‘शहाणपण’, ‘चातुर्य’, ‘उमज’, ‘ज्ञान’ हे शब्द आणि त्यांचा आविष्कार आपल्या चारित्र्याचे केंद्रबिंदू ठरावेत अशी बहुतांश लोकांची इच्छा असते. या संकल्पनांची निश्चित आणि नेमकी व्याख्या करणे कठीण. पण आपल्याला त्यांचा प्रत्यय आला, अनुभव आला की आपल्याला त्या जाणवतात. आणि ज्या व्यक्तीच्या सान्निध्यात, तिच्या वागण्या/ बोलण्या/ ऐकण्या/ विचार करण्यावरून आपल्याला त्या जाणवतात, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला विलक्षण आदर वाटतो/ आकर्षण वाटते/ कुतूहल वाटते/ अचंबाही वाटतो. या संकल्पनांमध्ये आणि त्यांच्या आविष्कारामध्ये काही मूलभूत प्रक्रिया दडलेल्या आहेत असे मानसशास्त्रज्ञांचं मत आहे. अशा व्यक्ती म्हणजेच प्रज्ञावंत. थोडक्यात, ही ६्र२ी व्यक्ती काही विशिष्ट गुणांनी बहरलेल्या मानसिकतेची असते. ज्ञान, अनुभव, प्रगल्भता आणि सखोल दृष्टिकोनातून समजून घेण्याची क्षमता असणारे.. आयुष्यातील अशाश्वततेकडे, अनिश्चिततेकडे, आव्हानांकडे, सुख-दु:खांकडे सहिष्णु नजरेतून पाहणारे.. त्यात विसंगती आढळल्यास विचलित न होता त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य परिणामांचा कयास लावून ते स्वीकारण्याचे धाडस दाखविणारे, आपला समतोल शक्यतो न ढळू देणारे, आणि कधी ढळल्यास तो पुन्हा कसा प्रस्थापित करता येईल यासाठी सक्रियरीत्या झटणारे, सकारात्मकता वा नकारात्मकता या दोन टोकांमध्ये लटकत राहण्यापेक्षा वस्तुनिष्ठ धोरणं, विचार, निर्णय अवलंबणारे, काही परिस्थितीतील टोकाच्या भावनांची स्वाभाविकता ओळखून त्या डावलण्यापेक्षा त्यांचा सन्मानपूर्वक स्वीकार करून, त्यांतून योग्य तो बोध घेऊन आयुष्य उमेदीने जगणारे- ते प्रज्ञावंत!
या शहाणपणाला आणखीनही बिरुदं लावता येतील. त्याचं वर्णन करता येऊ शकेल. ही सूची पूरक आहे असे म्हणणे अवाजवी ठरेल कदाचित; परंतु शहाण्या व्यक्ती कशा ओळखाव्यात आणि शहाण्या व्यक्तीसारखे कसे असावे/ वागावे याची अल्पशी ओळख ही सूची आपल्याला करून देईल यात दुमत नसावे. आपला स्वर, संवाद, देहबोली, दृष्टिकोन, भावना व त्यांचे प्रकटीकरण, हेतू, धोरण, विचारधारा, आचार, कार्यपद्धती योग्य प्रमाणात नियंत्रित ठेवून, स्वत:च्या व इतरांच्या मानसिकतेचा स्वीकार आणि आदर ठेवून, सहअनुभूतीने, सक्रियपणे, वस्तुनिष्ठपणे, जाणतेपणाने आणि डोळसपणे आपला कार्यभार सांभाळणारे/ पुढे नेणारे/ नात्यातील भूमिका बजावणारे आणि त्यातील विशेषता/ विविधता जपणारे/ स्वीकारणारे- ते खरे ‘शहाणे’! हे स्वभाव व आचारविशेष आपल्याला नवीन नाहीत. मूल्यशिक्षणाअंतर्गत, कधी धर्मग्रंथाधारे हे आपल्या जाणिवेत रुजवले गेले असतील. परंतु आपल्याला हे ध्येय इतके ‘अती’ वाटते, दुर्गम/ दुर्मीळ वाटते, न गाठता येणारे वाटते, की आपण त्या मार्गाला फारसे जातच नाही. प्रयत्नपूर्वक या मार्गी लागलोच, तरी साशंकतेने वाटचाल करतो. हे मार्गक्रमण नियमित ठेवत नाही, किंवा अप्रिय आणि उत्तेजन-ऊर्जा ढासळवणारे अनुभव आले की आपण मार्ग बदलतो. त्यामुळे ‘शहाणपण’ या संकल्पनेला आपण उपहासाच्या नजरेतूनच पाहतो. एखादी व्यक्ती तशी वागताना आढळली की मनोमन तिला वाखाणतो, तर कधी तिची उघडपणे खिल्ली उडवतो. खरं तर अशा मानसिकतेमागे आपले दोलायमान, अस्थिर मन दडलेले असते.
शहाणपण येण्यासाठी वयाची मर्यादा नसते. म्हणजे वय वाढलं, अधिक अनुभव गाठीशी आले की ती व्यक्ती ‘शहाणी’ होते असे म्हणणे अयोग्य ठरेल. अनुभवांच्या संख्येपेक्षा त्या अनुभवांतून मिळालेली/ मिळवलेली शिकवण किती गुणाढय़ आहे, समृद्ध आहे यावर ते अवलंबून असते. म्हणजे केवळ वय व बुद्धय़ांक आपल्याला प्रगल्भ बनवतात, यावर विश्वास ठेवणे कठीण. कारण ‘शहाणपण’ हे प्रस्थापित/ विकसित करावं लागतं. आणि एका विशिष्ट कार्यपद्धतीची ती जाणतेपणाने केलेली निवड असते. आणि याला वय, शिक्षण, बौद्धिक क्षमता आणि आजूबाजूची परिस्थिती जरी उत्तेजन देत असली, तरीही आपले व्यक्तित्व या प्रक्रियेशी जोडले गेल्याशिवाय ‘शहाणपण’ येणे कठीण! इतर व्यक्तींना त्यांच्या विचार, आचार वा निवडीवरून ‘चांगले’ वा ‘वाईट’ अशा टोकाच्या गटांमध्ये विभागण्यापेक्षा त्यांच्या त्या वागण्यामागचे कारण शोधण्याचा प्रज्ञावंतांचा पवित्रा असतो.
आनंद मिळवण्यासाठी आपण निरनिराळे मार्ग निवडतो. शहाणपण मिळवण्याचे ध्येय गाठण्याचा मार्ग निवडल्यास आनंद हा त्याचा स्वाभाविक परिणाम ठरू शकतो. कारण या स्वरूपाचा आनंद प्रगल्भतेवर आधारित असतो.. त्यामुळेच अधिक शाश्वतही. सांगण्याचा हेतू हा, की नवी गाडी कधीतरी जुनी होणार, हे निश्चित. परंतु शहाणपण आणि उमज याआधारे काम करत राहिल्यास ते जितके जुने, तितके अधिक परिणामकारक आणि पूरक ठरते. केवळ ज्ञान संपादन करणे म्हणजे प्रज्ञावंत बनणे, हे समीकरण अपुरं आहे. कारण प्रज्ञावंत होण्यासाठी सामान्यज्ञान आणि प्रगल्भ ज्ञान जसे महत्त्वाचे; तसेच त्या ज्ञानाचा योग्य तो विनियोग, योग्य समज, उपयोजन आणि व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं असतं. ही प्रक्रिया राबवण्यासाठी नियमित आत्मचिंतन गरजेचं असतं. केवळ एखादी गोष्ट ज्ञात असल्याने आपण शहाणे ठरत नसतो. आपल्या विचारांत आणि कृतीत तादात्म्य असणं गरजेचं आहे. म्हणजे दारूचे व्यसन वाईट हे ज्ञान आपणा प्रत्येकाला आहे. परंतु जोपर्यंत आपला हा ठाम विचार आणि व्यसनाधीन न होण्याची कृती आपल्या हातून घडत नाही, तोवर आपण व्यसनाच्या आहारी जाण्याचा संभव असतो. मग यास शहाणपण म्हणावे कसे? चांगले व वाईट- म्हणजेच नैतिकतेची ओळख पुरेशी नाही, तर ती विचार-आचारातही दिसायला हवी. निर्णय घेईपर्यंत किंवा एखादा विचार पक्का करेपर्यंत आपल्याला बरीच बौद्धिक कसरत करावी लागते, त्या विषयाचा एकेक पैलू तपासावा लागतो, त्याकरता परिश्रम घ्यावे लागतात. प्रत्येक विचाराला स्तर असतात. आपण जितके स्तर पार करत खोल खोल जाऊ; तितके आपले निष्कर्ष आणि निर्णय सखोल होतील.
लहान मुलांना शहाण्यासारखं वागण्याची शिकवण दिली जाते. पण त्यासाठी नेमकं काय करायचं, हे सांगितलं जातंच असं नाही. हट्ट करायचा नाही, मोठय़ांचं सगळं ऐकायचं, ताटातले अन्नपदार्थ टाकायचे नाहीत, वगैरे गोष्टी शहाणपणाच्या शाळेत शिकवल्या जातात. ‘शहाण्यासारखं वागलास तर तुला अमुक देईन’ अशी आमिषंही दाखवली जातात. त्यामुळे लहानपणापासून काहीतरी गोष्ट मिळवण्यासाठी शहाणपण गरजेचं, हे विचित्र समीकरण डोक्यात फिट्ट बसतं. आणि त्या समीकरणाच्या चष्म्यातून आपण प्रत्येक परिस्थितीकडे पाहत राहतो. आनंद, उत्साह, उत्तेजन आणि ऊर्जा मिळवण्यासाठी शहाणपण अंगीकारावं, हा निखळ हेतू कुठंतरी गायब होतो. आणि एखादी गोष्ट मिळाली नाही की शहाणपण परिणामकारक नाही आणि म्हणून तो निरुपयोगी- असा अयोग्य बोध आपण करून घेतो.
शहाणपण एखादा अवसर गाठून प्रस्तुत करण्याचे वर्तन नाही, तर नियमित प्रयत्नांतून बहरवण्याचं आणि गुणमय जीवन जगण्याचं ते साधन आहे. त्यामुळे इतरांची दाद मिळवण्यासाठी, कौतुक मिळवण्यासाठी, स्वत: सोडून इतर सर्वाना सतत खूश ठेवण्यासाठी अवलंबिलेलं वर्तन हे शहाणपण म्हणता येईल का, शंकाच आहे. कारण या स्वरूपाच्या शहाणपणाचे ओझे वाढू शकते. आणि हे ओझे जड वाटू लागण्यास किंचित जरी सुरुवात झाली, तरी ते त्वरित खाली उतरविण्यास आपण प्रवृत्त होऊ शकतो. आपल्या अचानक बदललेल्या पवित्र्याने लोकही बुचकळ्यात पडतात आणि आपलाही वैचारिक गोंधळ होतो. त्यामुळे आत्मोन्नतीसाठी तसेच नातेसंबंधांच्या सशक्तीकरणासाठी स्वत्वाने योग्य दिशेने वाटचाल करण्याकरता शहाणपणाच्या गावाला जाणारे वाहन पकडावे. स्वत:च्या गरजा डावलून, दबावाखाली येऊन, शहाणपणाने वागण्याचा मुखवटा परिधान करून दांभिक वागण्यापेक्षा दैनंदिन जीवनातील आणि सामाजिक/ राष्ट्रीय/ वैश्विक घडामोडींकडे जाणीवपूर्वक अभ्यासू नजरेने पाहिल्यास शहाणपण खऱ्या अर्थाने अंगी बाणवता येईल. आणि त्यातून सद्य:परिस्थितीचे स्वरूप अचूक ओळखून, त्यातील अपेक्षा लक्षात घेऊन आपली भूमिका ठरवता येईल. शहाणपण म्हणजे अतिगंभीर चेहरा आणि वर्तणूक असे समीकरण रूढ करण्यापेक्षा गरजेचा आणि वस्तुस्थितीजन्य सहभाग, सहकार्य आणि सक्रियता दर्शविण्याकडेच अधिक कल असलेला बरा.
डॉ. केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)