राग हा आपल्या मानसिक शत्रूंमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. रागापासून मुक्ती मिळावी अशी सर्वाचीच इच्छा असते, पण तसे होत नाही. शरीर व मनाला हानी पोहोचवणाऱ्या या रागाचे काय करावे? मनात ठेवावा की ताबडतोब व्यक्त करावा, हा प्रश्न आपल्याला सतत भेडसावत असतो. परंतु राग येण्याची नेमकी कारणे, त्याचे दुष्परिणाम तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या रागाला आपण कसे कवटाळतो, हे पाहणे आवश्यक आहे.
रागावर नियंत्रण ठेवायचे तर आधी आपल्याला ही भावना समजून घ्यावी लागेल. राग ही वस्तुस्थिती वा कल्पनेतील दहशतीला दिलेली त्वरित प्रतिक्रिया आहे. या प्रतिक्रियेची कारणे वेगवेगळी असू शकतात. आपली गरज वा इच्छेच्या वाटेत अडथळा आल्यास, आपली प्रतिमा व स्वत्वावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास, कमी लेखल्यास, आपले म्हणणे मान्य न झाल्यास किंवा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास राग येतो. मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यासही आपण रागावतो. बऱ्याचदा वडय़ाचे तेल वांग्यावर निघते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा राग आपण ज्याचा त्याच्याशी काही संबंध नाही अशांवर काढतो. दुखावलेल्या, अपमानित व्यक्तींचा राग हा सोबतीच असतो. तसेच नैराश्य, विफलता व दुखापतीचा प्रतिकार म्हणूनही राग येतो. ही विफलता शारीरिक कारणांमुळे, न्यूनगंड, आपला चुकीचा निर्णय, इतरांची वागणूक किंवा सामाजिक अन्यायामुळेही निर्माण होते.
रागाची पातळी हलकीशी कुरबूर, चीडचीड ते संतापापर्यंत असू शकते. रागाच्या पातळीवर कायदे, सामाजिक-सांस्कृतिक नियम व आपली विवेकबुद्धी यांचा पगडा दिसून येतो. रागीट व्यक्तींना आपण बलशाली व इतरांवर नियंत्रण राखून असल्याचा अनुभव येतो. अन्यायाविरुद्धच्या चळवळींचा विचार केल्यास हा राग सकारात्मक म्हणता येईल. परंतु नातेसंबंधांत रागाने वागणे इतरांसाठी अन्यायकारक ठरते. केवळ काही वेळाच (उदा. स्पर्धेत) राग कृती करण्यास तसेच तिची गती व तीव्रता वाढवण्यास उपयुक्त ठरत असला, तरी अवाजवी राग निषेधार्हच. कारण तो बऱ्याचदा शोषण, दहशत व आक्रमकतेचा स्रोत बनू शकतो. यामुळे रागावणाऱ्या आणि राग झेलणाऱ्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होऊ शकतो. रागावलेला माणूस आधी कृती आणि नंतर विचार करतो. रागाच्या भरात आपण बऱ्याच गोष्टी बोलून जातो. त्यात काही रागाशी संबंधित, तर काही त्याव्यतिरिक्त असतात. नंतर ते शब्द आपल्याला मागे घेणे कठीण होते. दहशतीला तोंड द्यायला, स्वत:चे संरक्षण करण्यासाठी वा लढय़ासाठी आलेला राग ही नैसर्गिक व निकडीची गोष्ट होय. पण आप्तेष्ट व आजूबाजूच्यांवर विनाकारण राग काढणे अयोग्यच.
राग आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्षणांवरून ओळखू शकतो. एखाद्याचे वर्तन, देहबोली, त्या व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा न बोलण्यातूनही रागाची लक्षणे ध्यानी येतात. काहींना राग येतो तेव्हा ते आक्रमक होतात. मारहाण, आदळआपट करतात. टीका, उपहास, सतत दुसऱ्यांच्या चुका दाखवून घालूनपाडून बोलणे, नावे ठेवणे, दुसऱ्याच्या सद्हेतूबद्दल अविश्वास दाखवणे, समोरची व्यक्ती कशी मूल्यशून्य आहे हे ठासून सांगणे, सूडाची भावना बाळगणे, बोलणे टाकणे, अपमान व मानहानी करणे, चहाडय़ा करणे, समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात त्रासदायक स्थिती निर्माण होईल असे मुद्दाम वागणे, शिवीगाळ करणे, सतत शंका व संशय घेणे, दुसऱ्यांना दोष देणे, असहकार करणे, अहंभावाला इजा पोहोचवल्याचा अनुभव येणे, सहानुभूतीपर न वागणे, समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, ही भावना बाळगून दुसऱ्याला कमी लेखणे.. अशा प्रकारची वर्तणूक राग आल्यावर घडते. सक्रिय वा सुप्त आक्रमकता म्हणजे मनात राग असल्याची खूण मानता येईल. याबरोबरच कोषात जाणे, संवाद टाळणे, चिंता व काळजी करणे, रडणे, अस्वस्थ वाटणे हीसुद्धा रागाची लक्षणे असू शकतात. काही प्रसंगी रक्तदाबाचा त्रास, हृदयविकार, काही अंशी मनोविकार, कोलेस्ट्रोलचे वाढते प्रमाण याही गोष्टी त्यामागे असू शकतात. व्यसनाधीनता तसेच मूल्यांप्रती तिरस्काराची भावनाही त्यातून निर्माण होऊ शकते. रागाची कारणे तसेच त्याच्या परिणामांचा प्रभाव दैनंदिन जीवन, नोकरी-व्यवसाय, नातेसंबंधांवर पडत असतो. राग भयंकर रूप धारण करताच भीतीदायक बनतो. म्हणून तो शक्यतो टाळला जातो. अशावेळी व्यक्ती राग लपवण्यासाठी, आपली प्रतिमा डागाळली जाऊ नये म्हणून राग गिळते किंवा काही घडलेच नाही असे दाखवते. पण बऱ्याचदा आपण शोषित असल्याची भावना मनी येऊन इतरांवर करत असलेली चिडचिड योग्यच वाटू लागते आणि इतरांनीही ती मान्य करावी अशी आपली अपेक्षा असते.
राग ही नकारात्मक भावना आहे. रागाला आनुवंशिकता व ग्रंथीरसांची पाश्र्वभूमी आहे. बालपणापासूनचे निरीक्षण व अनुभवांतून राग निर्माण होत असतो. त्यामुळे रागाचे नियोजन करण्याची गरज असते. काहीतरी बिनसले की आपल्याला राग येतो. हे ‘काहीतरी’ शोधून काढण्याचा प्रयत्न करायला हवा. रागाचा हा स्रोत सापडला की त्याचे निराकरण करणे सोपे जाते. यासाठी कोणत्या घटकांमुळे ही नकारात्मक भावना निर्माण झाली याचा आधी शोध घ्यावा. त्यात कुटुंब, वैवाहिक नाते, मुलेबाळे, नोकरी-व्यवसाय तसेच स्वत:चाही समावेश असू शकतो. हा शोध घेतल्यास रागावर काबू मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, हे कळेल. रागात आपल्या शारीरिक व मानसिक स्थितीत विशिष्ट बदल होतात. काहींना हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढलेला जाणवतो, काहींना घाम फुटतो, तर काहींना रडू येते. या खुणांकडे लक्ष दिल्यास आपणास जाणवेल, की आपण रागावलो आहोत. या खुणा ओळखणे म्हणूनच महत्त्वाचे. रागामुळे आपण स्वत:वरील नियंत्रण गमावून बसतो. नियंत्रण गमावले की शब्दांतून तसेच वर्तनातून रागाचा स्फोट होतो. ही पुढची क्रिया टाळण्यासाठी रागाच्या पहिल्या ठिणगीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशावेळी ‘थांबा, वेळ घ्या, विचार करा’ ही पद्धती उपयुक्त ठरते. काहींना हे ठरवणे सोपे; परंतु कृतीत आणणे कठीण वाटेल. त्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. न टाळता, न विसरता, न कंटाळता हा उपाय करावा. रागाच्या क्षणावर विजय मिळवणे म्हणजे तात्त्विक विचार करण्याचा मार्ग खुला करून प्रतिक्रियेसाठी वेळ मागून घेणे होय. राग आल्यावर मनात येईल ते बोलून टाकून नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा हा विलंब बरा. रागात शिथिलता अनुभवण्यासाठी दीर्घ व सजग श्वसन करावे, ऊर्जेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा. योगाचा आधार घ्यावा. संगीताची साथ घ्यावी. या सर्वाच्या साहाय्याने आपले सुरुवातीचे उत्तेजन व संतापाच्या स्थितीवर नियंत्रण आणण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. असे केल्यास रागामुळे हाताबाहेर जाण्याची शक्यता असलेल्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. हास्यविनोदही संताप सौम्य करण्यास उपयुक्त ठरू शकतो. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी व्हायला हवी, ही अपेक्षा अवाजवी आहे व असे नेहमी घडणेही कठीण. कोणतेही मतभेद हे भांडणापेक्षा सलोख्याने सोडवण्याचे ध्येय व जिद्द बाळगल्यास दोन्ही व्यक्ती त्यातून बोध घेऊ शकतात. आता या क्षणी रागावल्यास मी काय काय गमावणार आहे, तसेच माझ्या संतापाने एखाद्या समस्येचे निवारण होणार आहे का, याचा आढावा घेणेही गरजेचे असते. पूर्वी रागाचे कोणते दुष्परिणाम आपण भोगले आहेत याची स्वत:ला आठवण करून द्यावी. समोरच्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रहाने तिचा राग करणे टाळावे. आपल्या भूमिकेची जबाबदारी आपलीच आहे हे स्वत:ला समजवावे, म्हणजे इतरांना कमी दोष दिला जाईल. आपले म्हणणे स्वत:च्या व इतरांच्या गरजांचा व भूमिकेचा मान राखून मांडावे.
बऱ्याचदा आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये बदल करणे उपयुक्त ठरते. उदा. बऱ्याचदा संध्याकाळी वा रात्री दिवसभराच्या दगदगीमुळे आपण थकलेलो असतो. थकल्यामुळेही चिडचिड होऊ शकते. त्यामुळे अशावेळी वाद होतील असे विषय टाळणे किंवा त्यांची चर्चा पुढे ढकलता येत असल्यास तसे करावे.
हे सर्व करत असतानाही आपल्या लक्षात येईल की राग पूर्णपणे नाहीसा होणे अवघडच. स्वत:वर व परिस्थितीवर कितीही नियंत्रण ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरीही कधीतरी भडका उडणारच. पण योग्य तिथे, योग्य तेव्हा, योग्य तितका, योग्य कारणावरून आणि योग्य पद्धतीने व्यक्त केलेला राग उचित ठरतो. राग नियंत्रणात ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आहार, झोपेच्या वेळा व तिचे प्रमाण याकडेही लक्ष द्यावे. कारण या गोष्टींचाही राग शांत ठेवण्यास हातभार लागत असतो. आपला किंवा जवळच्या व्यक्तीचा राग विकाराच्या दिशेने जाताना दिसल्यास दिरंगाई न करता मानसिक आरोग्यतज्ज्ञाची मदत घ्यावी. त्यामुळे वेळीच योग्य ती मदत मिळेल व आपले मानसिक, शारीरिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य नीट जोपासता येईल आणि सुरक्षितही ठेवता येईल.
केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा