रिमा अन् सुप्रिया या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आणि शेजारणीही. त्यामुळे त्यांचा दुपारचा चहा एकत्रच व्हायचा. ‘काळेकाकूंचा मुलगा अमेरिकेत गेला तो अगदी तिकडचाच कसा झाला..’ ‘रोहनला कमी टक्के मिळाले, कारण आई-वडिलांचे कसे त्याच्याकडे लक्ष नाही..’ ‘मितालीला नोकरी लागली ती कशी वडिलांच्या वशिल्याने..’ ‘सावंतांच्या घरातील स्वयंपाक कसा अगदी तिखट असतो..’ ‘डिसोझा दाम्पत्याला कसा रोज ऑफिसला जायला उशीर होतो..’ ‘निवतकरांच्या घरातले इंटेरिअरचे काम किती भडक आहे, आणि पैशांची कशी उधळण झाली..’ यांसारख्या गावगप्पांसोबत त्यांना चहाची मजा काही औरच वाटे. रिमाला बाहेर जायचे असल्याने त्यांची आज नित्याची ही मीटिंग रद्द झाली आणि सुप्रियाला एकटीलाच चहा घ्यावा लागला. त्यामुळे तिला आजचा चहा अगदी फिका वाटला. चहा-साखरेचे प्रमाण तेच; पण आज रिमा सोबत नसल्याने काळे, सावंत, निवतकर यांच्याबद्दलही काही चर्चा घडली नाही. यावर थोडासा विचार केल्यावर सुप्रिया एकदम चमकली. तिच्या हे लक्षात आले, की त्यांच्या गप्पांचा मोठा भाग हा केवळ चहाडय़ाच होत्या.. किंबहुना आहेत. या गप्पांतून त्यांच्या एकमेकींसोबतच्या मैत्रीच्या आठवणी तयार झाल्या असल्या तरी दोघींची दृष्टी आणि विषय किती संकुचित झाले होते याचा प्रथमच तिला साक्षात्कार झाला. या चहाडय़ा तिच्या इतक्या अंगवळणी पडल्या होत्या, की आज तिला अगदी चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते.
त्यावर सुप्रियाने आज एक आगळाच प्रयोग केला. या सर्व व्यक्तींच्या कधीच न चर्चिलेल्या बाबींचा विचार करायचे तिने ठरवले. तेव्हा तिला जाणवले की, काळेकाका आणि काकू त्यांच्या मुलाच्या या भूमिकेने किती दु:खी आहेत.. रोहनच्या आई-वडिलांनी वर्षभर वेळोवेळी सुट्टय़ा घेऊन त्याच्यासाठी पुरेपूर वेळ देऊन पालक म्हणून आपले कर्तव्य बजावले होते. त्यांनी त्याच्यावर अभ्यासाची सक्ती किंवा दहावीचे दडपण येईल असे घरातले वातावरण अजिबात होऊ दिले नाही. परंतु रोहन ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडला आणि ९० टक्के सहज मिळवेल असे वाटत असताना त्याला ८८ टक्के गुण मिळाले, इतकेच. आणि हे गुणही इतरांच्या चहाडय़ा चर्चेचे कारण बनले. मिताली तर स्वहुशारीवरच नोकरीला लागली होती. आपल्या घरातला स्वयंपाक नारळ-गुळाचा म्हणून सावंताचा स्वयंपाक आपल्याला तिखट वाटतो. डिसोझा दाम्पत्य आपल्या आजारी पालकांचे सर्व आटोपून त्यांना औषध वगैरे देऊन मग ऑफिसला निघतात, त्यामुळे त्यांना उशीर होणे स्वाभाविकच नाही का! तसेच निवतकर कुचुंब त्यांच्या घरात केलेल्या इंटेरिअरच्या कामावर खूश आहे. मेहनतीने कमावलेल्या पैशातून त्यांनी हे काम मोठय़ा विश्वासाने इंटेरिअर डेकोरेशनची पदवी नुकतीच मिळालेल्या त्यांच्या भाच्याकडे सोपवले होते. त्याच्या या पहिल्याच कामावर निवतकर कुटुंबीय खूश होते. आज थोडासा वेगळा विचार केल्यावर सुप्रियासमोर या सर्वाची ही नवीनच बाजू उलगडली होती.
चर्चेतील व्यक्ती त्याच; परंतु त्यांच्या आयुष्याची कोणती बाजू आपण उचलून धरतो यावरून आपण त्यांच्या चहाडय़ा करतो की कौतुक, हे ठरते. चहाडय़ा करणे हा मानवी स्वभाव आहे. काही संशोधकांचे म्हणणे आहे की, चहाडय़ा करणे व त्या करण्यास आवडणे हे आपणा सर्वाच्याच आनुवंशिक व जैविक ढाच्यात भिनलेले आहे. एक सामाजिक जीव म्हणूनही आपल्याला चहाडय़ा करायला आवडतात. चहाडय़ा माणसाच्या आयुष्यात मजेदारपणा आणत असल्या तरी त्या गरजेच्या व अनिवार्य आहेत असे म्हणणे मात्र कठीण आहे. काही मानसशास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे दाखवले आहे की, चहाडय़ा करण्याने शरीरात ‘सेरोटॉनिन’ नामक सकारात्मक संप्रेरकाचे प्रमाण वाढते, ताण व चिंता कमी होतात आणि ज्यांच्याशी आपण इतरांच्या आयुष्यातील घडामोडींचे उपहासात्मक, फजितीवजा विश्लेषण करतो, त्यांच्याशी जवळचे ॠणानुबंध निर्माण झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. चहाडय़ांतून लोकांच्या आयुष्यातील चढउतारांची आपल्याला माहिती मिळते हे खरे; आणि वेळप्रसंगी ते गरजेचेही असले, तरी तिखट-मीठ लावून, सत्यतेची शहानिशा न करता पुढे सरकवलेली माहिती ही चहाडय़ांतली नकारात्मक बाब आहे. अति गोड खाण्याने आरोग्यास अपाय होतो हे आपल्याला माहीत आहे. पण जिलेबी वा गुलाबजाम दिसला की हात कसा आपसूक त्याकडे जातो आणि तोंडाला पाणी सुटते.. चहाडय़ांचेही तसेच आहे. त्यामुळे चहाडय़ांच्या दुसऱ्या बाजूचीही चर्चा करणे गरजेचे आहे.
चहाडय़ांमुळे श्रोते वा वक्त्याशी अद्वैत अनुभवास येत असले तरी ज्यांच्याविषयी आपण बोलत असतो त्यांना मात्र परकेच करत असतो. ‘आपण’ आणि ‘ते’ (लोक) असे स्वाभाविक विभाजन होते. इतकेच नव्हे तर नियमित चहाडय़ांमुळे आपल्यातील व ‘त्यांच्या’तील दरी वाढत जाते. चहाडय़ा बऱ्याचदा संकुचित, चुकीच्या किंवा एखाद्या घटनेबाबतच्या आपल्या वैयक्तिक मनोधारणेवर अवलंबून असतात. त्यामुळे ज्यांच्याविषयी आपण चहाडय़ा करत असतो, त्यांनी अथक प्रयत्नांती तयार केलेल्या त्यांच्या प्रतिष्ठेला मात्र धोका पोहोचू शकतो. चहाडय़ांनी आपण इतरांपेक्षा नैतिकदृष्टय़ा किती वरचढ आहोत, ही उथळ भावना आपल्याला स्वत:च्याच नजरेत खूप उंचावू शकते. इतकी, की आपले पाय जमिनीवर राहत नाहीत. म्हणजेच आपल्या कमतरतांची आपल्याला जाणीवही उरत नाही.
चहाडय़ा नैतिकदृष्टय़ा अनेक प्रश्न निर्माण करतात. दुसऱ्या व्यक्तींमधील कमतरता, दु:ख, पीडांबद्दल आपण चिंता व्यक्त करण्याऐवजी त्याकडे चहाडखोर कुतूहलाने बघणे कितपत योग्य आहे? बऱ्याचदा आपला चहाडय़ांचा मानस नसतो किंवा तसा स्वभावही नसतो. परंतु केवळ एखाद्या समूहाचा भाग म्हणून ओळखले जावे यासाठी आपण त्याला बळी पडत असतो. तसेच या समूहाला साथ न दिल्याने आपणच चहाडय़ांचा विषय बनू की काय, या भीतीनेही आपण चहाडय़ा करतो. तर कधी मत्सरातूनही चहाडय़ा केल्या जातात. ‘मी एखाद्या उच्चपदी पोहोचू शकत नाही, मग दुसऱ्या व्यक्तीचे कौतुक करणे हे माझ्यातील न्यूनगंड दाखवल्यासारखे आहे,’ अशा मानसिकतेतूनही चहाडय़ा केल्या जातात. एखाद्याचे वागणे पटत नसल्यास त्याच्या पश्चात त्यावर बोलणे सोपे असते. त्यामुळे संवाद साधून त्या व्यक्तीला त्या बाबत योग्य ती जाणीव करून देण्याची क्षमता व धाडस नसले की चहाडय़ांची कास धरली जाते. काही वैचारिक व कल्पक चर्चा करण्याची कुवत नसणाऱ्या, वरवरच्या वायफळ गप्पांमध्येच रस घेणाऱ्या लोकांचे चहाडय़ा हा आधार असतो. ‘च’ची बाधा झालेल्यांना (उदा. हे असे‘च’ झाले पाहिजे, हे असे‘च’ वाटले पाहिजे, हे असे‘च’ वागले पाहिजे, इ.) इतरांनी निवडलेला भिन्न मार्ग जराही रुचत नाही आणि त्यातून निर्माण होणारा विरोध चहाडय़ांचे कारण बनतो.
चहाडय़ा कराव्यात की न कराव्यात, त्या चांगल्या की वाईट, हा वैयक्तिक प्रश्न आहे. हा चर्चेचा व वादाचाही विषय आहेच. परंतु याची उत्तरे शोधण्याबरोबरच आपणच आपल्याला काही प्रश्न विचारू या..
१) इतरांना वगळून त्यांना परकेपणाची भावना अनुभवू देणारी व्यक्ती म्हणून आपल्याला आपली ओळख निर्माण करायची आहे का? तशी ती झाल्यास आपल्याला चालेल का? २) इतरांबद्दल चहाडय़ा करणाऱ्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू शकतो का? ठेवल्यास ते बरोबर ठरेल का? कशावरून आपल्याबरोबर बसून चहाडय़ा करणारे उद्या आपल्याबद्दलच चहाडय़ा करणार नाहीत? ३) इतरांच्या पीडेमध्ये त्यांना साहाय्य करण्याऐवजी त्याबद्दल तोंडसुख घेणे हे कितपत योग्य आहे? ४) सारासार विचार न करता व आपली स्वत:ची निश्चित भूमिका न बनवू शकणाऱ्या आणि कळपाबरोबर वाहवत जाणाऱ्या व्यक्तींसारखे आपल्याला व्हायचे आहे का? ५) चहाडय़ांमध्ये चर्चिले जाणारे विषय व धारणांमागील सत्य आपण स्वत: पडताळले आहे का? त्याने आपल्या नातेसंबंधांवर काय परिणाम होईल? एखाद्याने आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलेली गोष्ट वा आपण गोपनीयता राखू ही खात्री बाळगून मोकळे केलेले मन, आपण त्याला असे हीन व सार्वजनिक स्वरूप देऊन त्यांचा विश्वासघात तर करत नाही ना?
या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला हवीत. आणि ती शोधण्यास टाळाटाळ होत असल्यास आपण स्वत:ला बजावले पाहिजे की, आपण चहाडय़ांमध्ये जे बोलू ते आपल्याविरुद्धही वापरले जाऊ शकते, नव्हे जातेच. असे आपण स्वत:ला बजावले तरच आपला प्रत्येक शब्द आपण पुन: पुन्हा तपासून बघू. म्हणतात ना- ‘Strong minds discuss ideas, average minds discuss events, weak minds discuss people.’ त्यामुळे आपल्याला यातील कोणत्या पठडीत गणले जावे असे वाटते, हे आपणच ठरवायला लहवे.
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा