दया आणि करुणा ही महत्त्वाची जीवनमूल्ये आहेत. सहिष्णु समाजाच्या बांधणीसाठी तसेच समाजस्वास्थ्यासाठी ही मूल्ये महत्त्वाची ठरतात. ही भावनिक मूल्ये म्हणजे आपण इतरांच्या दु:ख व शोषणाप्रति किती जागरूक आहोत याचे द्योतक होत. अशीच जागरूकता आपण आपल्या स्वत:प्रतिही बाळगणे गरजेचे आहे यात संशय नाही. परंतु या भावना घट्ट कवटाळणे हीच आपली ओळख बनू नये याची दक्षता घेणेही तितकेच गरजेचे आहे. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत की आपण हिरमुसतो. आपल्याला खच्ची झाल्यासारखे वाटते. पण या अनुभवाकडे बोधात्मक नजरेने पाहून आपण पुढे वाटचाल करत राहतो. परंतु आपल्यातले काही लोक असे अनुभव येताच प्रचंड उद्दिपित होऊन स्वत:प्रति अतीव दया आणि सहानुभूती व्यक्त करतात. आपल्यावरच नित्य असे प्रसंग ओढवतात; लोक नेहमी आपल्याशीच वाईट वागतात; आपला नेहमी अपमान होतो; तसेच आपल्याला कमी लेखले जाते; या जगातले सगळे दु:ख माझ्याच वाटय़ाला आले आहे; माझेच आयुष्य खडतर आहे; मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण लोक माझा कायम विश्वासघातच करत आले आहेत; मी नेहमी फसवला जातो; इतर लोकांना सुख- सोयी-संधी अगदी सहजगत्या मिळतात, मी मात्र नेहमी नकारात्मक घटनांनी ग्रासलेला असतो/ असते; मी कितीही प्रयत्न केला तरीही यश नाहीच मिळत; इतरांना माझी व्यथा कधीच कळणार नाही.. समजणार नाही असे काहींचे ठाम विचार असतात. ‘बिचारा/ बिचारी मी!’ असे विचार अशा प्रकारच्या लोकांच्या मनात सदोदित येतात. हे विचार आपल्याही मनात येतात, पण ‘बिचारा/ बिचारी मी’ या विचारावर शिक्कामोर्तब करून वागणाऱ्या लोकांच्या मनात हे विचार वादळसदृश परिस्थिती निर्माण करतात.

‘बिचारा/ बिचारी मी’ ही एकदा ठाम ओळख बनली की पुढील विचार-भावना-कृती हे चक्रही मग Anti clockwise  फिरायला लागते. आपले आयुष्य किती खडतर आहे, अन्यायांनी ग्रासलेले आहे, हे इतरांना सतत पटवून देताना त्यांना कोणी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवण्याचा प्रयत्न केला तरी ‘हो.. पण’ हे शब्द त्याच्या कानावर येऊन आदळतात. त्या ‘पण’च्या पुढे पुन्हा त्यांच्या नाखुशीचेच गाऱ्हाणे असते. मात्र तरीही अट्टहासाने मार्ग सुचवण्यासाठी पुन्हा जोर लावताच या व्यक्ती आपल्याला त्यांची व्यथा व तिचे वैशिष्टय़ कसे कळत नाही, हे रडून, हिरमुसून सांगतात. पर्यायाने त्यांना वाटते, की त्यांचे दु:ख इतके डोंगराएवढे झाले आहे, की ते आता अनाकलनीय बनले आहे. आपण इतरांपेक्षा जास्त खस्ता खाल्लेल्या आहेत, खात आहोत आणि खाणार आहोत, हा त्यांचा अभेद्य विश्वास असतो. त्यांच्या जीवनात एकदा तरी आनंदाचा क्षण आला असेल का, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांच्याप्रति सहानुभूती दाखवेपर्यंत अशा व्यक्ती नि:श्वास सोडत नाहीत. ‘बळी’ म्हणून आपली व्यक्तिरेखा सतत रेखाटत राहिल्याने त्यांची मानसिकताही तशीच बनते आणि इतरांनी आपल्याला सतत समजून घ्यावे ही अपेक्षा वाढत जाते. त्यांच्या या मानसिकतेचे बळी (खऱ्या अर्थी बळी!) ठरणारे आपण मग त्यांच्याप्रति दया-करुणा-सहानुभूती या जोडीला त्यांना साहाय्यही करत राहतो. कारण शोषित-पीडिताला वाऱ्यावर सोडणे आपल्याला गैर वाटते. शोषण व अन्यायग्रस्त व्यक्तींना त्या दुष्टचक्रातून बाहेर काढणे हे आपले निश्चितच कर्तव्य आहे. परंतु अखंड फोल तक्रारी करणाऱ्यांशी, सगळ्या गोष्टींचा ‘राई का पर्वत’ करणाऱ्यांशी कसे वागायचे, ते इथे पाहू.

mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
narendra modi akola public rally
मोदींच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी; काय बोलणार याकडे लक्ष?

सर्वात आधी अशांना ओळखावे कसे, ते पाहू. या ‘बळी’राजांच्या बोलण्यात सतत निराशावाद डोकावत असतो. आपल्या कपोलकल्पित बिचारेपणाने ते आपल्याला इतके ग्रासतात, की आपण भांबावून जातो. कुठलाही जबाबदारी स्वीकारण्यापासून ते लांब  पळतात. स्वत:च्या परिस्थितीसाठी ते इतरांनाच दोषी मानतात. स्वत:ला नेहमी ‘कमनशिबी’ म्हणवतात. इतरांशी आत्मीय नाते क्वचितच जुळवू शकणाऱ्या या ‘बिचाऱ्यां’ना असे वाटते की, नात्याचे हे असे स्वरूप परिस्थितीमुळे आणि इतरांच्या नाकर्तेपणामुळे किंवा दैवामुळे घडले! त्यात आपली काहीच चूक नाही. त्यांनी अशी कोणतीच कुकर्मे केलेली नाहीत, ज्या कारणाने त्यांच्यावर ही अशी परिस्थिती ओढवलीय. आपल्याला या दुष्टचक्रातून कोणीतरी सोडवावे म्हणून ते लगेचच आपल्यालाच त्यांचा समुपदेशक बनवतात. आपण ही भूमिका बजावायला सुरुवात केल्यावर मात्र या व्यक्ती आपला अट्टहास व तक्रारींच्या पाढय़ांची तीव्रता वाढवतात. आपले कोणतेही उपाय त्यांच्यापर्यंत पोहोचतात- न पोहोचतात तोच त्यांनी कसे हे सगळे उपाय करून बघितले आहेत व ते कसे अपयशी ठरले आहेत, हे ते लगोलग सांगतात. थोडक्यात, त्यांना फक्त आपले ऐकून घेणारा श्रोता हवा असतो. त्यामुळे अशा व्यक्तींशी संवाद साधताना आपला पवित्रा काहीसा असा असावा : एखाद्या ‘बिचारा/ बिचारी’पणाच्या मानसिकतेने पछाडलेल्या मित्र/मैत्रिणीला सांगावे  की, ‘मला तुझ्या जीवनप्रवासाप्रति आणि अनुभवांप्रति सहानुभूती आहे, पण त्याबद्दल केवळ तक्रार करत राहणे हे योग्य नाही. ती व्यक्ती आपल्या सांगण्यानुसार तिच्या समस्येवर उपाय करू इच्छित नसल्यास ‘दहा मिनिटांच्या वर मला तुझे बोलणे ऐकण्यास वेळ नाही,’ असे स्पष्टपणे सांगावे. आपला असा रोख व सूर ऐकल्यावर संबंधित व्यक्ती- आपण कसे निर्दयी आहोत, असंवेदनशील आहोत हे जाणवून देण्याचा जोमाने प्रयत्न करतात. त्या बोलण्यास आपण बळी पडू नये. आपल्या भूमिकेवर आपण ठाम राहावे. ‘मला माहीत आहे की, मी निर्दयी नाही. संवेदनशील आहे. तुझा हितचिंतक आहे. तू या गर्तेतून बाहेर पडावंस अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे,’ असे त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगावे.

ही सगळी लक्षणे आपल्या स्वत:मध्ये आढळल्यास मुळात ती मान्य करावी आणि स्वत:शीसुद्धा याच प्रकारे संवाद साधावा. तक्रारींच्या वाक्यांची संख्या जर (योजलेल्या) उपायसदृश वाक्यांपेक्षा जास्त असल्यास आपल्या सहज लक्षात येईल की आपण आपल्याच व एकाच बाजूने स्थितीचा विचार करत आहोत. असा अर्थ लावून आपण आपली (तात्पुरती) सोडवणूक तर करून घेऊ; परंतु ही जबाबदारी टाळणे कितपत योग्य आहे याचाही विचार करावा. स्वत:च्या आयुष्याची व त्यातील यशापयशाची जबाबदारी स्वत:कडे घेणे हे जास्त धैर्याचे काम आहे. इतरांना दोष देणे सर्वात सोयीचे व सोपे असते. परंतु आपण किती काळ अशी जबाबदारी टाळू शकू? आपल्या या स्वभावामुळे इतर लोक आपल्यावर विश्वास टाकतील का, याचाही विचार करावा. काही काळाने लोकांचाही धीर सुटेल व ते आपली व्यथा ऐकेनासे होतील. आपण मात्र त्याच गर्तेत अडकून पडू. व्यक्ती म्हणून आपली प्रगती खुंटेल आणि निष्पन्न काहीच होणार नाही.

स्वत:ला व इतरांना घातक ठरणारे बिचारेपणाचे हे बिरुद लवकरात लवकर त्यागल्यास उपयुक्त ठरेल. त्यासाठी ‘बिचारेपणा’चे विचार आधी ओळखावेत. त्यातील नकारात्मक वाक्ये, इतरांकडे बोट दाखवणारे शब्द यांचा आढावा घ्यावा आणि ते कटाक्षाने टाळावेत. कारण या शब्दांमुळे आपण आणखीन त्यात अडकून पडू. (उदा. ‘तुझ्यामुळे नुकसान झाले’, ‘कमनशिबी’, ‘दुर्दैव’, ‘असहाय’, ‘अधीर’, इ.)

हा बदल घडून आणावयाचा असेल तर तो क्षण आहे आत्ताचाच. स्वत:च स्वत:ला साहाय्य करून बिचारेपणाचा त्याग करावा. बिचारेपणाने नव्हे, तर बिनधास्तपणे जीवनाकडे पाहायचे आहे, त्यातून डोळसपणे शिकायचे आहे. मागे जे घडले ते तेथेच पुरायचे आहे. नव्या जोमाने प्राप्त परिस्थितीकडे पाहायचे आहे. सर्व दृष्टिकोनांचा विचार करून एककल्ली मानसिकता टाळायची आहे. आज.. आतापासूनच!

केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)