मानवी वर्तन-व्यवहाराची सखोल चिकित्सा तसेच त्यातील सकारात्मक बदलांबद्दल चर्चा करणारं मानसशास्त्रज्ञाचं साप्ताहिक सदर..
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी सदैव नांदावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आपले सारे प्रयत्न ते मिळवण्याच्या दिशेनेच होत असतात. दु:खाच्या दिशेने हेतपुरस्सर मार्गक्रमण करणारी व्यक्ती तशी दुर्मीळच. तरीही अवहेलना, तिरस्कार आणि नकार पचवत दु:ख मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते. दु:खाचे हे वेदनादायक स्वरूप पाहता त्याचा तिटकारा वाटणे स्वाभाविकच. परंतु ते टाळणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे सर्वथा अशक्य. ते सोसत असताना त्यासोबत मिळणारे आणखी काहीतरी- म्हणजे इतरांचे सल्ले. जसे दु:ख टाळणे अशक्य, तसेच हे सल्लेही! असे सल्लागार आपल्याभोवती सतत घोंघावत असतात. आपण आपली मन:स्थिती कथन करायला सुरुवातकरणे म्हणजे यांच्या सल्ल्याच्या गुऱ्हाळाला घुंगरू बांधण्यासारखे आहे. आपण कधी कधी असे सल्लागार होत असतो. तर बऱ्याचदा आपणही अशा सल्लागारांची शिकार ठरतो. आपण असे सल्लागार बनणे कसे व का टाळावे, आणि अशा प्रकारच्या सल्लागारांच्या तावडीत सापडल्यास स्वत:ला कसे वाचवावे, ते इथे बघू या.
सल्ला देण्याला सरसकट वाईट, निरुपयोगी अथवा नकारात्मक म्हणणे चुकीचे ठरेल. पण या गोष्टीला काही बंधने व सीमारेषा आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळ-काळ, प्रसंग व त्यातील व्यक्ती, सल्ला देणाऱ्याची वा घेणाऱ्याची मानसिकता, नातेसंबंधांचे स्वरूप, सल्ला देणाऱ्याची पात्रता, पद्धत व हेतू तसेच त्या सल्ल्याची उपयुक्तता व समर्पकता असे अनेक पलू यासंदर्भात विचारात घ्यावे लागतात.
मनुष्य एखाद्या समस्येत सापडल्यास त्यातून बाहेर पडण्याकरता आधाराच्या शोधात असतो. त्यातून मार्ग काढण्याचा आपल्या परीने यथाशक्ती प्रयत्न करत असतो. यात इतरांकडून मागितलेला सल्ला हाही एक स्रोत असूशकतो. अशा परिस्थितीत विचारपूर्वक व योग्य पद्धतीने दिला गेलेला सल्ला उपयुक्त ठरतो. परंतु आपल्या पूर्वग्रहदूषित निरीक्षणातून, समस्येने ग्रासलेल्या व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार न करता किंवा आपल्या सल्ल्याची त्या व्यक्तीला कितपत गरज आहे हे जाणून न घेता दिलेला सल्ला लोकांना नको असतो. पण सल्लागाराला एवढा सगळा विचार करत बसायला वेळ नसतो. सल्ला देणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे व तो ऐकून घेऊन त्याची अंमलबजावणी करणे ही समोरच्या व्यक्तीची जबाबदारी आहे अशी सल्लागाराची ठाम समजूत असते. त्यामुळे गरज असो वा नसो, आपले मत ही मंडळी आग्रहाने मांडत असतात. आणि इतरांनी त्याची दखल घेईतो ते मांडत राहतात. इतरांनी त्यांचा सल्ला न ऐकणे हा ते आपला अपमान मानतात. पण त्यानंतरही स्वाभिमान जपण्यासाठी ते सल्ला द्यायचे थांबतातच असे नाही; तर सल्ला देण्याची त्यांची पद्धती अधिक कटू बनत जाते. त्यातून समोरच्या व्यक्तीने आपला सल्ला न ऐकल्याने (परिस्थितीजन्य कारणांमुळे) काही विपरीत घडले तर हे सल्लागार ‘मी आधीच सांगितले होते!’ असे ऐकवायला कमी करत नाहीत. आपले शब्द, आविर्भाव आणि आग्रह समोरच्या व्यक्तीवर लादल्याने कधी कधी त्या व्यक्तीचे समस्या निवारण दूरच राहते; उलट त्यांच्यापुढे या सल्लागारांच्या तावडीत सापडल्याची नवीच समस्या उभी ठाकते. समस्याग्रस्ताकडून असा अनुभव आल्यावरही बऱ्याचदा ‘सल्ला स्पेशालिस्ट’ आत्मपरीक्षण न करता इतरांनाच दोष देतात. परंतु समजा- त्यांनी आत्मपरीक्षण करायचे ठरवले तर ते कसे करावे, ते पाहू या.
एखादी व्यक्ती समस्येत सापडल्यास प्रथम त्या समस्येचे अवलोकन करावे. जिवावर बेतलेल्या संकटसमयी त्वरित पावले उचलणे हे योग्यच; परंतु आपण चर्चा करतो आहोत ती वैचारिक, भावनिक, नातेसंबंध, व्यावसायिक व जीवनविषयक दैनंदिन स्वरूपाच्या समस्यांची. त्यामुळे समस्येचे अवलोकन करताना समस्या निवारणाकरिता आपला सहभाग व सहकार्य कितपत उपयुक्त ठरणार आहे याचा आढावा घ्यावा आणि मगच आपले निरीक्षण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावे. समोरच्या व्यक्तीने आपणहून सल्ला न मागितल्यास तिला आपली सल्लारूपी मदत अपेक्षित आहे का, याची चौकशी करावी आणि आपली उपलब्धता सूचित करावी. त्या व्यक्तीला त्यावर विचार करायला, निर्णय घ्यायला पुरेसा वेळ द्यावा. आपला सल्ला ऐकवून मोकळे होण्यापेक्षा ‘माझी याबाबत काही मते आहेत, उपाय आहेत; ज्यांचा उपयोग मला स्वत:ला झालेला आहे. तुला गरज वाटल्यास आपण एकत्र यातून मार्ग काढू..’ अशा शब्दांत समस्याग्रस्त व्यक्तीला विचारायला हरकत नाही. आपल्याला हे कदाचित बेगडी वाटू शकेल; परंतु आधी नमूद केलेली आग्रही भूमिका आणि दुरावणारी नाती हे सारे टाळायचे असेल तर याबाबतीत अशाच स्वरूपाचे शब्द आणि शैली उपयुक्त ठरू शकेल. आपला सल्ला अपेक्षित आहे की नाही हे आपण समस्याग्रस्त व्यक्तीच्या देहबोलीकडे डोळसपणे पाहिल्यास नक्कीच समजू शकते. त्या व्यक्तीचे नकारार्थी धोरण असल्यास आपण मदतीचा हात पुढे केल्याचा आनंद बाळगावा आणि स्वत:ला किंवा समोरच्या व्यक्तीला दोष न देता/ घेता त्यातून बाहेर पडावे.
याच्या उलट समोरच्या व्यक्तीने आपला सल्ला मागितल्यास आपली मदतीमागची विनम्र भावना कायम ठेवावी. प्रथम समोरच्या व्यक्तीचे म्हणणे, तिचे दु:ख काय आहे हे पूर्णपणे ऐकून घ्यावे. समजून घ्यावे. बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीचे दु:ख ऐकून, तिची केविलवाणी मन:स्थिती पाहून आपल्याला अस्वस्थ वाटते आणि त्या व्यक्तीची अस्वस्थता दूर करायला आपण अनवधानाने, परंतु सवयीने त्या व्यक्तीला शांत होण्यास सांगतो. त्या व्यक्तीला ते तत्क्षणी शक्य नसते. त्यामुळे आपल्या वारंवार तसे सांगण्याने संवादाचा पूल बांधण्याआधीच कोलमडतो. सल्ला घेण्यासाठी समोरची व्यक्ती तयार आहे ना, हे आधी पाहावे. भावनिक प्रक्षोभाचा जोर कमी होऊन समोरची व्यक्ती ऐकण्याच्या मन:स्थितीत आल्यावरच आपले म्हणणे मांडावे. अगदी मोजक्या शब्दांत, आपुलकीने, संयमी पट्टीत व धोरणीपणे आपला सल्ला द्यावा. कधी कधी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेऊन ‘हं’, ‘अच्छा’, ‘बरं’ असे थोडके प्रतिसादही सल्ल्याचे रूप धारण करू शकतात. यामागचे कारण हे, की सल्ला देण्याचे मुख्य प्रयोजन म्हणजे एखाद्या व्यक्तीला समस्येतून मार्ग काढायला मदत करणे, प्रोत्साहन देणे. त्यामुळे आपल्या बोलण्या- न बोलण्यामुळे हे प्रयोजन व ध्येय जर साध्य होत असेल, तर हाही एक प्रकारे सल्लाच ठरेल. परिस्थितीचे योग्य ते भान ठेवून, संयम राखून सल्ला देणाऱ्या व्यक्तीकडे लोक आपणहून सल्ला मागतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात व त्याच्या सल्ल्यानुसार आपले वर्तन कसे ठेवायचे, हे ठरवतात.
सुरुवातीला चíचलेल्या गोष्टींचा सवयीने अवलंब केल्यास त्या आपोआप अंगवळणी पडतील व दैनंदिन वागणुकीत दिसून येतील. त्यामुळे ‘सल्लागार िझदाबाद’ म्हणायचे असल्यास नियमित आत्मपरीक्षण, निखळ हेतू आणि संयमी धोरण आत्मसात करणे उचित ठरेल यात शंकाच नाही.
केतकी गद्रे
ketki.gadre@yahoo.com, (लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)