गायक होते. त्याचबरोबर हिराबाई या मराठी संगीत नाटकांमध्येसुद्धा आघाडीच्या नायिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यामुळे असेल कदाचित, पण गाण्यांमध्ये भाव कसा आणायचा, ही तालीम त्यांना हिराबाईंकडे मिळाली असण्याची शक्यता आहे. पुढे जाऊन माणिकबाईंनी अनेक नाटय़गीतांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. आश्चर्याची गोष्ट ही की, माणिकबाईंनी स्वत: कधी नाटकात काम केलं असल्याचं फारसं दिसत नाही; पण तरीसुद्धा इतर शास्त्रीय गायक मैफलीमध्ये ज्या पद्धतीने नाटय़गीतं गातात त्याच्यापेक्षा माणिकबाईंची नाटय़गीतांची मांडणी ही खूप भिन्न वाटते. शास्त्रीय संगीतातली तयारी दाखवण्याची नाटय़गीत ही जागा नव्हे, हे माणिकबाईंनी पुरेपूर ओळखलं होतं. पुढे जाऊन माणिकबाईंनी आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडेसुद्धा तालीम घेतली; परंतु आग्रा घराण्यातल्या गायक-गायिकांकडे असलेली तालावरची हुकमत त्या इथे दाखवत नाहीत. ‘करीन यदुमनी सदना’, ‘नाथ हा माझा’, ‘अनृतचि गोपाला’ आणि ‘स्वकुल तारक सुता’सारखी अनेक नाटय़गीतं त्यामुळे खास माणिकबाईंची म्हणून ओळखली जातात. अत्यंत कसलेल्या शास्त्रीय गायिका असूनसुद्धा माणिकबाईंची नाटय़गीतं ही अतिशय भावपूर्ण वाटतात आणि या भावपूर्णतेतच त्यांचं सुगम संगीतातलं यश दडलेलं आहे.

१९५५ साली मराठी संगीतात आकाशवाणीद्वारे एक मोठा चमत्कार घडला.. ‘गीतरामायण’! दर आठवडय़ाला एक अशी ५६ गाणी त्या वर्षी प्रसिद्ध झाली आणि मराठी रसिकांनी ‘गीतरामायण’ डोक्यावर घेतलं. रामाइतकीच भक्ती त्यांनी ‘गीतरामायणा’वर केली. बाबूजींनी ‘गीतरामायणा’त अनेक गायक आणि गायिका यांची योजना केली होती; परंतु सीतेची गाणी गाण्याकरता त्यांच्या नजरेसमोर एकच नाव होतं, ते म्हणजे माणिक वर्मा. ‘निरोप कसला माझा घेता’ या गाण्यातील रामाकडे केलेली विनवणी, ‘मज आणुनि द्या तो हरीण अयोध्यानाथा’मध्ये केलेला लाडिक हट्ट आणि आणि ‘मज सांग अवस्था दूता रघुनाथांची’मध्ये हनुमानाकडे केलेली रामाची भीतीयुक्त चौकशी या विविध भावच्छटा प्रकट करणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती. त्यातही ‘गीतरामायणा’तील सीता ही अतिशय सोज्वळ, साधी, पतीच्या सुखातच आपलं सुख मानणारी पतिव्रता स्त्री आणि यात सीतेच्या तोंडी असलेली गाणी मात्र प्रचंड अवघड! शास्त्रीय संगीताची उत्तम तालीम असल्यामुळे फिरणारा गळा आणि त्याबरोबरच मुळातच असलेला एक सहज सालसपणा व कुठलाही अभिनिवेश नसलेला साधेपणा हे combination असलेली एकच गायिका त्यावेळी बाबूजींना जाणवली.. आणि माणिकबाईंचं नाव निश्चित झालं.

हाच साधेपणा माणिकबाईंच्या जवळपास सर्वच गाण्यांमध्ये दिसतो. आणि नुसतंच गाण्यांमध्ये नाही, तर त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिका ऐकल्या तरीसुद्धा हाच साधेपणा त्यात जाणवतो. रसिकांनी किंवा वाचकांनी या साधेपणाला सोपेपणाचं लेबल लावण्याची महान चूक कधीही करता कामा नये. या साधेपणात सोपेपणा नाही. उलट, हा साधेपणा प्रचंड अवघड आहे. हा साधेपणा तसाच अबाधित राखून प्रेक्षकांना अडीच-तीन तास आपल्या मैफलीत बांधून ठेवणं हे अतिशय कठीण काम यात काहीही संशय नाही. विविध चमत्कृतीपूर्ण ताना, पलटे, तारपंचमावर जाऊन टाळ्या मिळेपर्यंत केलेला ठहराव या सर्व गोष्टी माणिकबाईंनी पूर्णपणे टाळलेल्या दिसतात. सूरही काळी चारचा फार चढा नाही. सोज्वळपणा आणि संयमित रागमांडणी हीच माणिकबाईंच्या गायनाची वैशिष्टय़ं! शास्त्रीय संगीताच्या सर्व नियमांना कुठंही धक्का लागू न देता आणि तरीही भावसंगीताच्या अनुभवाची त्यात केलेली सुंदर पेरणी हेच माणिकबाईंच्या गायनाचं खरं वैशिष्टय़. ही तारेवरची कसरत त्यानंतर इतर कोणालाही जमल्यासारखी वाटत नाही.. निदान मला तरी.

‘गीतरामायणा’बरोबरच माणिकबाईंनी बाबूजींकडे इतर अनेक चित्रपटगीतं व भावगीतंही गायली. ‘सावळाच रंग तुझा’ व ‘घननिळा लडिवाळा’सारखी भावगीतं ही आपण कधीही विसरू शकत नाही. ‘सावळाच रंग तुझा’ या गाण्यातला मराठमोळा साधेपणा आणि त्याचबरोबर येणाऱ्या उत्तर हिंदुस्थानी उपशास्त्रीय ढंगाच्या अतिशय अवघड हरकती या दोन गोष्टींचा मिलाफ माणिकबाईंच्या अनेक गाण्यांमध्ये आपल्याला दिसतो. पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं ‘हसले मनी चांदणे’ किंवा मधुकर गोळवलकर यांचं ‘त्या चित्तचोरटय़ाला’ हे गाणंसुद्धा तुम्ही नीट ऐका. या गाण्यांमध्ये मराठी शब्द काढून उर्दू किंवा हिंदी शब्द घातले तर ते इतके चपखलपणे तिथे बसतील, की कोणाला कळणारही नाही की हे मूळ मराठी गाणं आहे! बाबूजींबरोबरच दशरथ पुजारी यांच्याकडे माणिकबाईंनी फार अप्रतिम गाणी गायली. ‘क्षणभर उघड नयन देवा’, ‘रंगरेखा घेऊनी मी’, ‘नका विचारू देव कसा’ आणि ‘अभंग माझा एकतारीवर’सारखी दशरथ पुजारी यांनी रचलेली गाणी ऐकली की सारखं जाणवतं की, या जोडीची अजून बरीच गाणी आपल्याला ऐकायला मिळायला हवी होती. माझ्या मते या जोडीचं सगळ्यात अप्रतिम गाणं म्हणजे ‘त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग’! जोग रागाच्या अंगाने जाणारा मुखडा शेवटी शुद्ध रिषभरावर येऊन स्थिरावतो, तो या गाण्यातला सगळ्यात आनंद देणारा क्षण असतो. प्रत्येक अंतरानंतर ती रिषभावर येणारी जागा कधी येते याची वाट बघत बसतो आपण. ‘क्षणभर उघड नयन देवा’मध्येसुद्धा पूरिया कल्याण या थाटात गुंफलेले स्वर आपल्याला अतिशय अंतर्मुख करतात. धृवपद संपताना ‘देवा’ या शब्दावर घेतलेली अप्रतिम हरकत जेव्हा मुखडय़ावर स्थिरावते त्यावेळेस एक परिपूर्ण चाल ऐकल्याचा अनुभव मिळतो. पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर माणिकबाईंनी ‘कबीराचे विणतो शेले’ हे अप्रतिम भक्तिगीत रसिकांना अर्पण केलं, जे आपण कधीही ऐकलं तरीही शांतपणाचा प्रसन्न अनुभव देऊन जातं. याचबरोबर बाळासाहेब माटे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली माणिकबाईंनी ‘अमृताची गोडी तुझ्या भजनात’, ‘माळ पदक विठ्ठल’आणि ‘विजयपताका श्रीरामाची’सारखी अप्रतिम भक्तिगीतं आपल्यासमोर उलगडली. परंतु ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ या गाण्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली, तेवढी इतर कुठल्याही अभंगाला मिळाली नाही. प्रसिद्ध दाक्षिणात्य शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांनासुद्धा या चालीची भुरळ पडली आणि त्यांनी कानडी भाषेमध्ये हे भजन गायलं याचा उल्लेख मिळतो. व्ही. डी. अंभईकर यांनी स्वरबद्ध केलेलं ‘रामचंद्र मनमोहन’, बाळ कोल्हटकर यांच्या नाटकातील ‘निघाले आज तिकडच्या घरी’ आणि ‘आली दिवाळी दिवाळी’, तसंच श्रीनिवास खळे यांचं ‘एकतारी गाते’, वसंत पवार यांची ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा’ ही गझल, दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं ‘अंगणी गुलमोहर फुलला’ हे भावगीत, प्रभाकर जोग यांचं ‘आळविते मी तुला’, विठ्ठल शिंदे यांचं ‘इथेच आणि या बांधावर’ आणि राम फाटक यांचं ‘घडी घडी घडी चरण तुझे’ या गाण्यांचा उल्लेख झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.

त्याकाळच्या इतर गायिकांपेक्षा माणिकबाईंचा आवाज बराच वेगळा होता. तसं म्हटलं तर त्यांचा आवाज थोडासा बसका होता. थोडासा अनुनासिक होता. आणि प्रथमदर्शनी ऐकताना असं वाटायचं की, त्यांचा आवाज कदाचित फार फिरत नसावा. असं वाटायचं, एक जडपणा आहे त्यांच्या आवाजात. आणि मग त्याच गाण्यामध्ये माणिकबाई अशी एखादी अत्यंत जलद आणि चपळ अशी तान किंवा हरकत घेऊन आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात. उदाहरणार्थ- ‘इथेच आणि या बांधावर’ या गाण्यात ‘सख्या रे’ या शब्दावर त्यांनी अशी काही हरकत घेतली आहे की आपल्याला एकदम आश्चर्याचा सुखद धक्काच बसतो. आणि ते झाल्यानंतर परत अत्यंत साधेपणानं पुढचं गाणं सुरू होतं. काही काही गाणी अशी आहेत, की जिथे माणिकबाईंनी आपला आवाज जाणीवपूर्वक थोडासा बदलल्याचं कळतं. जसं एक चित्रपटगीत आहे- ‘कुई कुई चाक बोलतंय’  किंवा ‘जाळीमंदी पिकली करवंदं’सारख्या लोकगीतामध्ये किंवा लावणीमध्ये त्यांचा आवाज एकदमच वेगळा ऐकू येतो आणि उच्चारसुद्धा जाणीवपूर्वक वेगळे केले आहेत असं कळतं.

माणिकबाई ज्या काळात कार्यरत होत्या त्याकाळी सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत ही दोन वेगवेगळी क्षेत्रं होती. आणि त्यामानाने कलाकारांत कर्मठपणाही जास्त होता. एका वेळेस एकच गोष्ट धरायची आणि ती पूर्ण करायची असा सर्वसाधारण नियम होता. अशा वेळेस शास्त्रीय संगीताच्या मैफली आणि चित्रपट संगीतातील तीन-चार मिनिटांची गाणी या दोन्हीमध्ये प्रचंड कर्तृत्व गाजवून माणिकबाईंनी स्वत:चं स्थान निर्माण केलं. आज त्यामानाने सर्व जगातील संगीत आपल्याकरता खुलं आहे. एकाच वेळेस सर्व प्रकारची गाणी गाऊन दाखवण्याची मुभा आहे. पण तरीही Jack of all trades and master of none असं बऱ्याच ठिकाणी दिसतं. अर्थातच याला काही महान अपवाद आहेत. पण या सगळ्या अपवादांमध्ये सगळ्यात पहिलं नाव एकच आहे आणि सगळ्यात मानाचं स्थान एकाच व्यक्तीकडे जातं..

नि:संशय माणिक वर्मा!

Story img Loader