‘Happy Families are all alike; every unhappy family is unhappy in its own way.’
थोर लेखक लीओ टॉलस्टॉय यांचे हे विधान कुटुंबसौख्याबद्दल मौलिक विचार मांडणारे आहे. काही विशेष बाबी व स्वभाववैशिष्टय़ांचा समावेश म्हणजे सुखी, संपन्न कुटुंब हे समीकरण स्वाभाविक आहे. प्रत्येक कुटुंबाचे स्वरूप, त्यातील व्यक्ती- संख्या व त्यांची व्यक्तिमत्त्वे, नीतिमूल्ये, सामाजिक-आर्थिक स्थिती, विचार-आचारपद्धती हे सारे जरी भिन्न असले तरी आनंदी कुटुंबासाठीच्या उद्दिष्टांत बरेच साधम्र्य आहे. ती सर्व कुटुंबांना प्रेरक आहेत.
एकंदर कुटुंबसंस्कृती ही व्यक्ती व सामाजिक विकासासाठी अनिवार्य आहे. याखेरीज प्रत्येक कुटुंबांतर्गत असणारी विशेष संस्कृतीही तितकीच महत्त्वाची. ही संस्कृती म्हणजे घरातील वातावरण, कुटुंबीयांच्या नातेसंबंधांतील आत्मीयता, निकटता, खोली आणि परिपक्वता. ‘आनंदी कुटुंब’ची व्याख्या या सिद्धान्तांवर करणे शक्य आहे. कुटुंबातील आनंद हा कुटुंबीयांच्या परस्परांशी असलेल्या वागण्या-बोलण्यावर अवलंबून असतो. ‘आपण’ या तत्त्वावर तो आधारित असतो. सामूहिक विचारसरणी व वागण्याची पद्धत यालाही यात महत्त्वाचे स्थान असून, आनंदी कुटुंबाची इमारत काही मूलभूत तत्त्वांवर उभी असते. या तत्त्वांमुळे कुटुंबामध्ये प्रेम, विश्वास, सहकार्य आणि आदरभावना प्रस्थापित होण्यास मदत होते. कुटुंबसंस्थेचे बदलते स्वरूप पाहता, बदलत्या गरजा आणि भिन्नता लक्षात घेता कौटुंबिक मूल्ये कशी काय सारखी असू शकतात, हा प्रश्न स्वाभाविकरीत्या पडू शकतो. परंतु ही मूल्ये मूलभूत व सार्वत्रिक स्वरूपाची असल्यामुळे कुटुंबाचा ढाचा कसाही असला तरीही त्याला साजेशी अशीच आहेत. त्यामुळे सुलभरीत्या ती लागू पडतात.
कुटुंबातील संवादशैलीवरून त्यांच्यातील एकरूपता अभ्यासणे शक्य आहे. संवादामधून आणि आदरपूर्वक विचार, भावना, धारणा यांतून याची पोचपावती मिळते. कुटुंबातील व्यक्ती एकमेकांशी काय बोलतात, कसे बोलतात, किती बोलतात, यावरून बरेच ठोकताळे मांडता येतात. कटुंबातील सदस्य आपल्या इच्छा व गरजा कशा प्रकारे व किती प्रमाणात मोकळेपणाने मांडतात याला महत्त्व आहे. कुटुंबाची शिस्त हे बंधन न मानता सुरक्षिततेची भावना देऊ पाहणारी गोष्ट आहे असे वाटणारे कुटुंब हे आनंदी कुटुंब मानावयास हरकत नाही. आपले म्हणणे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून ऐकले जाणार नाही, ही खात्री या कुटुंबातील प्रत्येकाला असते. त्यामुळे विचार व त्याचे शाब्दिक स्वरूप कसेही असले तरीही इतर कुटुंबीय त्यावरून त्या व्यक्तीबद्दल चुकीचा ग्रह करून घेणे टाळतात. शब्दांपेक्षा त्यामागील भूमिकेवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. एकमेकांचे अस्तित्व आणि योगदानाप्रति आदर प्रत्येकाच्या मनात असतो व तो योग्यरीत्या वेळोवेळी प्रकट केला जातो. प्रत्येक कुटुंबीय कुटुंबाचा जसा एक घटक आहे तसेच तो विशेष व्यक्तिमत्त्वपैलू असलेला स्वतंत्र मनुष्य आहे ही बाबही यात विसरली जात नाही. प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न, ध्येय याला पोषक वातावरण मिळण्यासाठी प्रत्येकजण कार्यरत असतो. परंतु वेळ पडल्यास आपल्या स्वत:च्या मतांना व अपेक्षांना मुरड घालण्याची मानसिक तयारीही दाखविली जाते. अटरहित स्वीकारामुळे प्रत्येकाला आपले स्वत्व जपणे शक्य होते. या स्वरूपाच्या स्वीकारामुळे आपण कुटुंबाचे एक आवडते, हवेहवेसे वाटणारे, मौलिक घटक आहोत अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते. ही भावना वृद्धिंगत करण्यासाठी आनंदी कुटुंबातील व्यक्ती इतरांप्रति वाटणारे प्रेम आणि ते बजावत असलेल्या भूमिका व करत असलेल्या योगदानाबद्दल वेळोवेळी कौतुक व्यक्त करतात व कृतज्ञता दर्शवतात. त्यामुळे कुटुंबात एकरूपता, एकजूट निर्माण होते आणि सामूहिक उद्देश दिसून येतो.
कुटुंबाचा सक्रिय हिस्सा असण्याचा अधिकार बजावताना (आनंदी) कुटुंबीय आपल्या जबाबदाऱ्याही त्याच निष्ठेने पार पाडतात. आपल्या भूमिकेबरोबर येणाऱ्या वागणुकीच्या अपेक्षा ओळखून सजगतेने कर्तव्यपूर्ती करतात. कुटुंब म्हणून नियमबद्ध वागण्याकडे त्यांचा कल असतो. हे नियम कुटुंबीयांनी एकमताने तयार केलेले असतात व ते पाळले जातील हा कटाक्ष असतो. हे नियम दैनंदिन जीवनाशी निगडित असतात. सामूहिक नियमपालनामुळे कुटुंबात सुसूत्रता आढळते. संकटांचा सामना एकत्रितपणे व दबावरहित केला जातो. कठीण परिस्थिती आल्यास कोणा एका व्यक्तीला दोष देण्यापेक्षा त्यावर यशस्वीरीत्या मार्ग काढून त्या व्यक्तीला त्यातून बोध घेण्यासाठी प्रेरणा देणारी पावले उचलली जातात. अशा कुटुंबांत परस्परांतील मतभेदांकडे दुरावा निर्माण करणारे घटक म्हणून न पाहता एकमेकांचे विचार व दृष्टिकोन समजून घेण्याची संधी म्हणून पाहिले जाते व त्यानुरूप निर्णय घेतले जातात.
बऱ्याचदा The grass is greener on the other side असे सवयीने वाटल्याने इतर कुटुंबं किती सुखी, समाधानी, संपन्न, तंटामुक्त आणि गुणमय आहेत असा विचार स्वाभाविकरीत्या मनात येतो; परंतु या विचारावर जास्त काळ घुटमळल्यास आपल्या कुटुंबावर केन्द्रीत केलेले लक्ष विचलित होऊ शकते. हे नक्कीच आपल्याला आपल्या कुटुंबध्येयांपासून दूर नेते व कृतीपासूनही. प्रत्येक कुटुंब हे विशेष असते. त्यांतील व्यक्ती, त्यांचे स्वभाव, त्यांची मते, त्यांचे दृष्टिकोन सर्वच विशेष. त्यामुळे इतरांच्या ‘साजेशा’ कुटुंबगुणांपासून प्रेरित होऊन आपली कुटुंबध्येये ठरवण्यात काहीच वावगे नाही; परंतु आपल्या कुटुंबाच्या मानसिकतेला काय लाभदायक ठरेल आणि काय हानीकारक, हे ठरवणे महत्त्वाचे. इतर कुटुंबांतील एखादी गोष्ट लाभदायी वाटली तरी ती जशीच्या तशी अवलंबिण्याआधी आपल्या कुटुंबाचे स्वरूप व त्याचे विशेषत्व लक्षात घेण्यास विसरू नये. हवे ते व गरजेपुरते बदल करून मगच ती स्वीकारावी. सौख्याची अशी वाटचाल करत असताना व आपले प्रयत्न त्या दिशेने वळवताना हे नित्य लक्षात ठेवावे, की दैनंदिन उलाढाली व आव्हाने नेहमीच आपल्यासमोर उभी ठाकणार आहेत. परंतु आपली इच्छाशक्ती ढळू न देता एकमेकांना वाटचालीचे स्मरण करून देत व प्रोत्साहित करत पुढे जाणेच उपयुक्त ठरेल.
प्रत्येक कुटुंब व त्यातील कुटुंबीय हे आपण निवडलेल्या जीवनशैलीसाठी जबाबदार असतात. प्रासंगिक भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापेक्षा कुटुंबाच्या तत्त्वांवर व मूल्यांवर आधारित निर्णय कुटुंबीयांना कार्यक्षम बनवतात. विशिष्ट स्वप्न आणि यथार्थ जीवन जगण्याच्या हेतूने कार्यरत राहणे, हे कुटुंबाला एका अनोख्या स्तरावर नेऊन पोहोचवते. नियमित आत्मपरीक्षण, कल्पकता, दृढ इच्छाशक्ती, सहकार व विवेकबुद्धी या सूत्रांच्या आधारे कौटुंबिक जीवन सुखी होऊ शकते.
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)
कुटुंबसौख्य
एकमेकांचे अस्तित्व आणि योगदानाप्रति आदर प्रत्येकाच्या मनात असतो व तो योग्यरीत्या वेळोवेळी प्रकट केला जातो.
Written by केतकी गद्रे
आणखी वाचा
First published on: 10-04-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy and unhappy family