देशवासीयांनी प्रखर लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले. त्यामुळे आज आपण मोकळेपणाने या भूमीवर श्वास घेतो आहोत. स्वातंत्र्य अनुभवत आहोत. परंतु आजही आपल्यातले बरेच लोक पारतंत्र्यात जगत आहेत. नागरिक म्हणून ते स्वतंत्र आहेत, परंतु नात्याच्या ढाच्यात ते परतंत्रच गणले जातील. भावनिकदृष्टय़ा इतरांवर अति प्रमाणात, किंबहुना पूर्णपणे अवलंबून असणे, असे या पारतंत्र्याचे स्वरूप आहे. आयुष्यातले गौण वा महत्त्वाचे निर्णय, आवडीनिवडी, दृष्टिकोन, धारणा व धोरणे या सगळ्यासाठी इतरांवर अवलंबून असणे, ही एक अभ्यासाचा विषय ठरू शकेल अशी मानसिकता आहे.
जीवनात सुखी होण्यासाठी आपल्याला इतरांच्या साथीची गरज भासते, तशीच इतरांनाही आपली गरज असते. एकमेकांवर अवलंबून असणे व हे परावलंबन सशक्त विश्वासातून निर्माण होणे महत्त्वाचे असते. आपल्या साथीदारावर अवलंबून असताना आपण मदतीची हाक मारली की त्याच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येईल याची खात्री वाटावी, आपण त्या व्यक्तीच्या नजरेत विशेष स्थान प्राप्त करून आहोत याची जाणीव असावी, आणि आपल्या भावनिक गरजांची पूर्तता त्या व्यक्तीशी असलेल्या आपल्या दृढ नात्यातून नक्की होईल याची शाश्वती असावी, अशी प्रत्येकालाच आस असते. परंतु आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी केवळ इतरांवर व अशा नात्यावर अवलंबून राहणे हे एक प्रकारचे भावनिक परावलंबन होय.
तेव्हा आधी भावनिक परावलंबन म्हणजे नक्की काय, हे समजून घेऊ. याची लक्षणे आपल्यामध्ये आढळल्यास त्यांचा काय परिणाम होतो, परावलंबन असणे चांगले की वाईट, ते अती प्रमाणात असल्यास त्याचे रूपांतर स्वावलंबनात कसे करावे, हे पाहू या.
आपण भावनिकरीत्या स्वतंत्र व स्वावलंबी तेव्हाच असतो- जेव्हा आपण अनुभवत असलेल्या भावनांसाठी इतर व्यक्ती, भूतकाळ, सद्य:परिस्थितीला आपण जबाबदार धरत नाही; आपण स्वत:ला त्यांचे बळी समजत नाही; स्वैर न वागता आपल्या भावनांची निगा राखतो. आपल्या आयुष्यातील घटनांमधून शिकतो, जबाबदारी स्वीकारतो व नकारात्मक विचार व भावनांनाही स्वीकारतो. तथापि त्यांचा आपल्या मानसिकतेवर होणारे विपरीत परिणाम टाळण्याचे प्रयत्न करतो. भावनिक परावलंबी व्यक्ती आपले संरक्षण, प्रेम, आत्मविश्वास व आत्मबळाकरता इतरांवर (बऱ्याचदा जवळच्या व्यक्तींवर) अवलंबून असतात. यामुळे त्यांची भूमिका सतत एका दबलेल्या व्यक्तीची होऊन बसते. इतरांच्या म्हणण्याला ते सतत लोंबकळत राहतात व त्यांच्यापासून दुरावण्याची भीती त्यांना सतत भेडसावत राहते. आपल्या स्वत्वाच्या कल्पना, भावना व निर्णय या तिन्हीचे लगाम त्यांनी त्या व्यक्तीच्या हाती दिलेले असतात. ही ते त्यांची नैतिक बांधीलकी मानतात. काहीजण तर अगदी रोज ‘कोणता शर्ट घालू’पासून ते ‘आज छत्री नेऊ की नको’पर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी इतरांच्या म्हणण्यावर अवलंबून असतात. इतरांनी दिलेले सल्ले किंवा एक प्रकारची शाश्वती याशिवाय त्यांचे पानच हलत नाही. कोणत्याही प्रकारची सक्रिय भूमिका न घेता समोरच्या व्यक्तीवरच ते आपले निर्णय सोपवतात. या सगळ्यात पुढाकारही त्याच व्यक्तीला घ्यायला भाग पाडतात. या वर्तनाचे टोक गाठल्यास तो व्यक्तिमत्त्व विकार ठरतो. या विकाराने ग्रस्त व्यक्ती ही लक्षणे तीव्र प्रमाणात दाखवतेच; वर कोणतेही काम स्वतंत्रपणे व स्वत:च्या हिमतीवर करण्याचे टाळते. अशी माणसे प्रसंगी समोरच्या व्यक्तीच्या दुष्कृत्यांनाही साथ देईल, त्यांचे समर्थन करेल. कारण त्या व्यक्तीचे आपल्याप्रतिचे प्रेम, जिव्हाळा व आधार गमावण्याचा स्वप्नातही विचार करणे अशांना अशक्यप्राय वाटते. सतत कुणाला तरी लोंबकळत, त्यांचा आधार घेत जगणाऱ्या अशा व्यक्तींना एकटेपण सहन होत नाही. तसे झाल्यास अशा व्यक्ती स्वत:ला असहाय समजतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपण आपली काळजी घेऊ शकतो यावर मुळी त्यांचा विश्वासच नसतो. या अविश्वासामुळे व भीतीमुळे त्यांनी कधीच स्वत:ला ही संधी दिलेली नसते. त्यामुळे त्यांची ही धारणा अधिकाधिक दृढ होत जाते.
अशा प्रकारच्या वागणुकीची पाळेमुळे काही अंशी सांस्कृतिक वारशात दिसून येतात. स्त्रियांनी नेहमी दुसऱ्याचे वर्चस्व स्वीकारून परावलंबी भूमिका बजावावी, ही रीत काही घरांत आजही पाळली जाते. वयाने वा हुद्दय़ाने लहान असणे म्हणजे वरचढ व्यक्तीच्या अंकित राहणे क्रमप्राप्त आहे असे बरेच लोकांचे मानणे असते. परंतु एखाद्याने ते जुमानले नाही तर बहुसंख्य लोकांच्या दबावापुढे अशा व्यक्तीसमोर दुसरा काही पर्याय उरत नाही. सवयीचे झालेले, लादले गेलेले, परंपरेचे नाव देऊन सक्तीतून येणारे हे परावलंबन व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानीकारक ठरते. कारण इतर लोक याचा गैरफायदा घेतात. अशा तऱ्हेने आपल्या अति लोंबकळण्याने समोरच्या व्यक्ती कंटाळू शकतात, राग राग करू शकतात, आपल्याला टाळू शकतात. कालांतराने त्यांना ही जबाबदारी बोजड वाटू शकते. त्यांनी या जबाबदारीतून अंग काढण्याचा थोडासा जरी प्रयत्न केला तरी आपल्याला हरल्यासारखे वाटते. म्हणून भावनिकरीत्या आपण स्वत:वरच जास्त प्रमाणात अवलंबून राहणे हे इष्ट. तसंच आपल्यावर कोणी अशा प्रकारे अवलंबत असल्यास त्याला स्वावलंबनाकडे वळवावे.
आपण भावनिक ‘वेताळ’ आहोत याचे शल्य न मानता, किंवा ही आपली चूक आहे असे न समजता, हे एक आव्हान आहे व ते धाडसाने झेलायचे आहे, त्यावर मात करायची आहे; कारण भावनिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आपले आयुष्य, आपले विचार, भावना आणि भूमिका आपल्या नियंत्रणात आहेत, हा आत्मविश्वास आपल्यात निर्माण होणार नाही. आपण इतरांवर अवलंबून असण्याचा अर्थ हा, की आपण आपल्या गरजांप्रति, विचारांप्रति अनभिज्ञ आहोत, आपण स्वत:च्या भावविश्वात रमलो नाही, आपला आनंद म्हणजे इतरांची जबाबदारी हा समज उराशी कवटाळल्यामुळे आत्मपरीक्षणापासून दूर राहिलो.
स्वत:शी नियमित बोलण्याची वाक्ये (संदेश) व उत्तरे शोधून काढावी असे काही प्रश्न पाहू. त्यांची नियमित उजळणी उपयुक्त ठरू शकते. घरांतील/ कचेरीतील दर्शनी जागांवरही या सूचना लिहून ठेवाव्यात. त्यामुळे त्या ध्यानात राहतील व त्या अवलंबण्याची शक्यता वाढेल.
१) मला माझ्या आयुष्याप्रति व त्यातील माझ्या भूमिका व निर्णयांप्रति सजग, स्वतंत्र आणि सक्रिय राहायचे आहे. २) मी स्वत:ची काळजी घेण्यास समर्थ आहे. नातीगोती व त्यांतील जोडले गेल्याची भावना हा मानवी स्वभाव आहे व गरजही; परंतु मी हे जोडले जाणे म्हणजे पूर्णपणे समोरच्यावर विसंबणे, हे मानणे टाळेन. ३) समोरच्या व्यक्तीच्या मदतीची गरज भासल्यास मी स्पष्टपणे मागेन. परंतु ती व्यक्तीच माझ्या गरजा ओळखून माझ्यासाठी काय गरजेचे असेल ते करेल, अशी बेजबाबदार अपेक्षा धरणार नाही. ४) भावनिक भिक्षा मागण्यापेक्षा मी माझी मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि निर्णयक्षमता सशक्त करण्यात यशस्वी होईन. त्यासाठी पुढील दोन गोष्टींचा आढावा घेईन- अ) आज मी अशा कोणत्या गोष्टींसाठी इतरांवर निष्कारण अवलंबून राहिलो/ राहिले- ज्या मी खरं तर स्वत:च करू शकलो / शकले असतो / असते. ब) मी कोणत्या कठीण वाटणाऱ्या गोष्टी स्वावलंबनाने केल्या. त्यामुळे मला कोणत्या सकारात्मक भावनांचा अनुभव आला. (या अनुभवांची लेखी नोंद करावी आणि आपले स्व-उत्तेजन कमी पडत आहे असे वाटले, किंवा आपण पुन्हा परावलंबनाच्या जाळ्यात अडकतो आहोत असे जाणवल्यास या सूचनांचे वाचन करावे).
तथापि आपण लहान मुले, वृद्ध, काही अंशी अपंगत्वाने ग्रासलेले, अन्यायाने पीडित व्यक्तींकडून ही अपेक्षा न धरता त्यांना लागेल तेव्हा व तेवढी मदत जरूर करायला हवी. त्यांचे असणारे तात्पुरते किंवा दीर्घकालीन परावलंबन ही त्यांची खरीखुरी गरज समजून त्यांना योग्य तो आधार द्यावा.
म्हणजेच आपल्या बाबतीत वेताळाने विक्रमादित्याच्या पाठीवरून नव्हे, तर सोबत चालून परस्परावलंबनाने व एकमेकांच्या साथीने जगाकडे पाहावे, जग अनुभवावे व आनंद उपभोगावा.
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)
भावनेचे वेताळ
जीवनात सुखी होण्यासाठी आपल्याला इतरांच्या साथीची गरज भासते, तशीच इतरांनाही आपली गरज असते.
Written by केतकी गद्रे
आणखी वाचा
First published on: 01-05-2016 at 01:32 IST
मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human emotions and feelings