‘जोडी’ या शब्दातच एकत्रितपणा दडलेला आहे. परंतु ‘जोड’ हा शब्द अभ्यासला तर त्यात दोन भिन्न व्यक्तित्वांना एकत्रित ठेवणारी रेषा किंवा दुवा असा अर्थ समोर येतो. म्हणजेच ‘जोडी’ या शब्दात द्वैत आणि अद्वैत या दोन्ही संकल्पना दडलेल्या आहेत. त्यामुळे हे द्वैत व अद्वैत दोन्ही जपणे तितकेच महत्त्वाचे ठरते. पती-पत्नी ही जोडगोळी मग या द्वैत-अद्वैतातून कशी काय सुटेल? या नात्यातला जिव्हाळा जितका चर्चेत येतो, तितक्याच, किंबहुना त्याहून जास्त त्यातल्या कुरबुरी. ‘आमच्यात कधीच वाद होत नाहीत’ हे वाक्य (दावा म्हणू या!) बरीच जोडपी उच्चरताना दिसतात. परंतु म्हणण्यात आणि असण्यात बऱ्याचदा तफावत असते. एखाद्या नात्यात- तेही पती-पत्नीच्या नात्यात कधी वादच झालेला नाही हे तसे दुर्मीळच. तसा दावा करणारे मात्र बरेच असतात. परंतु त्यात तथ्य कमीच. घटकाभर हे अगदी खरं जरी मानलं तरीही त्या जोडप्यातला एक शिलेदार कायम पडती, नमती, असक्रिय बाजू घेत असावा हे गृहीत धरण्यास हरकत नाही. स्वत:ची व आपल्या नात्याची प्रतिमा ‘चार लोकांत’ ढासळू नये म्हणून अट्टहासाने ‘सगळे कसे चांगलेच होते, आहे आणि असणार आहे’ असे भासवू पाहणाऱ्या आणि प्रत्यक्षात तसे अजिबात नसणाऱ्यांची खूप ऊर्जा या कसरतीत वाया जाते. आणि हे त्यांना जाणवत असते, परंतु ते मान्य करणे त्यांना कमीपणाचे वाटते. त्यामुळे नवरा-बायकोचे नाते हे कधी घट्ट मूळ रोवलेल्या वडाच्या विशाल झाडासारखे तर कधी काचेच्या वाटेवर चालल्यासारखे असते. या नात्यातील पैलू इतके विविध आहेत की त्यांचे वर्णन करण्यासाठी स्तंभाची ही जागा अपूरी पडेल. त्यामुळे आपण ‘आनंदी जोडपे’ या व्याख्येत चपखल बसणाऱ्या जोडप्यांची मानसिकता पडताळून पाहू. म्हणजे आपण योग्य करत आहोत काय आणि आपल्या नात्याच्या स्वरूपात कोणते बदल मोलाचे ठरतील (नाते आणखीन दृढ करण्यासाठी) याचा अंदाज बांधता येईल. प्रत्येक वैवाहिक नात्याची आपली म्हणून काही वैशिष्टय़े असतात. दोघांनाही पोषक असल्यास ती प्रत्येक जोडप्याने आपापली आवर्जून जपावी. पुढे चर्चिलेले पैलू हे सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत, ज्यांचे अस्तित्व बहुतांश ‘आनंदी जोडप्यांच्या’ आयुष्यात प्रामुख्याने आढळते.
(१) मोकळ्या मनाचे अणि खुल्या दिलाचे श्रोते- ‘नाखूश जोडपी’ एकमेकांचे म्हणणे आणि भूमिका खऱ्या अर्थाने ‘ऐकून’ घेण्यास (म्हणजेच समजून घेण्याचा प्रयत्न करण्यास) मागे पडतात. त्यांचा संवाद हा टीका, मागण्या, हल्ला-प्रतिहल्ला (शाब्दिक किंवा कधी कधी शारीरिकसुद्धा) या चक्रव्यूहात अडकतो. त्यामुळे कोणाचेच ऐकले जात नाही आणि कोणालाही समजून घेतले जात नाही. प्रत्येक जोडीदाराला खोडून काढल्यासारखे, अपमानित, परीक्षार्थी असल्यासारखे आणि टीकेचा बळी झाल्यासारखे वाटत राहते.
या उलट ‘आनंदी जोडपी’ यांचा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न असतो. एकमेकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक गरजा समजून घेण्याकडे त्यांचा कल असतो, किंबहुना आग्रहच असतो. एक व्यक्ती म्हणून तिची परिस्थिती, पाश्र्वभूमी आणि त्यामुळे त्या व्यक्तीची बनलेली भूमिका लक्षात घेऊन ही जोडपी परस्परांची भावस्थिती अभ्यासतात, त्याचे अवलोकन करून, अंदाज बांधून वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. या समतोल भूमिकेमुळे दोन्ही जोडीदार संसारनामक पुस्तकाच्या एकाच पानावर राहू शकतात.
(२) जवळीक साधणारे प्रेमार्थी – ‘आनंदी जोडपी’ आपल्या समतोल संवेदनशीलतेतून केवळ शारीरिक जवळीकच नव्हे तर भावनिक जवळीकही साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील संवाद ‘भाजी आणली का?’ किंवा ‘मुलांना शाळेत पोहचवायचे आहे.’ अशा केवळ सांसारिक दिनचर्येभोवती रेंगाळत राहत नाही. त्यांच्यातील संवाद परस्परांच्या आवडी-निवडी आणि व्यक्तित्व जपण्याभोवती, एकमेकांचे योग्य कौतुक करण्याभोवती, कृतज्ञता व आदर दर्शवण्याभोवती विणलेला असतो. अशी जोडपी एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची संधी आपणहून निर्माण करतात. थोडाथोडका का होईना तो क्षण ते पुरेपूर जगतात. दिवसभरात एकमेकांची आपुलकीने चौकशी करतात, पाळत ठेवण्याच्या हेतूने नव्हे तर एकमेकांच्या खुशालीची काळजी म्हणून. आपल्या शब्दांद्वारे आणि वर्तणुकीतून ते एकमेकांवर असलेला विश्वास आणि जिव्हाळा वेळोवेळी दर्शवतात.
(३)भांडय़ाला भांडे लागते खरे, पण कर्कश्श कलकल नव्हे तर सामंजस्याचा नाद निर्माण होतो. भांडण आणि वाद हे कोणत्याही वैवाहिक नात्याचे अविभाज्य घटक आहेत. पण नाखूश जोडपी हे वाद एकमेकांप्रति वार आणि हल्ला चढविण्यास वापरतात. दीर्घकाळचे अबोले, शीतयुद्ध मग नेहमीचीच स्थिती होऊन बसते. याउलट ‘आनंदी जोडपी’ भांडणादरम्यान एकमेकांचा आत्मसन्मान शक्यतो दुखावला जाणार नाही याची पोक्त काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. तरीही अनावधानाने असे झाल्यास आपली चूक मोठय़ा मनाने स्वीकारतात आणि सुधारतातही. भांडणानंतर आणि भांडणादरम्यानही एकमेकांप्रति आपुलकी कायम ठेवतात.
एकमेकांशी प्रेमळ आणि संयमी संवाद साधून, गरज असेल तेथे शांतता बाळगून, सकारात्मक वाक्यांचा प्रयोग करून, परिस्थितीला साजेशा विनोदाचा समावेश करून, चेहऱ्यावरचे स्मितहास्य कायम ठेवून किंवा सहानुभूतीचा अवलंब करून वादामुळे नात्याला वाळवी लागू देत नाहीत. वरवरच्या शब्दांपेक्षा त्यांच्यामागील सुप्त हेतू आणि गरजा तसेच खोलवर दडलेल्या मानसिकतेचा वेध घेण्यास त्यांना स्वारस्य असते. कारण त्यांच्या स्वत:च्या मानापमानापेक्षा नात्याला असलेल्या धोक्याची त्यांना चिंता असते आणि ते दूर करण्याची लगबगही.
(४) आदरयुक्त आणि सन्मानपूर्वक नाते- ‘आनंदी जोडपी’ आपल्या जोडीदाराच्या व्यक्तित्व आणि वैयक्तिकतेचा सन्मान तर ठेवून त्याचा सांभाळही करतात. एकमेकांप्रति सहिष्णुता दाखवून मतभिन्नतेचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करतात. इतरांसमोर वावरताना आणि आपापसातही एकमेकांना आदरपूर्वक वागणूक देतात, एकमेकांच्या कामांची दखल घेतात, मदत करतात, अडचणी समजून घेतात. भांडणातसुद्धा राग आलेला असतानाही ते आपली संयमाची पातळी शक्यतो ढळू देत नाहीत आणि काही अभद्र वागले-बोलले गेले तर त्याबद्दल माफी मागून आपल्या वागणुकीत बदल घडवून आणतात. एकमेकांच्या चारित्र्यावर टीकेचे शिंतोडे न उडवता एकमेकांचा स्वीकार करतात. मतभेद किंवा वाद होतातच. परंतु ते वादाच्या मुद्दय़ाभोवतीच राहतात. जुने कटु क्षण, प्रसंग, चुका आठवून दोषारोप करणे , जोडीदाराच्या चुकांची सतत उजळणी करणे अशा गोष्टी टाळतात आणि विनाकारण टोमणे मारणे, नावे ठेवणे यापासूनही दूर राहतात. त्यामुळे यावरून आपल्याला काही बाबी नक्कीच अवलंबता येऊ शकतात. वाद किंवा भांडणाचा नात्यावर होणाऱ्या विपरीत परिणामाचा दाह कमी करायचा असल्यास शांततेच्या काळात (जेव्हा भांडणकाळ सुरू नसेल तेव्हा!) एकमेकांप्रति कौतुक, आदर, प्रेम वेळोवेळी व्यक्त करावे. हा संचय संघर्षकाळात निश्चित कामी येतो. इतर वेळी (भांडणेतर वेळी) या भावनांनी ओतप्रोत भरलेल्या नात्यामध्ये कधी जर संघर्ष झाला, तर तो तात्पुरता आहे आणि माझ्या जोडीदाराच्या माझ्याप्रतिच्या या रागाच्या भावनाही क्षणीक आणि प्रसंगापेक्षा आहेत, ही उकल होते. याने भांडणात संयमी भूमिका घेतली जाते. म्हणजेच नात्यात वावरताना सकारात्मक भावनांचा, शब्दांचा, भूमिकांचा मुबलक समावेश जितका, तितकीच नकारात्मकतेशी लढा देण्याची ऊर्जा जास्त आणि हे करणेही तितकेच सोपे आणि आपल्या जोडीदाराला ‘Benefit of doubt’ देण्याकडे कल अधिक. आनंदी जोडपी अशी वागतात.
(५) ‘आम्ही’ वर भर आणि ‘मी’ चाही मान.
आनंदी जोडपी आणि त्यातील जोडीदार आपण निर्णयांचा आपल्या जोडीदाराच्या मानसिकतेवर व जीवनावर काय परिणाम होईल याचा साकल्याने विचार करतात. जोडीदाराच्या आनंदाचा सक्रियपणे विचार करतात. विवेकनिष्ठ वर्तणूक ठेवून, जोडीदाराच्या यशामध्ये आनंद मानतात, त्यांचे कौतुक करतात व आपल्याला आपल्या जोडीदाराच्या यशाचा किती अभिमान आहे, हे आनंदाने सांगतात.
हे सगळे वाचल्यावर, हे दिवास्वप्नातील जोडपे वाटेल. प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक समस्येत हा सर्व सिद्धांताचा अवलंब शक्य असेलच असे नाही. पण आपले नाते या सिद्धांतावर आधारित असावे असे वाटणे, हेही नसे थोडके! जर या सिद्धांतांना आपण आपली ध्येयं बनवली, तर प्रत्येक जोडप्याने ती ध्येयं गाठण्याचा फं-ि ेंस्र् तयार करायला हवा. या नकाशाचे वैशिष्टय़ हे की येथे मुक्काम – स्थळावर पोहचलो असे वाटते पण प्रवास संपला असे होत नाही. वैवाहिक नाते दृढ करण्यासाठी, ही ध्येयं गाठणं अंतिम सत्य नव्हे तर ही प्रवास – प्रक्रिया विचारपूर्वक योजून कशी फतेह करता येईल व मुक्कामस्थळी गाठल्यासही स्थिरावून पुन्हा प्रवासास कसे निघता येईल हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
यात ‘अहं’ पेक्षा ‘हम’ महत्त्वाचा, अद्वैताचा अनुभव घेत द्वैत जपण्याची ही सुवर्णसंधी; आणि पुढच्या पिढय़ा समृद्ध करण्यासाठीचा. मोलाचा दुआ म्हणजे हे नाते!
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा