जीवनाचे धडे कधी धडाधड समोर येतात, तर कधी धापा टाकत. कधी धाडस घेऊन येतात तर कधी धडकी भरवतात.. कधी धीराने तर कधी धसमुसळेपणाने. या शब्दांकडे नीट पाहिलं तर जाणवतं, की जीवन हे एका विशिष्ट गतीनेच पुढे सरकत असतं.. ही सगळी धडधड, या धापा, हे धाडस, ही धडकी, हा धीर, धसमुसळेपणा काय तो आपल्या चित्तात असतो. जीवन हे सतत निरनिराळ्या धाटणीचे धडे आपल्यासमोर सादर करत असते प्रत्येकासमोर. फरक असतो तो आपल्या ‘धडे’ घेण्याच्या, कळण्याच्या, झेपवण्याच्या, स्वीकारण्याच्या, समजण्याच्या क्षमतेत.. प्रक्रियेत.. मानसिकतेत. असं म्हणतात, की विद्यार्थी (मानसिकरीत्या) तयार असला, झाला की गुरू आपोआप प्रकट होतो. आपण बोध घेण्यास तयार असलो, तर या जीवनकळेला आपल्याला देण्यासारखे भरपूर आहे.

जीवनाचे धडे म्हणजे नक्की काय? त्यांचे स्वरूप काय? हे धडे कसे ओळखावे, अनुभवावे, अवलंबावे आणि त्यातून काय व कसे शिकावे- या प्रश्नांची उत्तरं भिन्न व्यक्तींसाठी भिन्न असतात, कारण जीवन प्रक्रिया ही प्रत्येकासाठी निरनिराळ्या पद्धतीने उलगडत जाते. काही जीवनविषयक धडे हे केवळ त्या त्या व्यक्तीसाठी असतात, काही सामूहिक स्वरूपाचे म्हणजे संपूर्ण कुटुंबाला शिकवण देणारे, समाजाला, राष्ट्राला, विश्वाला बोध देणारे! शाळेत, महाविद्यालयात निरनिराळे विषय शिकवले जातात. काही आपल्याला आवडतात, काही नाही.. काहींमध्ये आपण तरबेज असतो, तर काहींचा उलगडाच होत नाही. आपल्याला आवडो वा न आवडो, जमो वा न जमो; आपल्याला त्यांना सामोरं जावं हे लागतंच. त्यांच्या परीक्षेत कसोटीत उतरावं लागतंच. निकाल कधी मनाजोगा, आपल्या बाजूने लागतो, तर कधी निराशाजनक, परंतु दोन्हीमध्ये ‘बोध’ हा असतोच. आपल्याला काय जमतंय आणि काय जमवण्याचा प्रयत्न करायला लागणार आहे, सातत्य कोठे टिकवून ठेवायचं आहे आणि कधी वेळोवेळी विसावा घेत पुढे जायचं आहे, याचे अंदाज बांधता येतात. जीवनविषयक धडय़ांचेही काहीसे असेच! परंतु हे धडे मुळात ‘धडे’ आहेत याचे आकलन होण्यास आपली मानसिक तयारीही त्या तोडीची असावी लागते. म्हणजेच समोर येणाऱ्या अनुभवाला (संवेदनेला, प्रसंगाला, घटनेला, प्रक्रियेला) विश्लेषणात्मक दृष्टीतून पाहिल्यास, हे शक्य होते. जीवन- धडे म्हणजे आयुष्यातील केवळ मोठे मोठे महत्त्वाचे निर्णयच नव्हे, तर आपले दैनंदिन वर्तनही, म्हणजेच एखादी व्यक्ती दैनंदिन जीवनात कशी पुढे सरकते, वेळ-काळाचा उपयोग कशा प्रकारे करते आणि या सर्वाप्रति काय स्वरूपाचा दृष्टिकोन बाळगते, यालाही महत्त्व आहे. त्यामुळे आकलन- अवलोकन- अवलंब या तिन्ही प्रक्रिया या प्रवासात महत्त्वाच्या ठरतात. दैनंदिन जीवनातील वर्तन, निर्णय, सवयी, आवडी-निवडी, सोपस्कार यांसारख्या गोष्टींवरून व्यक्तीचे स्वरूप काय आहे, हे हुबेहूब नाही, तरी साधारण स्तरावर लक्षात येऊ शकते. लेखिका अ‍ॅनी डिलार्ड म्हणतात तसं, ‘आपण जसे दैनंदिन जीवनात वावरतो, जसे दिवस घालवतो, अगदी तशाच स्वरूपाचे जीवन व्यतीत करतो, या क्षणाला.. या तासाला जे करतो ती आपली कृती ठरते.’ यावरून लक्षात येईल, की आपला जवळजवळ प्रत्येक दिवस आपल्याला किती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता गांभीर्याने घेणं म्हणजे मौज-मजा – हास्य बासनात गुंडाळून अतिगंभीर चेहरा आणि कार्यपद्धती अवलंबणे नव्हे, तर हे आकलन होण्याची की, आपण आपला प्रत्येक दिवस आखतो ती आपली दीर्घकाळाची ओळख असते. थोडक्यात, जीवनविषयक धडे समजून-उमजून घेण्यासाठी आपल्याला वय आणि अनुभव- संख्या वाढण्याची प्रतीक्षा न करता, दैनंदिन वर्तनातून हे ज्ञान अवगत करून घेण्याची गरज आहे आणि ते शक्यही आहे. वयाबरोबर येणारे, अकस्मात येणारे, आपल्याच इतरांच्या कृतीचे पडसाद म्हणून येणारे अनुभव, हे काही थांबणार नाहीत. म्हणजे आपण फलाटावर हजर असण्या वा नसण्यावर जसं ट्रेनचं येणं-जाणं अवलंबून नाही.. ती आपल्या ठरलेल्या वेळेला येते व जाते- जीवनातील अनुभवांचे, धडय़ांचे काहीसे असेच! तसेच ट्रेनमध्ये प्रवेश करायला या ‘हजर’ असण्याला जसे महत्त्व आहे तसेच जीवनविषयक धडे अनुभवण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी, तेथे बौद्धिक, संवेदिक, भावनिकदृष्टय़ा ‘हजर’ असणे गरजेचे आहे. या अधिक, सजगरीत्या हजर असलो की आपल्याला दैनंदिन जीवनातील आणि त्या ओघाने, सर्वागीण जीवनातील घटना- बाबी यांना जवळून पाहता येईल, ओळखता येईल, अनुभवता येईल, अर्थ लावता येईल, निष्कर्ष काढता येईल. हे जीवनविषयक धडे नेमके आकार घेतात तरी कसे, का कुठे दडलेले असतात आणि आपण अशा कोणकोणत्या गोष्टी दैनंदिनीत समाविष्ट करूया, ज्या कारणाने हे धडे आपल्यापर्यंत पोहोचतील, याचाही विचार होणे गरजेचे आहे; नाही का?

Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Loksatta chaturang Life Power Center Pleasure school Fear of Pain
सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा

रोजमऱ्याच्या व्यवहारात, नातेसंबंधांच्या विश्वात, सामाजिक- व्यावसायिक दिनचर्येत, आपण अशा बऱ्याच धडय़ांना सामोरे जातो. संशोधनात्मक निष्कर्ष, निरीक्षणे आणि मानसशास्त्रज्ञांची मते, या सर्वाचा या बाबतीत आढावा घेतला तर व्यक्तिसापेक्ष ध्येय आणि धडय़ांबरोबरच, साधारणत: सर्वसमावेशक असे काही धडे समजले जाऊ शकतात, ही सूची पुरेशी वा पूरक नक्कीच नाही. कारण, त्यात प्रत्येकाचे वैयक्तिक परिस्थितीचे कंगोरे दडलेले आहेत. एखादी घटना घडून गेल्यावरच केवळ नव्हे, तर ती उलगडत जाताजाताही त्यातील बोध ओळखणे, हे लाभाचे ठरते. केवळ झालेल्या चुकांमधून, अयोग्य निर्णयामधून, अर्धवट निष्कर्षांवरून, तर्कहीन सिद्धांतांवरूनच नव्हे, तर सकारात्मक बाबींतूनही शिकण्यासारखे बरेच काही असते. थोडक्यात, असा प्रत्येक क्षण जो चांगल्या-वाईट कारणाने स्मरणात राहिला, तो क्षण शिकवण घेण्याचा. गत जीवनाच्या स्मृतीसंबंधी आणि पुढे उलगडत जाणाऱ्या जीवनपटाच्या दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा, तो मौलिक धडा. उदाहरणार्थ- एखाद्या परिस्थितीत आपण अमूक पद्धतीने वागलो आणि त्याचे अप्रिय पडसाद उमटले, तर आपण आपल्या कार्यपद्धतीचा आढावा घेणे अपेक्षित आहे. यातील त्रुटी आढळल्यास, ‘बिचारा मी.. घाबरलेला मी.. मला काही फरक पडत नाही म्हणणारी मी’ ही टोकं गाठण्यापेक्षा हे पुन्हा घडू नये ही पावले उचलावीत. म्हणजे एकच चूक दोन वेळा घडू नये.. यासाठीचा हा धडा.

जीवनाचे धडे आपल्याला आत्मपरीक्षण करण्यास प्रोत्साहित करतात हे खरे, परंतु आत्मपरीक्षणातूनच मुळी, आपण आपल्या जीवनातील बोध ओळखू-समजू शकतो. कशी आखावी ही प्रकिया- पाहू या.

एखादा प्रसंग घडला की त्याचे परिणाम- पडसादही ओघाने येतात. कधी त्वरित तर कधी दीर्घकाळानंतर. यांचा आढावा घ्यावा. आपण (व इतर लोक) यांची या बाबतीत काय स्वरूपाची भूमिका होती, ती किती अंशी आपल्या व त्यांच्या नियंत्रणात होती, काय टाळता आले असते.. काय बरोबर केले गेले. ‘आपण’ यात महत्त्वाचे घटक असल्यामुळे, या निमित्ताने आपल्याला आपल्या विचार- भावना- आचाराची पद्धत लक्षात आली. आपण संपूर्ण परिस्थिती बदलण्याचा नव्हे, तर आपला त्या दिशेने केलेला प्रयत्न कमी-जास्त करू शकतो का, शकलो असतो का, याचा आढावा घ्यावा.. प्रामाणिकपणे.

ही प्रक्रिया सरावाचा भाग आहे आणि तिच्या नियमिततेवर तिचे यश अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिनीत तिला जितके मोलाचे स्थान आणि वेळ दिला जाईल, तितकाच तिचा स्तर वाढेल, उपयुक्तता वृद्धिंगत होईल.

जीवनाचे धडे, म्हणजे कोणी ‘स्वीकार’ करण्यास शिकतं, तर कोणी पुढाकार घेण्यास, कोणी नातलगांना भावनिकरीत्या आधार देण्यास, नातेसंबंधांची वीण घट्ट बांधून ठेवण्यास शिकतं, तर कोणी आपलं व्यावसायिक काम सचोटीने करण्यास; कोणी धाडस शिकतं तर कोणी पुढे ढकलण्याची प्रवृत्ती; धडा हा घटनेचा निष्कर्ष नव्हे, तर निष्कर्षांतून आपण बुद्धीचा कस लावून काढलेला- लावलेला अर्थ आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेचा खराखुरा ‘अर्क’  म्हणावा लागेल. अर्क हा नेहमी गुणकारी असतो, असे म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे या अर्काच्या मागे लागण्यास, त्याचा पाठपुरावा करण्यास, त्याचा आग्रह धरण्यास लाभ मिळवणे शक्य होईल. म्हणजे, लेखक डॉ. वेन डायर म्हणतात त्या स्वरूपाचे प्रश्न स्वत:ला विचारावे नियमितरीत्या, म्हणजे धडय़ांचे आकलन सहज होईल आणि जीवनाची वाटचाल त्याजोगी, शक्य तितकी आखता येईल.

मी सद्य:स्थितीत काय करत आहे, ते सुरू ठेवायचे आहे? त्याचे प्रमाण कितपत वाढवायचे आहे? मी काय त्वरित सुरू करायचे आहे जे मी अजून केलेले नाही? मी काय करत आहे, ते मला त्वरित थांबवायचे आहे? अजिबात सुरू ठेवायचे नाही?

या प्रश्नांची उत्तरं म्हणजे एखाद्या परिस्थितीतील आपले बोध समजावे. जीवनाने समोर आणलेले हे धडे, जितके विचारपूर्वकरीत्या आणि नियमितपणे अभ्यासले- अवलंबले जातील, त्याचे समर्पक पडसाद, आपल्या विचार- भावना- आचार चक्रात दिसून येतील. प्रत्येक दिवस शिकण्याचा, सुधार स्वीकारण्याचा आणि स्वत:शी एक आत्मीयतापूर्ण, आत्मविश्वासपूर्ण नातं प्रस्थापित करण्याचा!

डॉ. केतकी गद्रे –  ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

Story img Loader