भूतकाळात रमणे आणि रुतणे या प्रक्रिया निरनिराळ्या आहेत. वेळ दोन्हीमध्ये व्यतीत होतो; परंतु निष्पत्ती मात्र भिन्न-भिन्न! भूतकाळ पुसून टाकणे कठीणच. कारण आपल्या आजवरच्या जीवनप्रवासात गोळा केलेले धडे, बोध, ज्ञान, कौशल्य, विचार, धारणा, भावना आणि अनुभव हे आपली ओळख बनतात. आपण वर्तमानकाळ अनुभवतो तो या घटकांच्याच बळावर. प्रत्येक क्षण हा या पोतडीत नवनवीन गोष्टी भरत असतो व आपला भूतकाळ संपन्न करत असतो. ‘स्वत्वा’चा शोध सुरू झाला की आपण आपला भूतकाळ तपासू लागतो. आपण कोण व कसे होतो, आता कसे आहोत व आपल्याला कसे व्हायचे आहे, या सततच्या अवलोकनाबरोबर आपण सतत गतअनुभवांची कास धरत असतो. हे अनुभव महत्त्वाचे. कारण स्वत:चे स्वत:शीच तुलनात्मक विश्लेषण करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. जुन्या आठवणींमध्ये रमणे मनाला सकारात्मक भावविश्वात नेते. परंतु कटु आठवणी आणि अनुभवांचे सततचे स्मरण मानसिक आरोग्यास लाभदायक ठरणे कठीण. आपण या सकारात्मक व नकारात्मक आठवणींचा कसा अर्थ लावतो, यावर मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. सद्य:स्थितीतील आपली मानसिकता, मानसिक आरोग्याचे स्वरूप व आपले एकंदर व्यक्तिमत्त्व हे आपण भूतकाळात रमतो की रुततो, हे ठरवत असतात. यातून हे स्पष्ट होते की, भूतकाळाचा उल्लेख वारंवार होणे अनिवार्य आहे. किंबहुना, स्वाभाविक आणि गरजेचाही. हा उल्लेख आपण कशा रीतीने करतो, यावरून गतअनुभवांचा कोणत्या स्वरूपाचा अर्थ लावून आपण त्यांचा आपल्या जीवनकथेत समावेश केला आहे, हे समजते. सकारात्मक व नकारात्मक स्वरूपाच्या घटनांशी तादात्म्य प्रस्थापित केल्यास आपण नव्या नजरेने, तटस्थपणे त्यांच्याकडे पाहू शकतो. बालपणी व तारुण्यात आलेले अनुभव हे प्रौढ जीवनाचे अविभाज्य घटक बनतात. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांचा खोलवर व दूरगामी परिणाम होताना दिसतो. हे अनुभव व त्यांचा दर्जा यावर आपण भूतकाळ आनंदाने, तृप्ततेच्या भावनेने स्मरू की पश्चात्ताप आणि तिरस्काराच्या, हे ठरते. सशक्त अनुभव मानसिक आरोग्य जपतात, तर कटु आठवणी, झालेले अन्याय व शोषण आपल्याला स्वास्थ्य लाभण्यापासून मागे खेचत राहतात, मार्गक्रमण खुंटवतात व आनंद उपभोगण्यापासून वंचित ठेवतात. कटु अनुभवांचे सावट आपल्यापैकी बऱ्याच जणांना सतत ग्रासून ठेवते, जखडून ठेवते. त्यातून सुटका करून घेण्याचा पर्याय अवलंबण्याची इच्छा असूनही बऱ्याचदा तसे करता येत नाही, इतक्या तीव्र दबावतंत्राने हे अनुभव कार्यरत असतात. परंतु भूतकाळाच्या दलदलीत रुतून राहण्याने केवळ आपल्यालाच नव्हे, तर आपल्याशी संलग्न व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींवर व त्यांच्या मानसिकतेवरही याचा दुष्परिणाम होऊ शकतो. आपण कळत-नकळत नैराश्याच्या जाळ्यात अडकून पडू शकतो. सतत नकारात्मक प्रसंगांच्या रवंथामुळे त्यातून स्वत:ला मुक्त करण्याऐवजी आपण आणखीन आणखीन त्यात सापडतो. यादरम्यान वर्तमानात येणारे आनंदी क्षणही कधी कधी आपल्या ध्यानातून निसटतात. भविष्यकाळाच्या दिशेने कल्पकतेने मार्गक्रमण करण्यासाठी भूतकाळातील घटनांचा, अनुभवांचा अभ्यास महत्त्वाचा यात वाद नाही; परंतु ही सततची चिकित्सा व उल्लेख उपयुक्त ठरण्याऐवजी हानीकारकच ठरू शकतात. डिंकासारखे चिकटून राहिलेले हे अनुभव आपोआप गळून पडतील ही अपेक्षा बाळगणे निरुपयोगी ठरेल. आपल्यालाच प्रयत्नपूर्वक ते काढून टाकावे लागतील. अर्थात ते नाहीसे होतील असे नाही, परंतु त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तरी बदलेल व आपण स्वत:ला नैराश्याचे बळी होण्यापासून काही प्रमाणात वाचवू शकू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा