तुलना करणे हा मानवी स्वभाव आहे. या स्वभावाचे दर्शन जवळजवळ सगळ्याच घरांमधून घडते. ‘आमचा मोठा मुलगा अभ्यासात अगदी हुशार! धाकटय़ाला मात्र अभ्यासाचे नाव काढले तरी अंगावर काटा येतो..’ ‘मागल्या आठवडय़ातली पालकची भाजी आजच्यापेक्षा जास्त चविष्ट झाली होती..’ ‘आधी दोन आकडी पगारातही मौज होती, आता पाच आकडी पगारही पुरत नाही..’ ‘अमुक व्यक्ती इतकी श्रीमंत आहे! तिला कसली आली आहेत दु:खं? नाहीतर आम्ही!’ ‘परदेशात काय उत्तम राहणीमान आहे. या देशात काय राहिलंय आता?’ असे चौकार-षटकार आपल्यापैकी बरेच जण मारत असतात. यात शास्त्रशुद्ध, तर्कनिष्ठ आणि सत्यावर आधारित किती स्ट्रोक्स असतील, हे सांगणे अवघड. परंतु कशाची ना कशाची तरी सतत तुलना आपल्या बोलण्यात नित्य होत असते. आपण अशी तुलना का करतो, याचे बरेच ठोकताळे बांधता येतात. आपले नेमके स्थान सुनिश्चित करण्यासाठी, तसेच दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी आपण अशी तुलना करत असतो. कधी आपली प्रतिमा उंचावण्यासाठी आपण ही तुलना करतो. तुलना करणे ही समस्या आहे किंवा कसे, हे ठरवण्याआधी त्यामागील हेतू व कारण याचा विचार करायला हवा. याचे एक उदाहरण पाहू-
नाईकांना दोन अपत्ये. एक मुलगा व एक मुलगी. मुलगी लग्न होऊन परदेशात गेली याचा वडिलांना प्रचंड अभिमान. तिथे ती आहे साधी गृहिणीच. परंतु तरी तिच्या घर सांभाळण्याचे कौतुक हा वडिलांचा इतरांशी मारल्या जाणाऱ्या गप्पांमधला प्रमुख विषय असतो. तिचे मोठे घर, तिच्या घरातील दिमाखदार पडदे, अद्ययावत यंत्रे, भिंतींना रंग नसून उत्तम वॉलपेपर लावल्याने सुशोभित झालेल्या खोल्या, वैभवाने ओतप्रोत भरलेले घर.. असे लेकीच्या घराचे वर्णन ते सतत करत असत. हे वर्णन ओघाने आलेल्या किंवा उकरून काढलेल्या विषयांतून नाईकांचा मुलगा दररोज ऐकत असे. बहिणीबद्दल त्यालाही प्रेम व आदर होता. पण वडिलांच्या या सततच्या पालुपदामुळे त्याच्यावर या गोष्टीचा भलताच परिणाम होऊ लागला. दहा वर्षे नित्यनेमाने जर एकाच व्यक्तीची थोरवी ऐकली किंवा ऐकवली गेली तर कुणालाही साहजिकच कंटाळा आणि राग हा येणारच. एनजीओ चालवणारा नाईक यांचा हा मुलगा आपल्या कार्यातून, लेखनातून देशाच्या समस्यांविषयी जनजागृतीचा प्रामाणिक प्रयत्न करणारा. विलक्षण देशप्रेम असलेला. त्याच्यासमोर परदेशाच्या प्रगतीचे, वैभवाचे, आरामदायी राहणीमानाचे वर्णन करताना वडील सुप्तपणे आपल्या मातृभूमीची अवहेलना करताहेत असे त्याला वाटू लागले. त्याला परदेशाबद्दल किंवा तिकडल्या सुबत्तेबद्दल अजिबातच मत्सर नव्हता. परंतु त्याला आपल्या देशाबद्दल अधिक प्रेम होते. प्रत्येक देशाच्या आपापल्या उपलब्धी असतात आणि उणिवाही, असे त्याचे मानणे होते. पण झापडे लावून बसलेल्या एककल्ली वडिलांच्या नजरेला हे दिसणे अवघडच. संकुचित आणि देशाबद्दल नकारात्मक भावना असणाऱ्या त्यांच्या मतीला हे कळणेही कठीणच.
कोणत्याही गोष्टीला स्वतंत्रपणे चांगले किंवा वाईट न म्हणता त्यांची तुलना करून, त्या गोष्टीची पत ठरवून मोकळे होणारे व त्यानुसार त्या गोष्टीला महत्त्व किंवा दर्जा देणारे असंख्य महाभाग आपल्या संपर्कात येतात. तुलना करताना एखादा समान घटक निवडलेला त्यांना पुरतो. उदा. गप्पीमासा व देवमासा ही तुलनाही ते कदाचित योग्य समजतात. मासा हा त्यातला समान घटक. देवमासा मोठा, अजस्र, दुर्मीळ; म्हणून त्याचे कौतुक निश्चितच करायला हवे. परंतु गप्पीमासा देवमाशाएवढा मोठा नसला तरीही हिवताप टाळायला तो उपयोगी पडतो. तेव्हा कोणी देवमाशाला पाचारण करीत नाही. या काहीशा चमत्कारीक वाटणाऱ्या उदाहरणाचा हेतू इतकाच, की प्रत्येक गोष्ट ही आपले एक स्थान घेऊन येते व असते. प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वाचे काही ना काहीतरी प्रयोजन आहे. त्यामुळे आपल्या मतानुसार एका गोष्टीचे प्रयोजन दुसऱ्या गोष्टीपेक्षा उत्तम, हे ठरवणे मूर्खपणाचे ठरते. पण हा मूर्खपणा आपल्यापैकी बरेच लोक करत असतात. आपल्याला स्वत:ची इतरांशी (तथाकथित वरचढ व्यक्तींशी) केलेली तुलना बऱ्याचदा सहन होत नाही. आपले स्थान हे त्या व्यक्तीच्या तुलनेत कमी असल्याचे जाणवते आणि त्यातून आपले खच्चीकरण होण्याचा संभव असतो. याउलट, आपली तुलना आपल्याहून खालच्या स्तरावरील व्यक्तीशी करताच आपण वरचढ असल्याचा अनुभव आपल्याला येतो आणि आपला न्यूनगंड नाहीसा होऊन आत्मविश्वास वाढू शकतो.
आता यातून आत्मविश्वास वाढतो की अहंकार, हे मात्र आपल्या स्वभावावर अवलंबून आहे. पण मुळात वरचढ कोण व हीन कोण, हे कोण व कसे ठरवणार? पण तुलनेतूनच जगाकडे पाहणाऱ्यांना हे ठरवणे काही कठीण जात नाही. त्वरित वर्गीकरण करून ‘अ’ पेक्षा ‘ब’ किती सरस किंवा दुय्यम याचा आलेख ते अगदी चटकन् मांडून आपले इतिकर्तव्य बजावतात. तुलना ही आपल्या मनाशी स्वाभाविकरीत्याच होत असते हे जरी खरे असले तरीही संबंधित व्यक्तीच्या परिस्थितीची/ स्थानाची पत ठरवून, त्यांचे वर्गीकरण करून त्यांचा दर्जा ठरवणे व त्यानुसारच त्यांच्याशी वर्तन ठेवणे हे उचित नाही. प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी आपण कोठून सुरुवात केली आणि कोठपर्यंत पोहोचलो, अशी तुलना योग्य होय. परंतु ‘हे स्पर्धात्मक युग आहे. तेव्हा तुलना ही होणारच व त्यातूनच कोण सरस ते ठरणार!’ अशी मानसिकता बाळगणाऱ्यांना काय म्हणावे? आपण आपली तुलना सहसा इतरांची आर्थिक स्थिती, मालमत्ता, नोकरी/ व्यवसाय, चेहरेपट्टी, शरीरयष्टी, शिक्षण यांसारख्या बाबींशी करतो. त्यामागे हेतू हा असतो, की या सर्व बाबींमध्ये मी नक्की कोठे बसतो/ बसते, माझे नेमके स्थान काय, माझ्या स्थानाप्रति माझ्या व इतरांच्या संभाव्य व प्रत्यक्ष भावना काय आहेत, हे जाणणे. आपला आत्मविश्वास डळमळणाऱ्या स्थितीत असल्यास इतर लोक किती उत्तम प्रगती करताहेत हे आपण गृहीतच धरतो. आपल्या आयुष्यातील अस्थिरतेमुळे, अशाश्वतीमुळे आपल्याला आपल्या तुलनेत इतर लोकच किती सुखमय अवस्थेत आहेत असे वाटत राहते व आपला डगमगता आत्मविश्वास कोसळण्याच्या स्थितीपर्यंत येऊन पोहोचतो. आणखी खोलवर विचार केला तर ‘आपण कोण आहोत’ आणि ‘आपण कोण नाही’ या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता आपण इतरांशी आपली तुलना करतो.
हल्लीच्या काळात ‘सेल्फी’ पोस्ट करण्याचे फॅड बोकाळले आहे. हे ‘सेल्फी’पर्व म्हणजे स्पर्धात्मक आखाडाच म्हणावा लागेल. स्वत:ला सुंदर, स्वस्थ दाखवण्याच्या अट्टहासात बरेच लोक यशस्वी होतात आणि तुलनात्मक जीवन जगणारे इतर लोक त्यांच्या या दर्शनी प्रतिमेस भुलून केवळ सेल्फीमध्ये दिसणाऱ्या (दर्शवल्या जाणाऱ्या) भावनेशी आपल्या स्थितीची तुलना करतात व त्याजोगी त्यांची मन:स्थिती होते. फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर लोक आपले निवडक फोटो उत्साहाने टाकतात. अर्थातच आनंदी क्षणांचे. आपण मग आपल्या आयुष्यात हे सगळे घडत नाही, याबद्दल विचार करत राहतो. कोणाचे युरोप टूरचे फोटो पाहिले की आपली तेथे जाण्याची कशी ऐपत नाही, याचा विचार आपल्या मनात येतो. एखाद्याचे लग्नाचे उत्तम कपडे, दागिने पाहिले की हा खर्च किती वायफळ आहे (बऱ्याचदा ईष्र्येतून ही टीकात्मक तुलना होताना दिसते.), असे आपण म्हणतो, किंवा माझ्या लग्नात हे वैभव कसे नव्हते, याबद्दल बोलतो. नव्या फॅशनचे पेहराव असलेले फोटो पाहून आपण कसे ‘त्यातले’ नाही, अगदी साधे-सरळ आहोत, या विचाराने सुखावतोही. ‘आम्ही अमुक ठिकाणी नवीन फ्लॅट बुक केला आहे,’ असे कुणी सांगितले की लगेचच आपल्या व त्यांच्या घराच्या मोजमापावर, बेडरूमच्या संख्येवर गणित येऊन थडकते. त्यांचा फ्लॅट दोन बीएचके आणि आपला अडीच बीएचके जरी असला तरी आपण मनोमन सुखावतो. परंतु आपला अडीच बीएचके आणि त्यांचा तीन बीएचके असला की आपला पापड मोडतो आणि तुलनात्मक रडगाणे सुरू होते.
या सगळ्यावरून हे लक्षात येईल की, आपण केवळ इतरांबरोबर केलेल्या तुलनेतून स्वत:ची स्थिती ठरवणार असू तर ते योग्य नाही. आपला आनंद सतत ‘आपण तुलनेत वरचढ ठरलो तर ठीक; नाहीतर अस्वस्थतेचे कारण’ यावर अवलंबून ठेवला तर तो दीर्घकाळ टिकणे कठीण. स्पर्धा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला तरीही त्यात नेहमी अव्वलच आले पाहिजे असा काही नियम नाही. महत्त्वाकांक्षा असणे अनुचित नाही. ती निश्चितच असायला हवी. परंतु तिची तीव्रता इतकीच असावी, की जी आपल्याला प्रयत्न करण्यास उत्तेजित करेल, आपला उत्साह टिकवून ठेवेल व आपल्यातील क्षमता आपण जास्तीत जास्त उपयोगात आणू शकू. ‘The best’ करण्यामागे पळण्यापेक्षा ‘my/ our best’ करण्याकडे कल असल्यास आपण या तुलनेच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकू. स्वत:ला क्षमता व न्यूनगंडांसकट स्वीकारणे हे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरेल. सामाजिक वा वैयक्तिक स्वास्थ्य व प्रगतीसाठी वेगवेगळ्या मार्गाची निवड करणे, प्रत्येक मार्गाच्या उपयुक्ततेचे विश्लेषण करणे आणि मग सर्वार्थाने साजेसा मार्ग निवडणे, ही प्रक्रिया तुलनात्मक विवेचनाला प्रेरक आहे. परंतु कुटिल हेतूने केलेली, दुसऱ्याला बोचणारी, कुणाच्या मानसिकतेवर आघात करू पाहणारी, स्वत:कडे पडती बाजू ओढवून घेणारी, आत्मविश्वास ढासळवणारी तुलना रुचणे अवघडच. त्यामुळे तुलना ही मनुष्य म्हणून मानवतावादी दृष्टिकोन ठेवण्यास आपण काल किती सक्षम होतो, आज किती सक्षम आहोत व उद्या किती सक्षम असणार आहोत, हे पाहण्यापुरतीच असलेली बरी. नाही का?
केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास