मानवी वर्तन-व्यवहाराची सखोल चिकित्सा तसेच त्यातील सकारात्मक बदलांबद्दल चर्चा करणारं मानसशास्त्रज्ञाचं साप्ताहिक सदर..
चुका होणे ही मनुष्यजीवनातील एक सामान्य गोष्ट आहे. कधीच कोणत्याही प्रकारची चूक न केलेली व्यक्ती सापडणे कठीणच. आपण चूक केलेल्या की चुकीचे पडसाद भोगणाऱ्या बाजूला उभे आहोत- यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. चुकीबरोबर माफी ही जोडलेली दिसत असली तरी तिचा अवलंब आपण कोणत्या बाजूस उभे आहोत यावर ठरतो. माफी मागणे वा न मागणे यामागची मानसिकता वेगळीच असते.
चूक झाली तर ‘I am sorry’ ‘ म्हणणे (माफी मागणे) हा संस्कार लहानपणापासून शिष्टाचाराच्या दृष्टीने मुलांवर केला जातो. या शिष्टाचाराचा बऱ्याचदा उपचार बनतो व त्या माफी मागण्यामधील अपेक्षित भावना नाहीशी होते किंवा मुळात ती नसतेच. उपचार म्हणून मागितलेल्या माफीचा परिणाम क्वचितच होतो. बऱ्याचजणांना माफी मागणे ही गोष्ट फारशी रुचत नाही. गरजेची वाटत नाही. त्यामुळे ते ती अवलंबत नाहीत. ‘मी कधीच चुकत नाही. कारण मी नेहमी भानावर राहून विचारपूर्वकच वागतो/वागते’ अशी त्यांची ठाम भूमिका असते. माफी मागणे म्हणजे आपली सूत्रे समोरच्या व्यक्तीच्या हाती सोपवणे असे त्यांना वाटते. छोटीशी चूकही मान्य करणे (त्याबद्दल माफी तर दूरच!) अशांना कर्मकठीण वाटते. हे कमकुवतपणाचे लक्षण आहे अशी त्याची समजूत असते. आपण चुकलो हेच मुळात नाकारल्यामुळे अपराधीपणाची भावना त्यांना क्वचितच शिवते. काहीतरी तोंडदेखली कारणे सांगून ते आपली जबाबदारी सहज झटकतात. इतरांना त्यांचे हे वर्तन आडमुठेपणाचे, अहंकारी आणि स्वार्थीपणाचे वाटले तरी त्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही.
मानसशास्त्रज्ञ ओकिमोटो व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनाने या बाबीवर प्रकाश पडला आहे. त्यांनी केलेल्या प्रयोगांत असे आढळून आले की, चूक झाल्यास कटाक्षाने माफी न मागितलेल्या व्यक्तींमध्ये चुकीकडे दुर्लक्ष केलेल्या व्यक्तीपेक्षा स्वत्वावरील नियंत्रण जास्त प्रमाणात असते. स्वत:बद्दलच्या त्यांच्या भावना सकारात्मक होत्या. ‘चूक झाली की जबाबदारी स्वीकारून त्याबद्दल माफी मागणे’ या प्रचलित व प्रस्थापित सिद्धान्ताच्या विपरीत हे निष्कर्ष आहेत असे वाटते. परंतु त्यातून हा कयास लावणे सोपे, की माफी न मागण्याची ही भूमिका त्या मनुष्याच्या मानसिकतेला पोषक असेलच असे नाही. यामुळे आपले स्वत्व जोपासले जात असल्याचे जरी त्या व्यक्तीला वाटत असले तरीही स्वत्वावर प्रभाव पाडणारे व त्याच्याशी निगडित घटकांवर या भूमिकेचा काय परिणाम होतो याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यातील जीवनमूल्ये व नातेसंबंध हे घटक विशेष महत्त्वाचे. यांसारख्या घटकांच्या जिवावर टोकाची भूमिका घेऊन स्वत्व जपणे किती काळ शक्य होईल हे सांगता येणे कठीण.
केवळ दिलगिरीचे शब्द उच्चारणे अवघड वाटणाऱ्या व्यक्ती व त्यांची याबाबतची मानसिकता त्यांच्या भावनिक जडणघडणीवर प्रकाश टाकते. माफी मागण्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मनावर व भावविश्वावर सहज दिसून येतो. सखोल प्रभाव पडतो. माफी मागणे म्हणजे भीती, लज्जा व दुर्बलता अशा भावनांनी ग्रासलेले मन त्यांना दिलगिरी व्यक्त न करण्यास प्रोत्साहित करते. आपण चुकलो हे मान्य करणे त्यांना धोकादायक वाटते. कारण त्यांना ते सत्य मान्य करणे कठीण जाते. ते आपल्या व्यक्तिमत्त्वावर झालेला हा वार समजतात. आपण माफी मागितल्यास समोरच्या व्यक्तीला आपल्यावर आणखी दोषारोप करण्याची संधी दिल्यासारखे त्यांना वाटते. आपण माफी मागितल्यास घटनेची जबाबदारी आपल्यावरच येते व समोरची व्यक्ती मुक्त होते, या भावनेतून ते माफी मागणे टाळतात. वेळप्रसंगी राग, चिडचीड, कुरबूर, भावनिक दुरावा त्यांना चालतो. पण माफी मागितल्याने सामोरे जावे लागणाऱ्या आपल्यातल्या कमतरता, दुर्बलता व चुकांचा सामना करणे त्यांना कठीण वाटते. दुसऱ्याच्या भूमिकेत सजगतेने शिरून शकणाऱ्या व्यक्ती साधारणत: असे वागतात. समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया, मते व प्रतिसाद आपल्यावर आक्रमण करेल या पूर्वग्रहापायी आधीच स्वत:ला सुरक्षाकवचात घालून घेतात. प्रसंगी कोषातही जातात. तर कधी अति आक्रमक बनतात. इतरांना दोष देत आपली सोडवणूक करू बघतात. आपली भावनिक इमारत कोसळू न देण्यासाठी ते परिस्थिती आणि वस्तुस्थिती नाकारू पाहतात व तात्पुरता दिलासा मिळवू पाहतात. आपल्याला माफी मिळेल व दिलासाही- ही शक्यता ते पडताळू पाहत नाहीत. खरे तर ही संधी त्यांनी स्वत:ला दिल्यास त्यांच्या स्वत्वाला बळ व भावनिक स्थैर्य मिळू शकते. क्षमा मागण्याने नातेसंबंधातील ताणतणाव निवळवण्याची संधी मिळू शकते, हे समजल्यास माफी मागणे सहज जमू शकते. आपल्या अहंकारापेक्षा नात्यातला विश्वास आणि मुळात नाते टिकणे महत्त्वाचे आहे असे वाटल्यास दिलगिरी व्यक्त करण्यासाठी अट्टहास करावा लागत नाही. चुका प्रत्येकाच्या हातून घडतात, या गोष्टीचा स्वीकार जितक्या लवकर करू, तितकी माफी मागणे सुलभ! चुकी मान्य करणे, त्याची जबाबदारी स्वीकारणे हे धर्याचे काम आहे. गरसमज दूर करण्यासाठी, सुसंवाद साधण्यासाठी व नात्यात विश्वास निर्माण करण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे ठरते. परंतु ही माफी तोंडदेखली व उथळ नसावी. जवळच्या नातेसंबंधात बऱ्याचदा डोळ्यांतील भाव व देहबोलीतून आपली भूमिका स्पष्ट होऊन समोरची जिवाभावाची व्यक्ती आपल्याला माफही करते. परंतु हे सर्वाच्याच बाबतीत लागू पडत नाही.
आपण माफी मागतो आहोत याचा अर्थ आपण समोरच्या व्यक्तीला विशिष्ट भावनांना सामोरे जाण्यासाठी उत्तेजित केले आहे. दु:ख, शोक, राग, अचंबा, नाराजी व एकंदर त्यांच्या भावविश्वात शिरलो आहोत, आपले विशिष्ट वागणे, बोलणे किंवा गरजेच्या आणि अपेक्षित वागण्या-बोलण्याअभावी समोरची व्यक्ती स्वाभाविकरीत्या प्रभावित झालेली आहे, ही गोष्ट आपण स्वीकारणे महत्त्वाचे! त्यामुळे त्या व्यक्तीचे अस्वस्थ मन शांत करणे हे आपले ध्येय असल्यास आपली वाटचाल योग्य दिशेने होईल व त्या व्यक्तीकडून आपल्याला खरीखुरी माफी मिळेल. असे झाल्यास आपल्या मनातील अपराधीपणा व पश्चात्तापाची भावना दूर होईल. माफी मागताना २११८ सारख्या क्षमायाचना करणाऱ्या शब्दांचा समावेश अनिवार्य आहे. घडलेल्या चुकीबद्दल/ घटनेबद्दल पश्चात्ताप व्यक्त करावा. समोरच्याच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न करून त्या व्यक्तीवर याचा काय परिणाम झाला आहे, हे आदरपूर्वक व स्पष्टपणे कथन करावे. आपल्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या भावनांवर जास्त लक्ष केंद्रित करावे व माफीची विनंती करावी. आपण माफी मागितली तरी ती मिळेलच असे नाही. ते चुकीचं स्वरूप, ती करणाऱ्याचं व्यक्तिमत्त्व व दृष्टिकोन तसंच समोरच्या व्यक्तीच्या क्षमा करण्या- न करण्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. त्यामुळे माफी मिळावी ही इच्छा असावी; आग्रह नव्हे. समोरच्या व्यक्तीस आपल्या विनंतीबद्दल विचार करण्यास वेळ द्यावा. प्रसंगी समोरच्या व्यक्तीकडून आपल्या माफी मागण्याबद्दल दर्शविला गेलेला अविश्वासही पचवावा लागू शकतो. त्या व्यक्तीला काही प्रश्न, संदेह असल्यास त्याबाबत प्रामाणिकपणे चर्चा करण्याची मुभा द्यावी/ घ्यावी. त्याने गरसमज दूर होतील. समोरची व्यक्ती आपली नाराजी/ राग दर्शवेल, त्या प्रकाराबद्दल आपली प्रतिक्रिया मांडेल, हे गृहीत धरावे. पण आपला हेतू प्रामाणिक असल्यास आपण टीकाही झेलू शकू.. माफीची वाट बघू शकू.
चुकीचे स्वरूप तीव्र असल्यास आणि क्षमेस पात्र नसल्यास माफी मिळवणे कठीण जाते. अशावेळी जास्त प्रमाणात भावनिक भूकंपांना सामोरे जावे लागते. ही आंदोलने बऱ्याचदा काळ शमवतो. परंतु या काळात आपण निष्क्रिय न राहता आत्मपरीक्षण सुरूठेवावे. चुकांमधून बोध घेऊन त्या पुन्हा न करण्याचा निग्रह करावा व आपले वर्तन त्या दिशेने ठेवावे. सामाजिक, कौटुंबिक बंधनांचे उल्लंघन करून इतरांना व्यथेत टाकल्याचे आपणच निर्माण केलेले पेचप्रसंग प्रामाणिक हेतूने व योग्य पद्धतीने मागितलेल्या माफीने आपण टाळू शकतो. आपली कृती व भूमिकेबद्दल कायम सजग राहिल्यास माफी मागण्याच्या घटना मुळातच कमी होतील. जीवनप्रवास सुखमय व नातेसंबंधांतील कटुता कमी होईल. हे वाटते तितके सोपे जरी नसले तरीही ते प्रयत्नपूर्वक व योग्य रीतीने अवलंबल्यास त्याचे पडसाद खोलवर उमटतील. आत्मबळ वाढेल. आणि इतरांच्या व आपल्या स्वत:च्या नजरेतही आपले स्थान आदराचे राहील.
ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)
माफी असावी!
मानसशास्त्रज्ञ ओकिमोटो व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनाने या बाबीवर प्रकाश पडला आहे
Written by केतकी गद्रे
आणखी वाचा
First published on: 24-01-2016 at 01:17 IST
मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human behavior and habit