राधिकाने मनाशी पक्के ठरवले होते, की शनिवार व रविवारची सुट्टी सत्कारणी लावायची. लवकर उठायचे आणि घराची स्वच्छता व आवराआवरी करायची. कोणाकडेही जायचे नाही की बाहेरचे जेवण नाही. घरी छान स्वयंपाक करायचा व कामे आटोपायची. शिवाय, नववर्षांच्या संकल्पांतर्गत ठरवलेली रोज पुस्तकाचे एक तरी पान वाचायचे व नोकरीच्या ठिकाणी उपयोग होईल असा नवीन कोर्स शोधून अभ्यास सुरू करायचा.’ हे दोन्ही संकल्प त्या weekend च्या to- do list मध्ये जागा करून होते. पण शनिवारी राधिकाने उठल्यावर घडय़ाळ पाहिले तर नऊ वाजले होते. लवकर उठण्याचा प्लॅन कोलमडलाच होता. तिला आळसावल्यासारखे होत होतेच. कसेबसे तिने नाश्त्यासाठी पोहे बनवले. गप्पा आणि चहाची दुसरी फेरी होता होता दुपारचे १२ वाजत आले. घरातला पसारा जणू राधिकाला हाक मारत होता, पण राधिकाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारची सकाळ ‘ध्येयप्राप्तीविना’च गेली. दुपारी जरा आराम करून मग काम सुरू करू असेही तिने ठरवले. त्यातच संध्याकाळ उजाडली आणि सिनेमाला जायचे ठरले आणि मग बाहेर जेवण.. शनिवार तिच्या हातातून निसटला. तिला वाईट वाटले, पण उद्या नक्की ठरवल्यासारखे वागू असा पण तिने केला. शनिवारपेक्षा रविवार मात्र जरा लवकर सुरू झाला, पण कंटाळ्याने राधिकाला ग्रासले होते. नेहमीसारखे राहुलला ऑफिसचे काम करायचे होते. त्यामुळे त्याची मदत होणे कठीण. वरवरची कामे अगदी ठरवली होती म्हणून केली गेली. परंतु ठरवलेली ध्येये मात्र तिला गाठता आली नाहीत. एखादा वीकेन्ड असा रेंगाळत गेला असता तर कदाचित चालले असते, पण सलग तीन आठवडे ही चालढकल केल्याने घराचा अगदी बोजवारा उडाला होता. घरातील पसाऱ्यामुळे व तो आवरण्यात चालढकल केली गेल्याने राधिका आणि राहुलला अस्वस्थ वाटत होते, पण म्हणून ते दोघे सारी शक्ती एकवटून पसारा आवरायला लागले, असे अजिबात घडले नाही!
‘आळस’ हा एकमेव आपल्याला हवाहवासा वाटणारा शत्रू आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. चौकटीबाहेरचे किंवा कधी कधी चौकटीतले काम पूर्ण करण्यास आपण कंटाळा करतो. आळसाचा उगम कसा होतो? आळस आपल्याला का ग्रासतो? त्याचे विविध पैलू कोणते? आणि आळसावर मात कशी करावी, याविषयी थोडी चर्चा करू.
आदिमानवाच्या काळात साधनसंपत्तीची कमतरता व अशाश्वतता असताना, आपली ऊर्जा फक्त अति गरजेच्या कामांसाठीच खर्च करणे फायद्याचे होते. त्यामुळे आपले पूर्वज स्वत:ची ऊर्जा जास्तीतजास्त प्रमाणात राखून ठेवत असत. आजूबाजूच्या नैसर्गिक व श्वापदांच्या धोक्यांमुळे ते ही ऊर्जा गरज पडेल तेव्हाच वापरत असत. त्यामुळे टाळता येण्यासारख्या कृतींप्रती ते कमीतकमी कष्ट घेत असत. आपली उत्क्रांती यातूनच झाली. ही मानसिकता आपल्याला आपल्या चर्चेतल्या विषयाशी जोडता येऊ शकते. लेखक व मानसशास्त्रज्ञ कॅल्मन ग्लॅन्ट्झ यांच्या मते, ‘भविष्याचे नियोजन’ ही संकल्पना अस्तित्वात येताच ‘आलस्य’ उदयास आले असावे. आदिमानवांच्या काळात गरज लागली तरच कृती करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे न करण्याचा किंवा चालढकल करण्याचा प्रसंग दुर्मिळच. परंतु गरजेपुरती कृती करून त्या जोडीला भविष्याच्या दृष्टीने जास्त प्रमाणात विचार करणारे लोक तहान- भूक या मूलभूत गरजांव्यतिरिक्त आपली ऊर्जा अन्य कृतींमध्ये जास्त खर्चू लागले व असे न करणाऱ्यांना ‘आळशी’ म्हणू लागले.
आपली ऊर्जा खर्च न करण्याची मानसिकता म्हणजे ‘आळस’ असे म्हणता येईल. ‘आळस’ हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा करणे, ती टाळणे, चालढकल करणे, दिरंगाई करणे या सर्व प्रक्रियांशी निगडित आहे. आपल्यातला प्रत्येकाने याचा थोडय़ाफार फरकाने अनुभव निश्चित घेतला असेल. एखादी कृती करणे अपिरहार्य असतानाही आपण आळशीपणा करतो. आपल्या प्रेरणेमध्ये अडथळे निर्माण होतात. यामागची नेमकी कारणे कोणती ते पाहू- जर हाती घेतलेले काम किंवा पूर्ण करायला लागलेले काम आपल्या आवडीचे नसेल तर आळस वाटू शकतो. ते काम म्हणजे डोक्यावर भले मोठे ओझे ठेवल्यासारखे वाटते. तेव्हा मात्र आपण कामात टाळाटाळ करतो. पण ते काम करणे अनिवार्य असल्यास आपण स्वत:ला कसेबसे पुढे ढकलतो व ते काम जेमतेम पूर्ण करतो. परंतु ते करत असताना आपली नाराजी व्यक्त करण्यास विसरत नाही. एखाद्या गोष्टीचा मोबदला आपल्याला तितकासा मौलिक वाटत नसल्यासही आपण आळसाचे शिकार होऊ शकतो. तसेच आपल्या हातातील काम रंजक व आव्हानात्मक वाटत नसल्यासही आपण कंटाळतो व ते टाळतो. एखाद्या कृतीचे फळ व त्यासाठी लागणारे कष्ट यामध्ये विसंगती असेल, तरीही आपण ती कृती टाळतो. थोडक्यात, परिणाम छोटे आणि कष्ट फार अशी स्थिती आपण टाळतो. एखादी कृती आपण करू शकू की नाही? सुरुवात केलीच तर पूर्णत्वाला नेऊ शकू की नाही? याबद्दलचा आत्मविश्वास नसेल तरीही आपण ती कृती नजरेआड करण्याचा संभव जास्त असतो. एखादी कृती सुरू करण्यासाठी मुळात उशीर झाला असेल तर, ‘आता सुरू करून काय फायदा!’ अशा असहाय्य भूमिकेतूनही आपण कृती टाळतो. अपयशाची भीतीसुद्धा आपल्या आळसाचे कारण ठरू शकते. एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला इतरांच्या मदतीची गरज भासते, पण आपल्याला मदत मिळणारच नाही, असे पूर्वग्रह आपण बांधतो व कृती अवलंबण्याआधीच मागे सरतो. आपला दृष्टिकोन निराशावादी असल्यास आपण प्रत्येक गोष्ट त्याच चष्म्यातून पाहतो व यश आपल्याला मृगजळासारखे वाटते. त्यामुळे त्याच्या सत्यतेबद्दल मनात शंका निर्माण होते व आपण प्रयत्न टाळतो. Diagnostic & Statistical Manual (मानसशास्त्रज्ञांचा मनोविकार- निदान करण्याचा ग्रंथ) दीर्घकाळ टिकणारा निरुत्साह, कोणत्याच कृतीत रस न वाटणे व इतर लक्षणांना ‘नैराश्या’चे सूचक (अस्तित्व) मानते व त्यावर त्वरित उपचार करणे अनिवार्य ठरते. परंतु आपण येथे विकाररहित निरुत्साहाची व आळशीपणाची चर्चा करत आहोत.
कधी कधी आपले शरीर थकल्यामुळे विचारांची गती मंदावते व आपण एखादी कृती टाळतो. किंबहुना ती टाळली जाते. त्याच त्याच गोष्टी सतत सुरू असल्यासही तोचतोचपणा ‘आलस्या’चे कारण ठरतो. स्वत:ला घालून घेतलेल्या शिस्तीचा अभाव असल्यासही आपण आळशीपणाकडे मार्गक्रमण करतो. समजेल असे ठोस कारण नसल्यासही कधी कधी कंटाळा येतो. याला कारण आपली तत्क्षणीची मन:स्थिती, ताण, शीण किंवा व्यक्तिमत्त्वातील काही मूलभूत स्वभावपैलू जबाबदार असू शकतात. काही वेळा पूर्वी घडलेल्या कटू घटनांच्या आठवणींमुळे व नकारात्मक भावनांमुळे आपण एखादी गोष्ट हेतुपुरस्पर टाळतो, हा संभव नाकारता येत नाही.
आळशीपणाची कारणे काहीही असली तरीही दीर्घ काळ टिकणारे आलस्य हे दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करू शकते. त्याचा आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. नियोजनानुसार प्रभाव पडू शकतो व एकंदरच निष्क्रियतेमुळे आयुष्याची घडी विसकटू शकते. आळस टाळावा हे आपल्याला कळतं, पण वळत नाही. आळस टाळायची इच्छा खूप असते, पण कंटाळ्याने आपल्याला इतके ग्रासलेले असते, की सर्व शक्ती व ऊर्जा एकवटून कामाला लागणे कर्मकठीण काम वाटते. तरीसुद्धा आळशीपणावर मात करण्यासाठी काही कल्पना योजू शकतो.
अवघड वाटणारी किंवा अप्रिय कामे करण्यास आपल्याला अनिश्चितता वाटते, परंतु आपल्या इच्छाशक्तीवर अट्टहासाने नियंत्रण आणल्यास व ‘हे काम करणे अनिवार्य आहे,’ हे स्वत:ला वारंवार समजून सांगितल्यास आपण प्रयत्नांच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यास सज्ज होऊ शकतो. हे पहिले पाऊलच सगळ्यात जड वाटेल, परंतु निष्क्रियतेवर मात केल्याचा आनंदही मिळेल. काहीतरी साध्य केल्याचा अनुभव निश्चित येईल. त्यायोगे ते कामही यशस्वीपणे व सहजतेने केले जाईल. ‘आपण उगाचच चालढकल करत होतो,’ असेही वाटेल. काम संपवण्यापेक्षा सुरू करण्यावर भर असावा. एका कृतीपासून दुसऱ्या- सहसा नवीन / नावडत्या कृतीकडे वळण्यासाठी व आपले चित्त एकाग्र करण्यासाठी १५-२० मिनिटांचा सलग प्रयत्न उपयुक्त ठरतो. हा वेळ आपण आपल्यालाच द्यावा. आपल्याला असे लक्षात येईल, की आपण आळशीपणाला आव्हान दिल्यास त्यावर मात करू शकू. ध्येयाच्या दिशेने उचललेल्या प्रत्येक कृतीचा नियमित आढावा घ्यावा, त्याने पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळेल. आळसावर मात केल्यावर गोष्टी खरेच सुरळीत होतात, या अनुभवाचे स्मरण सतत ठेवल्यास ते आपल्याला प्रेरणादायी ठरेल. एखाद्या कामातील तोचतोचपणा घालवण्यासाठी ती गोष्ट इतर विविध व कल्पक पद्धतींनी कशी करता येईल, याचा विचार करावा. मोठय़ा व दीर्घ स्वरूपाच्या कामांचे छोटय़ा भागांमध्ये विभाजन करावे. त्यांचे स्वरूप लक्षात आल्यावर ती कामे सुसाध्य वाटतील. यासाठी स्वत:ला उत्तेजन देण्यासाठी आप्तेष्टांची मदत घेणे उपयुक्त ठरेल. त्यांना आपण काम पूर्ण करण्याबाबत दिलेली आश्वासने आपल्याला आळसावर मात करण्यास प्रोत्साहित करतील. आळस हा बऱ्याचदा सवयीचा भाग असतो; अंगवळणी पडलेला! त्यामुळे सवय बदलण्यास थोडा वेळ खर्च होणे स्वाभाविक आहे. यासाठी ‘2-minute rule’ चा अवलंब मजेशीर ठरेल. ‘वेळेचे नियोजन’ याविषयाचे प्रसिद्ध सल्लागार व लेखक डेव्हिड अॅलेन यांची ही संकल्पना. त्यांच्या मते, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या २ मिनिटांपेक्षाही कमी वेळात साध्य केल्या जाऊ शकतात. त्याची कल्पना येताच त्या त्वरित करून घ्याव्यात. आपल्या ध्यानात कोणत्या कृतीनंतर कोणती कृती हे ठोकताळे मांडलेले असले की संपूर्ण प्रक्रिया सोपी वाटते, करण्याजोगी वाटायला लागते व समोर असलेल्या कामाचे नियोजन कसे करावे हे कळते. याने एक प्रकारचा ‘window – time’ मिळतो. या वेळेत कमीतकमी ऊर्जा व अवधी लागणारी कामे करून घ्यावीत. आपण यावरून समजू शकतो, की याने बुद्धीला व शरीराला चालना मिळते व आपण जास्त वेळ लागणारी अन्य कामे करण्यासाठी या उत्तेजनाचा उपयोग करू शकतो.
आपल्या लक्षात येईल, की आळस झटकण्यासाठी पहिले पाऊल टाकणे सर्वात कठीण, पण सर्वात महत्त्वाचे ठरते. तुमच्या समोर पुस्तक वाचण्याचे ध्येय असल्यास पहिले पाऊल पहिले पान वाचण्याचे.. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे हे ध्येय असेल तर फळाची पहिली फोड खाणे व व्यायाम करणे आवश्यक आहे. हे पहिले पाऊल उचलले तर पुढील कामे आपसूक होतील, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा