आमच्या ओळखीत एका शिकलेल्या, चांगली नोकरी असलेल्या मुलाचे लग्न जमवण्याचा बेत आखला जात होता. स्थळ कसं हवं, त्याला कशी मुलगी बायको म्हणून पसंत पडेल, याचे आडाखे बांधले जात होते. त्या मुलाची म्हणे एकच अपेक्षा होती- मुलगी ‘पिठ्ठ गोरी’ हवी. मग ती कमी शिकलेली, स्वयंपाक न येणारी, जरा रागीट असली तरी चालेल. ही अवाक् करणारी अपेक्षा आहे. याचे कारण- स्वभाववैशिष्टय़े, गुण यांना मागे टाकून आनुवंशिकतेतून व नैसर्गिकरीत्या अवगत झालेल्या देणगीची प्राधान्याने निवड केली गेली होती. आंतरिक सशक्त मानसिक सौंदर्य डावलून बाह्य़ (शारीरिक) वैशिष्टय़ांवर भर दिला गेला होता. स्वरूपापेक्षा रूपाला महत्त्व दिले गेले. म्हणजे लग्नसंबंधांमध्ये एकमेकांची मानसिकता किती साजेशी आहे हे पाहण्यापेक्षा हा गोरा म्हणून बायकोही केवळ उजळ नव्हे, तर अगदी ‘पिठ्ठ’ गोऱ्या कांतीची हवी- याला प्राधान्य दिले गेले. नवल म्हणजे अशी मुलगी त्याला सापडलीही. लग्न झाले. दोघांच्या कांतीचा रंग उजळ; पण नात्यातला रंग मात्र फिका पडू लागला. कोणतेही नाते व त्याची सुदृढता ही फार काळ व्यक्तींच्या केवळ ‘दिसण्यावर’ नव्हे, तर ‘असण्यावर’ टिकून राहते. समोरच्या व्यक्तीच्या गोऱ्या, सुंदर दिसण्यावर- म्हणजेच रूपावरच आपण प्रथम आकर्षिले जातो आणि त्या व्यक्तीला सकारात्मकतेच्या चष्म्यातूनच न्याहाळतो. ही एक आपोआप घडणारी मानसिक प्रक्रिया आहे. याच मानसिकतेचा पुरेपूर फायदा त्वरित गोरेपण बहाल करणाऱ्या तथाकथित ‘fairness cream’ च्या उत्पादकांनी घेतलेला दिसतो. म्हणजे कृष्णवर्ण असणे हा नैतिक गुन्हा असावा, इतपत त्यांची मजल गेलेली पाहून वाईट वाटते.
‘शारीरिक आकर्षकता’ या विषयावर केलेल्या तीन दशकांच्या संशोधन व अभ्यासातून डॉ. पॅटझर यांच्या लक्षात आले की, चांगल्या (आकर्षक) दिसणाऱ्या व्यक्ती या अधिक प्रमाणात हुशार आणि प्रामाणिक असतात. या आकर्षक व्यक्तींकडून आपल्याला मान्यता मिळावी, आपुलकी मिळावी म्हणून बऱ्याच व्यक्ती झटतात, हेही त्यांना आपल्या संशोधनात्मक प्रयोगांवरून लक्षात आले. एवढेच नव्हे तर तान्ह्य़ा बाळांवर केलेल्या प्रयोगांतून हे ताडले गेले की, ती बाळंही आकर्षक चेहऱ्यांच्या व्यक्तींकडेच दीर्घकाळ व आत्मीयभावाने पाहत राहतात. आकर्षक व्यक्ती या जास्त आनंदी, यशस्वी असतात, हे इतरही बऱ्याच प्रयोगांवरून स्पष्ट झालेले आहे. लोक ही धारणा पक्की बाळगतात. परंतु काही संशोधकांनी अशा प्रयोगांवर आणि निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, या धारणेचा उगम नैसर्गिक स्रोतात/ उत्क्रांतीत असण्यापेक्षा व्यक्तीच्या संस्कृतीत दडलेला आहे. म्हणजेच आपण वावरत असलेल्या संस्कृतीत जर विशिष्ट प्रकारची कांती, बांधा, चेहरेपट्टीला सरस आणि वरचढ मानले जात असेल, तर या धारणा आपल्याही मानसिकतेत उतरतात. आपण त्या आत्मसात करतो, मानतो आणि हीच मान्यता येणाऱ्या पिढय़ांनाही बहाल करतो. पाश्चिमात्य देशांमध्ये व मानसिकतेवर प्रसारमाध्यमांचा विलक्षण पगडा आहे, हे तिथलेही अभ्यासक मानतात. त्यामुळे जाहिरातींद्वारे बिंबवली जाणारी आकर्षकतेबद्दलची मते ग्राह्य़ धरून बरेच लोक वावरतात. आपल्या काही पौराणिक कथांमधून रूपाने मोहित केल्याचे बरेच दाखले असले तरीही आपला सांस्कृतिक वारसा हा रूपापेक्षा स्वरूपाला महत्त्व देणारा आहे यात शंका नाही. परंतु हल्ली जाहिरातदारांचे वर्चस्व आणि प्रेक्षकांच्या मानसिकतेवर असणारा त्यांचा पगडा नाकारणे कठीण. त्यामुळे सांस्कृतिकदृष्टय़ा दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या ‘रूपा’ला आज यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग मानला जाऊ लागण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली दिसते, हे दु:खद आहे. म्हणूनच कदाचित आकर्षक दिसणाऱ्या नटाने खासगी आयुष्यात कुकर्मे केली- अगदी लोकांच्या जीवाला धोका वा इजा जरी पोचवली- तरीही त्याच्या रूपेरी पडद्यावरच्या रूपाच्या आधारावर त्याच्यावरील चाहत्यांचे प्रेम अधिकच वाढताना दिसते. अगदी त्याचा गुन्हा ही अनवधानाने घडलेली चूक आहे, हे मानण्यापर्यंत या चाहत्यांची तयारी असते. हे काहीसे चमत्कारिक आहे, पण असे घडताना आपण आजूबाजूला पाहतो. या रूपाच्या वर्चस्वाधारेच आपण बऱ्याचदा मित्रपरिवार, जोडीदार, नोकरी-व्यवसाय निवडत असतो आणि केवळ शारीरिक आकर्षिततेचे निकष लावून एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवणे, त्यावरून त्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यात समावेश करणे वा न करणे हे अयोग्य ठरेल, भेदभाव केल्यासारखे भासेल, घातक सिद्ध होईल हे माहीत असूनसुद्धा आपण बऱ्याचदा हेच करतो. यावर उपाय काय, हा प्रश्न कायमच अनुत्तरित राहतो. पुन्हा आपण हा भेदभाव करणाऱ्याच्या की सोसणाऱ्याच्या बाजूस आहोत, यावरही आपली उपाययोजना अवलंबून असते. आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे, की आकर्षकतेकडे एखादी व्यक्ती आकर्षिली जाणे ही आपोआप घडणारी प्रक्रिया आहे हे जरी मान्य केले तरीही त्यानंतरची आपली भूमिका, भाव-वर्तनस्थिती (त्या व्यक्तीप्रति) कसा आकार घेते, यावर सारे अवलंबून आहे. म्हणजेच बाह्य़ रूपाने आकर्षक गोष्टीप्रति मोहित होऊन ‘First impression is the last impression’ या उक्तीत अडकून जर त्या व्यक्तीच्या संभाव्य अवगुणांना, स्वभाव, वागणूक व विचारधारेतील त्रुटींना जर पाठीशी घालणार असू, तर जीवनप्रवासातील ऐन मोक्याच्या क्षणी, मानवी मूल्ये, विकेकबुद्धी व कौशल्य अपेक्षित असलेल्या प्रसंगांमध्ये आपण या व्यक्तीसंदर्भात तोंडावर तर आपटणार नाही ना, हे पाहावे. म्हणजे ‘दर्शन मोठे आणि लक्षण खोटे’ असे नको व्हायला. व्यक्ती आणि तिचे व्यक्तिमत्त्व हे बहुरंगी, बहुढंगी असते. त्यात दिसण्या-असण्याचे विविध पैलू दडलेले असतात. बऱ्याचदा आपल्या स्वभाववैशिष्टय़ांप्रमाणे आपण इतरांमधल्या स्वभाववैशिष्टय़ांची निवड करत असतो आणि इतर वैशिष्टय़ांकडे कधी कधी आपसूक दुर्लक्ष होते, तर कधी हेतुपुरस्सर! आपण आपल्या विचारधारेप्रमाणे आकर्षक असणाऱ्या गोष्टींना चिकटून राहतो. पण कालांतराने अनुभवांती आलेल्या प्रगल्भतेने आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलतात आणि त्यामुळे आपले दृष्टिकोनही! त्यामुळे केवळ आकर्षक शरीरयष्टी आणि चेहरेपट्टी याने मोहित होऊन प्रस्थापित केलेले संबंध योग्य आहेत का, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. (जो विचार या बाबींच्या आधारावर केलेल्या निवडीच्या आधीच होणे खरे तर आवश्यक असते!) प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व हे शारीरिक आणि मानसिक गुण-अवगुणांवर उभे असते. आपले व्यक्तिमत्त्व बहरणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज असते; आणि सुखी समाजाचीही! रूपसंवर्धनाकडे आवर्जून लक्ष देणे, आपण रूपवान असावे असे वाटणे गैर नाही. लौकिकदृष्टय़ा आपण परिपूर्ण असावे, इतरांवर आपल्या रूपाची किंवा आपल्या रूपामुळे छाप पडावी हे वाटणेही अगदी स्वाभाविक आहे. परंतु सौंदर्य ही वैयक्तिक कल्पना-संकल्पनांनी नटलेली बाब आहे. Subjective आहे. त्यामुळे त्यात व्यक्तीभिन्नताही आलीच. परंतु ‘स्वरूप’ कसे असावे, या वर्णनामध्ये विचार व मतभिन्नता फारशी आढळत नाही. त्यामुळे आपली ध्येये स्वरूपसंवर्धनाभोवती योजिलेली असणे केव्हाही लाभदायक. म्हणजेच कोणाला गोऱ्या कांतीची व्यक्ती मोहित करते, तर काहींना गव्हाळ कांतीची. परंतु प्रामाणिकपणे वागणारी, समंजस, विवेकनिष्ठ स्वरूपाची व्यक्ती सर्वानाच मोहित करते. या गुणांचे ‘shelf life’ ही बाह्य़ रूपाच्या shelf life पेक्षा दीर्घ असते. आता यातून निवड कशी करायची, कशास प्राधान्य द्यायचे, त्यामागील कारणे काय असावीत, याचा प्रत्येकाने विचार करायचा आहे. ‘रूप’ हे पहिली छाप पाडायला महत्त्वाचे आहे असे थोडा वेळ मानले, तरीही त्याच्या जोडीला जर साजेसे ‘स्वरूप’ नसेल तर ते व्यक्तिमत्त्व पूर्णस्वरूप मानता येणे कठीण. परंतु याउलट स्वरूपाने मोहित करणाऱ्या व्यक्ती लौकिकदृष्टय़ा रूपवान नसल्या तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या मार्गक्रमणात कोणतीही बाधा येऊ शकत नाही. म्हणजेच रूपाला स्वरूपाची जोड लागते, गरज भासते; परंतु स्वरूप हे स्वयंसिद्ध आहे. त्यामुळे आता दोहोपैकी नक्की कोणाची कास धरावी, हे आपण ठरवावे आणि कोण कुठची कास धरतो, यावर त्या व्यक्तींची आपल्या जीवनातील जागा निश्चित करावी.

केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader