साधारणत: इतरांनी आपण त्यांच्यासाठी केलेल्या कामाची नोंद घ्यावी आणि त्याबद्दल कृतज्ञ असावे, ही इच्छा बहुतांश लोकांच्या मनात असते. काहींच्या मनात सुप्तपणे, तर काहींच्या अगदी उघडपणे. पण समोरच्या व्यक्तीला केलेल्याची कदर नाही, हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याचजणांचा असतो. दुसऱ्याने आपल्यासाठी अपेक्षारहित राहून केलेल्या कार्याची, त्यागाची, उपकाराची नोंद घेण्यासही आपण नेमके कसे काय विसरतो?!
काही लोकांना ते (केलेले) कार्य, त्याग किंवा उपकार तितकेसे महत्त्वाचे वाटत नाहीत, किंवा त्या कृत्याची नोंद घ्यावी/ कौतुक करावे इतकी त्याची थोरवी आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. माझ्यासाठी एखादी गोष्ट करणे ही समोरच्या व्यक्तीची जबाबदारीच आहे.. तिचे ते कर्तव्यच आहे, अशी त्यांची ठाम समजूत असते. एखाद्याने आपल्यासाठी केलेला त्याग इतर शंभर घरांमधून बऱ्याच व्यक्ती करत असतात, त्यामुळे त्यात नावीन्य, असामान्यता किंवा दुर्मीळ असे काहीच नाही, अशीही त्यांची धारणा असण्याचा संभव नाकारता येत नाही. आपल्याला केलेल्या मदतीची जाणीव जरी असली, तरी ती कोणी केली, यावरही बऱ्याचदा हे कौतुक करणे, आभार मानणे किंवा नोंद घेणे अवलंबून असू शकते. त्या व्यक्तीसोबतच्या आनंदी क्षणांपेक्षा पूर्वीचे कटू अनुभव व सुसंवादापेक्षा वादच जास्त असल्यास तिने केलेल्या मदतीकडे दुर्लक्ष केले जाते आणि अप्रिय आठवणींचीच उजळणी जास्त केली जाते. कधी कधी ‘मीच त्याच्यावर इतके डोंगराएवढे उपकार करून ठेवले आहेत- (ही पावती स्वत:ची स्वत:लाच दिलेली असते. ती व्यक्ती खरेच अशी वागली आहे की नाही, कोणास ठाऊक!) त्याची परतफेडच ही!’ मग कसली नोंद आणि कसले आभार? असाही त्यांचा पवित्रा असतो.
तक्रार केली नाही म्हणजेच कौतुक आहे असेही काही लोक मानतात व त्यामुळे तसे वागतात. बरेच लोक एखाद्या व्यक्तीचा स्वभावच तसा आहे म्हणून ती अशी वागते असा समज करून घेतात आणि स्वभावाला औषध नाही याचा दाखला देऊन ही कृतघ्नता स्वीकारतात. कौतुक करणे किंवा आभार मानणे हे आमच्या पूर्वजांनीही कधी केले नाही, तेव्हा ती पद्धतच नव्हती. त्यामुळे आम्हीही ती परंपरा नव्याने रूजू केली नाही, अशी पळवाटही बरेचजण शोधतात. शिवाय, कौतुक किंवा आभार हे वर्तनातून कळतात. त्याला स्वतंत्र शब्दांची जोड द्यायची गरज नाही. अशी शब्दांची जोड दिल्यास भावना कृत्रिम वाटते असेही काहींचे मत असते. काही व्यक्ती स्वत:च तयार केलेल्या एका समीकरणावर विश्वास ठेवतात : ‘मी कोणाकडून कौतुकाची व कृतज्ञतेची अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे मीही कोणाचे कौतुक करत नाही.. आभारही मानत नाही.’
कृतज्ञतेचा अभाव तेव्हाच प्रत्ययास येतो- जेव्हा आपण आपले आयुष्य, त्यातल्या घडामोडी, व्यक्ती आणि वस्तू गृहीत धरतो. मला मार्गक्रमण शक्य करून देणारे पाय, सुंदर कलाकृती निर्माण करू देणारे हात, हे सुंदर जग दाखवणारे डोळे, चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिव्हा, सुरक्षित राहण्यासाठी छत, प्रेमभावाची माणसे या व इतर गोष्टी रोजच्या सवयीच्या झाल्यामुळे गृहीत धरल्या जातात. हे गृहीत धरणे काही काळ बाजूला सारल्यास त्याउलट आपल्या कृतज्ञतेच्या भावनेने, वर्तनाने, शब्दांनी इतरांवर आणि स्वत:वरदेखील काय परिणाम होऊ शकतो, ते पाहू या..
आपल्यासाठी झटणाऱ्या, आपली सोय व्हावी म्हणून प्रसंगी स्वत:ला गैरसोयीत टाकणाऱ्या व्यक्तीला आपल्या कृतज्ञभावाने उल्हास व उत्साह वाटू शकतो. आपण केलेल्या प्रामाणिक कौतुकाचा व डोळस कृतज्ञ व्यवहाराचा तिला प्रत्यय येऊ शकतो. क्षणार्धासाठी ती व्यक्ती आपली दु:खं विसरू शकते. त्या व्यक्तीचा थकवा भावनिकदृष्टय़ा कमी होऊ शकतो. आपल्या प्रयत्नांची दिशा योग्य होती.. केलेल्याचे सार्थक झाले असे त्या व्यक्तीला वाटल्यामुळे मानसिक स्वास्थ्य लाभणे शक्य होऊ शकते. परस्परांमधील नातेसंबंध अधिक दृढ आणि पारदर्शक होऊ शकतात. आपल्या स्वत:लाही त्यातून इतरांसाठी उपयुक्त कसे ठरावे आणि आधार कसा द्यावा, कृतज्ञ राहिल्याचा आनंद व भावनाविश्वात पसरलेल्या त्याच्या कक्षा कशा अनुभवाव्यात याची ओळखही होऊ शकते. हे सर्व अनुभव आपली जीवनकथा बहरून टाकण्यासाठीचे उत्तम साधन ठरू शकतात. आयुष्याच्या उत्तरार्धात आनंदाने या आठवणी चघळता येऊ शकतात.
स्वत:ला आणि इतरांना निखळ समाधान व आनंद देणारी, केलेल्याची जाण व सार्थकता जपणारी आणि व्यक्तीला नव्याने स्वत:ची व इतरांची ओळख करून देणारी कृतज्ञतेची भावना व्यक्त तरी कशी करावी, ते पाहू या-
प्रथम ती व्यक्त करणे जरूरीचे आहे, हे मान्य करू. शाब्दिकरीत्या, देहबोलीतून किंवा वर्तनातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला डोळसपणे आणि जागरूकतेने वावरण्याची, निरीक्षण करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आपल्या स्वत:मध्ये, इतरांमध्ये व आजूबाजूच्या परिस्थितीत काय चालले आहे, कोणते बदल घडत आहेत, स्वागतार्ह बदलांकरिता कोण कार्यरत आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती काळ ती व्यक्ती प्रयत्न करते आहे, त्यासाठी तिला काय त्याग करावा लागला.. या सर्व बाबींचा विचार करून उत्तरे शोधली तर आपल्या लक्षात येईल की, कृतज्ञता अनुभवण्याच्या संधी सहज उपलब्ध होत असतात. आपल्याच नजरेतून कधी कधी त्या निसटतात! नातेसंबंध सशक्त होण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी एकमेकांच्या आधारस्वरूप अस्तित्वाचा विसर पडू देणे हे केव्हाही घातक ठरेल. त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक सौख्यासाठी आपण जाणीवपूर्वक वावरून इष्ट कामांची, त्यागाची नोंद घेत त्याचे महत्त्व ओळखून कौतुक करावे, आभार मानावेत आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी.
आपण जाण ठेवून आहोत याची कल्पना देण्याची
बरीच साधने आहेत. काहीजण ती संबंधित व्यक्तींना हाती लिहिलेली पत्रे पाठवून दर्शवतात. तर काहीजण ई-मेलद्वारे. मोबाइलच्या ऐ३्रूल्ल२ चाही हातभार या प्रक्रियेला लागताना दिसतो. यात एक मूलभूत गोष्ट अंतर्भूत आहे, की आपण उपकारांची जाण ठेवली, त्या व्यक्तीच्या मदतीमुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल व परिवर्तन घडून आले व लाभ झाला. या सगळ्याला जी व्यक्ती कारणीभूत ठरली व कार्यरत होती, तिची सन्मानपूर्वक आठवण ठेवून आपली कृतज्ञतेची भावना शब्दांमधून तिच्यापर्यंत पोहोचविली! कृतज्ञतेची भावना प्रामाणिकपणे मनात असली, जाणिवेत असली, की शब्द मोजकेच असले तरीही देहबोलीतून समोरच्या व्यक्तीला योग्य ती पोचपावती मिळते. मग ती व्यक्तीसुद्धा नेमक्या शब्दांचा अट्टहास धरणेही कदाचित टाळते. तत्परतेला या प्रक्रियेत महत्त्व तर आहेच, परंतु वर्षांनुवर्षांनी जरी एखाद्याकडून धन्यवाद व्यक्त करणारे पत्र आले, तरीही मन सर्व कटू आठवणी विस्मरणात टाकू शकते. त्यामुळे कृतज्ञता बाळगायला/ व्यक्त करण्यासाठी काळ-वेळेचे बंधन नाही. त्याचे काही निकष नाहीत. निव्वळ आपली जागरूकता आणि आपली जाणीव इतरांपर्यंत पोहोचवण्याची तीव्र इच्छा- ही महत्त्वाची! कौतुक आणि आभार केवळ उपचार म्हणून केल्यास शब्द पोहोचतील; परंतु भावना रितीच राहील. त्यामुळे सकारात्मक भावना निर्माण करणारी ही प्रक्रिया निखळ मनातून निर्माण झाली व तिचा सराव होत राहिला तर ती दीर्घकाळ टिकेल आणि वृद्धिंगत होईल, सवयीची होईल.
‘कृतज्ञता’ सवय म्हणून बाळगणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा ‘कल हो, न हो’ या विचारातून कृतज्ञता व्यक्त करण्यात तत्पर असतात. ती व्यक्त करण्याची संधी पुन्हा येईल वा नाही, तसंच आयुष्याच्या अशाश्वतेची जाणीव ठेवून ते अशी संधी हातातून निसटू देत नाहीत. ही सवय स्वत:ला लावून घेण्याचे काही मार्ग..
दर दिवशी वेळात वेळ काढून आपला आजचा दिवस कसा व्यतीत झाला, कृतज्ञता वाटावी अशा काय गोष्टी घडल्या, कोणामुळे त्या घडल्या, याचा आलेख मांडावा. (काहीजण याकरता डायरी/ जर्नलही लिहितात.) आधी उल्लेख केल्याप्रमाणे पत्र हेही एक उपयुक्त साधन ठरते. या जोडीने एक कॅलेंडर बनवणेही मजेदार ठरू शकते. रोज किमान तीन अशा गोष्टी लिहाव्यात, ज्यांच्या अस्तित्वाने (किंवा विशिष्ट घटना घडल्यामुळे) तुम्हाला कृतज्ञ वाटले. एखादे भावलेले भाषण, एखादे भावलेले पुस्तक- त्यातील एखाद्या विचाराने/ मजकुराने तुमच्या आयुष्यात, दृष्टिकोनात, जाणिवेत व कृतीत झालेला सकारात्मक बदल त्या लेखकापर्यंत कृतज्ञतापत्राद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. पत्र लिहिण्यासाठी वेळ न मिळाल्यास किमान स्मरणात तरी आपल्यासाठी झटलेल्या व्यक्तींच्या आठवणींना उजाळा द्यावा व त्यांचे आभार मानावेत.
कृतज्ञता या सकारात्मक भावनेची सवय करून घेतल्यास मानसशास्त्रीय संशोधनाने स्पष्ट केलेले लाभ आपल्याला मूळ स्वरूपात अनुभवता येतील. कृतज्ञतेची भावना बाळगल्याने आणि योग्यरीत्या ती व्यक्त केल्याने शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व स्थैर्य लाभू शकेल. परस्परांतील नातेसंबंध अतूट होतील व आत्मिक समाधान व उन्नती अनुभवास येईल.
खरोखरच, आजूबाजूस आणि स्वत:च्या अंतरंगात डोळसपणे व जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले तर कृतज्ञता वाटेल अशा अनेक गोष्टी आणि व्यक्ती आपल्या प्रत्ययास येतील. ही प्रक्रिया नियमित स्वरूपाची राहावी यासाठी गरज आहे ती- कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या संधी ओळखण्याची, मान्य करून आदरपूर्वक ती व्यक्त करण्याची आणि प्रत्यक्ष या सवयीच्या अंमलबजावणीची!
केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)
जावे कृतज्ञतेच्या गावा..
तक्रार केली नाही म्हणजेच कौतुक आहे असेही काही लोक मानतात व त्यामुळे तसे वागतात.
Written by केतकी गद्रे
आणखी वाचा
First published on: 21-02-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of gratitude