एखाद्या विषयाचे गांभीर्य कळण्यात आपल्या बुद्धीचा निकष लागतो, हे सर्वमान्य आहे. यासारखाच ‘विनोद’ उमगायला आणि कळायलाही बुद्धीच कार्यरत असावी लागते. गांभीर्य जसे काही लोकांनाच जाणवते, तसेच विनोद समजण्यासाठीही जाणिवा तशा विशेष जागृत असाव्या लागतात. म्हणूनच एखादी विनोदी घटना घडली तर त्या घटनेशी संबंधित लोकांचे ओठ किती मापात हसतील, किती दात दिसतील, आणि ही प्रक्रिया कितपत मनापासून घडेल याबाबतीत नेहमी भिन्नता आढळते. तरीही आपल्या आयुष्यात परिस्थितीला साजेशा, योग्य प्रमाणात केलेल्या वा घडलेल्या, संदर्भ असलेल्या निखळ विनोदाचे स्थान शारीरिक-मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय मोलाचे असते. ही मौलिक क्रिया किती प्रमाणात लाभते, उपभोगता येते, हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांवर, ढाच्यावर, व्यक्तिमत्वातील पैलूंवर आणि एकंदर परिस्थितीवरही अवलंबून असते. परंतु एखादी व्यक्ती कधी हसलीच नाही असे उदाहरण दुर्मीळ. काहींचे हसणे अगदीच स्वस्त, तर काहींचे अतिमहाग. तसेच काहींचा विनोद ‘रोजमर्रा’च्या जीवनातील घडामोडींवर आधारित (त्यामुळे जवळजवळ सर्वानाच हसवणारा), तर काहींचा उथळ, इतरांचे व्यंग, न्यूनगंड अथवा कमतरतांवर आधारित (बहुतांश विचारी, विवेकी व्यक्तींना न रुचणारा असा)!
कधी थोडा वेळ का होईना, आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारा साधा, सरळ, निखळ विनोद. संघर्ष, संकटं, समस्यांची तात्पुरती विस्मृती घडवून आणणारा; तर कधी अंतर्मुख करणारा. आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारा. कधी शब्दांची हातचलाखी, तर कधी एकही शब्द न वापरता केवळ चित्र, सूचक खाणाखुणा व देहबोलीतून साकारलेला विनोद! काही लोकांना (विनोदबुद्धीचा अभाव असणाऱ्यांना) कोणताही विनोद हा आधी विनोद आहे, हे कळणेच कठीण. त्यात तो जर तात्त्विक असेल, तर त्यांची भंबेरी उडाली म्हणूनच समजा. विनोद कळून हसणाऱ्या इतरांकडे या व्यक्ती तुच्छ नजरेने पाहतात. तो विनोदच मुळी त्यांना हीन दर्जाचा, निर्थक, विसंगत वाटतो. परंतु विनोद हा प्रत्येकाच्या रुचीवरही तितकाच अवलंबून असतो. विनोद करणे ही प्रकृती, प्रवृत्ती, परिस्थिती, सामाजिक भान आणि जाणीव, संस्कृती, भौगोलिक परिस्थिती, पेशा, व्यक्तित्व, माध्यम, विचारधारा यांसारख्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. त्यात विनोद करणाऱ्या तसेच तो पाहणाऱ्या/ ऐकणाऱ्या वा अनुभवणाऱ्या व्यक्तीच्या प्रगल्भतेचा, शैक्षणिक पाश्र्वभूमीचा, बुद्धिमत्तेचा आणि भावविश्वाचाही त्यात प्रभाव आढळून येतो.
आता ही विनोदाची चिकित्सा वाचून धीरगंभीर, आंबट चेहरा झाला असला तर लेख बाजूला ठेवून द्या आणि हसून टाका. पण पुढे जे वाचले जाणार आहे, खरी गंमत तिथेच दडलेली आहे!
आमचे काळेकाका म्हणजे एक आगळेवेगळे प्रकरण! अहो, ते नुसते दिसले आणि त्यांच्या चेहऱ्यावरची रेष हलते- न हलते तोच लोकांना हसू फुटे. काळेकाका आले की वातावरण कसे हलकेफुलके होते याचा अनुभव सर्वानाच असल्यामुळे ते सर्वत्र हवेहवेसे असायचे. आणि काळेकाकाही आपल्या या (विनोदी) स्वभावाचा पैलू लोकांना मुबलक वाटायचे. लोक तात्पुरते का होईना, आपले दु:ख विसरतात (याचा त्यांना आनंद होता.)- या साध्या, पण मोलाच्या धारणेवर त्यांचे वर्तन आधारलेले होते. मग व्यंगचित्र असो, शब्दकोटी असो, गाण्यांचे व कवितांचे विडंबन असो, पुलंच्या, द. मां. मिरासदारांच्या, शंकर पाटलांच्या लेखनातील असोत किंवा खरोखर घडलेले किस्से सादर करायचे असोत; काळेकाका त्यात पटाईत होते. त्यांच्या स्कूटरचा हॉर्न बिघडला तेव्हा तिचा वेग नियंत्रित ठेवून, शिट्टी वाजवून ते अधेमधे लुडबुडणाऱ्या लोकांना बाजूला सारायचे. लोक आश्चर्यचकित होऊन पाहायचे. या आश्चर्यानंतर काहीजण हसायचे. त्यांना मजा वाटायची. तर काही चिडायचे. त्यांना हे सारे चमत्कारिक, वाह्य़ात वाटायचे! पण लोकांचे हे भावनिक आविष्कार काकांपर्यंत पोहोचण्याआधीच स्कूटर पुढे निघून गेलेली असायची! हसणे आणि हसवणे हा त्यांचा छंद होता. त्यांचा हातखंडा आणि आग्रहही. जीवन जटील, गुंतागुंतीचे आहे आणि त्यात बऱ्याच प्रमाणात दु:ख व क्लेष भरलेले आहेत असे काका मानत. पण हे मानणे उराशी कवटाळून दु:खाचे डोंगर उभे करण्याऐवजी ते हास्याची पठारे निवडण्यास जास्त प्राधान्य देतात. डोंगर चढणे आणि उतरणे हे दमणुकीचे काम. पण पठारावर चालताना त्या तुलनेत दमछाक कमी, वाटचाल जरा जास्त सुसह्य़.. यावर त्यांचा भर होता. विश्वास होता. ‘कोणाला रडवणे सोपे आहे, पण हसवणे अगदी कठीण’ असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आपणा जाणतो, की कठीण गोष्टी हाती घेणारे, त्या झेपवू शकणारे निवडक, मोजकेच असतात. त्यामुळे विनोदवीरांना सलाम! काळेकाका अशांतील एक!
काळेकाकांचे आयुष्य गरिबीतून सुरू झाले आणि आता ते मध्यमवर्गात येऊन विसावले आहे. परंतु आपल्या विनोदी पैलूने त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या पाहता त्यांना श्रीमंतच म्हणावे लागेल. काळेकाकांनी खूप आव्हाने स्वीकारली. दु:खे पचवली. मुले परदेशात जाऊन आई-वडिलांना विसरल्याची.. त्यामुळे नातवंडांना कधीही न पाहायला मिळाल्याची, आपल्या तब्येतीच्या सततच्या कुरबुरींची, पत्नीच्या आजाराची, इत्यादी. प्रसंगी तेही कंटाळले, चिडले, वैतागले, थकले, खचले. पण विनोदाची कास मात्र त्यांनी बिलकूल सोडली नाही. म्हणजे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले नाही असे नाही. ते हसण्यावारी नेण्याच्या आग्रहामुळे आपल्या कर्तव्यांत चुकले का? तर- नाही. हशा पिकावा म्हणून इतरांना त्यांनी कमी लेखले, अपमानित केले का? तर- नाही. आपल्या विनोदाची पातळी प्रगल्भ ठेवून, आयुष्यातील घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोण तसेच या घटनांची कारणमीमांसा, चिकित्सा करताना विनोदबुद्धी शाबूत ठेवून आणि त्या घटनांमधील मजेदार गोष्टी नजरेतून निसटू न देता ते आयुष्य हसत हसत जगत आले. ते आपणही विनोद करत आणि इतरांनी आपल्यावर केलेले विनोदही तितक्याच ताकदीने झेपवत आणि त्यावर हसतही. आपल्या कमतरतांचा न्यूनगंड बाळगण्याऐवजी त्यांना ते गमतीदार चर्चेचा विषय बनवीत. त्या कमतरतांवर लक्षपूर्वक एकीकडे कामही करत असत. ‘हसते हसते.. कट जाए रस्ते’ ही त्यांची ठाम भावना. आणि त्यालाच साजेसं असं त्यांचं वर्तन.
संशोधकांनी विनोदावर बराच शास्त्रीय अभ्यास केलेला आहे. मेंदूतील काही विशिष्ट भाग हा विनोद करण्याशी/ कळण्याशी संबंधित आहे. मेंदूचा हा भाग बौद्धिक आणि भावनिक माहिती संदर्भासहित एकत्रित करतो. त्यामुळे एखाद्या विनोदाचा अनुभव घेताना या भागाचा कार्यभाग महत्त्वाचा ठरतो. थोडक्यात काय, तर आपल्या मेंदूमध्ये आणि मेंदूमुळे चालणाऱ्या या प्रक्रिया विनोदाशी केवळ संलग्नच नव्हे, तर त्यातूनच उगम पावतात. कोणताही विनोद कळण्यासाठी लक्षपूर्वक श्रवण आणि एकाग्रता, त्यातील नेमकी माहिती/ मजकूर ध्यानात ठेवणे, त्याचा मथितार्थ समजून घेणे आणि मग विनोदाच्या नेमक्या गाभ्याशी ((punch) शी जोडणे, संदर्भ लावणे या सव गुंतागुंतीच्या प्रक्रिया ‘विनोद’ या महासंकल्पनेत दडलेल्या आहेत. चटकन विनोद समजून, पटकन हसू येणे या निमिषात घडणाऱ्या प्रक्रियेत या सखोल प्रक्रिया दडल्या आहेत. म्हणजे त्यांचा वेग किती, हे आपल्या लक्षात येईल. या प्रक्रिया जर धीम्या, संथगतीने घडत असल्यास किंवा क्वचितप्रसंगी मुळात घडतच नसल्यास आपण अशा लोकांना ‘लेट करंट’ म्हणतो. आणि त्यांना ‘जोक’ समजावून सांगणे आपल्यासाठी ‘ट्रॅजेडी’ बनते. शास्त्रज्ञांचं हेही मानणे आहे की, विनोदबुद्धी ही आनुवंशिकतेत दडलेली असते. म्हणजे, जसे funny bone तसेच funny gene म्हणजे हे bone आणि gene आपल्यात नसली तर आपण काय करणार? या कोडय़ाने आंबट, हरलेला चेहरा घेऊन गंभीर व्हायची फारशी गरज नाही. कारण आनुवंशिकतेबरोबरच ‘विनोद’ ही कला आहे (उपजत आहे) आणि आत्मसात करता येण्यासारखे कौशल्यही! अर्थात त्याचे प्रमाण, पातळी आणि दर्जा कितपत गाठता येईल, हे सांगता येणं अवघड. पण ही मर्यादा आडकाठी न समजता आणखी प्रयत्न करण्याचा मार्ग आहेच की आपल्या हाती. म्हणूनच चार्ली-चॅप्लीनचा विनोद हा लॉरेल-हार्डीपेक्षा खूप भिन्न होता. आणि पुलंचे लिखाण शंकर पाटलांपेक्षा! सर्वच मजेदार, विनोदी, पण बाज मात्र वेगवेगळा.
विनोदवीराचे निरीक्षण.. तो काय पाहतो, त्या दृश्याचा त्याच्यावर कितपत प्रभाव पडतो, तो त्यात काय शोधतो आणि शोधलेले लोकांपर्यंत तो कशा पद्धतीने पोहोचवतो.. या सगळ्या गोष्टी भिन्न व्यक्तींमध्ये भिन्न प्रमाणात आढळतात. म्हणूनच विनोद करणारा आणि तो अनुभवणारा संवेदना, समजूत आणि संदर्भ या त्रिसूत्रींत एकाच पानावर असतील तर ते खऱ्या अर्थाने समपातळीवर विनोदाचा आस्वाद घेऊ शकतात.
हसरे चेहरे लोकांना आवडतात म्हणून नव्हे, तर हसण्याने विनोदाचा माझ्या आयुष्यात समावेश केल्याने माझा स्वत:चा ताण कमी होतोय का? आयुष्यातील दु:खांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोण बदलतोय का? संघर्ष करण्यासाठी, आव्हाने स्वीकारण्यासाठी बळ मिळते आहे का? थोडक्यात, काळेकाकांसारखे मला बनता येत आहे का, ते पाहू या!
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)
हसताय ना?!
काळेकाकांचे आयुष्य गरिबीतून सुरू झाले आणि आता ते मध्यमवर्गात येऊन विसावले आहे.
Written by केतकी गद्रे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-08-2016 at 01:32 IST
मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laughter in human activity