मानसशास्त्रीय समुपदेशनाबद्दल लोकांच्या काही विशिष्ट कल्पना, ठोकताळे, भ्रम आणि भावना आहेत. या एकंदर प्रक्रियेबद्दल असणारी त्यांची मते साधारणत: ऐकीव माहिती वा स्वानुभवावर आधारित असतात. मानसशास्त्रीय समुपदेशनाची गरज नक्की कोणाला, हा प्रश्न बऱ्याचदा चर्चेत येतो. खरे तर प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ही गरज भासतेच. समुपदेशन त्या प्रत्येकासाठी- जो भावनिक व शारीरिक समस्यांना सामोरा जात आहे, ज्या समस्यांचा त्याच्या जीवनावर परिणाम होत आहे आणि ज्याला यातून सुयोग्य मार्ग काढून आनंदी व सुदृढ व्हायचे आहे. समुपदेशन त्या प्रत्येकासाठी- ज्याला मानसिक आरोग्याच्या संपन्नतेची गरज भासते, व्यक्तिमत्त्व विकासाची इच्छा असते व जो कौटुंबिक, सामाजिक घटकांच्या सौख्याची आकांक्षा बाळगतो.
असे असूनही बऱ्याचजणांच्या मनात मानसशास्त्र व मानसशास्त्रीय समुपदेशनाविषयी संदेह असलेला आढळतो. या संदेहाची कारणे म्हणजे या प्रक्रियेबद्दलचे काही ठाम विचार व मते. यामुळे समुपदेशन अवलंबिण्यावर होणारा विपरीत परिणाम अधिक तीव्र होताना दिसतो.
बरेच लोक समुपदेशन टाळतात. तेही या ठाम धारणेवर- की त्यांना त्यांच्या मानसिकतेची पूर्ण जाणीव आहे व नक्की काय करायचे आहे याची पुरेपूर माहिती त्यांना आहे. फक्त पाऊल तेवढं उचलण्याची खोटी! त्यांच्या मते, ज्या व्यक्ती मनाने कमकुवत असतात, ज्यांना सतत कोणत्यातरी आधाराची, टेकूची गरज असते, अशांनाच समुपदेशनाची गरज असते. त्यामुळे समुपदेशन अवलंबिणाऱ्या व्यक्तींकडे तुच्छतेने पाहायला, त्यांना हिणवायला ते कमी करत नाहीत. आपल्या मानसिक स्थितीबद्दल अथवा समस्यांबद्दल कुटुंबातील वा आप्तेष्टांच्या वर्तुळाबाहेरील एखाद्या अनोळखी व्यक्तीला सांगणे, हे ते कमीपणाचे लक्षण मानतात. आपले आयुष्य व त्यांतील घटना याद्वारे चव्हाटय़ावर येतात असे मानून ते समुपदेशन टाळतात. ‘समुपदेशनामध्ये फारसे तथ्य नाही. तो वेळेचा अपव्यय आहे. नुसते बोलून प्रश्न सुटत नसतात’ हा विचार मनी बाळगून ते समुपदेशनाबद्दल अपप्रचार करतात. समुपदेशन अवलंबणे म्हणजे आपण मानसिक रुग्ण आहोत व मानसिक रुग्ण असणे ही एक सामाजिक दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे, असे काहीसे समीकरण ते मांडताना दिसतात. केवळ दैवी शक्तीमुळेच आयुष्य सरत असते, घटना घडत असतात व फक्त धार्मिकतेच्या आधारे (प्रार्थना, ध्यानधारणा, इ.) कोणत्याही नकारात्मक प्रसंगावर मात करणे सहजशक्य आहे यावर त्यांचा विश्वास असतो. आयुष्यातील समस्यांना त्यांची तीव्रता न जोखता गौण मानण्याकडे त्यांचा कल असतो. प्रत्येक समस्येवर उपाय म्हणजे ‘काळ सरला की सगळे आपोआप ठीक होईल’ हे नेहमीचे बोल. समुपदेशकांकडून सल्ले घेण्यापेक्षा- तेही पैसे मोजून- मी माझ्या मित्रांकडून, स्नेह्य़ांकडून मोफत मार्गदर्शन घेऊ शकतो, या विचारातूनही समुपदेशन टाळले जाते. समुपदेशनाचा अवलंब करायला लागणे म्हणजे स्वत:च्या बुद्धिमत्तेची, आत्मविश्वासाची, ‘स्व’त्वाची, कौटुंबिक एकजुटीची हार आहे असेही बऱ्याच लोकांचे मानणे आहे. या मानण्यामुळे समुपदेशन टाळले जाते. बऱ्याचदा समुपदेशन प्रक्रियेबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे ती करून घेण्यापेक्षा ती प्रक्रियाच टाळणे त्यांना सोयीचे वाटते. आणि ही प्रक्रिया अवलंबण्यापेक्षा अज्ञानातून जन्मलेली तात्पुरती सोय ते बघतात. शरीरावर खरचटले तर जखम तीव्र होऊ नये म्हणून ते त्वरित मलमपट्टी करतात; पण भावनिक दुखापत झाल्यास भावनिक प्रथमोपचार आणि वैचारिक मलमपट्टी करणे मात्र ते गरजेचे मानत नाहीत.
समुपदेशनाप्रतिच्या आपल्या मतांवर आपल्या संगोपनाचा, जडणघडणीचा, सांस्कृतिक स्वरूपाचा, सामाजिक दृष्टिकोनाचा, व्यक्तिमत्त्वाचा परिणाम होत असतो. आपले कुटुंबीय व स्नेह्य़ांची समुपदेशनाबद्दलची काय भूमिका आहे, याचाही प्रभाव त्यात दिसून येतो.
गोपनीयता (शोषण प्रसंगांव्यतिरिक्त) राखणाऱ्या व शास्त्रीय स्वरूप असणाऱ्या समुपदेशन प्रक्रियेबद्दल नेमकी माहिती व त्यातील सूक्ष्म व स्थूल बाबींचे ज्ञान याबद्दल विस्तृत चर्चा म्हणूनच गरजेची आहे.
समुपदेशन ही प्रक्रिया शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित आहे. कालबद्ध आणि ध्येयनिष्ठ. विविध स्वरूपांच्या आणि तीव्रतेच्या समस्यांवरच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठीही समुपदेशन उपयुक्त तोडगा ठरू शकतो. समुपदेशनाचा अचूक अवलंब केल्यास एखादी समस्या तीव्र होण्यापासून वाचते. आपल्या अडचणीच्या काळात आप्तेष्टांचा आधार आपल्याला महत्त्वाचा असतो यात शंका नाही. परंतु काही वेळा एखादी अडचण दूर करण्यासाठी तटस्थ भूमिका घेऊन त्या समस्येकडे पाहणे, तिचे पैलू अभ्यासणे, जीवनघटकांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे व सर्वागीण निर्णय घेणे गरजेचे असते. त्यावेळी कधी कधी आप्तेष्टांची आपल्याबाबत असलेली मते व पूर्वग्रह सकारात्मक/ नकारात्मकदृष्टय़ा या निर्णयाच्या आड येऊ शकतात. अशावेळी शास्त्रीय प्रशिक्षण घेतलेले समुपदेशक ही भूमिका योग्य तऱ्हेने बजावून, आत्मीयतापूर्वक सुयोग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरक व पोषक वातावरण निर्माण करू शकतात. सक्रिय साथीदाराच्या रूपात आपल्या अडचणींकडे पाहण्याचा व त्यावर कल्पक कार्यपद्धतींचा उपयोग करून मात करणे महत्त्वाचे ठरते. आपल्याला योग्य ते व योग्य वेळी प्रश्न विचारून संयमाने आपले म्हणणे, वागणे ऐकून, पाहून, त्यांतील पोषक व प्रतिकूल विचार, भावना, कृतीचा व या त्रिसूत्रीतील सुसूत्रता व विसंगतीचा अभ्यास करून समुपदेशक समुपदेशनाची प्रक्रिया जबाबदारीने पार पाडत असतात. प्रशिक्षित समुपदेशक आपली खासगी मते, भूमिका आपल्यावर लादणे टाळतात व आपल्याला व्यक्ती म्हणून उपजत प्रवृत्तींसकट स्वीकारतात. समुपदेशकांचा विश्वासपूर्ण नाते जोडण्यावर भर असतो. आपल्या बोलण्याने, आवाजाची पट्टी व देहबोली यांतून ते आपल्याप्रति आदर व आपुलकी दर्शवतात. इतरांना साधारणत: विक्षिप्त व नकारात्मक वाटणाऱ्या आपल्याबाबतच्या भूमिका ते न नाकारता स्वीकारतात व गरजेचे बदल सुचवून, समंजसपणे विवेकी विचार-आचार करण्यास प्रेरित करतात. परिस्थितीचे योग्य अवलोकन करून व आपल्याला स्वीकार करण्यास मदत करून परिस्थितीजन्य निर्णय घेण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समुपदेशक या सर्व प्रक्रियेची कल्पक बांधणी करतात. मात्र, परस्पर-सल्ला देणे व आपल्या वतीने परस्पर-निर्णय घेऊन कार्यपद्धती अवलंबणे कटाक्षाने टाळतात. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला सशक्त करणे- या स्वरूपाचे त्यांचे ध्येय असते.
समुपदेशनाच्या प्रक्रियेचा आपल्याला किती उपयोग झाला, लाभ झाला, याचे ठोकताळे बांधणे शक्य आहे. जसजशी समुपदेशन प्रक्रिया पुढे सरकते व अखेर संपते तेव्हा आपल्याला आपल्या भूतकाळाकडे, ‘स्व’त्वाकडे, सद्य:परिस्थितीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा, ती पूर्णपणे स्वीकारण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. व्यक्ती म्हणून वृद्धिंगतेची भावना प्रस्थापित होते. आपण आपल्या व्यक्तित्वाकडे नव्याने पाहतो. समुपदेशनात बऱ्याचदा आपल्या कुटुंबीयांच्या, आप्तेष्टांच्या समावेशामुळे ही प्रक्रिया सकारात्मक ठरते व त्याची व्याप्ती मोठी ठरते. समुपदेशनामध्ये आकलन झालेल्या कार्यपद्धतींचा इतर वेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी निश्चित उपयोग होतो. जखमा हळुवार भरून निघण्यास मदत होते. ताण कमी होऊन शारीरिक स्वास्थ्यावरही त्याचा पोषक प्रभाव पडतो. आपले विचार, भावना व कृतीचक्र कसे आहे व ते चालते याची नव्याने ओळख होते. आपले गुण-अवगुण, क्षमता, त्रुटी याबाबत नवे दृष्टिकोन प्रस्थापित होतात. नातेसंबंध दृढ होऊन आपल्याला शांत व सुरक्षित वाटते. आपल्या आत्मविश्वासावर व निर्णयक्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. समस्या निवारणक्षमता वाढते व तणावमुक्त होण्यासाठी आपण कटिबद्ध होतो. संवादपद्धती अधिक जाणीवपूर्वक सहज व जबाबदार बनते. हे बदल तात्पुरते नसून दीर्घकाळ आपली छाप पाडतात. यातच समुपदेशन प्रक्रियेचा विजय आहे. समुपदेशन प्रक्रियेचे हे लाभ अनुभवण्यासाठी प्रशिक्षित, मानसशास्त्रीय सिद्धांतांवर आधारित प्रक्रिया राबवणाऱ्या समुपदेशकाची निवड डोळसपणे करणे गरजेचे ठरते. प्रशिक्षणाबरोबरच आत्मिक ज्ञान, धोरण व जबाबदारीने प्रक्रिया राबवणाऱ्या समुपदेशकाचे निखळ व खरे प्रयत्न आपल्या हिताचे ठरतात यात संदेह नाही. याच्या जोडीने आपलेही प्रामाणिक, सहकार्याचे प्रयत्न या प्रक्रियेला लाभदायक ठरतात.
केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader