‘आत्मविश्वास’, ‘आत्मपरीक्षण’, ‘आत्मसात’.. ‘आत्म’ या संकल्पनेला जोडून तयार झालेले हे शब्द व्यक्तिमत्त्व विकासात सकारात्मक योगदान करू शकतात. योग्य तेवढा आत्मविश्वास, नियमित आत्मपरीक्षण व आत्मसात केलेली सुयोग्य मूल्ये व तत्त्वे. स्वत्व बहरून टाकणाऱ्या या मानसिक प्रक्रिया. परंतु स्वत्वाला चमत्कारिक भूल पाडणारी व ‘स्व’ला नको इतकं उंचावणारी (ज्या उंचीवरून सारे जगच थिटे करून दाखवणारी) ‘अतीव आत्मप्रीती’ हा आपला आजचा विषय आहे. आत्मप्रीतीसुद्धा व्यक्तिमत्त्व विकासास उपयुक्त ठरते. पण या शब्दाला ‘अतीव’ जोडले जाणे व त्यापेक्षाही ‘आत्मपूजा’ हा व्यक्तिमत्त्वाचा ढाचा बनणे हे काही फारसे उचित नाही. ते का व कसे, ते पाहू.
आत्मप्रीतीवाद वा आत्मपूजा यास इंग्रजीत Narcissism असे म्हणतात. हा योग्य अनुवाद ठरेल असे नाही, पण शब्दाचा तात्त्विक अर्थ समजण्यास अयोग्य नक्कीच ठरणार नाही. केवळ ‘मी’, ‘मला’, ‘माझे’ नव्हे, तर मी‘च’, मला‘च’ व माझे‘च’ अशी धारणा बाळगणारे व त्या अनुषंगाने वागणारे ते आत्मपूजक. आपल्या सांस्कृतिक वारशाच्या मापदंडांनी अशा व्यक्तीला आपण स्वार्थी व स्वकेंद्रित ही बिरुदे लावू शकू. पण व्यक्तिकेंद्रित संस्कृतीच्या मापदंडाप्रमाणे हे वागणे सामान्यत: अपेक्षितच! परंतु त्या संस्कृतीतही या स्वभावाचे भलते टोक गाठलेल्यांचा तिथले लोकही सत्कार करीत नाहीत. विकाराकडे मार्गक्रमण करणारी ही आत्मपूजा, हा ‘मी’पणा, हा अहंकार (सांस्कृतिक वीण कोणतीही असो-) याचा निषेधच केला जातो. हा ‘ I…. Me… Myselfll attitude विकार कधी बनतो ते पाहू. ‘नार्सिसिझम’ची काही लक्षणे मानसशास्त्रज्ञांच्या ‘निदान-ग्रंथा’त (Diagnostic & Statistical Manual) असून, ती संक्षिप्त व सोप्या स्वरूपात येथे मांडत आहे. ही लक्षणे आपल्या स्वत:मध्ये कदाचित जाणवतील. काही प्रसंगांमध्ये आपण किंवा अमुक व्यक्ती अशी वागली होती, किंवा एखादी व्यक्ती नेहमीच अशी वागते असेही आपल्याला वाटेल. पण केवळ येथे उल्लेखिलेल्या लक्षणांवरून एखाद्या व्यक्तीला हा व्यक्तिमत्त्व विकार आहे असे गृहीत धरणे अनुचित ठरेल. ही लक्षणे आपल्यामध्ये थोडय़ाफार फरकाने वेगवेगळ्या स्थिती-परिस्थितीत आढळतात. ती प्रासंगिक असतात. परंतु जेव्हा आत्मपूजेचे टोक गाठून आपण जीवन जगतो व आपल्या प्रत्येक हालचालीत व वागणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसू लागते तेव्हा व्यक्तिमत्त्व विकार डोकावतो आहे असे समजावे. थोडक्यात, एखाद्या व्यक्तीला नार्सिसिझम व्यक्तिमत्त्व विकार आहे की नाही, असे म्हणण्यापेक्षा लक्षणांची तीव्रता किती आहे, याचा अभ्यास होणे गरजेचे असते. तेव्हा ही प्रातिनिधिक लक्षणे अंतिम सत्य मानून आपल्या आसपासच्या लोकांचे नामकरण करणे कटाक्षाने टाळावे. नार्सिसिझम व्यक्तिमत्त्व विकाराचे निदान केवळ मानसिक आरोग्यतज्ज्ञच करू शकतात.. त्यांचे ज्ञान व प्रशिक्षणाच्या आधारे!
नार्सिसिस्ट व्यक्ती- आपण तिला सोयीसाठी ‘आत्मपूजक’ म्हणू- ही स्वत:ला अतिशय महत्त्वाची व्यक्ती समजते व हा समज अतितीव्र व मोठा मनोवेधी असतो. आपल्याला भरपूर यश, सत्ता, हुशारी, रूप लाभलेले आहे, या कल्पनाविश्वात ते सतत रमतात.. वावरतात. आपण कोणीतरी विशेष आहोत, अद्वितीय आहोत व आपले व्यक्तिमत्त्व हे केवळ दिग्गज व ख्यातनाम व्यक्तीच समजू शकतात, किंवा या व्यक्तींच्या सान्निध्यात व मापदंडांनीच ते समजले जाऊ शकते असे ते मानतात. लोकांनी सतत आपले कौतुक करावे, मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. (दासबोधात रामदासस्वामींनी मान मिळेल तेथे सतत जाणाऱ्या इसमास ‘मूर्ख’ म्हटले आहे. असो!) नातेसंबंधांतही आपल्या स्वकेंद्रित दृष्टिकोनामुळे ते इतरांची पिळवणूक करताना आढळतात. स्व-अनुभूतीचा अभाव असल्याकारणाने ते इतरांच्या इच्छा व गरजा ओळखायला, त्यांना महत्त्व द्यायला तयार नसतात. इतरांप्रती ते सतत मत्सर बाळगतात व इतर लोकही त्यांच्यावर जळतात अशी त्यांची भावना असते. अतिशय उद्धट, हेकेखोर, निंदायुक्त व अपमानास्पद असे त्यांचे वागणे व एकंदर रोख असतो. ही काही लक्षणे वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की, या व्यक्ती टीका सहन करू शकत नाहीत. ते टीका म्हणजे दुसऱ्याने आपल्यावर हल्ला चढवला आहे असे समजतात व सावध होतात. स्वरक्षणासाठी आपली स्वभावशस्त्रे बाहेर काढतात. कधी कधी विषयच बदलून टाकतात, किंवा विचारलेल्या प्रश्नाला बगल देत काहीतरी असयुक्तिक उत्तर देतात. त्यांच्या अहंकाराला छेद देणे खरं तर अतिशय सोपे असते. पण समोरच्या व्यक्तीची अशा स्वरूपाची कृतीही ते सहन करू शकत नाहीत. त्यांच्या वागणुकीतून ते स्वत्वाबद्दल किती सुरक्षित व सुसज्ज आहेत असे सहजगत्या दाखवत असतात, परंतु मनाच्या एका कोपऱ्यात ते असुरक्षित व भीतीयुक्त जगत असतात. त्यात न्यूनगंडही त्याचे अस्तित्व दाखवून देत असतो. ते सतत इतरांना आपली बाजू पटेपर्यंत सिद्ध करून दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. (ती पटली नाही तरीही बऱ्याचदा लोक त्यांच्यापासून पळ काढण्यासाठी ती पटल्याचा देखावा करतात, ही गोष्ट वेगळी!) स्वत:चे कर्तृत्व किती विलक्षण, असामान्य आहे, हे ते सतत उद्धृत करीत असतात. I am always right या भूमिकेत वावरणाऱ्या अशा व्यक्तींशी संघर्षांच्या वेळी तर सोडाच; नुसता साधा संवादही अतिशय कठीण असतो. कोणताही व कोणाबद्दलचाही विषय कल्पकतेने आपल्या बाजूने वळवून संवादाचा केंद्रबिंदू बनू पाहणाऱ्या अशा व्यक्तीशी जमवून घेणे अवघडच. येता-जाता अशी व्यक्ती आढळल्यास आपण काणाडोळा करू शकतो एक वेळ; पण दररोज अशा व्यक्तीशी संपर्क येत असल्यास आपण आपला बचाव कसा करावा व त्या व्यक्तीस सामावून कसे घ्यावे ते पाहू..
‘My way or the highway’ असा दृष्टिकोन बाळगणाऱ्या व्यक्तीमुळे आपण सहज गोंधळून जाऊ शकतो, दुखावले जाऊ शकतो. स्वत:च्या भावनांची निगा राखणे ही आपली जबाबदारी आहे, हे प्रथम ओळखावे. त्यामुळे आत्मपूजकांच्या स्वैर व स्वकेंद्रित वागण्याने आपले आत्मबल आपण ढळू देणार नाही, असा चंग बांधावा व सुनियोजित पावले उचलावीत. तटस्थ राहून आपल्या नात्याच्या स्वरूपाकडे पाहावे. या व्यक्ती आपल्या वाक् चातुर्यातून व वागणुकीतील सफाईच्या आधारे आपल्या अपूर्ण आश्वासनांवर, खासगी मर्यादांच्या त्यांनी केलेल्या उल्लंघनावर पांघरूण घालू शकतात. अशा घटना अचूक ओळखाव्यात. त्याबद्दल सावध राहावे. सदर व्यक्ती कशी बोलते व कशी वागते, याबद्दल नियमित तफावत जाणवल्यास आश्वासने देताना व घेताना जागरूक राहावे. त्यांच्या करिष्म्याला भुलून न जाता वस्तुस्थितीनिष्ठ राहण्याचा आग्रह धरावा. आत्मपूजेचा अतिरेक आढळल्यास व त्याचा तुमच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्यास प्रसंगी आपल्याला त्या व्यक्तीपासून भावनिक अंतरही बाळगावे लागू शकते. आत्मपूजकांचा स्वभाव बदलण्याचा आपला प्रयत्न जरी वाखाणण्याजोगा असला तरी त्याला यश किती येईल हे सांगणे कठीण आहे. कारण अशा प्रकारे आपण हेतुपुरस्सर संवाद साधताच आत्मपूजक व्यक्ती आपल्याही नकळत आपल्याला हे सहज पटवून देतील की, त्यांना बदलण्याची का गरज नाहीए, तर ती उलट आपल्यालाच आहे. त्यामुळे अशा व्यक्तीशी वागताना व्यक्ती म्हणून स्पष्ट मर्यादा आखणे आपले मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी अनिवार्य ठरते. आत्मपूजकांशी नाते निभावताना आपल्या मूलभूत अधिकारांना बगल दिली जात नाही ना, किंवा ती व्यक्ती हे अधिकार हिरावून घेत नाही ना, हे कटाक्षाने पाहावे. आपल्याला आदराने वागवले जावे, आपल्या भावना, मते व गरजा मांडता याव्यात व आपले आयुष्य सुदृढ व आनंदी करण्याचा आपल्याला अधिकार आहे. या अशा व्यक्तींशी असलेले नाते या अधिकारांआड येत नाही ना ते पाहावे. इतरांच्या अधिकारांना आपण इजा पोहोचवत नाही ना, याचा विचार करावा व आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी शक्ती एकवटावी. आत्मपूजक या अधिकारांना मुळात इतरांचे अधिकार मानतच नाहीत. त्यांचे जग हे सतत फक्त त्यांच्याभोवती फिरते व फिरावे अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु आपल्या आयुष्याची मालकी ही आपलीच आहे, हे नैतिक सत्य बाळगून जबाबदारीने आत्मपूजकांचा सामना करावा. आपला विनम्र स्पष्टवक्तेपणा सोडू नये. आत्मपूजक हे कदाचित त्यांच्या जडणघडणीच्या काळात दुखावल्या गेलेल्या व्यक्ती असू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन प्रसंगी त्यांना माफ करावे. सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया न देता करुणाभावाने, पण तटस्थपणे भूमिका घ्यावी. उदा. माझ्या साथीदाराचा स्वभाव अहंकारी, आत्मपूजक आहे. असहकारी व अविवेकी कुटुंबात जीवन व्यतीत करून इथपर्यंत येणे नक्कीच सोपे नाही, असे मानावे. आपली ही भूमिका त्यांच्या वागण्याचे समर्थन करणे नव्हे, परंतु आपल्या मनाशी त्यांच्या अस्तित्वाबद्दल साधलेला संवाद आहे. त्यामुळे त्यांच्या गुणांची आठवण ठेवून, भावनिकदृष्टय़ा ते सीमित, कमकुवत आहेत हे समजून घेऊन, त्यांना त्यांच्या आत्मपूजक भूमिकेची जाणीव/ माहिती असेलच असे नाही, हे लक्षात ठेवून, वस्तुनिष्ठ अपेक्षा ठेवून व आपल्या मानवाधिकारांचा सन्मान ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा. त्या व्यक्तीचा व तिच्या स्वभावाचा सतत विचार करणे टाळावे. ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा भाग असली तरी तिला वर्चस्व गाजवू देऊ नये. आत्मपूजकाबरोबरची वाटचाल खडतर वाटत असल्यास आप्तेष्ट आणि प्रशिक्षित तज्ज्ञांकडून वेळीच मदत घ्यावी.
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Atul Subhash Suicide Note last 12 wishesh
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Story img Loader