‘ज्येष्ठांचा आदर करावा’ ही शिकवण आपली संस्कृती आपल्याला देते. परंतु वयाबरोबर आलेल्या ज्येष्ठत्वाइतकेच त्यासह आलेले (किंबहुना, येणे अपेक्षित असलेले) श्रेष्ठत्व, प्रौढत्वही तितकेच महत्त्वाचे नाही का? संशोधनाच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्याची, त्यांचे आयुष्य, त्यांचे दृष्टिकोन, त्यांच्या कल्पना, संकल्पना, धारणा, विचारधारा समजून घेण्याची संधी मला मिळाली. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. ज्येष्ठांबरोबर अनेक चर्चा रंगल्या. त्यातील एक मजेदार गोष्ट म्हणजे यातल्या काही ज्येष्ठांचा आपण ‘ऐंशी वर्षांचे वृद्ध’ नव्हे, तर ‘ऐंशी वर्षांचे तरुण’ असल्याचे सांगण्याचा अट्टहास. या आग्रही भूमिकेचे मूळ हल्लीच्या ‘तरुण’ दिसण्याची सक्ती करणाऱ्या ‘anti-aging products’च्या (उदा. विविध प्रकारच्या क्रीम्स) जाहिरातींत दडलेले आहे असे वाटते. तारुण्याला प्रमाणाबाहेर महत्त्व देण्याने एकेकाळी सकारात्मक मानल्या जाणाऱ्या वार्धक्याला आज ‘तारुण्या’च्या अट्टहासाने झाकोळून टाकल्यासारखे वाटते. मुळात kanti-aging’ या शब्दातच वार्धक्याबद्दलची अनास्था दडलेली आहे. आणि अशी धारणा- ज्याला ‘ageism’ असे म्हणतात ती- आपल्यातील बऱ्याच लोकांच्या मनात व वर्तनात आढळते. ‘Ageism’ मध्ये म्हातारपण आणि त्यात ओघाने येणाऱ्या म्हाताऱ्या व्यक्तीबद्दलची चीड, अनास्था, तिटकारा, बेबनाव आणि तत्सम अगणित नकारात्मक भावना व वर्तनाचा अंतर्भाव होतो. ज्येष्ठत्वाबद्दल आपल्या काही ठोस भूमिका असतात. आपली जडणघडण, स्वानुभव, निरीक्षणे यांतून या भूमिका आकार घेत असतात. अशा भूमिकांचा अनुभव आम्हाला एकदा  आला.

झाले असे की, मी माझ्या आजीबरोबर मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तिसऱ्या रांगेतून पॉपकॉर्न खात एका हिंदी चित्रपटाचा ‘फर्स्ट डे- फर्स्ट शो’ पाहिला. आमच्या ओळखीतल्या लोकांना  ही ‘बातमी’ समजल्यावर त्यावर त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आमच्या कानावर पडल्या. काहींचा यावर विश्वासच बसला नाही. काहींना याचे आश्चर्य वाटले. तर  काहींनी चक्क टीकाही केली. परंतु लोकांच्या या मतांचा आमच्यावर फार काही परिणाम झाला नाही. त्यानंतरही आम्ही अनेक चित्रपट पाहिले, मॉल्समध्ये फिरलो, वगैरे. पण लोकांच्या या अशा विचारसरणीने निश्चितच विचार करण्यास प्रवृत्त केले.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

अशी विचारसरणी असण्यामागे काही कारणं आहेत. बऱ्याच लोकांच्या मते, वृद्ध व्यक्ती म्हणजे हातात जपाची माळ वा काठी घेतलेली, आरामखुर्चीत गतजीवनाबद्दल शोक करत बसणारी, कपडालत्त्यापेक्षा औषधांनी कपाटाचे खण भरलेली,  लाचार, असहाय, परावलंबी, शारीरिक व्याधी-आजारांनी ग्रासलेली आणि ‘आता मरण यावं’ या प्रतीक्षेत असणारी, मौजमजेपासून पूर्णपणे अलिप्त राहणारी व्यक्ती. इतकेच नाही, तर आपल्यापैकी अनेकांच्या वृद्धत्वाबद्दल आणि वृद्ध व्यक्तीच्या वागण्याबद्दल काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून काही कडक नियमही आखले जातात. यातली शोकांतिका अशी, की या लोकांचे हे नियम इतर वृद्धांसाठीच असतात. परंतु स्वत: मात्र तो उंबरठा ओलांडताच या अपेक्षांचा डोलारा एकदम गळून पडतो. असो!

अशा लोकांची काही ठाम मते ऐकली की अचंबा आणि वाईटही वाटते. त्यांच्या मते, वृद्धत्व येताच माणसाने अलिप्त राहावं, छंद, मौजमजा करू नये, नियमित औषधे घेऊन तब्येतीची निगा राखावी, आहार कमी करावा, कौटुंबिक उलाढालींमध्ये लुडबुड करू नये. आपले सल्ले मुळात देऊ नये. अन् दिलेच, तर ते लादू नयेत. इतकेच नव्हे, तर नव्या तंत्रज्ञानाबद्दल त्यांनी कुतूहल बाळगू नये. (कारण त्यांना त्याची उपयुक्तता ती काय!) तक्रारी करू नयेत. गतायुष्याचे वर्णन करत बसू नये. ‘आमच्या वेळी असं होतं वा नव्हतं’ या पालुपदातून बाहेर पडावं. बेचव भाजी गोड मानून घ्यावी. मुलं-नातवंडांकडून अवाजवी अपेक्षा करू नयेत. वेळेवर इच्छापत्र तयार करून मालमत्तेची योग्य ती वाटणी करावी. तसेच मुलं परदेशात असली, किंवा इथे असूनही संबंध ठेवून नसली तर त्यांनी वृद्धाश्रमाचा आधार घ्यायलाही हरकत नसावी. या व अशा अनेक ‘to- do lists’ या तथाकथित चिरतरुण लोकांच्या अगदी जिभेवर असतात. वृद्ध व्यक्ती दिसताच ही सूची आणि आपल्या या धारणा आकाशवाणीसारख्या उच्चारल्या जातात. ही विचारधारा घातक आणि वृद्धांना शोषणास सामोरे जायला भाग पाडणारी आहे. दुर्दैवाने असे विचार बाळगणारे लोक आपल्या आजूबाजूस वावरत असतात याची खंत वाटते.

ज्येष्ठत्वासंबंधी सामाजिक शास्त्रांनी अनेक सिद्धान्त समोर आणले आहेत.. कल्पिलेले आहेत. (इथे त्या सर्वाचा उल्लेख करणे अशक्य आहे.  ‘वृद्धत्व’ हा एक सखोल विषय आहे. इथे त्यातील काही निरीक्षणं उद्धृत करीत आहे.) संशोधनात्मक निरीक्षणांतून हे सिद्धान्त- म्हणजेच ‘Theories of Aging’- उदयास आले आहेत. त्यातील मानसशास्त्रीय सिद्धान्त हे खास महत्त्वाचे आहेत. यात सर्वात प्रथम ‘Disengagement Theory’चा विचार झाला. या सिद्धान्तानुसार, वृद्ध माणसाने वृद्धत्व आल्यावर सर्व पाश तोडून स्वत:ला अलिप्त ठेवावं असं कल्पिलं गेलं. कालांतराने यावर टीका झाली आणि ‘Activity Theory’, ‘Continuity Theory’ यांसारख्या संकल्पना व सिद्धान्त पुढे येऊ लागले. या सिद्धान्तांचा वृद्धांनी निष्क्रिय, विरक्त भूमिका घेण्याला विरोध होता. याउलट, वृद्धांनी सक्रिय व्हावं, आपला दिनक्रम, आवडीनिवडी, छंद जपावेत, ते सुरू ठेवावेत यावर भर होता. याला जोड म्हणून ‘Selective Optimisation and Compensation’ हा सिद्धान्त उदयास आला. त्यानुसार वृद्धत्वामुळे किंवा वृद्धत्वाबरोबर येणाऱ्या बदलांचा स्वीकार करून, आपल्या क्षमतांचा आढावा घेऊन ज्यात नैपुण्य अजूनही स्पष्ट दिसतं अशा क्षमता आणखी विकसित कराव्यात आणि आपल्यातील कमतरतांमुळे नैराश्य न बाळगता किमान कार्य सुरू ठेवता येईल इतपत पावलं उचलावीत. ‘मॅड्रिड इंटरनॅशनल प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन ऑन एजिंग- २००२’ हा संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आखला गेला. हा कृतिआराखडा  वृद्धत्वाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला कलाटणी देणारा ठरला. यातच ‘ Active- Productive Aginglची पाळंमुळं रोवली गेली. आणि वृद्धत्व ही बाब केवळ विकसित देशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची बाब आहे हे लक्षात आले. यात वृद्ध व्यक्तींना व त्यांच्या उत्कर्षांस केंद्रस्थानी ठेवणे, त्यांच्या स्वास्थ्याबद्दल दक्ष राहणे, आग्रही राहणे आणि त्यांना साजेशी अशी आजूबाजूची स्थिती/ परिस्थिती निर्माण करणे यावर भर होता. वृद्ध व्यक्तींना योग्य तो मान, गरजेचे संरक्षण आणि संधी मिळाव्यात आणि त्यांचे कोणत्याही प्रकारे शोषण होऊ नये, या मानसिकतेतून ही ध्येयं.. ही वाटचाल योजली गेली.

आपल्या देशातही सांस्कृतिक वारशाबरोबरच कायदाही वृद्ध व्यक्तींच्या संरक्षण व स्वास्थ्याप्रति सजग आहे. त्यासाठी काही सकारात्मक योजना आखण्यात आलेल्या आहेत. मग ती १९९९ ची ‘National Policy on Older Persons’ असो किंवा २०११ ची ‘National Policy for Senior Citizens’ असो; या दोन्हींमध्ये ज्येष्ठांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्वास्थ्याचा  विचार व तशा तरतुदी केलेल्या आढळतात. याशिवाय २००७ चा kMaintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007’ हाही वृद्धांचे स्वास्थ्य, देखभाल आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. खासकरून वृद्धांच्या मूलभूत गरजा (शारीरिक, मानसिक, आर्थिक, इ.) आणि शोषणरहित जीवनाच्या शाश्वतीसाठी याची अत्यंत आवश्यकता आहे.

या सर्व दृष्टिकोनांचा विचार केला तर विज्ञान आणि शास्त्र वृद्धत्वाबद्दल तात्त्विक विचार करताना दिसते. किंबहुना, तशी महत्त्वाकांक्षा तरी नक्कीच बाळगते.  खरी गोम स्वत: वृद्ध आणि इतर पिढय़ा वृद्धत्वाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, यात आहे. ‘यशस्वी वृद्धत्व’ या संकल्पनेवर बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी भाष्य केलेलं आढळतं. काहींनी सूचीही तयार केलेली आहे; ज्यात शारीरिक- मानसिक- बौद्धिक- आर्थिक- सामाजिक स्वास्थ्य आणि नातेसंबंधांविषयीची सशक्त बाजू अशा गोष्टींचा समावेश आढळतो. ‘यश’ ही संकल्पना जशी भिन्न लोकांच्या नजरेत भिन्न स्थान राखून असते तसेच ‘यशस्वी वृद्धत्व’ या संकल्पनेबाबतही आहे. त्यामुळे सर्वागीण स्वास्थ्य हे निश्चितच आपलं ध्येय असावं. परंतु प्रत्येक वयोगटात पदार्पण करताना जसे बदल होतात तसेच वृद्धत्वात पदार्पण करतानाही होतात. ही नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या सत्याचा स्वीकार महत्त्वाचा ठरतो. नव्या भूमिका, त्यामुळे नव्या जबाबदाऱ्या, दिनचर्येत बदल, आहारविहारात बदल हेही आढळून येतात. वृद्ध म्हणून आपण काही गोष्टी स्मरणात व आचरणात ठेवल्या तर कदाचित आपला हा प्रवास सुखकर होईल आणि आजूबाजूच्या या तारुण्यपूजक जगाचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नाही.

एक ‘आकडा’ (उदा. ६० वर्षे) हे माझं ‘वय झालं’ हे सुचविण्यास पुरेसं आहे का, हे स्वत:ला प्रथम विचारवयास हवे. माझं वय माझ्या सद्य:परिस्थितीतील क्षमता आणि आधीच्या तुलनेत त्यात झालेला बदल यातून अधिक स्पष्ट होतं, हा विचार योग्य ठरतो. त्यामुळे वृद्धत्वाकडे निराशावादी नव्हे, तर सकारात्मक व आशावादी दृष्टीने पाहण्यावर भर असावा. यादृष्टीने विचार केल्यास भावनिक विश्व स्वास्थ्यपूर्ण राहते, हे मानसशास्त्रीय संशोधनातून स्पष्ट झाले आहे. प्रत्येक वयोगटाची आपापली अशी वाटचाल असते, आपापली ध्येयं असतात, आपापल्या मर्यादा असतात.  मग फक्त वृद्धत्वालाच वगळून त्यातील आव्हाने आणि मर्यादाच केवळ उचलून धरण्याची आवश्यकता लोकांना का भासावी, याचे आश्चर्य वाटते. त्याचे प्रमाण काहींच्या बाबतीत कदाचित थोडेसे अधिक असेल, परंतु वृद्धत्व म्हणजे गतिरोधक हे समीकरण पटण्यासारखे नाही.  वृद्धांनीही कोणतीही शारीरिक- मानसिक समस्या ही वृद्धत्वाचा परिणाम असल्याचे परस्पर ठरवणे टाळावे. त्यांनी सद्य:स्थितीतील आपल्या क्षमतांचे प्रामाणिकपणे अवलोकन करावे. त्यानुसार आपला आचार आखावा व आजूबाजूच्या परिस्थितीचाही (उदा. घराची रचना, उपयुक्त तांत्रिक साधनांचा समावेश, स्वास्थ्यतज्ज्ञांशी नियमित संपर्क, आहाराचा आराखडा, आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करण्यास योग्य व्यक्तींची सूची, प्रथमोपचार सामग्री, इ.) आढावा घ्यावा.

वय वाढण्याचं दडपण वाटण्यापेक्षा त्याबरोबरीने येणाऱ्या अनुभवसंचयाचा अधिक विचार करावा. सद्य:परिस्थिती मनासारखी असो वा नसो, नातलगांशी होणाऱ्या भेटींचे प्रमाण जरी कमी-जास्त असो;  स्वत: स्वत:चे स्थान स्वत:च्या नजरेत नेहमी राखून ठेवणे गरजेचे आहे. कारण स्वयंप्रेरणा ही सर्वात महत्त्वाची! ही प्रेरणा गतजीवनाकडे पाहण्याचा सुयोग्य दृष्टिकोन बहाल करते. कामकाजातून निवृत्त झालेल्या वृद्धांकडे वेळेची उपलब्धी असते. शक्य असल्यास आणि शक्य तितके ‘राहून गेलेले’ करून पाहावे. अर्थात वस्तुस्थितीच्या परवानगीने! अर्थात इतर वयोगट जसे आनंदाने अनुभवले, तसाच हा काळही अनुभवावा. गतजीवन मनाजोगे न अनुभवता आलेल्यांनी त्याचे दु:ख चघळत राहण्यापेक्षा वृद्धत्वाकडे नवीन संधी म्हणून पाहावे आणि ही संधी निसटू नये म्हणून ध्येयनिष्ठ पावले उचलावीत. वृद्धत्व म्हणजे मरणाची वाट बघत बसण्यासाठी बहाल केलेला काळ नव्हे. गतजीवनात जे काही योग्य केले त्याचा आनंद बाळगावा. मनाला उल्हसित करतील अशा आठवणींना वाट मोकळी करून द्यावी. इतकी र्वष वाहत असलेल्या बोजड ओझ्याला काही वेळ खाली ठेवून त्या ओझ्यातील मनाला डागण्या देणाऱ्या सामानाला ‘रामराम’ म्हणण्याचा आणि प्रेरित, आनंदित, सुखावह, समाधानी करणाऱ्या सामानाची घडी जशीच्या तशी ठेवण्याचा हा काळ आहे. आणखी खूप काही आहे चर्चिण्यासारखं. परंतु तूर्तास.. हा काळ आहे प्रा. रॉबर्ट हॅविग्हर्स्ट म्हणत तसे जगण्याचा. म्हणजेच Adding life to years, and not merely years to life.

(१ ऑक्टोबर- जागतिक ज्येष्ठत्व (वृद्धत्व) दिनाच्या सर्वाना शुभेच्छा!)

डॉ. केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)